अध्याय ३ रा - श्लोक ८ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


निशीथे तमउद्भूते जायमाने जनार्दने ।
देवक्यां देवरूपिण्यां विष्णुः सर्वगुहाशयः ॥
आविरासीद्यथा प्राच्यां दिशीन्दुरिव पुष्कलः ॥८॥

आधींच कृष्णपक्षींचें तम । वरी वार्षिकीचा अभ्रागम । वरी योगमायेचा विक्रम । महाभ्रम पसरिला ॥११॥
ऐसें महाध्वांत दुर्गम । परंतु आश्चर्य हेंचि परम । जायमान पुरुषोत्तम । तेव्हां सुगम पूर्वोक्त ॥१२॥
निशीथ म्हणजे मध्यरात्र । उदया आला अत्रिपुत्र । ते समयीचें हें विचित्र । सर्वीं सर्वत्र स्वानंद ॥१३॥
महाभूतें विमलतर । सुरवर आनंदें निर्भर । उपजणार जगदाधार । जाला सुखकर तो समय ॥१४॥
आठां श्लोकीं कथिला अर्थ । तो हा श्रीकृष्णजन्मार्थ । येर्‍हवीं तेव्हां महा निशीथ । महाद्भुत घोरतम ॥११५॥
चोरव्याघ्रीं जो दुर्गम पंथ । राजा येतां तो होय सुपथ । तैसा उपजतां रमानाथ । कृतकृतार्थ त्रैलोक्य ॥१६॥
हेंचि जाणिजे महानुभावीं । भक्तभाविकीं साधकीं सर्वीं । भगवत्प्राप्तीची हे पदवी । दुर्गम दावी सुगमत्वें ॥१७॥
याति वर्ण कुल शील । जन्म कर्म धर्म जे विकळ । भगवत्प्राप्ति होतां सकळ । होय सकळ सौभाग्यें ॥१८॥
कोण गणिकेचें आचरण । अजामिळाचें पवित्रपण । ध्रुवाचें वय आणि शहाणपण । गजेंद्राचें विचारा ॥१९॥
ऐसें अपार सांगों किती । ज्यांसि सर्वस्वें अनुपपत्ति । त्यांसि जालिया भगवत्प्राप्ति । वंद्य होती विधिहरां ॥१२०॥
एवं श्रीकृष्णजन्मावसरीं । ब्रह्मानंदाची सुरवरी । वर्षोनि सर्व चराचरीं । विपरीत करी सुपरीत ॥२१॥
ऐशिये समयीं जनार्दन । देवकीचे हृदयीं आपण । सर्वांतर्यामी जो परिपूर्ण । तो निर्गुण प्रकटला ॥२२॥
सर्वां देवांच्या दिव्यदीप्ति । ते हे देवकी दैवी संपत्ति । म्हणोनि तिच्याठायीं श्रीपति । प्रकटे भक्तिप्रतापें ॥२३॥
तें भक्तीचें निरूपण । स्वमुखें करील श्रीभगवान । जो कां सर्वव्यापी पूर्ण । विष्णु सर्वगुहाशय ॥२४॥
कृतकर्माचा परिपाक आशय । ज्यासि नाम बोलिजे हृदय । गूढत्वें तें वसवूनि राहे । गुहाशय ज्या नाम ॥१२५॥
कूटस्थ म्हणोनि वाखाणिती । यः सर्वग ऐसें म्हणती । हें असो तो जगत्पति । उत्तम पुरुष परमात्मा ॥२६॥
जरी तो सर्वगुहाशय । तरी देवकीचाच केंवि तनय । ये आशंकेचा अन्वय । पाराशर्य सांगत ॥२७॥
आविरासीत् म्हणजे प्रकट । तेथील महिमा हा उत्कृष्ट । येर सर्वत्र नित्य निघोंट । पाठीपोटवर्जित ॥२८॥
मही सजळ सर्वत्र हें खरें । परी तृषेनें प्राणि मरे । जेथ प्रकट होइजे नीरें । तेथ लहानें थोरें सेविती ॥२९॥
तैसा सर्वगुहाशय आत्मराम । परी प्रकटतेचा सुखसंभ्रम । लोकत्रयाचें मंगलधाम । भक्तोत्तम भोगिती ॥१३०॥
जेणें रूपें बोदिला विधि । तेणेंचि रूपें कृपानिधि । वसुदेव देवकीतें बोधी । जन्मावधि वरदाची ॥३१॥
आपण अयोनिसंभव । हाही सुचवावया भाव । ऐश्वर्येंशीं श्रीकेशव । निजात्मत्व प्रकाशी ॥३२॥
पूर्णकलामृतें पुष्कळ । ज्याचें अस्पृष्ट दिग्मंडळ । जैसा प्रकटे अतिनिर्मळ । ऋक्षपाळ मृगांक ॥३३॥
त्याचि मृगांकाचिये कुळीं । तेचि दाविली जन्मशैली । अयोनिसंभव श्रीवनमाळी । भक्तीं टाळी पीटिली ॥३४॥
शुकमुखें तें हरिरूपश्रवण । होतां हृदयीं धरीन ध्यान । म्हणोनि परीक्षितीनें श्रवण । केले तीक्ष्ण परिसाया ॥१३५॥
नाहीं वेण न दुखे पोट । नाहीं प्रसूतिसंकट । अद्भुत बाल झालें प्रकट । श्रीवैकुंठ निजरूपें ॥३६॥

तमद्भुतं बालकमम्बुजेक्षणं चतुर्भुजं शङ्खगदार्युदायुधम् ।
श्रीवत्सलक्ष्मं गलशोभिकौस्तुभं पीताम्बरं सान्द्रपयोदसौभगम् ॥९॥
महार्हवैदूर्यकिरीटकुण्डलत्विषा परिष्वक्तसहस्रकुन्तलम् ।
उद्दामकाञ्च्यङ्गदकङ्कणादिभिर्विरोचमानं वसुदेव ऐक्षत ॥१०॥

तें ऐकावया भगवद्ध्यान । श्रोती व्हावें सावधान । जें परीक्षितीसि शुक भगवान । करी कथन युग्मकें ॥३७॥
अकस्मात देवकीउदरीं । प्रकट जाहला श्रीमुरारि । श्लोकयुग्में शुकवैखरी । मूर्ति गोजिरी वर्णितसे ॥३८॥
कोटिकोटि कंदर्पशोभा । गाळूनि काढिली लावण्यप्रभा । अद्भुत ओतिली नवनीरदाभा । मूर्ति सुलभा प्रभूची ॥३९॥
ऐसें अद्भुत बालक । पाहे वसुदेव साशंक । त्या अद्भुतपणाचा विवेक । राया ऐक विशेषणीं ॥१४०॥
इंदिरेचें हृदयकमळ । तैसे नेत्र सकोमळ । पुरुषार्थ भक्ताचे निर्मळ । तैसे विशाळ भुज चारी ॥४१॥
आजानु आणि अव्याहत । भगवंताचे चार्‍ही हस्त । विजयश्रीचे मनोरथ । उत्साहवंत जे ठायीं ॥४२॥
अधर्मतमाचे नाशक । स्वधर्मलक्ष्मीप्रकाशक । दैत्यदुष्कृतां अंतक । संरक्षक साधूंचे ॥४३॥
ब्राह्मण्याचे अभिवर्द्धक । उत्पथपाखंडमर्दक । सद्भक्तांचे अनुमोदक । आनंदक अमरांचे ॥४४॥
विश्वाश्रियेचें पाणिग्रहण । विरिंचीचें प्रबोधन । मन्मथाचें संलालन । विप्रपूजनमंडित ॥१४५॥
ऐसें बाहुचतुष्टय । न्यहाळूनि वसुदेव पाहे । तेथ आयुधांचा समुदाय । तेजोमय देखिला ॥४६॥
शंख चक्र गदा पद्म । आयुधें शोभती अति उत्तम । भक्तकामकल्पद्रुम । मनोरम घनतनु ॥४७॥
प्रणवमंडित सरादिवर्णीं । श्रुति शोभली यज्ञादि भरणीं । नाद नाटला नानाध्वनीं । जेथ जन्मोनि तिहीं लोकीं ॥४८॥
जो नादाचें मूळपीठ । चहूं वाणींची वाहती वाट । तो हा पांचजन्य श्रेष्ठ । स्वयें वैकुंठ वागवी ॥४९॥
ऐकोनि ज्याचा विजयध्वनि । देवादिवनिता पाताळभुवनीं । गर्भ टाकिती दचकोनि । चक्रपाणि वाजवितां ॥१५०॥
सर्वदेवतामंत्रबीजें । नादात्मकें देवतातेजें । तेथ वसती अधोक्षजें । हस्तांबुजें तो धरिला ॥५१॥
ज्याचा ऐकतांचि ध्वनि । विघ्नें जाती हरपोनि । जैसा झळकतां मार्तंड गगनीं । खद्योत किरणीं लोपिजे ॥५२॥
ज्याच्या भारें पृथ्वी सगद । तिशीं करावयालागीं अगद । मात्रा गदा रणविदग्द । श्रीगोविंद वागवी ॥५३॥
पटबंध राज्याभिषेक । उभय चामरें स्निग्ध अनेक । उपचर्या त्या म्हणती मूर्ख । नरनायक भूषति ॥५४॥
धरित्रीआंगींचे दुष्ट स्फोट । नीतिभंगें देती कष्ट । त्यासि बांधिंती जेवीम कर्पट । राजपट तो तैसा ॥१५५॥
उष्णोदकें करिती शेक । तया नांव पट्टाभिषेक । चामरयुग्माचा विवेक । तें मक्षिकावारणें ॥५६॥
स्निग्धौषधप्रकार । किंकर मक्षिकांचे भार । ऐसे भूतळीं रोगाकार । महा असुर उदेले ॥५७॥
त्यासि करावया फाड । गदाशस्त्र हें सुदृढ । हस्तीं वाहे गरुडारूढ । भव अवघड संहर्त्ता ॥५८॥
संग्रामभुवनींचा सहस्रकिरण । कीं वीरश्रीचा सहस्रनयन । वीररसाचें करितां कथन । सहस्रवदन दूसरा ॥५९॥
कोटि सूर्यांची दावी वोप । कालाग्निरुद्रा तुल्य आटोप । श्रीप्रभूचा जाणोनि कोप । महाप्रताप प्रज्वलित ॥१६०॥
तें धगधगीत चक्र करीं । जें संकल्पमात्रें पावे समरीं । आज्ञेसरिसें दैत्यां मारी । तें मुरारि वागवी ॥६१॥
जें शिवाचें हृदयपद्म । भक्तभ्रमरां जो विश्राम । सनकादिकांचे यमनियम । जें निजधाम टाकावया ॥६२॥
मन्मथमातेचें मंदिर । आमोद हरिप्रेमा सुंदर । महर्षींचें मनमधुकर । सुख सादर जे ठायीं ॥६३॥
विरिंचीचें जन्मस्थळ । मन्मथाचें वदनकमळ । भास्कराचें नेत्रोत्पल । तुळितां केवळ अरौतें ॥६४॥
सुशीळ दयाळ कीर्तिवहळ । तैसें अमल कोमल सुपरिमळ । जेथ षट्पद हरिप्रेमळ । तें गोपाळ वागवी ॥१६५॥
बाहुचतुष्टय सायुध । वसुदेव पाहे एवंविध । तंव श्रीवत्स देखिलें शुद्ध । चिन्मयबोध ज्यापरी ॥६६॥
ब्राह्मण्यदेव श्रीभगवान । जनीं प्रकट हे दावी खूण । हृदयीं वाहे ब्राह्मणचरण । निजात्मभोषणसौभाग्यें ॥६७॥
पत्र म्हणवी रमाकांत । विप्रपादमुद्रांकित । तन्नियोगें ब्रह्मांडांत । प्रतिपाळीत विश्वातें ॥६८॥
मुद्रा विप्रपादपीठ । हृत्कमळचि करी वैकुंठ । म्हणोनि पादोदका श्रीकंठ । पांचही मुकुट ओढवी ॥६९॥
जे जलतरंगभंगचपला । कमळा अत्यंत तरळ वहळा । श्रीवत्सचिन्हें ते वेल्हाळा । जाली निश्चळा हरिहृदयीं ॥१७०॥
ब्रह्मादि करिती दास्यविधि । कोण पुसे रिद्धिसिद्धि । ऐशा अनंतसमृद्धि । ज्याचे प्रसिद्धीपासूनि ॥७१॥
ब्रह्मांड मुकुटीं पुष्पप्राय । धरूनि क्रीडे आनंदमय । तो शय्या होऊनि ज्याच्या भयें । राहे कायेतळवटीं ॥७२॥
पवित्र गंगेचें जन्मस्थान । श्रेष्ठत्वें विधिहरांवरि शासन । वशी विश्व श्रीमोहन । कीर्तिकल्याण त्रिजगाचें ॥७३॥
धरादेवीचें मंगलसूत्र । ब्रह्मांडभुवनींचें एक छत्र । ऐसें सौभाग्य स्वतंत्र । पदांक मात्र लाधतां ॥७४॥
सकळ कल्याणाची खूण । हृदयीं धरी जो विप्रचरण । सकळसद्गुणें परिपूर्ण । विष्णूसमान तो होय ॥१७५॥
इत्यादि सौभाग्यें कल्याणभरित । तें श्रीवत्सलक्ष्म सुशोभित । बाळकाहृदयीं अत्यद्भुत कौस्तुभयुक्त ग्रैवेय ॥७६॥
विद्युल्लतेचें गाळूनि पाणी । केली जयाची सूतरावणी । बोटधारिया बाळतरणि । पिळूनि पाणी रंगिल्या ॥७७॥
तो कांसेसि पीतांबर । कसी अमृतघनसुंदर । त्यावरी महार्ह अलंकार । जे निर्जर न देखती ॥७८॥
कोटिबालार्क मिडगणीं । ज्याची प्रभा स्वीकारूनी । उजळिताति ब्रह्मांडश्रेणी । त्या चिद्रत्नीं जडिले जे ॥७९॥
तीं भूषणें हरीच्या आंगीं । वर्णितां भारती राहे उगी । त्याची साकल्यें झगमगी । भोगी दृगीं वसुदेव ॥१८०॥
पाच पेरोज प्रवाळें । वज्र गोमेद मुक्ताफळें । माणिकें पुष्कराज नीळें । जडित केलें मुकुटातें ॥८१॥
दिव्य सुवर्णजडितरत्नीं । मकराकृति विचित्र घडणी । कुंडलें झळकती उभय श्रवणीं । तेज वदनीं फांकलें ॥८२॥
आकर्ण नेत्रांचिये प्रांतीं । कुटिल कुंतल भ्रमरकांति । कुंडलप्रभेची पडतां दीप्ति । विलसताती सहस्रधा ॥८३॥
भ्रू व्यंकटा विशाळ भाळ । नयन चिन्मात्र तेजाळ । कपोल कोमळ नासिक सरळ । वदनोत्पल सुरदांचें ॥८४॥
परादि वाचांचें माहेर । श्रीमुख सुखांचें मंदिर । दंत केवळ सुधाकर । अमृतें अधर पाझरती ॥१८५॥
जया अधरामृताची गोडी । लागोनि लक्ष्मी जाली वेडी । विरक्त वल्लभ तिसी झाडी । परी ते न सोडी कल्पांतीं ॥८६॥
हनुवटी गोमटी तेजाळ । कंबुग्रीव श्रीगोपाळ । बाहुभूषणें अंगदें अमळ । प्रभा विशाळ कटकांची ॥८७॥
भूतदयेच्या हृदयकमळा - । सारिखें मार्दव हस्तोत्पळां । नवग्रहनवरत्नांच्या किळा । हस्तीं सुढाळां मुद्रिका ॥८८॥
सामुद्रिके सुशोभितें । हस्तपद्मीं यथोचितें । पद्मा आणि पद्मजातें । त्या स्पर्शातें पात्रता ॥८९॥
हस्तीं आयुधें जीं उद्यत । पूर्वींच वर्णिलीं श्लोकोक्त । आपादवैजयंतीसहित । तें अद्भुत बालक ॥१९०॥
कटिप्रदेशीं मेखळा । प्रलयतेजाचा उमाळा । गाळूनि ओपिल्या रत्नकिळा । ते झळाळा जडिताचि ॥९१॥
ऐसें परम अद्भुत बाळ । तेजःपुंज चैतन्यगोळ । तेजें धवलित बंदिशाळ । पाहे भूपाळ वसुदेव ॥९२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP