अध्याय ३ रा - श्लोक ३६ ते ४५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
एवं वा तप्यतोस्तीव्रं तपः परमदुष्करम् । दिव्यवर्षसहस्राणि द्वादशेयुर्मदात्मनोः ॥३६॥
ऐशी तपश्चर्या तीव्र । दोघें आचरलां एकाग्र । ऐसा नाहीं ऐकिला धीर । पुढें होणार असे ना ॥१८॥
तपश्चर्येच्या संकटीं । ब्रह्मादिकांही दुर्लभ भेटी । तो मी तुमचिया तपःसंतुष्टीं । हर्षें पोटीं तुष्टलों ॥१९॥
बारा सहस्र वर्षें पूर्ण । तीव्र तपाचें आचरण । काया वाचा अंतःकरण । मत्परायण दंपती ॥६२०॥
तदा वां परितुष्टोऽहममुना वपुषानघे । तपसा श्रद्धया नित्यं भक्त्या च हृदि भावितः ॥३७॥
तुम्हां दंपतीच्या तपोत्कर्षें । मी तुष्टलों प्रेमविशेषें । श्रद्धा म्हणजे दृढविश्वासें । नित्य मानसें भावितां ॥२१॥
अहो देवकी निष्पापे । तये काळींही याचि रूपें । उभयतांच्या कृतसंकल्पें । अभीष्टकाम द्यावया ॥२२॥
प्रादुरासं वरदराड्युवयोः कामदित्सया । व्रियतां वर इत्युक्ते मादृशो वां वृतः सुतः ॥३८॥
जो मी सकल वरदां वरद । तुम्हां तुष्टलों गोविंद । मागा म्हणोनि बोलतां शब्द । तुम्हीं अनुवाद हा केला ॥२३॥
तुजसारिखा पुत्र व्हावा । म्हणोनि मागितलें जेव्हां । धुंडितां ब्रह्मांडीं आघवा । साम्य स्वभावा मी मज ॥२४॥
अजुष्टग्राम्यविषयावनपत्यौ च दंपती । न वव्राथेऽपवर्गं मे मोहितौ देवमायया ॥३९॥
तुम्हीं तपश्चर्या केली वरिष्ठ । परंतु दैवी माया हे दुर्घट । तिनें मोहितां भुललां वाट । झालां विनट प्रपंचीं ॥६२५॥
नव्हते भोगिले ग्राम्य विषय । विदित नव्हताचि व्यवाय । अनपत्य जितेंद्रिय । मदाश्रय वांच्छिला ॥२६॥
म्हणोनि प्रसन्नतेचिये वेळे । कैवल्य मागावें हें न कळे । दैवीमायामोहपटळें । केलें आंधळें तुम्हांसी ॥२७॥
मजसारिखा वरद विभु । आणि तुम्हांसी पुत्रममतालोभु । नाहीं इच्छिला अपवर्गलाभु । जो दुर्लभु सुरनरां ॥२८॥
तुम्हांसि न कळे आत्महित । परी मी सर्वज्ञ करुणावंत । तुमचे पुरवूनि मनोरथ । अपवर्गार्थ तुष्टलों ॥२९॥
उदंड असती वरदानी । परी मी वरदांचा मुकुटमणि । यालागीं वरदराट् या अंभिधानीं । सनकादि मुनि मज गाती ॥६३०॥
इतर तरूंची शीतळ छायी । तैसाचि कल्पतरु काये । जो कां कामनेची नवाई । बैसले ठायीं पुरविता ॥३१॥
मीही कल्पनामात्रचि देता । तेव्हां सुरतरूचीच साम्यता । लज्जा वाटे हें भावितां । मी निजभक्तहिता प्रवर्तें ॥३२॥
भक्तीं कामिला जो अर्थ । तो पुरवूनि मनोरथ । ओपीं चौथाही पुरुषार्थ । त्यांचा स्वार्थ मी वाहें ॥३३॥
जरी निजहित न कळे बाळा । परी तो माउलीसि कळवळा । तेंवि स्वभक्तांची जीवनकळा । मज गोपाळा पोखणें ॥३४॥
तुजसारिखा व्हावा पुत्र । यया वरासि झाला पात्र । मग म्यां म्हणोनि तथास्तु मात्र । केलें चरित्र तें ऐक ॥६३५॥
गते मयि युवां लब्ध्वा वरं मत्सदृशं सुतम् । ग्राम्यान्भोगानभुञ्जाथां युवां प्राप्तमनोरथौ ॥४०॥
वर देऊनि गेलिया मज । विध्युक्तविषयीं झालां सज्ज । वरदासारिखा आत्मज । मी अधोक्षज जाहलों ॥३६॥
तुमचे पुरले मनोरथ । तेणें सर्वदा स्वानंदभरित । काया वाचा आणि चित्त । भजनीं निरत सप्रेमें ॥३७॥
अदृष्ट्वान्यतमं लोके शीलौदार्यगुणैः समम् । अहं सुतो वामभवं पृश्निगर्भ इति श्रुतः ॥४१॥
मज समान मागतां सुत । म्यां शोधिलें त्रिभुवनांत । शील औदार्यगुणीं युक्त । कोणी न पवत तुलनेतें ॥३८॥
लत्ता हृदयीं दे ब्राह्मण । तेंचि मिरवीं मी भूषण । ऐसा दुजा क्षमस्वी कोण । जो साहे अवगुण गुणत्वें ॥३९॥
प्रर्हादाचिया वचनासाठीं । मी प्रकटलों कोरडे काष्ठीं । ऐसा कळवळी परसंकटीं । दुजा सृष्टीं कोण पां ॥६४०॥
घेऊनि भक्तांचा कैवार । झालों मत्स्य कूर्म सूकर । कोणी न साहे न्यून उत्तर । योनीं नीचतर जन्मलों मी ॥४१॥
सांडूनि विश्वश्रीवैभव । पावलों भिक्षेचें लाघव । भक्तां अधीन करूनि जीव । त्यांचें सेवकत्व स्वीकेलें ॥४२॥
पितृभाषपाळणासाठीं । राज्य त्यजिलें उठाउठीं । एवं शीलौदार्य गुणाची साठीं । नाहीं सृष्टीं मज साम्य ॥४३॥
तेव्हां पूर्ण जो भगवंत । तो मी झालों तुमचा सुत । पृश्निगर्भनामें विख्यात । वर कृतार्थ व्हावया ॥४४॥
तयोर्वां पुनरेवाहमदित्यामास कश्यपात् । उपेन्द्र इति विख्यातो वामनत्वाच्च वामनः ॥४२॥
पुढें त्रेतायुगीं तुम्हीच दोघें । कश्यपादिति झालां ओघें । तोचि हा मी त्या प्रसंगें । झालों निजांगें वामन ॥६४५॥
पूर्व वराच्या उत्तीर्णा । व्हावया तुमचे पोटीं जाणा । जन्मोनि सुरांच्या रक्षणा । बलिबंधना म्यां केलें ॥४६॥
आधींच तुमचे पोटीं होतां इंद्र । त्यातें उच्छेदितां दैत्येंद्र । मग वामनत्वें म्यां उपेंद्र । होऊनि सुरेंद्र स्थापिला ॥४७॥
देव दैत्य आणि ऋषि । पहातां समस्तही सभेसी । निगमागमें भार्गवासी । म्यां निमेषार्धेंशीं भुलविलें ॥४८॥
गुणगौरवें दाऊनि महिमा । पुत्रत्वें धन्य म्हणविलें तुम्हां । तोचि मी या तृतीय जन्मा - । पासूनि तुम्हां पावलों ॥४९॥
तृतीयेऽस्मिन् भवेऽहं वै तेनैव वपुषाथ वाम् । जातो भूयस्तयोरेव सत्यं मे व्याहृतं सति ॥४३॥
तुम्ही वसुदेव देवकी । होऊनि जन्मला इहलोकीं । तुम्हां व्हावया ठाउकी । गोष्टी मम मुखीं निघाली हे ॥६५०॥
एवं माझें प्रभाषित । अन्यथा नाहीं सत्य सत्य । तुज कळावें हें इत्थंभूत । साध्वी इत्यर्थ वदलों हा ॥५१॥
एतद्वां दर्शितं रूपं प्राग्जन्मस्मरणाय मे । नान्यथा मद्भवं ज्ञानं मर्त्यलिङ्गेन जायते ॥४४॥
तुम्ही दोघें पूर्व जन्मीं । पृश्नि सुतपा इहीं नामीं । येणेंचि रूपें तेथें पैं मी । तुम्हां प्रसन्न जाहलों ॥५२॥
तें या पूर्वजन्मस्मरणासाठीं । म्यां हें निजरूप दाविलें दृष्टी । मानवी बालत्वें जन्मतों पोटीं । तैं तुम्हां हे गोठी नुमजती ॥५३॥
आतां प्रार्थनापरामर्ष । जें त्वां प्रार्थिलें विशेष । ऐक तयाचा विन्यास । सावकाश जननीये ॥५४॥
हें रूप न दाखवीं कोणां । ऐशी तुवां केली प्रार्थना । तई तुज पूर्वजन्मस्मरणा । वरदखुणा दाविलें ॥६५५॥
या रूपाचे अनधिकारी । त्यांसि न दाखवीं निर्धारीं । यावरी विज्ञापना दुसरी । तेही सुंदरी ऐकावी ॥५६॥
येणें रूपें पुत्र म्हणवितां । मी पावेन उपहास्यता । जाणोनि तुझिया मनोगता । बाळक आतां होईन मी ॥५७॥
शरण आलें त्राहें म्हणसी । तरी तूं ऐके इयेविशीं । जन्मत्रयातें ओळखिसी । मियां तुजपाशीं सांगितलें ॥५८॥
पूर्वींच मागतां निर्वाण । तरी तेव्हांच पावतां कैवल्यसदन । तुम्ही दैवमाया ठकलां जाण । परी मी स्वशरण नुपेक्षीं ॥५९॥
आतां तुम्हीं भजावें मातें । भजनें पावाल कैवल्यातें । याचिलागीं निजरूपातें म्यां तुम्हांतें दाविलें ॥६६०॥
एथूनि तुमच्या मनोगता - । सारिखा बाळचि झालों आतां । तरी जाणोनि या वृत्तांता । तुम्हीं तत्त्वतां भजावें ॥६१॥
युवां मां पुत्रभावेन ब्रह्मभावेन चासकृत् । चिन्तयन्तौ क्रुतस्नेहौ यास्येथे मद्गतिं पराम् ॥४५॥
जरी भजाल पुत्रभावें । तरी भजनचि तें आघवें । याचिसाठीं केलें ठावें । वर्म आघवें तुम्हांसी ॥६२॥
अथवा हेचि धरूनि खूण । कराल ब्रह्मभावें चिंतन । तरी माझिये परमगतीचें स्थान । कैवल्यसदन पावाल ॥६३॥
प्रसन्न झालिया जगदीश्वर । न चुके जन्मजन्मांतर । येचि लज्जेनें त्रिवार । झालों कुमर मी तुमचा ॥६४॥
आतां माझें दिव्यदर्शन । होतां तुम्हांसि झालें ज्ञान । तेणें केलें माझें स्तवन । जें पढणें निर्वाणदायक ॥६६५॥
एथूनि जन्मजन्मांतरें । तुमचीं खंडलीं निर्धारें । मियां एकें झालेनि कुमारें । काय अपुरें तुम्हांसी ॥६६॥
आणीक तुझी विनवणी । जें तुझें जन्म माझे सदनीं । दुरात्मया कंसालागोनि । चक्रपाणि न कळों दे ॥६७॥
N/A
References : N/A
Last Updated : April 26, 2017
TOP