अध्याय ३ रा - श्लोक २१ ते २५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
त्वमस्य लोकस्य विभो रिरक्षिषुर्गृहेऽवतीर्णोऽसि ममाखिलेश्वर ।
राजन्यसंज्ञासुरकोटियूथपैर्निर्व्यूह्यमाना निहनिष्यसे चमूः ॥२१॥
विभु म्हणोनि संबोधन । तुझें विभुत्व वर्णीं कोण । लंघूं न शकती शासन । मायादिगुण तव तंत्र ॥९७॥
तूं या लोकांचिया रक्षणा । ईश्वर ईश्वरांचा राणा । लेवूनिया कृष्णपणा । आलासि सदना माझिया ॥९८॥
मम गृहें अवतरलासी । परी तूं सर्वात्मा निश्चयेंशीं । तुझ्या प्रसादें मम मतीसी । गोष्टी ऐशी उमजली ॥९९॥
पाळण करितां शुक्लवर्ण । संहारकर्त्ता मी कृष्णवर्ण । तरी या लोकांचें रक्षण । मजपासून केंवि म्हणसी ॥४००॥
तरी तूं गुणत्रयाचा स्रष्टा । तूंचि गुणांची प्रतिष्ठा । कृष्णवर्णें महादुष्टां । क्रियाभ्रष्टां संहारिसी ॥१॥
जेंवि तृणाच्या संहारें । धान्यें रक्षिजती कृषीश्वरें । कां मोडूनि अवाक्षरें । वेदाक्षरें बुध बोधी ॥२॥
तैशी रायाची अवगणी । घेऊनि जन्मले क्षत्रियवर्णीं । प्रवर्त्तले दैत्याचरणीं । त्या दुःश्रेणी कोटिशा ॥३॥
पृथक् कोटीचे यूथप । शाल्वमागधादि अनेक भूप । दुर्मदचमूचा प्रताप । धरिती सापेक्ष युद्धाचे ॥४॥
ऐशी चमू मेळवूनी । धांवती युद्धार्त खवळोनी । संहारिसी ते प्रकरणीं । दैत्यश्रेणी अमूपा ॥४०५॥
दैत्य मर्दूनि तृणप्राय । साधु रक्षिसी धान्यन्यायें । कर्त्ता हर्त्ता त्राता स्वयें । हीं मायामयें नतनाट्यें ॥६॥
आतां सर्वज्ञासी विज्ञापना । करितां पात्रत्व ये अज्ञाना । तेंही घडो परी सर्वज्ञा । वृत्तांतकथना परिसावें ॥७॥
अयं त्वसभ्यस्तव जन्म नौ गृहे श्रुत्वाग्रजांस्ते न्यवधीत्सुरेश्वर ।
स तेऽवतारं पुरुषैः समर्पितं श्रुत्वाधुनैवाभिसरत्युदायुधः ॥२२॥
सुरनायका जगत्पति । सर्वज्ञासि अयोग्य विनंती । तथापि शंका माझे चित्तीं । ते श्रीपति अवधारीं ॥८॥
असभ्य म्हणजे दुर्मति खळ । तो हा कंस मातुळ । महादुरात्मा केवळ । दुष्ट कुठिल दुर्जन ॥९॥
तुझें जन्म माझें गृहीं । नारदमुखें ऐकोनि पाहीं । तुझे अग्रजबंधु सहाही । येणें लवलाहीं मारिले ॥४१०॥
तो आतां कंसासुर । दूतीं सांगतां समाचार । ऐकोनि तुझा हा अवतार । ओढूनि शस्त्र धांवेल ॥११॥
ऐकें राया परीक्षिती । ऐशी वसुदेवें करूनि स्तुति । अल्प शंका होती चित्तीं । ते ही श्रीपति निवेदिली ॥१२॥
श्रीशुक उवाच - अथैनमात्मजं वीक्श्य महापुरुषलक्षणम् । देवकी तमुपाधावत्कंसाद्भीता शुचिस्मिता ॥२३॥
यानंतरें या आत्मजातें । अवलोकूनि सप्रेमचित्तें । देवकी स्तुतीतें प्रवर्ते । तें नृपातें शुक सांगे ॥१३॥
अद्भुत बाळक तयेक्षणीं । देखोनि महापुरुषलक्षणी । कंसभयाची अंतःकरणीं । होती झडपणी जियेतें ॥१४॥
शंख चक्र गदा पद्म । माळा कौस्तुभ श्रीवत्सलक्ष्म । किरीट कुंडलें मेघश्याम । पुरुषोत्तम चतुर्भुज ॥४१५॥
अंगदें कंकणें मुद्रिका । चरणीं शोभा सामुद्रिका । पीतांबर कसिला निका । क्षुद्रघंटिका मेखळे ॥१६॥
सहस्र कुंतलांचिया दाटी । झळकती मुकुटातळवटीं । गोमटीं गंडस्थळें हनुवटी । साम्य भृकुटी स्मरचापा ॥१७॥
नीलोत्पलासारिखे नेत्र । नासिका सरळ कोमळ वक्त्र । कोटि मन्मथांचें गात्र । होय अपात्र उपमेसी ॥१८॥
सच्चित्सुखाब्धि केवळ । परंतु भासे कोमळ बाळ । अद्भुत देखोनि उतावीळ । सप्रेमळ देवकी ॥१९॥
प्रकृतीसि जो कां पर । तो शुद्ध सत्त्वात्मक ईश्वर । हा ईश्वरांचाही ईश्वर । परमेश्वर महापुरुष ॥४२०॥
प्रकृतिपुरुषें दोघें जणें । जन्मलीं जेथींच्या सहज स्फुरणें । महापुरुष याकारणें । सिद्धांत म्हणे श्रुतीचा ॥२१॥
एवं महापुरुषलक्षण । आत्मज लक्षूनि सुलक्षण । सस्मित देवकी करी स्तवन । मन उद्विग्न कंसभयें ॥२२॥
तेथ प्रथम श्लोकचतुष्टयें । रूप वर्णीं निरामय । जेथ काळासही महाप्रळय । त्या कंसभय केंतुलें ॥२३॥
देवक्युवाच - रूपं यत्तत्प्राहुरव्यक्तमाद्यं ब्रह्म ज्योतिर्निर्गुणं निर्विकारम् ।
सत्तामात्रं निर्विशेषं निरीहं स त्वं साक्षाद्विष्णुरध्यात्मदीपः ॥२४॥
कांहें एक जे कां वस्तु । अरूपरूप तें अव्यक्त । आद्य अगोचर अहेतुहेतुक । ब्रह्म प्रशस्त बृहत्त्वें ॥२४॥
ज्योतिर्मय स्वप्रकाश । निर्गुण निर्विकार निराभास । सत्तामात्र निर्विशेष । अपरोक्ष निरीह ॥४२५॥
तो तूं विष्णु अध्यात्मदीप । साक्षात्परमात्मा निर्विकल्प । जेथ मायादिगुणसंकल्प । न थरे अल्प पृथक्त्वें ॥२६॥
तरी कांहीं एक जें तें रूप । वस्तु म्हणोनि निगमीं जल्प । केला तयाचा विवेक अल्प । श्रोतीं संक्षेप ऐकावा ॥२७॥
तें तूं वस्तु म्हणसी कोण । जें या सर्वांचें आदिकारण । म्हणसी अव्यक्त साधारण । तरी तूं पूर्ण बृहद्ब्रह्म ॥२८॥
वस्तु म्हणजे अव्यक्त आद्य । श्रुतिसमुच्चयें प्रतिपाद्य । ज्यातें ब्रह्म म्हणती वंद्य । जें अमराराध्य आदिकवि ॥२९॥
बृहद्ब्रह्म हें अभिधान । तरी तें म्हणसी मी प्रधान । प्रधाना जेणें प्रकाशन । तें स्वप्रकाशघन चिज्ज्योति ॥४३०॥
वैशेषिकांच्या सिद्धांतीं । ज्ञानगुणक चैतन्य म्हनती । त्याच्या सारिखें या व्युत्पत्ति । भाविसी चित्तीं तें नव्हे ॥३१॥
जैसें आकाश वास्तव शून्य । त्यासी प्रकाशी शब्दगुण । तैसें तूंतें प्रकाशितें जरी ज्ञान । तरी तूं ज्ञानगुण होतासी ॥३२॥
तरी तें म्हणसी ज्ञानगुण । तूं शुद्ध चैतन्य निर्गुण । परी मीमांसकापरी न म्हण । केवळ ज्ञान परिणामीं ॥३३॥
दुग्ध परिणमोनि झालें दहीं । तो दुग्धाचा विकार पाहीं । तैसा निर्विकार वस्तूच्या ठायीं । ज्ञान विकार कांहीं न वदावा ॥३४॥
शक्तिविक्षेपें करूनि मोक्ष । परिणामीं म्हणती पुष्कराक्ष । तैसा न होसी तूं अपरोक्ष । जो अलक्ष सन्मात्र ॥४३५॥
शक्तिविक्षेप तें विपरेत ज्ञान । तेणें भासे प्रपंचभान । त्याचा परिणाम कारण । जें अज्ञान अव्यक्त ॥३६॥
म्हणसी सामान्य सर्वगत । हेही युक्ति न सरे एथ । तूं निर्विशेष विशेषरहित । नित्यनिर्मुक्त निस्सीम ॥३७॥
कर्मफळही कारणमय । तैसा म्हणसी मी सक्रिय । तरी तूं निरीहत्वेंचि । अविक्रिय । कारणप्राय सन्निधिमात्रें ॥३८॥
इत्यादि प्रकारें कार्यकल्प । किमपि वस्तु जें निर्विकल्प । तो तूं विष्णु अध्यात्मदीप । प्रकाशरूप बुद्ध्यादिकां ॥३९॥
हेतु प्रतिपाद्यविशेषण । हें वेदांतपरिभाषाव्याख्यान । आतां व्युत्पत्ति साधारण । जे व्याकरणसंमत ॥४४०॥
व्यज्यते म्हणजे व्यक्तीं येत । तया नाम बोलिजे व्यक्त । नव्हे व्यक्त तें अव्यक्त । न लगे एथ सांगावें ॥४१॥
जन्मल्या व्यक्तवस्तु जात । तूं सर्वाद्य जन्मरहित । आदिमध्य नाहीं अंत । तूं अनंत पूर्णत्वें ॥४२॥
मेरु उत्तरे म्हणतां कळे । सूर्य उगवोनि मावळे । तैसें नव्हे हें देशें काळें । व्यक्ति नातळे ब्रह्मत्वें ॥४३॥
सर्वगतत्वें देशरहित । सनातनत्वें काळातीत । पूर्णब्रह्मत्वें संतत । तो तूं शाश्वत चिन्मात्र ॥४४॥
सूर्यप्रकाशें दृश्य सृष्टि । त्या सूर्यातें प्रकाशी दृष्टि । तैशी प्रकाशत्वें ज्याची गोष्टी । व्यक्तिपोटीं न सांपडे ॥४४५॥
ज्योति म्हणोनि निर्धारिलें । म्हणसी गोचरत्वें व्यक्तीं आलें । तरी निर्गुणत्वें निराकारिलें । ज्योतिगोचर प्राकृत ॥४६॥
तमोगुणें महाभूतें । व्यक्तीं पातलीं प्राकृतें । त्या गौणा ऐसें निर्गुणातें । कारण ज्ञातें पैं कोण ॥४७॥
होतां धूम्रादि विकार । व्यक्तीसि ये वैश्वानर । तैसा मीही विश्वाकार । म्हणसी सविकार अभिव्यक्त ॥४८॥
तरी जें निर्विकार संचलें । कोठें व्यक्तीसी नाहीं आलें । म्हणोनि अव्यक्त येणें बोलें । प्रतिपादिलें वेदांतीं ॥४९॥
ऐसें अव्यक्त कांहीं एक । अभाव म्हणती त्या नास्तिक । परी स्वानुभवें ज्ञाते लोक । सत्तामात्रक जाणती ॥४५०॥
इत्यादि विशेषणीं विशिष्ट । येणें विशेष होईल प्रकट । तरी जो निर्विशेष ऐसें स्पष्ट । वदती श्रेष्ठ श्रुत्यर्थें ॥५१॥
निर्विशेष जें कां एक । तेव्हां सामान्य मी सम्यक । तेथ निरीह पदाचा विवेक । निषेधक शंकेतें ॥५२॥
जेथवरी ईहेची प्रवृत्ति । तेथवरी मायेची अभिव्यक्ति । अनीहत्वें क्रियाशांति । नेति नेति अवाच्य ॥५३॥
तो तूं अध्यात्मदीप विष्णु । प्रत्यक्ष देखिलासि भ्राजिष्णु । त्या तुज कंसभयाचें भान । हें जल्पन अघटित ॥५४॥
कंस बापुडें तें किती । महाप्रळयाचे अंतीं । व्यक्त मिळालिया अव्यक्तीं । तैं भयाची खंती तुज नाहीं ॥४५५॥
होतां सर्वांचा विनाश । उरे केवळ जो अविनाश । तो तूं अशेष निःशेष । कैंचा भयलेश तुज बाधी ॥५६॥
नष्टे लोके द्विपरार्धावसाने महाभूतेष्वादिभूतं गतेषु ।
व्यक्तेऽव्यक्तं कालवेगेन याते भवानेकः शिष्यतेऽशेषसंज्ञः ॥२५॥
नेत्र झांकितां लोपे सृष्टि । सूर्य नसतां लोपे दृष्टि । तैशी विश्वाची रहाटी । लोपे पोटीं प्रकृतीच्या ॥५७॥
तो दैनंदिन प्रलय । जेथ भौतिकाचा होय लय । विकृत अव्याकृतीं समाये । पावे उदय यथापूर्व ॥५८॥
कृत त्रेता द्वापार कलि । संख्या चहूंची मोकळी । त्यांसि महर्युग संज्ञा केली । शास्त्रकुशलीं प्राचीनीं ॥५९॥
तीं महर्युगें सहस्र वेळां । भ्रमतां गणना नोहे काळा । तो एक दिवस बोलिला । ब्रह्मयाचा सिद्धांतीं ॥४६०॥
तैशींच महर्युगें सहस्र - । पर्यंत रात्रींचा विस्तार । रात्रीं लीन चराचर । उपसंहार सृष्टीचा ॥६१॥
येणें अहोरात्रें शताब्दवरी । दोन्ही पदार्द्धें होतीं पुरीं । सरे ब्रह्मायुसामग्री । तैं काळ संहारी विधीतें ॥६२॥
तया नांव ब्रह्मप्रलय । तेव्हां स्थूल भूतांचा होय लय । पुढें उरे जोतिर्मय । लिंगदेह प्रभूचा ॥६३॥
ऐशिया अहोरात्रींचें वर्षशत । होतां विष्णुलोकासि ये अंत । तेव्हां सूक्ष्मभूतें मिळत । महाभूतीं अव्यक्तीं ॥६४॥
येणें प्रमाणें उत्तरोत्तर । काळकलनेचा विचार । अव्यक्ताभिमानी जो रुद्र । तोही संहार पावतो ॥४६५॥
त्यावरी इच्छाशक्तीचा नाथ । तोही प्रधानीं लीन होत । ‘ प्रकर्षेण धीयते ’ जेथ । प्रधानसंकेत तयालागीं ॥६६॥
प्रकर्षेकरूनि सांठवण । त्याहूनि आणीक नाहीं जाण । यालागीं म्हणिजे या प्रधान । जें केवळ जाण गुणसाम्य ॥६७॥
तें प्रज्ञान आनंदब्रह्म । स्वरूपीं पावे उपरम । जैसें अभ्र विरोनि उरे व्योम । तैसें निस्सीम सन्मात्र ॥६८॥
उत्तरोत्तर काळाभिवृद्धि । गणना जाणवी विशाळ बुद्धि । जंव काळाची पुरे अवधि । मग निरुपाधि परब्रह्म ॥६९॥
एक म्हणती ब्रह्मायुष्य । तो विष्णूचा श्वासोच्छ्वास । एक म्हणती अर्धनिमेष । मिथ्या कोणास म्हणावें ॥४७०॥
एवं काळाचें महत्त्व । जाणावें हें एथींचें तत्त्व । वितंडवादें वादकत्व । तें लघुत्व ये ठायीं ॥७१॥
पाती पोळी आणि रोटी । भक्षिजे एके तृप्तीसाठीं । चतुराईच्या इतर गोष्टी । तेवीं चावटी ये ठायीं ॥७२॥
एवं प्रधाना झालिया लय । उरे केवळ जो अव्यय । तो तूं प्रत्यक्ष सन्मय । तुज कंसभय केतुलें ॥७३॥
प्रधान लीन झालियावरी । केंवि उरलों म्हणसी जरी । येविशयींची शंका दूरीं । देवकी करी तें ऐका ॥७४॥
तरी निमेषादि प्रधानान्त । कालगणना कथिली एथ । तितुका काळवरी निवान्त । प्रधान होत स्वस्वरूपीं ॥४७५॥
तितुका क्रमिलिया काळ । अशेषसंज्ञ स्फुरणरोळ । सत्तामात्रें बोधनशीळ । तो गोपाळ तूं शेष ॥७६॥
निरंजनीं जो निजोनि राहे । तो स्वास्तिक्यें ज्या गृहीं लाहे । तेवीं जो प्रधान जागविताहे । तो तूं स्वयें अशेषसंज्ञ ॥७७॥
N/A
References : N/A
Last Updated : April 26, 2017
TOP