अध्याय ३ रा - श्लोक ५१ ते ५३
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
मघोनि वर्षत्यसकृद्यमानुजा गम्भीरतोयौषजवोर्मिफेनिला ।
भयानकावर्त्तशताकुला नदी मार्गं ददौ सिन्धुरिव श्रियः पतेः ॥५१॥
आनंदभरित निर्भय मनीं । वसुदेव चालतां अध्वनीं । पुढें यमाची धाकुटी बहिणी । जाते भरोनि महापूरें ॥९६॥
जन्मूनि चित्सूर्यप्रभाकिरणीं । लोटली विषयाचिये धरणी । आपणामाजीं चिन्मयतरणि । जिणें बिंबवोनि कांपविला ॥९७॥
घेऊनि चित्सूर्यप्रकाशा । जे धांवली विषयलेशा । ते हे यमुना कौरवेशा । महादुराशा जी नांव ॥९८॥
गुणक्षोभाच्या वर्षोत्कर्षें । विपरीत ज्ञानाच्या उपासें । मनोरथजळें भरली असे । विषयध्यासें हेळावे ॥९९॥
महामोहाचा महापूर । एकदांचि भरला अपार । जिचा नेणती पर पार । नर किन्नर सुर सिद्ध ॥७००॥
कामक्षोभाचेनि वेगें । लोटली विषयप्रलोभओघें । वासनाऊर्मींच्या प्रसंगें । फेण दाटुगे तृष्णेचे ॥१॥
वृत्ति क्षेत्र द्वारा सुत । इष्ट मित्र सुहृद आप्त । इत्यादि मोहाचे आवर्त्त । शतानुशत भोंवती ॥२॥
जिचिया पाण्याची खोली । ब्रह्मादिकां नाहीं कळली । उल्लंघितां वयें सरलीं । परी लंघिली नवजाये ॥३॥
भरण मरण दोन्ही चिंता । दोन्ही तटें हे धरित्रीकांता । धैर्यदमाचिया निपाता । ममतावर्त्तामाजीं करी ॥४॥
वितर्कविहंगांचे अनेक पाळे । रागद्वेषांचे पक्षबळें । विषयप्रलोभाचीं स्थळें । सर्वकाळें वसविती ॥७०५॥
ऐशी दुस्तर महाथोर । दुराशायमुना भयंकर । देखिली वसुदेवें सत्वर । हृदयीं श्रीधर धरिलासे ॥६॥
हरि कवळूनि हृदयकमळीं । वसुदेव यमुनेतें न्यहाळी । तंव वाट देखिली मोकळी । झाली तत्काळीं दुखंड ॥७॥
उमजोनि पाहतां रज्जु सर्प । कीं चांदिणां रोहिणी आप । विष्णुस्मरणापुढें पाप । पावली लोप ते तैशी ॥८॥
इहीं दृष्टांतीं उपपादितां । दिसे अत्यंत अभावता । तरी द्विभाग झाली ऐशी वार्ता । काय अन्यथा म्हणावी ॥९॥
एकीकडे तुंबोनि ठेली । येरीकडे वहातचि गेली । मध्यें निःशेष कोरडी झाली । द्विभागबोली ते ऐशी ॥७१०॥
प्रपंचीं दुराशा ओहटली । मोक्षविषयीं दुणवटली । कृष्ण कवळितां कोरडि झाली । वाट मोकळी जीमध्यें ॥११॥
जयापरी लवणार्णवें । हेळिलें याञ्चेच्या लाघवें । मार्ग मागतांही राघवें । अगौरवें न ओपी ॥१२॥
मग देखोनि चंड आवेशा । प्रलयाग्निबाण पातला शोषा । तेव्हां मार्ग वीरश्रीअधीशा । ओपिला जैसा सागरें ॥१३॥
लक्ष योजनांची खोली । सिंधु असतां पादचाले । अपार सेनाहि उतरली । नाहीं भिजलीं पादतळें ॥१४॥
हें असो पाशीं असतां श्रीकृष्ण । भवाब्धीच आटे पूर्ण । तेथ यमुनेचें जीवन । आश्चर्य कोण खंडतां ॥७१५॥
ऐशी भयानक सरिता । कृष्ण घेऊनि वसुदेव येतां । जैसा सागरें सीताकांता । तैसा त्वरिता पथ ओपी ॥१६॥
नन्दव्रजं शौरिरुपेत्य तत्र तान् गोपान्प्रसुप्तानुपलभ्य निद्रया ।
सुतं यशोदाशयने निधान तत्सुतामुपादाय पुनर्गृहानगात् ॥५२॥
ऐशी यमुना उतरोनि शौरि । आला गोकुळाभीतरीं । लोटली आहे मध्यरात्रि । लोक नगरीं निद्रिस्त ॥१७॥
रात्रीं निद्रिस्त नरनारी । हें तों आश्चर्य नव्हे भारी । योगमायेची हे नवलपरी । जंगमस्थावरीं सुषुप्ति ॥१८॥
श्वानें न भुंकती कोठें । चोर नाढळती वाटे । महाद्वारादि दारवंटे । मुक्तकपाटें स्वतःसिद्ध ॥१९॥
जैशी लेप्यालेख्याची नगरी । चित्रें दिसती डोळेभरी । प्रवेशतां राजमंदिरीं । कोणी न निवारी निर्जिवत्वें ॥७२०॥
तैसा वसुदेव नंदसदनीं । प्रवेशतां पाहे नयनीं । सर्व आपुलाले स्थानीं । निद्रिस्तपणीं अचेत ॥२१॥
केश ओढितां तत्काळ कळे । परी आयुष्य गिळिलें कोणा न कळे । तैसें योगमायेनें सगळें । केलें आंधळें गोकुळ ॥२२॥
सवेग जाऊनि यशोदेपाशीं । उल्बेंसहित श्रीकृष्णासी । पुढें ठेवूनि सावकाशीं । मग कन्यकेसि उचलिलें ॥२३॥
ठायीं ठायीं जळती दीप । यशोदेसि लागली झोंप । सुईणी लोळती प्रतरूप । थोर प्रताप मायेचा ॥२४॥
मग निघाला झडकरी । येत मंदिराबाहेरी । द्वारें लागलीं पहिल्यापरी । मेघधारीं पद नुमटे ॥७२५॥
महाद्वारा लंघितां नेटें । लागलीं तेथींचींही कपाटें । भरूनि जातां यमुना कांठे । कोरडे वाटे उतरला ॥२६॥
जों जों टाकी पुढें पाय । तितुकीच यमुना मिळोनि जाय । एवं ध्वांतदीपिकान्यायें । आला लवलाहें मथुरेसी ॥२७॥
ज्या स्थळापासूनि सहस्रफणी । मागें आला जातेक्षणीं । परतला त्याचि स्थळापासूनि । वसुदेव भुवनीं प्रवेशला ॥२८॥
नगरीं प्रवेशला सत्वर । तंव पिहित झालें महाद्वार । पुढें ठाकिलें कारागार । जें निजमंदिर वस्तीचें ॥२९॥
जीं जीं उल्लंघिलीं तेणें द्वारें । तीं तीं कळासलीं पूर्वानुसारें । द्वास्थ पौर निदसुरे । झाले चेइरे अळुमाळ ॥७३०॥
देवक्याः शयने न्यस्य वसुदेवोऽथ दारिकाम् । प्रतिमुच्य पदोर्लोहमास्ते पूर्ववदावृतः ॥५३॥
यानंतरें ते नंदिनी । वसुदेवें ठेवूनि देवकीशनीं । लोहशृंखला अवलंबूनि । झाल्या चरणीं निबद्धा ॥३१॥
जैसा पूर्वीं होता बद्ध । झाला तैसाचि निबद्ध । आतां गोकुळींचा अनुवाद । ऐकें विशद कुरुवर्या ॥३२॥
N/A
References : N/A
Last Updated : April 26, 2017
TOP