अध्याय ३ रा - आरंभ

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीकृष्णपरमात्मने नमः ॥
गोविंदसद्गुरुचरणस्मरण । करितां विस्मरणासि ये मरण । तेणेंचि चुकलें संसरण । कार्यकारणसमवेत ॥१॥
इंद्रियवर्गासि जो अविदित । गोविंदनामाचा संकेत । तो सत्प्रकाश्मूर्तिमंत । सद्गुरु म्हणिजे तया हेतु ॥२॥
ज्याचिया गुरुत्वाचिया पोटीं । अनंतब्रह्मांडांचिया कोटी । होऊनि लपती उठाउठीं । स्वप्नसृष्टीसारिख्या ॥३॥
अणूहूनि जें अणुतर । गुरुहूनि गुरुत्वें थोर । जेणें व्यापिलें चराचर । करितां निर्धार अस्पष्ट ॥४॥
सर्वगतत्वें विद्यमान । सर्वीं सर्वग तुझे चरन । विश्वतस्पात् हे जाणोनि खूण । श्रुति सज्ञान प्रबोधी ॥५॥
सर्वगताचा जों विसर । तोंवरी सर्वाचा विस्तार । सर्वातीत अगोचर । स्मरणादर भव नाशी ॥६॥
सर्वगताचें विस्मरण । तंववरी यथार्थ जन्ममरण । विस्मरणासि येतां मरण । निराकरण विवर्त्ता ॥७॥
स्मार्य स्मरण आणि स्मर्ता । एथ इतुकेंचि रूप विवर्त्ता । त्रिपुटी तेथ अनेकता । बीजा आतौता जेवीं तरु ॥८॥
बीज विरूढोनि होय झाड । झाडीं लगडती बीजघड । येणें विस्ताराचि होय वाड । मूर्ख घडामोड मानिती ॥९॥
उगमींहूनि निघे पाणी । तें प्रवाहीं करी धांवणी । तों तों वाढे अनंतगुणीं । उपसंहरणीं तें नव्हे ॥१०॥
जंव जंव उगमा अंतरणें । तंव तंव प्रवाहीं बहुवस होणें । उपरतौनि उगमा नेणें । नाहीं होणें ज्यापरी ॥११॥
शेंडाहूनि वृक्ष रस । परतोनि टाकी जैं मूळास । तैं झाडचि पडे ओस । बीज ना भूस समरसीं ॥१२॥
तैसा विस्मरणेंचि विवर्त्त रूढ । विवर्ते विसर गाढ मूढ । येणें इहामुत्र दृढ । भव अवघट इतुकाची ॥१३॥
एथ सर्वगतत्वें तुझें चरण । स्मरतांचि उडें विस्मरण । सहित सगर्भ संसरण । कार्यकारणसमवेत ॥१४॥
जेव्हां विसराचा निरास । तेव्हांचि स्मरणाचा प्रकाश । जेवीं रात्रि आणि दिवस । एकत्र वास न करिती ॥१५॥
विद्युल्लतेचें जें विस्फुरण । फांकोनि उजळी अवघें भुवन । कां शब्दाचें संवेदन । अंतःकरण क्रमें घे ॥१६॥
सुषुप्ति उजळी जैं जागरा । क्रमेंचि फांकें इंद्रियद्वारा । तैसा उपसंहार होय विसरा । तो अवधारा क्रमरीति ॥१७॥
हें सांगतांचि लागे उशीर । होतां क्रम तो अतिसत्वर । उपाधिपोटीं वेगवत्तर । बिंबे भास्कर ज्यापरी ॥१८॥
परी शब्द स्पर्श रूप रस गंध । विषय अवघा पंचविध । येणें विश्वाभास प्रसिद्ध । दृश्य विविध उपजविलें ॥१९॥
सविश्वासें सद्गुरुवचनें । दुःखदोषादिदर्शनें । इहामुत्रार्थीं विरक्त होणें । तेव्हां करणें उपरमती ॥२०॥
मनपवनाच्या पक्षवेगें । आत्मप्रकाश बाहेरी निगे । तो इंद्रियोपरमेंचि मागें । फिरोनि निजांगें उपरमे ॥२१॥
मनचि जालिया उन्मन । प्रकाश विसरे जगृतिभान । ते सुषुप्ति म्हणती शून्य । परी तें ज्ञान घनगर्भित ॥२२॥
मन लपालें अंधकारीं । जागृति बुडूनि गेली विसरीं । चैतन्य ठेलें अगोचरीं । मग निर्धारीं शून्यत्व ॥२३॥
मन निर्बुजोनि आपुल्या ठायीं । कल्पूनि रची सर्व कांहीं । इंद्रियें नेणती स्थूल देहीं । स्वप्न पाहीं या नांव ॥२४॥
ऐशी मनाची लपिटपी । सर्वां विदित आणि सोपी । म्हणोनि सत्यत्व जग आरोपी । विषयरूपी सुखाचें ॥२५॥
एथ सविश्वासें सद्गुरुबोधें । अवस्थात्रयात्मकविवर्तरोधें । चिन्मात्रैक उरे नुसधें । प्रत्यगात्मत्व प्रतिबिंब ॥२६॥
दुग्धामाजीं असे लोणीं । परी तें लाभे निर्मथनीं । तैशी चित्प्रभा विपरीत ज्ञानीं । कालवली ते निवडणें ॥२७॥
सत्य सत्यत्वें निवडलें । मिथ्या मिथ्यत्वें बहुडलें । सर्वगतत्वें श्रवण जालें । विपरीत गेलें विस्मरण ॥२८॥
कार्य तितुकें प्रपंचभान । याचें कारण मूळ अज्ञान । दोहींचेंही अस्तमान । श्रीगुरुचरणस्मरणेंची ॥२९॥
ऐशिया चरणस्मरणसेवा । कृपा उपजली सद्गुरुदेवा । द्वैत उपजवूनि अद्वैत ठेवा । म्हणती बोल ममाज्ञा ॥३०॥
तेथ अकिंचन म्हणियारा । ये आज्ञेचा दयांबुझरा । सांठवणें ओडवी शिरा । दयार्णव खरा या हेतु ॥३१॥
ऐसें स्वामींहीं वरदप्रेमें । गौरवूनि आपुल्या नामें । राबविती स्वेच्छाकामें । आज्ञानियमें निजसत्ता ॥३२॥
आरब्ध श्रीमद्भागवत - । व्याख्यान चालवीं अतंद्रित । विश्वात्मकत्वें आपुले आर्त्त । श्रोते होऊनि बैसले ॥३३॥
द्वितीयाध्यायीं गर्भस्तुति । समर्थिली जे यथामति । तिच्या श्रवणें सुखविश्रांति । अंतर्वृत्ति श्रोतयां ॥३४॥
आतां श्रीकृष्णजन्मकथन । रसाळ चालवीं व्याख्यान । बसवूनि श्रोतयांचें मन । श्रोते सुरगण तिष्ठती ॥३५॥
ऐसें स्वामीवरवैभव । वर्षतां भरला दयार्णव । प्रज्ञापाणियाची धांव । गिरा गौरव पावली ॥३६॥
वरानंदें उचंबळोन । नयनें लक्षूनियां श्राचरण । हृदयपीठीं प्रतिष्ठून । मग व्याख्यान आदरिलें ॥३७॥
शुक म्हणे गा कौरवभूपा । श्रवणसुखाच्या घेऊनि मापा । कृष्णकीर्तीचा सांटपा । करितां सोपा अपवर्ग ॥३८॥
तरी दशमामाजीं तृतीयाध्याय । जेथ पूर्णब्रह्म देवकीतनय । होऊनि तोष्गे लोकत्रय आनंदमय करील ॥३९॥
वसुदेव देवकीसि निजध्यान । दावूनि सांगेल जन्मकथन । प्रेरितां वसुदेव कंसाभेणें । गोकुळीं स्थापन करील ॥४०॥
इतुकी कथा अध्यायांत । राया ऐकें सावचित्त । शौनकादिकांप्रति सूत । अवधानार्थ संबोधी ॥४१॥
साधनसंपन्न मुमुक्षु श्रोते । तिहीं सादर होआवें चित्तें । सुकृताभीष्टफळाचे भोक्ते । सत्वर त्यांतें पाचारा ॥४२॥
भाविकाचा कल्पतरु । परमामृताचा सागरु । भगवत्कथेचा उद्गारु । कृष्णावतार परियेसा ॥४३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP