मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २ रा| श्लोक २७ अध्याय २ रा प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ ते ३४ श्लोक ३५ श्लोक ३६ श्लोक ३७ ते ३८ श्लोक ३९ ते ४० श्लोक ४१ ते ४२ अध्याय २ रा - श्लोक २७ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २७ Translation - भाषांतर एकायनोऽसौ द्विफलस्त्रिमूलश्चतूरसः पश्चविधः षडात्मा ।सप्तत्वगष्टविटयो नवाक्षो दशच्छदी द्विखगो ह्यादिवृक्षः ॥२७॥वृक्श ब्रह्मभूमिके निर्मळे । गुणसाम्यप्रकृतीचें आळें । तेथ गुणत्रयाचीं मूळें । कर्मजळें बळावलीं ॥३४५॥अष्टधा प्रकृति खांद्या अष्ट । षड्विकार स्वभाव स्पष्ट । सप्तधातु त्वचा काष्ठ । वेष्टूनि श्रेष्ठ वाढला ॥४६॥दशप्राणपत्रीं हाले । नवां छिद्रांची खूण वाळे । चतुर्विध पुरुषार्थ रसाळें । द्विविध फळें लगटलीं ॥४७॥फलास्वादप्रकार पांच । तेचि पांच विषय साच । दोन्ही पक्षी उंच नीच । ये वृक्षींच राहिले ॥४८॥ऐसा प्रपंच आदिवृक्ष । साद्यंत आवघाचि परोक्ष । एथ आत्मा तूं अपरोक्ष । जो अलक्ष अगोचर ॥४९॥आतां शुद्धभूमीं केवळ । कैसें निर्माण झालें आळें । तेथें दृढावलीं कैशीं मूळें । हें परिसा कळे त्या रीतीं ॥३५०॥अचळ अमळ शुद्ध बुद्ध । अलक्ष्य अव्यय स्वतःसिद्ध । अपार अमूप अगाध । स्वसंवेद्य सन्मात्र ॥५१॥श्रुति जयाचें आंगण । पाहोनि करिती आंगवण । जें पूर्णाचेंही परिपूर्ण । ज्ञानाज्ञान अस्पष्ट ॥५२॥जें होऊनि जें पहावें । जें होऊनि जेथ रहावें । जें होऊनि जें भोगावें । द्वैत न शिवे जे ठायीं ॥५३॥जया न संभवे अधोर्ध्व । जया नातळे शुद्धाशुद्ध । जेथ द्वैतबुद्धिबोध । हा निरोध जे ठायीं ॥५४॥जये ठायीं सत्ता इतुकी । ऐसें कथूनि शारदा मुकी । सूर्यासि ज्याची अनोळखी । व्योमा चुकी व्याप्तीची ॥३५५॥ऐसें जें कां केवळ ब्रह्म । तये भूमीसि प्रपंचद्रुम । थावला त्याचा अनुक्रम । मुनिसत्तम निरूपी ॥५६॥अद्वैतभूमि द्वैत आळें । म्हणतां सरस्वती पांगुळे । अनिर्वाच्य म्हणते वेळे । केवीं कळे अवलांसी ॥५७॥हें तों अनिर्वचनीय खरें । यासारिखें कैचें दुसरें । दृष्टांत दीजे त्या आधारें । कीं एथ पुरे उपमेसी ॥५८॥जेथ द्वैताचा ठावचि नाहीं । अनंत सृष्टि तेचि भुई । लगडोनि पिकती हे नवाई । अपूर्व काय बोलावी ॥५९॥व्योमें व्योमचि व्यापिलें । पवनें पवना चंचळ केलें । तेजें तेजा प्रकाशिलें । जीवनें जीवविलें जीवनातें ॥३६०॥तैसें आपणामाजीं आपण । जितकें स्फुरे अहंस्फुरण । तितुकें महद्ब्रह्म जाण । दीर्घ स्वप्न मायिक ॥६१॥तरंगीं आवरे जितका सिंधु । तितकाचि तरंगाबबोधु । येर उरला जो अगाधू । तो स्वतःसिद्ध संचला ॥६२॥जागृतीमाजीं जें चैतन्य । तेंचि जैसें देखे स्वप्न । एवं कार्यकारण अभिन्न । अनिर्वचन या हेतु ॥६३॥ऐशी अनिर्वचनीय माया । अंगीकारेंवीण बोलावया । निलाग म्हणोनि या उपाया । प्रवर्त्तलीया श्रुतिस्मृति ॥६४॥एर्हवीं शब्दाशीं हें कानडें । सर्व साधनांसि कोडें । विचार राहे एकीकडे । ज्ञान बापुडें तें काय ॥३६५॥एथ एकचि उपाय । ईश्वरकृपा सद्गुरुपाय । अनन्यभावें सेवूनि ठाय । त्यासि जाय उपभोगा ॥६६॥येर अवघीच व्युत्पत्ति । मुखें बडबड हातीं पोथी । संकल्पसन्निपात भरला चित्तीं । तेणें वसति भ्रमाची ॥६७॥भ्रमिष्टें भ्रमिष्टा उपजवणें । अंधा अंधें चालवणें । काळें काजळें निर्मळ धुणें । तैशी देहाभिमानें व्युत्पत्ति ॥६८॥ईश्वरप्रसादें सद्गुरुप्राप्ति । तरीच तेथ अनन्यभक्ति । तेथेंचि घडे चित्सुखावाप्ति । येर व्युत्पत्ति आंधळी ॥६९॥गुरुशिष्य घरोघरीं । अनन्यभक्तीपासूनि दूरी । यालागीं उभयतां बाजारीं । दे - घे करी दुकानीं ॥३७०॥सृष्टि अवघी दंपत्यवंत । पतिव्रतांची वाण बहुत । अनसूया अरूंधती विख्यात । लोपामुद्रा इत्यादि ॥७१॥असो किती हा विस्तार । परिसें न पालटे खापर । तो धोंडा हा मृद्विकार । अनधिकार परस्परें ॥७२॥श्रुतीचा इतुका उपकार । वेदांतशास्त्रें पाखंडभार । खंडोनि केला साक्षात्कार । परात्परतर वस्तूचा ॥७३॥अनन्यसद्गुरुभक्तिबळें । श्रुतिप्रणीतप्रमेय कळे । स्वसंवेद्य ज्ञान उजळे । हृदय खोळे आतौतें ॥७४॥तत्स्वयं योगसंसिद्ध इति । कालेनात्मनि विंदति । ऐसें बोलिला श्रीपति । गीता चतुर्थाध्यायीं ॥३७५॥असो अद्वैतीं नसतां माया । अनिर्वाच्या अंगीकारूनिया । श्रुति प्रवर्त्तल्या प्रबोधकार्या । तेंचि राया शुक सांगे ॥७६॥लटिका व्योमीं नीळिमा मळ । लटिका भ्रमाचा वेताळ । लटिका लेंकुराचा खेळ । तैशी टवाळ हे माया ॥७७॥मी ब्रह्म हें नाथिलें स्फुरण । हेंचि प्रकृतिआळें जाण । तेथें आदिप्रपंचाभिवर्धन । तेंहि कथन अवधारा ॥७८॥जैशी लटुपटु कहाणी । ऐकिजे हूंहूं म्हणोनि । तैशी अद्वैतीं द्वैतकथनी । कोणीं कानीं न काढावी ॥७९॥जें अद्वैत प्रसिद्ध । तेथ प्रणववीजाचा कंद । प्रपंचाकारें झाला विशद । तो अनुवाद वृक्षाचा ॥३८०॥वृद्धिक्षयरूपें इय । दो अक्षरीं व्याख्या होय । कथिली श्रुतीनें नामसोय । प्रपंचमय हा वृक्ष ॥८१॥विपरीतज्ञानें वृद्धि होय । वास्तवज्ञानें पावे क्षय । वृश्च्यत इति इति वृक्ष व्याकरणसोय । दाविली स्वयें श्रीधरें ॥८२॥अहं ब्रह्मास्मि हें स्फुरण । तया कंदाचें संजीवन । तोचि शुद्ध सत्त्वगुण । ओल्हावून टवटविला ॥८३॥तेथूनि त्रिगुणांचीं मूळें । आळां पांजरोनि झालीं सबळें । अहंस्तंभाच्या रसाळ नळें । फुटले डहाळे अष्टधा ॥८४॥ते महत्तत्वाचे खोडी सदटे । अहंकाराचा कोंब फुटे । तो त्रिविध तिहीं ठायीं वाटे । तीन्ही फांटे त्रिलोकीं ॥३८५॥तमोमूळाचे नीरस उफाडे । तामस फांटा लांब वाढे । अधोमुखची तो वावडे । अजडा जडें जडत्व ॥८६॥तेथें प्रथम फांटा शून्यरूप । त्यासि आकाश ऐसा जल्प । त्याहूनि चंचळ जड अमूप । वायुस्वरूप पांजरला ॥८७॥वायूहूनि दशगुणी जड । सतेज शाखेचा झडाड । त्याही दशगुणी जड अवघड । धांवे घडघड जळशाखा ॥८८॥जळाही दशगुणी घनवट । सर्व शाखांचा तळवट । ते भूमिशाखा ज्याची स्पष्ट । ऐसे अष्ट विटप हे ॥८९॥एवें सत्त्वमूळें रसाळें । याचि शाखांत वेगळे । पारंब्यांत फुटती डहाळे । ते मोकळे अनुवादूं ॥३९०॥अंतःकरणनामें शाखा । व्योमशाखेसि अंतर्मुखा । वाढोनि मुळींची भूमिका । लांब देखा कवळावया ॥९१॥दुसरी पवनशाखेसी फुटे । संकल्पविकल्पाचे तिसी फांटे । परमचंचळ वावटे । मन हें घटे ती नांव ॥९२॥तिसरी तेजशाखेची फांदी । रसाल निश्चया प्रतिपादी । सत्त्वमूळरसाची वृद्धि । नामें वृद्धि जे म्हणिजे ॥९३॥चौथा जळशाखेचा डहाळा । अनुसंधानात्मक कोंवळा । चित्तनामें ज्याची कळा । वृक्षा सकळा शोभवी ॥९४॥भूमिशाखेचा सबळ बांड । अहंकारनामें जो सदृढ । शोभें शोभवी ब्रह्मांडपिंड । जेणें झाड लसलसित ॥३९५॥आतां रजाच्या मूळरसें । फांटे वाढले ते कैसे । तेंचि ऐका सावकाशें । होती तैसे निरोपूं ॥९६॥अध उर्ध्व आणि मध्य । फांटे पांजरले त्रिविध । चेष्टा ज्ञान क्रिया बोध । शुद्धबद्ध संमिश्र ॥९७॥व्यान समान उदान । प्राण आणि पांचवा अपान । हें पंचविध पूर्ण जाण । स्पष्ट रुणझुण हालती ॥९८॥नाग कूर्म कृकलास । देवदत्त धनंजय विशेष । हे गुप्तपत्रें गर्भकोश । वेष्टूनि अग्रांश वाढविती ॥९९॥वाम दक्षिण आणि मध्य । जैशीं पळसाचीं पत्रें विविध । तैशींच प्रपंचतरूचीं दशविध । मुनि प्रसिद्ध बोलिला ॥४००॥या वृक्षाचे चारी रस । ते विवळ राया परिस । दृष्टांतद्वारा तव मानस । हा विशेष उमजेल ॥१॥जैसें कोमळ रसाळ फळ । तिक्त सदोष केवळ । तेंच वाढतां सबळ । कपायशील संमिश्र ॥२॥लवणरायीरामठमेळें । रुचिदायक तें सदोष केवळ । तेंच फळ जैं निवर झालें स्वादें अम्लें परिणमे ॥३॥तेव्हां लवण मिरीं आणि गुड । यांच्या योगें विशेष गोड । केवल परिपक्क तैं सुरवाड । पीयूषपडिपाड गोडिचा ॥४॥तैसें भवतरूचे रस चारी । चारी पुरुषार्थ अवधारीं । इंद्रियांच्या पंचप्रकारीं । तेचि परी रसाची ॥४०५॥ज्ञानेंद्रियांचे विविध धर्म । तैसेंचि कर्मेंद्रियांचें कर्म । ते विषयपरचि संभ्रम । तैं रसाळतम मूळरसें ॥६॥तें संपादाया विषगोडी । अन्यायार्जित अर्थ जोडी । ते अकीर्तिरसपरवडी । तमोवाढी भवद्रुमीं ॥७॥अनर्थ अर्थें वाढे काम । तैं काम्यकर्माचा संभ्रम । भूतप्रेतार्चनें वाम । चाळी नेम तमोमूळें ॥८॥तुटोनि विधींचें बंधन । स्वेच्छारसे यथेष्टाचरण । उच्छृंखल मुक्तपण । हा मोक्ष जाण तामस ॥९॥ऐसे तमात्मक चारी रस । तमोशाखींचे विशेष । हेचि रजाचे असोस । शाखारस भववृक्षीं ॥४१०॥तेव्हां कर्मशास्त्राचे आवडी । भवद्रुमाची रसाळ गोडी । पुण्यप्रकारपरवडी । वाढे जोडि सर्वस्वें ॥११॥नाना व्रतें तपें तीव्रें । इहामुत्ररसें मधुरें । पूर्वमीमांसा यज्ञाधारें । इष्टपूत रसाळ ॥१२॥दुसरा राजस रस अर्थ । स्वधर्में जोडिजे यज्ञार्थ । तिसरा स्वर्गकामाचा स्वार्थ । यज्ञें कृतार्थ तो चौथा ॥१३॥इंद्रादिदेवतासायुज्य । शास्त्रें मानूनि होईजे पूज्य । राजस मोक्षाचें हें भोज्य । या चहूंही रज रसाळ ॥१४॥भवद्रुमाचे चार्ही रस । आतां सत्त्वशाखांचे हे परिस । वाळे भवद्रुमची अशेष परिपक्कास रस येतां ॥४१५॥समष्टि हें सगळें झाड । व्यष्टि वेगळाले मोड । चहूंकडे लगडले घड । एवं अवघड अवघाची ॥१६॥सात्त्विक प्रथम रस तो धर्म । जें यथोक्त निष्काम कर्म । दैवोपलब्ध अर्थ परम । मोक्षकाम निरपेक्ष ॥१७॥ब्रह्मावबोधें अपरोक्ष । तोचि सात्त्विकरस चौथा मोक्ष पांच प्रकार प्रत्यक्ष । याचे दक्ष जाणती ॥१८॥श्रवणें तामसरसप्रकार । आत्मस्तुतीचा आदर । तें तामसमुख मुहुर । फळ निंदा दुःखतर कडवट ॥१९॥त्वचा - फळीं दुसरी गोडी । स्वैर स्त्रीस्पर्शीं आवडी । स्रक् चंदन वस्त्रें कोडी । हे परवडी सुखफळीं ॥४२०॥तेथ शीतोष्णादि कंटक खडे । कठोरस्पर्शें देह अवघडे । त्वगिंद्रयद्वारा दुःखें रडे । हा प्रकार घडे दुःखफळीं ॥२१॥ऐसा द्विविध त्वग्विचार । सुखदुःखफळीं प्रकार । अवघा पंचेंद्रियविस्तार । त्रिगुणाकार सुखदुःखें ॥२२॥नेत्रेंद्रियप्रकार तिसरा । गोडी अनेक श्रृंगारा । वनितारत्नवस्त्रभांगारा । रसगोडी या सुखफळीं ॥२३॥व्याघ्र वृश्चिक सर्प राक्षस । घोर तस्कर रण कर्कश । नेत्रद्वारा उपजे त्रास । दुःखफळास हे गोडी ॥२४॥जिव्हेंद्रियाची परवडी । षड्रसांची सुरस गोडी । ती या सुखफळाचे पडिपाडीं । कीजे कुरवंडी इतरांची ॥४२५॥तेथची विषादि मारक । जैसें वज्र सदा मस्त अर्क । गातकरेचकादि वमक । हेचि दुःखफळगोडी ॥२६॥पांचवा प्रकार घ्राणेंद्रिय । चंद्रकाश्मीरादि आमोद सोय । नाना प्रसूनपरागें सोय । रसाळता ये सुखफळा ॥२७॥लिहितां त्रिगुणात्मक अशेष । तरी ग्रंथ वाधेल विशेष । हा उल्लेख श्रोतयांस । फळमूळांश दाविला ॥२८॥दोन्ही कंटक बदरीझाडा । एक सरळ एक वांकुडा । तैसाचि इया प्रपंचझाडा । फळांचा जॊडा द्विविध हा ॥२९॥सुखदुःखात्मकें विविध फळें । चहूं पुरुषार्थरसीं रसाळें । पंचेंद्रियांचे मोकळे । प्रकार कथिले पंचविध ॥४३०॥स्वभावासि आत्मा म्हणती । या वृक्षाचे स्वभाव किती । तेहि ऐकावे यथामति । निरूपिजती साकल्यें ॥३१॥कंद असतांचि निघे मोड । पुढें याचेंचि वाढे झाड । पुढें विकारें कडू गोड । मिश्र सदृढ मृद्वादि ॥३२॥अपक्षयें वोझडे वाळे । नाशही पावे यथाकाळें । ऐसे षड्विकारमेळे । वाखाणिले षडात्मक ॥३३॥एक षट्कोषप्रकारभाव । षडात्मा ऐसें ठेविती नांव । एक षडूर्मीचा प्रादुर्भाव । म्हणते एभव षडात्मा ॥३४॥त्वग्मांसास्थिस्नायुमज्जा । रुधिरें सहित स्वेदबीजा । सप्त त्वचा या महाराजा । उत्तरात्मजा अवधारीं ॥४३५॥त्यासि सप्त अंतरसाली । ते सप्तधातूंची व्युत्पत्ति केली । दोहों पक्ष्यांचीं आंविसाळीं । हे बोली अवधारा ॥३६॥समष्टिअभिमान करूनि घर । राहे पक्षी तो ईश्वर । व्यष्ठि अभिमान नीडकर । राहे अपर जीवपक्षी ॥३७॥यथाविधीच्या वातवर्षें । पुण्यकर्मांचे अंगवसें । फळें लगडती संतोषें । तीं निर्दोषें सुखात्मकें ॥३८॥अविधिअसत्कर्मभरें । अथवा तामसें अभिचारें । वृक्षीं झगटे वृष्टिवारें । तैं पापाग्रें दुःखें फळती ॥३९॥त्या सुखदुःखांचा भोक्ता । एक जीवपक्षी तत्त्वता । तेणें अत्यंत पावे व्यथा । उन्मादकता भ्रमशील ॥४४०॥तेणें भ्रमे खांदोखांदिइं । चढे उतरे उर्ध्वीं अधीं । ऐसा भ्रमे वृक्षसंधीं । आधिव्याधि भोगित ॥४१॥दुसरा पक्षी राहे खोडीं । तो फळाची न चाखे गोडी । नेणे भ्रमाची भोंवंडी । जाणे आवडी स्वसुखाची ॥४२॥त्रिगुणात्मकां फळां आरोगी । म्हणोनि जीवपक्षी हा भवरोगी । नाथिली अहंता वाहे अंगीं । स्थानें भोगी क्षणिकत्वें ॥४३॥सत्त्वात्मकें फळें खाय । तेणें स्वर्गशाखा कवळोनि ठाय । निर्मळ ज्ञानें मधुर गाय । अहंसुखीये म्हणोनि ॥४४॥रजात्मकें सेवी फळें । तैं मर्त्यशाखांवरी घोंटाळे । सत्त्वफळांचे रसाळें । तोंडीं लाळ घोटीत ॥४४५॥तमात्मकें फळें सेवी । तैं तिर्यक्शाखांची भ्रांति गोंवी । निद्रा तंद्रा तो तोष भावी । गुर्मी आघवी प्रमादीं ॥४६॥एवं अवघा हा भववृक्ष । आम्ही तेथील पक्षिविशेष । तूं प्रकृतीचा परेश । आदिपुरुष परमात्मा ॥४७॥म्हणूनि आपुली साम्यता । आम्हां न मानावी अनंता । आम्ही आपुलिया अभयोर्जिता । शरण तत्त्वतां पातलों ॥४८॥ऐसा अफाट हा भवतरु । द्वैत जयाचा विस्तारु । अनादि आघवा असाचारू । कोणा निर्धारु न करवे ॥४९॥एकीं अनेकतेचा भ्रम । पडोनि वाढला हा द्रुम । हेमीम मिथ्यारूप नाम । जैसें जन्म नगांचें ॥४५०॥ N/A References : N/A Last Updated : April 25, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP