अध्याय २ रा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


मिमद्य तस्मिन् करणीयमाशु मे यदर्थतन्त्रो न विहन्ति विक्रमम् ।
स्त्रियाः स्वसुर्गुरुमत्या वधोऽयं यशः श्रियं हन्त्यनुकालमायुः ॥२१॥

आजि ये क्षणींच सावधान । होऊनि करावा कोण प्रयत्न । सामादि उपाय न चलती जाण । तें कारण बोलतों ॥२२५॥
इचे गर्भीं आहे हरि । जो कां देवांचा कैवारी । माझा केवळ पूर्ण वैरी । तो निर्धारी मम हन्ता ॥२६॥
हा दैवतंत्र विचार । अन्यथा न करवे साचार । एथें करणीय प्रकार । मज सत्वर कोणता ॥२७॥
सामान्य पुरुष प्रतापवंत । अंगीकारी जें जें कृत्य । तें तें सिद्धी पाववीत । हा तो सत्यसंकल्पी ॥२८॥
एक उपाय दिसतो सिद्ध । जो आतांचि करावा इचा वध । तेव्हां आपणासीच विरुद्ध । तेंचि प्रसिद्ध बोलतों ॥२९॥
कोणी तरी एक प्राणी । कर्मतंत्रें वर्त्ततां जनीं । आचरोनि दुष्ट करणी । ऐश्वर्यहानि न करिती ॥२३०॥
गगनोच्चार ऐकोनि कानीं । मारीत होतों बाळपणीं । वसुदेवें वारिलें ते क्षणीं । निंद्य करणी म्हणोनिया ॥३१॥
आतां तेंचि केलिया पुढती । सकळ पातकें येऊनि घडती । अंगीं अपवाद अवघे जडती । तेचि झडती निरूपीं ॥२२॥
स्त्रीवदाचें दुस्तर पाप । भगिनीहत्येचें अमूप । गरोदरीचें अनंतकल्प । ऐसा जल्प शास्त्रींचा ॥३३॥
येणें पापें यशोहानि । कल्याणप्राप्ति मग कोठूनि । गेली विजयश्री पळोनि । ऐसें कळोनि केंवी करूं ॥३४॥
ऐसें अघोर कर्म करी । त्यासि अकाळें काळ मारी । तेव्हां हानि बळात्कारी । आपुल्या पदरीं घेतली ॥२३५॥
यादवांचा होईल जय । मज येईल पराजय । पापें आयुष्याचा क्षय । शत्रूंसि विजय अनायासें ॥३६॥
देवकी मेलिया माझीच बहिणी । स्त्रिया वसुदेवा बहुत जणी । काय त्याची होईल हानि । माझी करणी मज विघ्न ॥३७॥

स एष जीवन् खल्ल संपरेतो वर्त्तेत योऽत्यन्तनृशंसितेन ।
देहे मृते तं मनुजाः शपन्ति गन्ता तमोऽन्धं तनुमानिनो ध्रुवम् ॥२२॥

स्त्री बहिणी आणि गरोदरी । देहलोभें जिवें मारी । ऐसें क्रूर कर्म जो करी । त्यासि संसारीं धिक्कार ॥३८॥
ऐसा क्रूरपणें जो वर्त्तत । तो संसारीं जीवचि प्रेत । लहान थोर धिक्कारित । छी धू करीत मागें पुढें ॥३९॥
ऐसे देहाभिमानी प्राणी । जाती अंधतमा लागुनि । मागें लोकीं शापध्वनि । कर्णोपकर्णीं बोलतील ॥२४०॥
पापें आयुष्याचा नाश । मृत्यु आयुष्याचा करी ग्रास । मग तो जाईल अंधतमास । जो नृशंस दुरात्मा ॥४१॥
ऐसा देवकीगर्भीं हरि । दर्शनें कंसाची दुर्मति हरी । तेणें प्रवर्त्तला विचारीं । धरी अंतरीं पापभय ॥४२॥

इति घोरतमाद्भावात्सन्निवृत्तः स्वयं प्रभुः । आस्ते प्रतीक्षंस्तज्जन्म हरेर्वैरानुबन्धकृत् ॥२३॥

ऐसा विवरितां विचार । पापापवाद अपयश घोर । येणें भयें कंसासुर । स्वयें सत्वर परतला ॥४३॥
सर्व सामर्थ असतां हातीं । कंस दुर्वृत्त निघाती परंतु सम्यक बरवे रीतीं । विचारस्थितीं परतला ॥४४॥
जन्मांतरींचा वैरानुबंध । आहे जेणेंशी संबंध । त्याची जन्मप्रतीक्षा सिद्ध । होऊनि सावध करीतसे ॥२४५॥
हरि माझा केवळ वैरी । वदली वाणी अशरीरी । म्हणोनि जन्मप्रतीक्षा त्याची करी । स्मृति दुसरी विसरला ॥४६॥

आसीना संविशंस्तिष्ठन्भु्ञ्जानः पर्यटन्महीम् । चिन्तयानो हृषीकेशमपश्यत्तन्मयं जगत् ॥२४॥

नवल वस्तुमहिमा अगाध । दर्शनमात्रें झाला वेध । विसरला सर्व प्रपंचबोध । धन्य विरोधप्रेम हें ॥४७॥
द्वेषें मैत्रें अथवा भयें । किंवा प्रेमें पुत्रस्नेहें । रतिरहस्यें जारविग्रहें । प्राप्ति लाहे समसाम्य ॥४८॥
त्यांत हा स्वभावें परमक्रूर । भयें वेधला कंसासुर । देखे हरिरूप चराचर । तो प्रकार शुक बोले ॥४९॥
बैसला असतां स्वेच्छासनीं दचकोनि कृष्ण पाहे नयनीं । कृष्ण कोंदला मनाचें मनीं । ध्यानीं नयनीं श्रीकृष्ण ॥२५०॥
मनेंचि धरिलें कृष्णभय । तेणें ब्रह्मांड झालें कृष्णमय । मुशीचें मेण विघरोनि जाय । जेवीं रसमय मग कोंदे ॥५१॥
मनें कल्पिला विश्वाभास । त्या मनासी लागला कृष्णधास । कैंचा ठाव संसारास । झाला कंस कृष्णमय ॥५२॥
प्रवेशतां नानासदनीं । सबाह्य कृष्ण देखे नयनीं । चौंभागीं चोहों कोनीं । अवनीं गगनीं श्रीकृष्ण ॥५३॥
स्वभावें जेथें उभा राहे । कृष्णचि देखे सेवकसमूहें । कृष्णमयचि भासे देह । दचकोनि पाहे घाबरा ॥५४॥
जेव्हां बैसे आरोगणें । भोंवतीं ठेवी दृढ रक्षणें । अन्न ब्रह्म हें स्मरतां मागें । अंतःकरणें ओथरे ॥२५५॥
विष्णुअंश स्ववधाप्रति । दृढ विश्वास हा बैसला चित्तीं । देखोनि श्रीकृष्णाची व्याप्ति । तेणें चित्तीं दचकत ॥५६॥
अन्नं ब्रह्म रसो विष्णु । एथ कैसा रक्षूं प्राणू । म्हणोनि ग्रासोग्रासीं कृष्ण । दचकोन भयभीत ॥५७॥
फिरत असतां पृथ्वीप्रति । कृष्णमयचि भासे क्षिति । सरली विषयांचि विश्रांति । श्रीकृष्ण चित्तीं दृढ झाला ॥५८॥
शब्दश्रवणीं अंतःकरण । अवघा कोंदोनि ठेला कृष्ण । स्पर्शत्वगिंद्रियेंशीं मन । श्रीभगवान दाटला ॥५९॥
रूप चक्षु आणि बुद्धि । कृष्णचि कोंदला त्रिशुद्धि । रसरसना चित्तावधि । कृष्णबोधीं कृष्णमय ॥२६०॥
गंध घ्रीण अहंकार । कृष्णचि झाला निरंतर । कृष्णें व्यापिले विकार । देखे चराचर कृष्णमय ॥६१॥
कृष्ण आसनीं शयनीं भोजनें । कृष्ण गमनागमनीं निवेशनीं । कृष्ण भुवनीं जीवनीं दहनीं । पवनीं गगनीं श्रीकृष्ण ॥६२॥
ऐसें कृष्णमय झालें जग । भय मात्र कंसत्वाचें अंग । पहिले कथेचा प्रसंग । तो अव्यंत अवधारा ॥६३॥

ब्रह्मा भवश्च तत्रैत्य मुनिभिर्नाददादिभिः । देवैः सानुचरैः साकं गीर्भिर्वृषणमैडयन् ॥२५॥

ऐसा कृष्णवेधें लागला छंद । हा तीव्र ध्यानाचा अनुवाद । कंसभजन तेंचि द्वंद । चिदानंदप्रापक ॥६४॥
असो कंसाचें व्याख्यान । शंभूसहित चतुरानन । नारदादिक जे मुनिगण । आणि सुरगण इंद्रादि ॥२६५॥
जे देवांचे अनुचर । यक्ष गंधर्व किन्नर । वसुरुद्रादित्य पितर । साध्य खेचर सिद्धादि ॥६६॥
अवघे येऊनि देवकीपाशीं । स्तविते झाले हृषीकेशी । जो कां वांच्छितार्थ अभिवर्षी । निजभक्तांसी कामद ॥६७॥
ब्राह्मी वाणी ते वेदवती । शैवी मांत्रिकी भारती । ऐंद्री गीर्वाण सरस्वती । सुप्तिडन्ती संस्कृत ॥६८॥
ऐसें वदतां पृथकागणीं । पृथक भाषा पृथक वाणी । तिहींतिहींकरूनि । चक्रपाणि स्तवियेला ॥६९॥
ते बादरायणोक्ति बादरायणि । वाखाणितां गीर्वाण वाणी । पडतां परीक्षितीच्या कर्णीं । अंतःकरणीं निवाला ॥२७०॥
ते ब्रह्मस्तुतीचिये श्रवणीं । सादर होइजे विचक्षणीं । आबालसुबोधसाधनीं । ये व्याख्यानीं अधिकार ॥७१॥
गीर्भिः म्हणजे बहुतां वाणीं । देवीं स्तविला चक्रपाणी देशभाषा देशिक जनीं । हरि तोषोनि सुखदात्री ॥७२॥
जे जे देशीं जी जी भाषा । तेचि तोषदें श्रीपरेशा । भेद संस्कृत प्राकृत ऐसा । एथें सहसा न वदावा ॥७३॥
चारी वाचा प्रकृतिपोटीं । तेव्हां सर्व वाचांची प्राकृत गोष्टी । व्याकरणसंस्कार परिपाठी । संस्कृत कसवटी या हेतु ॥७४॥
देशभाषांचा उच्चार । त्यासहि द्वादश संस्कार । करितां लोक वर्णोच्चार । तेणें व्यवहारपटु वाणी ॥२७५॥
देशभाषां संस्कारवंत । तेव्हां त्याही म्हणाव्या संस्कृत । एवं संस्कृत प्राकृत भेदरहित । हा संकेत समस्तां ॥७६॥
देशभाषां आणि गीर्वाणी । इहीं नामें भिन्न दोन्ही । संस्कृत प्राकृत सर्व वाणी । अबिन्नपणीं अभिधानें ॥७७॥
श्लोक आर्या नाना छंदें । पिंगलप्रणीतें गद्यपद्यें । प्रतिपादिलीं गांधर्ववेदें । तीं तीं विशदें अतिरम्यें ॥७८॥
ऐशी सुललिता रसाळवाणी । अभिवांच्छितकामवर्षणी । देवीं स्तविला चक्रपाणि । तें ऐकें श्रवणीं भूपति ॥७९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP