अध्याय ३ रा - श्लोक ४६ ते ५०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
यदि कंसाद्बिभेषि त्वं तर्हि मां गोकुलं नय । मन्मायामानयाशु त्वं यशोदागर्भसंभवाम् ॥४६॥
तरी जंववरी कंस न मावळे । तंववरी माझिये बाळलीले । न पहाती तुझे डोळे । हें वेल्हाळें जाण पां ॥६८॥
कंसापासूनि तुजला भेव । म्हणोनि माझा धाकें जीव । म्हणसी अधीर स्त्रीस्वभाव । तरी हा उपाव ऐकावा ॥६९॥
यशोदा नंदपत्नी गोकुळीं । कन्या प्रसवेल येचि काळीं । मजला नेऊनि तेथ घालीं । ते एथ आणिली पाहिजे ॥६७०॥
माझिया स्मरणाचा प्रताप । विघ्नें पळती आपेंआप । सर्व भयाचा होय लोप । सत्यसंकल्प निश्चयें ॥७१॥
श्रीशुक उवाच - इत्युक्त्वासीद्धरिस्तूष्णींभगवानात्ममायया । पित्रोः संपश्यतोः सद्यो बभूव प्राकृतः शिशुः ॥४७॥
शुक म्हणे गा परीक्षिति । इतुकें बोलिला इंदिरापति । मग लोपवूनि निजाकृति । धरिली व्यक्ति बाळाची ॥७२॥
आपुले योगमायेंकरून । सद्यचि अवलंबी बाळपण । परी धरूनि ठेला मौन । न करी रुदन शिशूपरी ॥७३॥
सकळ ऐश्वर्याचे मुकुटीं । त्या भगवंतें धाकुटी । धरिली बालाकृति गोमटी । पहातां दृष्टीं जनकातें ॥७४॥
ततश्च शौरिर्भगवत्प्रचोदितः सुतं समादाय स सूतिकागृहात् ।
यदा बहिर्गन्तुमियेष तर्ह्यजा या योगमायाऽजनि नन्दजायया ॥४८॥
देवकीसी वृत्तांतकथन । स्वमुखें करितां श्रीभगवान । तें योगमायेनें परिसोन । केलें वर्त्तणें तैसें तैसें ॥६७५॥
संकर्षणाच्या आकर्षणीं । आज्ञा केली ते अभिवंदूनि । तैंपासूनि योगजननी । सावधानी वर्तत ॥७६॥
देवकीवसुदेव जंव पहाती । तंव देखिली बालाकृति । जें जें वदली आदिमूर्ति । तें तें चित्तीं आठवलें ॥७७॥
प्रभुआज्ञेप्रमाणें तातें । घेऊनिया निज सुतातें । सांडूनि सूतिकागृहातें । गोकुळातें निघाला ॥७८॥
तेचि समयीं योगमाया । यथोक्त संपादूनि कार्या । यशोदा जे नंदजाया । तिची तनया जाहली ॥७९॥
निमित्त करूनि यशोदेसी । जन्मली प्रभूचे आज्ञेसरिसी । एरव्हीं ते सर्वदेशीं । सर्व कार्यासी सादर ॥६८०॥
तया हृतप्रत्ययसर्ववृत्तिषु द्वाःस्थेषु पौरेष्वपि शायितेष्वथ ।
द्वारस्तु सर्वाः पिहिता दुरत्यया बृहत्कपाटायसकीलश्रृङ्खलैः ॥४९॥
तिणें सर्वांचिया ज्ञानवृत्ति । हिरोनि वोइरिली सुषुप्ति । द्वारपाळां आणि पौरांप्रति । महाभ्रांति पसरिली ॥८१॥
तुझिया जनकजनकें गोग्रहणीं । घालूनि अस्त्रविद्यामोहनी । नागविल्या सुभटश्रेणी । ते हे करणी समसाम्य ॥८२॥
ऐसे निजविले द्वारपाळ । आणि नगरींचे लोक सकळ । जेव्हां वसुदेव भूपाळ । उद्योगशीळ जावया ॥८३॥
तंव पायीं ममतेची दृढ बेडी । वरी महामोहाची बांदवडी । देहबुद्धीच्या कवाडीं । भ्रांतीची कडी कळासली ॥८४॥
विषयबुद्धीचे लोहखिळे । संस्कारलोहारीं दृढ ठोकिले । प्रारब्धभोगाचें कुलूप केलें । जें मोडिलें नवजाये ॥६८५॥
सर्व द्वारीं विषयभोग । तेथ तेथ प्रारब्धयोग । अहंकंसाभेणें साङ्ग । झाले मार्ग दुरत्यय ॥८६॥
ऐशियेही दुर्गमस्थळीं । स्वानंदकंद श्रीवनमाळी । घेतां वसुदेव ते काळीं । झालीं मोकळीं बंधनें ॥८७॥
ताः कृष्णवाहे वसुदेव आगते स्वयं व्यवर्यन्त यथा तमो रवेः ।
ववर्ष पर्जन्य उपांशुगर्जितः शेषोऽन्वगाद्वारि निवारयन्फणैः ॥५०॥
चंडकिरणाच्या उदयकाळीं । तिमिरें हारपती अंतकाळीं । तेंवि कृष्णा धरितां हृदयकमळीं । झालीं मोकळीं बंधनें ॥८८॥
सर्व द्वारांचिया ज्ञप्ति । प्रकाशल्या आत्मस्थिति । कवाडें उघडलीं आयतीं । जाणों मोकळीं होतीं पहिलेंची ॥८९॥
कृष्णा धरूनि हृदयकमळीं । वसुदेव येतां द्वाराजवळी । तंव तें पहिलेंचि मोकळीं । श्रीवनमाळीप्रसादें ॥६९०॥
द्वारपाळही निद्रित । तें योगमायेचें अवघें कृत्य । पुढें चौबारा वसुदेव जात । कृष्णासहित एकला ॥९१॥
ऐकों न ये आपुल्या श्रोत्रीं । सूक्ष्म उच्चार ऐसा वक्त्रीं । त्यासि उपांशु म्हणिजे शास्त्रीं । मंत्रजपासी हा नेम ॥९२॥
ऐशी उपांशु मेघध्वनि । सूक्श्मस्वनें गर्जे गगनीं । मंद वर्षे अंबुकणीं । जेवीं सुमनीं सुरेंद्र ॥९३॥
तंव पातला सहस्रशिरी । फणा धरूनि वसुदेवावरि । मागें चालिला वारीत वारि । रत्नें निवारी तमातें ॥९४॥
वसुदेव सहजीं स्मरणनिष्ठ । तेणें मार्गीं न होती कष्ट । अद्यापि स्मरणीं जो एकनिष्ठ । त्याचें संकट हरि वारी ॥६९५॥
N/A
References : N/A
Last Updated : April 26, 2017
TOP