अध्याय २ रा - श्लोक ११ ते १५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


नामधेयानि कुर्वन्ति स्थानानि च नरा भुवि । दुर्गेति भद्रकालीति विजया वैष्णवीति च ॥११॥

मृत्युलोकीं भजनपर । तुझे ठायीं होती नर । नाना स्थानांचा विचार । नामोच्चार तो ऐकें ॥२१॥
दुर्गमापासूनि सोडविती । म्हणोनि दुर्गा ऐसें तुज म्हणती । भद्र म्हणजे कल्याणदात्री । भद्रकाली या नामें ॥२२॥
अधर्माचा पराजय । करूनि धर्माचा करिसी विजय । यालागीं विजया नामधेय । लोकत्रयविख्याता ॥२३॥
माझिये आज्ञेच्या लाघवीं । बर्त्तसी म्हणोनि तूं वैष्णवी । कुमुदा चंडिका कृष्णा माधवी । इत्यादि नांवीं वर्णिती ॥२४॥

कुमुदा चण्डिका कृष्णा माधवी कन्यकेति च । माया नारायणीशानी शारदेत्यम्बिकेति च ॥१२॥

कुमुदा नामें संजीवनी । चंडिका चंडमुंडमर्दिनी । कृष्णा विश्वमोहिनी । वासंतिनी माधवी ॥१२५॥
कन्यका नामें अस्पृष्टकामा । माया वर्धिनी भवद्रुमा । नारायणाची ऐश्वर्यवामा । जगद्विश्रामा नारायणी ॥२६॥
ईशनसामर्थ्यातें धरिती । म्हणोनि ईशानी हें म्हणती । शरदुत्सवाची अधिष्ठात्री । यालागीं म्हणती शारदा ॥२७॥
धारण पोषण अभिशिक्षण । करिसी विश्वाचें पालन । यालागीं अंबिका अभिधान । करिती जन तुजलागीं ॥२८॥
ऐशी चौदा नामरत्नीं । स्वयें भगवंतें गौरवूनि । प्रतिष्ठिली नानास्थानीं । श्रीभवानी जगदंबा ॥२९॥
चतुर्दश नामें भगवद्दत्त । प्रातःकाळीं स्मरती नित्य । ते पावती अभिवांच्छित । हा गुह्यार्थ एथींचा ॥१३०॥

गर्भसंकर्षणात्तं वै प्राहुः संकर्षण भुवि । रामेति लोकरमणाद्बलं बलवदुच्छ्रयात् ॥१३॥

आणीक वदे श्रीभगवान । सम्यक् गर्भाचें कर्षण । करिसी म्हणोनि संकर्षण । म्हणती जन गुणनाम ॥३१॥
लोकां रमवील स्वस्वरूपीं । म्हणोनि राम हें नाम विश्व कल्पी । बलोत्कर्षें महाप्रतापी । विश्वव्यापी बल नाम ॥३२॥

श्रीशुक उवाच - संदिष्टैवं भगवता तथेत्योमिति तद्वचः । प्रतिगृह्य परिक्रम्य गां गता तत्तथाऽ‍करोत् ॥१४॥

एवं पूर्वोक्त प्रकारीं । आज्ञापिता श्रीमुरारी । ते वरदाज्ञा अत्यादरीं । अंगीकारी जगदंबा ॥३३॥
भगवंतें सम्यक् प्रकारें करून । स्वमुखें केलें आज्ञापन । तें स्वस्वामीचें वचन । केलें मान्य अत्यादरें ॥३४॥
आम्रेडित म्हणजे द्विरुक्ति । तथेति आणि ओमिति । ऐशी अत्यादरें आदिशक्ति । तोषे चित्तीं प्रभुवाक्यें ॥१३५॥
आज्ञा घेऊनि आदिमाया । लागली स्वामीचिया पायां । प्रदक्षिणा करूनिया । नियोगकार्या चालिली ॥३६॥
कित्येक म्हणती पाखंडी । वरदायक कलौ चंडी । परी आज्ञेवेगळी तिचेनि काडी । नोहे वांकुडी पृथक्त्वें ॥३७॥
जैसे याचक बराडी । सेवका स्वामीचिये प्रौढी । ग्रासा एकास्तव बडबडी । तैशी चंडी सकामा ॥३८॥
झाडें करिती पूर्ण काम । तरी काय ईश्वर कल्पद्रुम । पाषाण चिंतामणीचें नाम । तो परब्रह्म म्हणावा ॥३९॥
ज्यावरि प्रभूचा अनुग्रहो । तेथ इत्यादि वस्तुसमूहो । करिती सेवेचा लवलाहो । धरूनि देहो आणिमादि ॥१४०॥
म्हणोनि अमर्थ जगदात्मा । तो तरी एकचि परमात्मा । महत्त्व देऊनि अनेक नामा । प्रतापमहिमा प्रकटवी ॥४१॥
भगवद्गीतेचे सप्तमाध्यायीं । स्वमुखें बोलिला शेषशायी । कीं जो जो भजेल जे जे देहीं । ते ते ठायीं मी प्रकटें ॥४२॥
यो यो यां यां तनुं भक्तः । या दों श्लोकीं रमाभर्ता । म्हणे जो जो भक्त जे जे देवता । श्रद्धयान्विता आराधी ॥४३॥
ते देवतामूर्तीच्या ठायीं त्याची । अचलश्रद्धा मीच रचीं । मग ते श्रद्धेनें भजतां मीची । करीं कामाची पूर्णता ॥४४॥
ऐसें कळोनि भ्रांत होती । अहंताभ्रमें भेदं कल्पिती । ते ते प्राणी दुःखी होती । नागवती अभिमानें ॥१४५॥
पंचायतन पंचभूतें । जडें त्रिगुणात्मकें दैवतें । परमात्म्याचें चैतन्य तेथें । हें एकात्मते जाणावें ॥४६॥
सर्वव्यापी श्रीभगवान । तोचि झाला पंचायतन । ऐसें जयाचें अभेद भजन । सुखसंपन्न तो होय ॥४७॥
समुद्राचे तरंग अनेक । हें बोधे तें ज्ञान सम्यक । तरंगा एकाचे सिंधु अनेक । हा अविवेक ज्ञानाचा ॥४८॥
लेंकुरासाठीं मांडिती सटी । परब्रह्म जन्मलें इचे पोटीं । ऐशीं अज्ञानें उफराटीं । कामें करंटीं नागविलीं ॥४९॥
एथ परमात्मा विश्वव्यापी । नाना देवता तत्संकल्पीं । होती जाती कल्पोकल्पीं । वृथा विकल्पी जल्पती ॥१५०॥
असो पाखंडीयाची गोठी । मग ते अघटितघटनापटी । प्रभूची आज्ञा वंदूनि मुकुटीं । भूतळवटीं पातली ॥५१॥
जैसें आज्ञापिलें नाथें । तैसें तैसें तेथ तेथें । सर्व प्रभूच्या सामर्थ्यें । ती तदर्थें संपादी ॥५२॥
कुसुळी जैसें चोरूनि लोणी । लोकांचें आपुल्या सदना आणी । देवकीगर्भसंकर्षणीं । हेचि करणि दाखविली ॥५३॥

गर्भे प्रणीते देवक्या रोहिणीं योगनिद्रया । अहो विस्रंसितो गर्भ इति पौरा विचुक्रुशुः ॥१५॥

देवकीगर्भातें योगनिद्रा । नेऊनि घालितां रोहिणीउदरा । प्रवाद उठिला माजीं नगरा । लोकद्वारा तो ऐका ॥५४॥
सुहृद सदय ज्या नरनारी । शोक करिती मथुरापुरीं । सातवा गर्भ देवकीउदरीं । कोणे परीं जिराला ॥१५५॥
दैवीसंपत्ति देवकी । अहंकंस हा अविवेकी । बाळें मारितां झाली दुःखी । धाकें धडकी बैसली ॥५६॥
कंस केवळ प्रलयकाळ । झणीं मारील सातवा बाळ । येणें भयें उतावीळ । गर्भगोळ टाकिला ॥५७॥
देवकीचा गर्भपात । झाला म्हणोनि नगरीं मात । कर्णोपकर्णी हा वृत्तांत । कंसा विदित जाहला ॥५८॥

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP