अध्याय २ रा - श्लोक ४१ ते ४२

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


दिष्ट्याऽम्ब ते कुक्षिगतः परः पुमानंशेन साक्षाद्भगवान्भवाय नः ।
मा भूद्भयं भोजपतेर्मुमूर्षोर्गोप्ता यदूनां भविता तवात्मजः ॥४१॥

सुरवर म्हणती जगन्माते । ब्रह्मांडविभवे कल्याणसरिते । हृदयकोशीं श्रीअनंतें । विद्यमानत्व स्वीकेलें ॥९९॥
अनंतब्रह्मांडघटनापटी । तिसी न करवे ज्याची गोठी । म्हणोनि परपुरुष हे चावटी । ब्रह्मांडघटीं वाजिली ॥९००॥
ऐसा प्राकृतीसि जो पर । तो परपुरुष परमेश्वर । मायाअंशेंशीं ईश्वर । झाला स्थिर तव कुक्षीं ॥१॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । तो हा साक्षात् श्रीभगवान । आमुच्या जन्माचें कारण । जयवर्धन परमात्मा ॥२॥
इतुकें सांगावया हेंचि सार । तूं कंसभयाचा वाहसी घोर । त्याचा पडो आतां विसर । जाणोनि ईश्वर निजकुक्षीं ॥३॥
माझें कुक्षीस गर्भगोळ । कंस प्रबुद्ध केवळ खळ । ऐसें न म्हणे हा गोपाळ । दैत्यां काळ जन्मतो ॥४॥
मरणोन्मुख आतां कंस । म्हणोनि झाला बुद्धिभ्रंश । वृद्धावज्ञा बाळां नाश । केला अपयशसंग्रह ॥९०५॥
कंसा क्षय आमुचा जय । एथूनि लोकत्रयासि अभय । यादवरक्षणाचें ज्या कार्य । तो यदुवर्य तव कुक्षीं ॥६॥
परमभाग्यें तूं सभाग्यवंत । गर्भा आला श्रीभगवंत । तेणें देवकी आनंदभरित । शुक सांगत रायासी ॥७॥

श्रीशुक उ० - इत्यभिष्ट्य पुरुषं यद्रूपमनिदं यथा । ब्रह्मेशानी पुरोधाय देवाः प्रत्तिययुर्दिक्म् ॥४२॥

जें अमुकें ऐसें न ये व्यक्ति । सर्वातीत सर्वव्याप्ति । सर्वप्रत्यग्भूतप्रतीति । तें केलें स्तुतीमाजींवडें ॥८॥
अणूहून सूक्ष्म सान । तेथही सूर्याचे पावती नयन । त्यासही जेथ आंधळेपण । स्वरूप जाण तें स्तविलें ॥९॥
रसना रसज्ञ ज्याचेनि योगें । परी त्यासी चाखों नेणे निजांगें । आंत बाहेर पुढें मागें । असोनि नलगे ते गोडी ॥९१०॥
वाचा देखिलें ऐकिलें बके । ज्याचेनि जीवनें वदनीं फांके । ते त्या सहसा वदों न शके । कीं तें न टके वाचेतें ॥११॥
श्रवण नादवंत सदा । नादें ते ऐकती बाह्य नादा । ते नेणती परमानंदा । असतां शब्दा सबाह्य ॥१२॥
त्वगिंद्रियीं स्फुरे पवन । ज्याचेनि संवेदनें स्पर्शज्ञ । परी तें जेणें सल्लग्न । असोनि जाण सांचला ॥१३॥
चक्षु प्रकाशाचें शर । घेऊनि नीलशाचा आधार । अभ्यासमार्गें योगेश्वर । परात्परतर टाकिती ॥१४॥
त्या चक्षूसि नाहीं ठावें । रक्त श्वेत कृष्ण हिरवें । ओतप्रोत पपंचभावें । कोणासवें उमसेना ॥९१५॥
प्राण गंधाचें ग्राहक । सर्वां मंडण म्हणवी नाक । त्यासि घ्रेयत्वविवेक । नोहे निष्टंक वस्तूचा ॥१६॥
मन कल्पूनि ब्रह्मांडकोटि । परी वस्तूची न करी गोष्टी । बहु शहाणी करूनि दिठी । तेही पैठि नोहेची ॥१७॥
मनोरथाचें अनुसंधान । करूनि चित्त चतुर पूर्ण । सव्यापारें अस्तमान । त्यासही जाण ते ठायीं ॥१८॥
नानापदीं पदाभिमानें । अहंकाराचें अवतरणें । स्वयें असूनि विमुखपणें । ज्याचें जिणें वस्तूशीं ॥१९॥
अंतःकरण विश्वाभास । विसरोनि स्मृति होय ओस । विपरीतज्ञाना करी ग्रास । तेथें वस्तूसि आस्तिक्य ॥९२०॥
शून्यपणें सर्व विसरे । वस्तू मानूनि आपण स्फुरे । नये नेणवे नानाविकारें । एवंप्रकारें अनिदं जें ॥२१॥
ऐसें स्वरूप निर्विकार । स्तवनीं स्तवूनि सुरवर । ब्रह्मा शंभु पुरस्सर । जाती सुरवर स्वधामा ॥२२॥
कन्या माहेरीं सुरवाडे । कां जळगार सागरीं पडे । तैसे स्वकारणीं होऊनि वेडे । विधिहर कोडें झणें रहाती ॥२३॥
पुढें करूनि विधिहरांसी । अमर गेले निजपुरासी । वैयासकी भूवरासी । कथा ऐशी निवेदी ॥२४॥
आतां एथूनि सावधान । श्रीकृष्णाचें जन्मकथन । कथामृतासि भोक्ते श्रवण । होत सज्जन श्रोत्यांचे ॥९२५॥
एथूनि श्रीकृष्णजन्मकाळ । श्रोतयां सुखाचा सुकाळ । लोकत्रयीं शुभ मंगळ । पुण्यशीळ परिसोत ॥२६॥
वसुदेवदेवकी सनाथ । करूनि गोकुळीं श्रीकृष्णनाथ । क्रीडा करीत तेचि एथ । कथा कृतार्थ जग करू ॥२७॥
दत्तब्रह्मांडभांडोदरीं । जनार्दनाख्यक्षीरसागरीं । श्वेतद्वीपएकाकारीं । चिदानंदगिरि रत्नांचा ॥२८॥
तेथ स्वानंदभुवनीं सत्यसंकल्पी । गोविंदसद्गुरु वृषाकपि । कृपापादोद्भवा ओपी । प्रेमत्रिपथा दयार्णवा ॥२९॥
तये संगमीं सुस्नात । श्रवणक्षेत्रीं श्रोते होत । भावें श्रीमद्भागवत । मूर्तिमंत परमात्मा ॥९३०॥
तो पूजोनि मानसोपचारीं । निर्माल्यटीका हे अंगीकारीं । हरिवरद त्यातें वरी । मोक्षलक्ष्मी उभयत्र ॥३१॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे अष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दार्णवानुचरविरचितायां ब्रह्मस्तुतिर्नाम द्वितीयोऽध्यायः ॥२॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४२॥ ओवीसंख्या ॥९३१॥ एवं संख्या ॥९७३॥ ( दोन अध्याय मिळून ओवीसंख्या १९६१ )

दुसरा अध्याय समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP