अध्याय ३ रा - श्लोक १७ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


एवं भवान् बुद्ध्यनुमेयलक्षणैर्ग्राह्यैर्गुणैः सन्नपि तद्गुणाग्रहः ।
अनावृतत्वाद्वहिरन्तरं न ते सर्वस्य सर्वात्मन आत्मवस्तुनः ॥१७॥

जरी तूं म्हणसी मी अनंत । पूर्णस्वरूपें अच्युत । कार्यीं कारणत्वें वर्त्तत । विषयभूत गोचर ॥३३५॥
तरी इंद्रियद्वारा विषयग्रहण । तैसाचि मीही गृहमाण । तरी कायसें एवढें स्तवन । तें लक्षण अवधारीं ॥३६॥
माजील बुद्धीच्या प्रकाशें । होतीं इंद्रियें डोळसें । तीं जाणीव धरिती विषयावेशें । शब्दस्पर्शरूपादि ॥३७॥
इंद्रियग्राह्य जे जे विषय । तेथ वास्तव तुजवीण काय । परी विषयग्रहणीं तूं अग्राह्य । तो अभिप्राय अवधारीं ॥३८॥
तरी स्वविषयीं इंद्रियप्रवृत्ति । इतुकीच इंद्रियांची शक्ति । तीं सर्वव्यापका तुजप्रति । केंवि जानती साकल्यें ॥३९॥
त्वचे स्पर्शमात्रचि कळे । नेणे श्वेत पीत काळें । तेथ अभिज्ञ जैसे डोळे । ते आंधळे संस्पर्शीं ॥३४०॥
इंद्रिया स्वविषयचि मात्र कळे । अन्य विषयीं तें आंधळें । त्यासि चिन्मात्र नाकळे । विषया वेगळें म्हणोनि ॥४१॥
तूं सर्वबुद्धीचा द्रष्टा । तुझेनि प्रकाशें इंद्रियचेष्टा । सारिखा भाससी प्रविष्टा । वृथापुष्टा मूर्खासी ॥४२॥
बुद्धिद्रष्टा तूं परात्पर । पूर्वींच विद्यमान अक्षर । प्रविष्ट म्हणणें हा विचार । भ्रांतिपर सर्वथा ॥४३॥
प्रागेव विद्यमान । ऐसें दृष्टांतींचें वचन । तें दार्ष्टांतीं उपपादन । केलें जाण सुरवर्या ॥४४॥
तरी कां प्रवेश न घडे म्हणसी । जैसा वारुळीं सरीसृपासी । कां नीडीं जेवीं शकुंतांसी । तेंवि सर्वांसी स्वसदनीं ॥३४५॥
तरी जें प्रत्यक्ष परिच्छिन्न । त्यासीच घडे निवेशन । तूं अनावृत अपरिच्छिन्न । भेदहीन सबाह्य ॥४६॥
अंतर्बहिर्भेदद्वय । यावेगळा तूं सबाह्य । अनावृतत्वोपपादनीं पाहें । हेतुचतुष्टय बोलिलें ॥४७॥
सर्वस्य आणि सर्वात्मक । आत्मा वस्तु इत्यादिक । चार्‍ही हेतु पृथक् पृथक् । स्वयें श्रीशुक वाखाणी ॥४८॥
जो सर्वांचें आवरण । त्यासि कैचें प्रावरण । यालागीं प्रविष्ट हें जल्पन । न घडे जाण सर्वथा ॥४९॥
जो एकाचा आत्मा होय । त्यासि अन्याचा होतां नये । तूं सर्वात्मा सर्वमय । अप्रमेय परमात्मा ॥३५०॥
केवळ आत्मा पूर्णपणें । यदर्थीं ‘ अत सातत्यगमने ’ । ऐसें व्याकरणींचें सूत्र म्हणे । व्यापकपणें प्रतिपादी ॥५१॥
अतति म्हणजे व्याप्नोति । एवं सर्वगतत्वें व्याप्ति । त्या तुज प्रविष्ट म्हणतां चित्तीं । प्राकृतमति न लजिजे ॥५२॥
पारमार्थिक वस्तु नांव । तें परब्रह्मचि स्वयमेव । येर अवस्तु दृश्य सर्व । मायाप्रभव भवभान ॥५३॥
तूं सर्वगतत्वें हृषीकेशी । देवकीगर्भीं म्हणतेविषीं । गौणत्व ये प्रवेशासी । अनादि अससी म्हणोनि ॥५४॥
जो सर्वीं प्रवेशला न म्हणवे । सर्व जयासि नाहीं ठावें । जो एकलाचि आघवें । तो गर्भीं संभवे हे भ्रांति ॥३५५॥
यालागीं जैसा गर्भगोळ । तैसा नव्हेसि देवकीबाल । अनुभवानंदस्वरूप केवळ । तूं गोपाळ परमात्मा ॥५६॥
ज्यातें नेणती सुरवर्य । तो म्यां ओळखिलासि आर्या आर्य । केवढें भाग्याचें ऐश्वर्य । हें आश्चर्य मज वाटे ॥५७॥
जरी तूं म्हणसी हृषीकेशी । हेतुचतुष्टयें प्रपंचासी । अवस्तुत्व प्रतिपादिसी । परी हे गोष्टी कैशी घडेल ॥५८॥
प्रपंच अवस्तु हें न संभवे । जो प्रत्यक्ष इंद्रियां अनुभवे । तरी यदर्थीं ऐकावें । हें वसुदेवें प्रार्थिलें ॥५९॥

य आत्मनो दृश्यगुणेषु सन्निति व्यवस्यते स्वव्यतिरेकतोऽबुधः ।
विनानुवादं न च तन्मनीषितं सम्यग्यतस्त्यक्तमुपाददत्पुमान् ॥१८॥

आत्मप्रकाशें अवभासला । तो आत्म्याहून वेगळा । देहादि प्रपंच संचला । साच मानिला ज्या पुरुषें ॥३६०॥
सूर्यावेगळें मृगजळ सत्य । प्रतिबिंब बिंबाहून यथार्थ । प्रपंच तैसाचि इत्थंभूत । आत्मव्यतिरिक्त जो भावी ॥६१॥
पृथक्त्व प्रपंचासी । आत्म्याहूनि भासे ज्यासी । तोचि अबुध निश्चयेंशीं । म्हणिजे त्यासि अविद्वान ॥६२॥
तोचि मूर्खत्वा माहेर । केवळ अज्ञानाचें सार । आत्म्याहून प्रपंच अपर । सत्य साचार जो भावी ॥६३॥
रूपेंवीण छाया भेटे । कीं जळेंवीण तरंग उमटे । तैसा आत्म्याहून प्रपंच कोठें वेगळा घटे सत्यत्वें ॥६४॥
आत्म्यावेगळें प्रपंचासि । सत्यत्व नाहींच निश्चयेंशीं । वाचारंभणमात्र त्यासि । नामरूपेंशीं जाणिजे ॥३६५॥
प्रपंच अवस्तुत्वें वाळिला । बुद्धिमंतीं न्यहाळिला । जेणें सत्यत्वें प्रतिपाळिला । तो निवडिला मूर्खत्वें ॥६६॥
एवं परमेश्वराहूनि वेगळा । प्रपंच नाहींच निराळा । परमेश्वरेंचि जरी आभासला । तरी निवडिला नवजाय ॥६७॥
प्रपंचाचें उपादान । परमेश्वरचि जरी कारण । तरी तद्व्यतिरेकें भिन । नुरे निवडून दावितां ॥६८॥

त्वतोऽस्य जन्मस्थितिसंयमोन्विभो वदन्त्यनीहादगुणादविक्रियात् ।
त्वयीश्वरे ब्रह्मणि नो विरुध्यते त्वदाश्रयत्वादुपचर्यते गुणैः ॥१९॥

जन्म स्थिति आणि निदन । प्रपंचासी तुजपासून । ऐसें असतां विकारीपण । तुजलागून नातळे ॥६९॥
तें कां नातळें म्हणसी जरी । तरी अनिच्छा म्हणूनि तूं अविकारी । जैसें व्योम अभ्रा धरी । निर्विकारी अनीहत्वें ॥३७०॥
जन्म स्थिति आणि प्रलय । अभ्रासि व्योमगर्भींचोय । परी तें जैसें तैसें अनीह । संचलें राहे अविकारी ॥७१॥
तरी आकाश शून्यत्वें नसे कांहीं । सर्व कर्त्तृत्व माझ्याठायीं । आकाश तामस अज्ञान पाहीं । मी सर्वदेहीं सर्वज्ञ ॥७२॥
तरी ऐसें न म्हणावें श्रीपति । तूं निर्गुण परंज्योति । तुज दृष्टांतें उपपत्ति । कोण संमति पावेल ॥७३॥
स्वर्गी सुकृतीं प्रवृत्ति । विवेकजिज्ञासा परममति । कीं योगाभ्यासें ब्रह्मस्थिति । सत्त्वसंपत्ति हे ईहा ॥७४॥
प्रपंचाची अति प्रीति । धनमानलोभांची प्रवृत्ति । तृष्णा अहंता वसती चित्तीं । रजःसंपत्ति हे ईहा ॥३७५॥
निद्रा आलस्य रुचे फार । कर्म रुचे प्रमादपर । मूढ असोनि अहंकार । हे ईहा साचार तामस ॥७६॥
तूं निर्गुण गुणातीत । म्हणोनि अनीहत्वें वर्त्तत । निर्विकारी इत्थंभूत । तूं अनंत परमात्मा ॥७७॥
म्हणसी अनीह मी स्पष्टु । तरी जगत्कर्त्तृत्वीं कैसा पटु । जरी झालों कर्त्तृत्वनिष्ठु । तरी अविक्रियत्वें घटूं शकें केवीं ॥७८॥
ऐसें न म्हणावें मुकुंदा । ऐकें यदर्थीं अनुवादा । तरी कर्त्तृत्व आलें ईश्वरपदा । तो तूं गोविंदा सर्वज्ञ ॥७९॥
कर्त्तृत्व असोनि अविकारी । ऐसें न घडे म्हणसी जरी । जें पूर्णब्रह्म निर्विकारी । तो तूं श्रीहरि निश्चित ॥३८०॥
तरी ब्रह्म आणि सर्वकर्त्तें । विरुद्ध बोलणें हेंचि एथें । म्हणसी तरी या उत्तरातें । श्रीभगवंतें परिसावें ॥८१॥
तरी तूं देवा गुणाश्रय । तुझेनि प्रकाशें गुणादि कार्य । स्रुष्टिस्थित्यादि प्रलय । होतां अविक्रिय पूर्णत्वें ॥८२॥
सूर्य न करूनि मृगजळ । राजा न करूनि राष्ट्र सकळ । स्वामी न करूनि भृत्यशीळ । सत्ताबळ प्रतिपादी ॥८३॥
म्हणोनि सन्मात्र तूं स्वतंत्र । येर अवघेचि असन्मात्र । त्रिगुणात्मक माया तंत्र । ते माया चिन्मात्र प्रकाशी ॥८४॥
सृष्ट्यादि मायागुणांचें कार्य । ते माया चेष्टे तवाश्रयें । तेव्हां सर्व कर्तृत्व तवान्वयें । भृत्यविजयें नृप जेवीं ॥३८५॥
ऐसा जो तूं निर्विकार । विश्वोत्पत्तिस्थितिसंहार । गुणानुवर्णीं त्रय अवतार । करिसी साचार स्वलीला ॥८६॥
तोचि तूं हा प्रत्यक्ष एथें । भूमिभारापनयनार्थ । अवतरलासि हें इत्थंभूत । म्या यथार्थ जाणितलें ॥८७॥

स त्वं त्रिलोकस्थितये स्वमायया बिभर्षि शुक्लं खलु वर्णमात्मनः ।
सर्गाय रक्तं रजसोपबृंहितं कृष्णं च वर्णं तमसा जनात्यये ॥२०॥

केंवि जाणितलें म्हणसी हरि । तरी वर्णव्यक्ति त्रिगुणानुकारी । सृष्टिस्थितिप्रलयाचारीं । तूं लीलावतारी स्वमायया ॥८८॥
विश्वोत्पत्तीकारणें । तूं अवतरसी रजोगुणें । विराजमान रक्तवर्णें । रूपलावण्यें सुशोभित ॥८९॥
तें सृजनक्रमाचें कथन । पंचमस्कंधीं केलें जाण । त्याचें एथें अनुस्मरण । स्तुतिप्रकरण म्हणूनि ॥३९०॥
लोकत्रयाचें रक्षण । करावया सत्त्वसंपन्न । शुक्लवर्णें अवतरण । स्वमायेंकरून तूं करिसी ॥९१॥
तीं अनेक अवतारचरित्रें । वर्णितां शिणलीं शेषवक्त्रें । तेथ मर्त्यवैखरीच्या स्तोत्रें । किती विचित्रें वदावीं ॥९२॥
समुद्र शोषिजे लिक्षामुखें । कीं व्योम झांकिजे मशकपांखें । काळ बाचटे मत्कुणविखें । तैं मनुष्यमुखें गुणगणना ॥९३॥
अमोघधारीं वर्षे मेघ । चंचुपात्रें चातकां लाग । तैसा मनुष्यमतिचा ओघ । श्रवणें मननें कळला तो ॥९४॥
तैसा चौर्‍यांयशीं लक्ष योनि । पाळणीं समर्थ चक्रपाणि । ते ते गुणावतारचरित्रकहाणी । कोण पुराणीं बोलका ॥३९५॥
असो अपारत्व गुणांचें । तो तूं विश्वाचिया वेचें । तोष मानूनि तमाचें । धरिसी साचें कृष्णरूप ॥९६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP