अध्याय २ रा - श्लोक ६ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


भगवानपि विश्वात्मा विदित्वा कंसजं भयम् । यदूनां निजनाथानां योगमायां समादिशत् ॥६॥

येरीकडे श्रीभगवान । विश्वद्रष्टा जो सर्वज्ञ । भय कंसाचें दारुण । यादवगण पावले ॥७८॥
माझिया अवतारानिमित्त । यादवां त्रासी कंसदैत्य । दीनप्राय हे अनाथ । माझेनि सनाथ आघवे ॥७९॥
विश्वात्माही चक्रपाणी । यादवकरुणें कळवळूनि । क्म्सभयातें जाणूनि । विश्वमोहिनी आज्ञापी ॥८०॥
भगवत्सत्तायोगेंवीण । जे कां जड मूढ अज्ञान । सत्तायोगें सचेतन । योगमाया जाण या हेतु ॥८१॥
जैसा अग्निसामर्थ्यें यंत्रगोळा । जडही धांवेव अंतराळां । विध्वंसूनि शत्रुबळा । दावी झळाळा भयंकर ॥८२॥
तैशी भगवत्सत्तानुग्रहें । पुढें येऊनि उभी राहे । आज्ञापिली रमानाहें । तें कथिताहे शुकराया ॥८३॥

गच्छ देवि व्रजं भद्रे गोपगोभिरलंकृतम् । रोहिणी वसुदेवस्य भार्याऽऽस्ते नंदगोकुले ॥७॥
अन्याश्च कंससंविग्ना विवरेषु वसन्ति हि । देवक्या जठरे गर्भं शेषाख्यं धाम मामकम् ॥८॥

अवो देवी कल्याणवती । तुवां जावें व्रजाप्रति । गोपीगोपाळ स्वयंपत्ति । जेथ नांदती अलंकृत ॥८४॥
तये स्वलंकृते नंदगोकुळीं । वसुदेवभार्या जे वेल्हाळी । नेऊनि गुप्त ठेविली । भाग्याथिली रोहिणी ॥८५॥
आणीकही वसुदेवनारी । कंसभयें उद्विग्न भारी । लपालिया नाना विवरीं । नामें अवधारीं तूं त्यांचीं ॥८६॥
ध्रुवदेवा आणि शांतिदेवा । उपदेवा आणि श्रीदेवा । देवरक्षिता आणि सहदेवा । या बहिणी सर्व देवकीच्या ॥८७॥
या वसुदेवाचिया वनिता । देवकरायाचिया दुहिता । यावेगळ्या वसुदेवकांता । त्याही समस्ता परियेसीं ॥८८॥
पौरवी रोहिणी तिसरी भद्रा । चौथी नामें बोलिजे मदिरा । पांचवी रोचना सहावी इरा । या वसुदेवदारा सर्वही ॥८९॥
या सर्वही वदुसेवजाया । उद्विग्न पावोनि कंसभया । सेवोनि अलक्षिता ठायां । लपोनिया राहिल्या ॥९०॥
आतां देवकीच्या गर्भकोंशीं । शेष जो कां सहस्रशीर्षीं । अनंत ऐसें म्हणती ज्यासी । जो निश्चयेंशी मम धाम ॥९१॥

तत्संनिकृष्य रोहिण्या उदरे संनिवेशय । अथाहमंशभागेन देवक्याः पुत्रतां शुभे ।
प्राप्स्यामि त्वं यशोदायां नंदपत्न्यां भविष्यसि ॥९॥

तयाचें करूनि कर्षण । रोहिणीजठरीं घाली पूर्ण । मग मी अंशभागें जाण । होईन नंदन देवकीचा ॥९२॥
शुक म्हणे गा देवराता । अंशभागें धरीज पुत्रता । ऐसें बोलिला मन्मथपिता । हा संशय चित्ता न शिवों दे ॥९३॥
पार्थिवांश ते परमाणु । कां जलांश म्हणजे अंबुकण । ते अंशाहूनि अंश भिन्न । हा अभिन्न परमात्मा ॥९४॥
तरी अंशभाग म्हणसी कैसा एथींचा अर्थ असे ऐसा । पूर्णपणेंचि विश्वाभासा । न होऊनि जैसा हरि धरी ॥९५॥
गुणत्रयादि प्रजापति । अनेक देवता गुणविभूति । हे अंशावबोधें ज्यातें भजती । तो श्रीपति अंशभाग ॥९६॥
अंश म्हणजे सकळ शक्ति । चराचरांतें अधिष्ठिती । आब्रह्मस्तंबपर्यंत व्याप्ति । तो जगत्पति अंशभाग ॥९७॥
अथवा जे कां निजांघ्रिशरण । ज्ञानैश्वर्यादि आपुलें गुण । त्यांतें भजतां तिहींकरून । तो श्रीभगवान अंशभाग ॥९८॥
अथवा अंश म्हणजे मायांगीकारें । भक्तानुग्रहें साकारें । रूपें धरूनि निर्विकारें । नानावतारें अंशभाग ॥९९॥
ते पृथक् भेद स्वप्नरीतीं । वतारचरित्रव्युत्पत्ति । न होऊनि प्रकाशी जगत्पति । यालागीं म्हणती अंशभाग ॥१००॥
किंवा निर्गुणचि भक्तानुग्रहें । मत्स्यकूर्मादि रूपें इयें । अंशेंचि भजकां भज्य होय । पोरोणत्वें राहे अभज्य ॥१॥
अंशावेगळें न जोडे भजन । त्याचें तोचि मी परिपूर्ण । देवकीजठरीं प्रवेशोन । पुत्र होईन तियेचा ॥२॥
नातरी आणीकही एक घडे । जे मज भजती भजनें वाडें । ज्ञानैश्वर्यादि जें मजकडे । तें त्यां जोडे मद्भजनें ॥३॥
असो व्युत्पत्तीची कुसरी । हा सिद्धांत सर्वां शिरीं । पूर्णस्वरूपें श्रीहरि । देवकीजठरीं प्रवेशे ॥४॥
मायेसि म्हणे त्वरा करीं । देवकीचा गर्भ हरीं । नेऊनि घालीं रोहिणीउदरीं । मी देवकीउदरीं जन्मेन ॥१०५॥
मग तूं होसी नंदकुमारीं । जन्म पावशी यशोदाउदरीं । यदर्थीं शंका सहसा न करीं । अतिसत्वरीं निघावें ॥६॥
म्हणसी करितां गर्भाकर्षण । कैसेनि राहील तो प्राण । तरी तो मत्कला चैतन्यघन जरामरण नातळे ॥७॥
एवढी त्वरा काय निमित्त । ऐसें कल्पील तुझें चित्त । तरी यादवां त्रासिलें कंसें बहुत । त्यां दुःखित न देखवे ॥८॥
मद्भक्तांशीं करिती वैर । तेणें दुखवे ममांतर । मग ते मारावया असुर । धरीं अवतार युगीं युगीं ॥९॥
मी सर्वात्मा सर्वांतरीं । परंतु धर्माचा कैवारी । अधर्मकर्त्ते दुराचारी । ते ते वैरी पैं माझे ॥११०॥
मी अवतरोनि युगीं युगीं । स्वधर्मीं निजभक्त अपंगीं । अधर्मी दुष्ट दैत्य भंगीं । हेचि भंगी तूं चाळीं ॥११॥
म्हणसी अधर्मी ते कोण । त्यांची सांगतों ओळखण । हेचि धरोनि आठवण । करीं वर्त्तन ममाज्ञें ॥१२॥
देहाभिमानी विषयासक्त । विद्यावैभवमदगर्वित । माझी आज्ञा जे वेदोक्त । जे उत्पथ न गणिती ॥१३॥
प्रतिमापाषाणीं प्रेम धरिती । भूतमात्रीं द्रोह करिती । सचेतनीं निर्दयवृत्ति । ते मूढमति दुर्जन ॥१४॥
सद्गुणीं भक्ति दुर्गुणीं वैर । ऐसे तेही अभक्त नर । मद्रूप मानिती चराचर । ते निर्विकार मद्भक्त ॥११५॥
मुख्य दैत्य तो अहंकर । त्याचे पक्षपाती जे विकार । त्यांचा करिती अंगीकार । ते दुराचार दुष्कृत ॥१६॥
कामलोभें जे जे भजती । क्रोधद्वेषें जय वांच्छिती । ममतामोहीं प्रेमा धरिती । ते ते दुर्मति तुज कळो ॥१७॥
मज हें कळोनि करणें काय । ऐसा न मानावा संशय । माझे आज्ञेनें तूं होय । जगद्वंद्य फलदात्री ॥१८॥

अर्चिष्यन्ति मनुष्यास्त्वां सर्वकामवरेश्वरीम् । धूपोपहारबलिभिः सर्वकामवरप्रदाम् ॥१०॥

माझिया वरें तुज जनीं । मनुष्यें अर्चिती वो कल्याणी । धूपउपहारबलिदानीं । नाना विधानीं आगमोक्त्या ॥१९॥
सर्वकामवरेश्वरीं । तूं होसी वो परमेश्वरी । भावें भजती त्यांचे घरीं । अभिष्ट वरीं वर्षिती ॥१२०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP