मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २ रा| श्लोक १६ ते २० अध्याय २ रा प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ ते ३४ श्लोक ३५ श्लोक ३६ श्लोक ३७ ते ३८ श्लोक ३९ ते ४० श्लोक ४१ ते ४२ अध्याय २ रा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर भगवानपि विश्वात्मा भक्तानामभयंकरः । आविवेशांशभागेन मन आनकदुंदुभेः ॥१६॥सातवा झाला गर्भपात । ऐशी नगरीं पसरली मात । परंतु योगमायेचा वृत्तांत । कोणा विदित असेना ॥५९॥शुक म्हणे गा अर्जुनपौत्रा । परीक्षिते विराटदौहित्रा । श्रवणामृताच्या सदृढ पात्रा । ऐकें चरित्रा हरीच्या ॥१६०॥एक गर्भ दोघीं पोटीं । कैसा म्हणोनि पुशिलिया गोष्टी । तें हें ऐकूनि कर्णपुटीं । संशयतुटी झाली कीं ॥६१॥मग विश्वीं विश्वात्मा श्रीभगवान । भक्तांसि ज्याचें अभयदान । तो वसुदेवाचें वसवी मन । अच्युत पूर्ण अंशभाग ॥६२॥अंशभाग ये व्याख्यानीं । पूर्णचैतन्यस्वरूपेंकरूनि । आनकदुंदुभीचे शुद्ध मनीं । चक्रपाणि प्रवेशला ॥६३॥अंशभाग हे व्याख्यान । केलें असतां पुढती जाण । पुनरुक्तीचें काय कारण । हें निरूपण संकेतें ॥६४॥पूर्वकर्माच्या संस्कारीं । प्राकृत जीव पितृशरीरीं । अब्दार्धार्ध वसति करी । धातूमाझारीं अन्नरसें ॥१६५॥तैसा नोहे हा अच्युत । गुणपरिपूर्ण गुणातीत । भक्तानुग्रहें विग्रहें धरित । कर्मातीत अयोनिज ॥६६॥तो निजभक्ताचे मनीं । प्रवेशोनी राहिला ध्यानीं । तेणें वसुदेव आसनीं शयनीं । ठेला होऊनि तन्मय ॥६७॥स बिभ्रत् पौरुषं धाम भ्राजमानो यथा रविः । दुरासदोऽतिदुर्धर्षो भूतानां संबभूव ह ॥१७॥धरितां श्रीमूर्ति अंतःकरणीं । वसुदेव तेजस्वी जैसा तरणि । निर्भय कळिकाळापासूनि । कोणा मनीं शंकेना ॥६८॥विश्व पाहे आत्मप्रतीती । द्वितीयाद्वै भयं भवति । हा अनुभव श्रुतिसंमतीं । सहजस्थितीं तो पावे ॥६९॥जैसी चंडकिरणाची दीप्ति । सचंद्र तारागणें लोपती । कायशी दीपाची तेथ ख्याति । कैंचि खद्योतीं वल्गना ॥१७०॥तैसे अविद्याजनितविकार । कंसभयाचे अंकुर । ते हरपले स्वप्नाकार । जेवीं जागर झळकतां ॥७१॥तैसा सर्वीं सर्वत्र दुर्घर्ष । वसुदेव झाला स्वप्रकाश । तेजोविशेष आदिपुरुष । हृदयकोश वसविता ॥७२॥ततो जगन्मङ्गलमच्युतांशं समाहितं शूरसुतेन देवी । दधार सर्वात्मकमात्मभूतं काष्ठा यथाऽऽनन्दकरं मनस्तः ॥१८॥ऐसा वसुदेवचित्तीं हरि । तेजःपुंज वसति करी । तदुपरि देवकीच्या अंतरीं । वसुदेव करी निक्षेप ॥७३॥सकळ जगाचें मंगळ । झालें मूर्तिमंत केवळ । ऐश्वर्यादि अंश सकळ । जेथें प्रांजळ अच्युत ॥७४॥ज्याच्या अंशासि नाहीं च्युति । यालागीं अच्युत श्रीपति । ज्ञानैश्वर्यादि संपत्ति । जेथें वसती अविच्युत ॥१७५॥तो वसुदेवहृदयीं अच्युतांश । आविर्भवला स्वप्रकाश । तेणें यथाविधि उपदेश । देवकीस पैं केला ॥७६॥अंतरीं बाणली जे प्रतीति । ते ओपिली देवकीप्रति । तिणें धरूनि आपुले चित्तीं । निजविश्रांति पावली ॥७७॥आपुली पूर्ण सुखाची प्राप्ति । सद्गुरु सच्छिष्याच्या चित्तीं । सांठवी तेवीं ध्यानस्थिति । देवकीप्रति दीधली ॥७८॥क्षीराब्धिजठरीं पूर्ण शशी । बिंबोनि राहे स्वप्रकाशीं । तैसा देवकीचे मानसीं । हृषीकेशी सांठवला ॥७९॥अलिप्तपणें हिमकरासी । पूर्वदिशा धरी जैशी । तैशी देवकी निजमानसीं । जगदात्म्यासि सांठवीं ॥१८०॥गंगोदकीं मेघोदक । जैसें अभेदें पावे ऐक्य । कीं पन्हरें पन्हरां सम्यक । होय एक अभेदें ॥८१॥कीं व्यष्टिचैतन्याचा वाच्यांश । सांडूनि निवडिला जो लक्ष्यांश । तो समष्टिचैतन्यीं शुद्धांश । पावे समरस एकत्वें ॥८२॥एवं उत्तमीं उत्तमचि सामावे । शुद्धीं शुद्धचि सांठवे । देवकी द्योतमान दैवें । विश्व सद्भावें कळवळिलें ॥८३॥जैसे हिमाद्रीचे हिमकण । ग्रीष्मीं विघरूनि होय जीवन । तेंचि शारदीं घनावोन । कठिणपणें आवगे ॥८४॥तैसें महताहूनि जें महनीय । अणूहूनि जें अणीय । वरिष्ठाहूनि गरीय । तें स्वकीय आत्मत्वा ॥१९५॥सर्व सर्वैकगुहाशय । व्याप्यव्यापक जें अविक्रिय । स्वप्रकाश ज्योतिर्मय । स्वयमेव होय आत्मभूत ॥८६॥तरी तो धरिला म्हणाल कैसा । जयाच्या विचारें ठाव दृश्या । तया अविस्मर स्वप्रकाशा । हृदयकोशामाजीं धरी ॥८७॥धारणा बुद्धीचा एक अंश । जेथ कृतनिश्चयाचा विशेष । धरूनि व्यवहारे प्रकाश । सावकाश संसारीं ॥८८॥जयासि म्हणती विपरीत ज्ञान । जें विषयव्यावहारिकचिंतन । तें धारणेमाजीं धारण्य । तेणें भवभान अध्यस्त ॥८९॥दैवी संपत्ति भाग्योदयीं । सर्वात्मकत्वें स्वप्रत्ययीं । ठसावली धारणालयीं । जैशी हृदयीं शिवाचे ॥१९०॥सा देवकी सर्वजगन्निवासनिवासभूता नितरां न रेजे । भोजेन्द्रगेहेऽग्निशिखेव रुद्धा सरस्वती ज्ञानखले यथा सती ॥१९॥शुक म्हणे राया औत्तरा । ऐशी देवकी गरोदरा । जगन्निवास आला उदरा । ज्यामाजीं थारा सर्व जगा ॥९१॥अनंत जगाचें वसतिस्थान । त्याचें निवासभूत जें पूर्ण । परंतु अत्यंत शोभायमान । नव्हेचि जाण देवकी ॥९२॥काय निमित्त म्हणसी ऐसें । सावध होऊनि परियेसें । अहंकंसाचे बंधनीं असे । तेणें न दिसे कोणासी ॥९३॥जे जे अंतरीं भगवन्मूर्ति । धरूनि पावले विश्रांति । देहअहंतेभेणें लपती । नित्य एकांतीं साधक ॥९४॥यमदमाचे राखणाईत । नियमें दशधा ते जागत । शमकुलुपें घालूनि आंत । केला एकांत निबद्ध ॥१९५॥अहंकंसाचें भय भारी । यालागीं स्वसुख निजांतरीं । धरूनि बाह्यलौकिकाचारी । कवणेपरी व्यवहारे ॥९६॥शरीर कृश स्वधर्माचरणें । कंदमूलादि प्राणधारणे । अष्टभोगां कैचें जिणें । संभाषण अनोळख ॥९७॥बाह्य अकिंचन अनाथ रंक । अंतरीं स्वानुभवाचें सुख । तैसाचि देवकीचा विवेक । सज्ञान लोक जाणती ॥९८॥अंतरीं धरूं म्हणे भगवंता । इंद्रियां रहाटवी अहंता । तरी तो नागवे परमार्था । नित्य अनर्था आतुडे ॥९९॥अहंकंसाचा जेव्हां मृत्य । साधनबंधन तेव्हांचि मुक्त । पूर्ण तेव्हांचि परमार्थ । सर्व पुरुषार्थ ते क्षणीं ॥२००॥कंस असतां जिवें जिवंत । गर्भीं धरितांही अनंत । नोहे बंधनापासूनि मुक्त । राहे गुप्त न शोभतां ॥१॥अहंकाराचा झंजावात । स्वानंददीपातें झडपीत । म्हणोनि एकांत गेहीं बुद्धिमंत । परम गुप्त रक्षिती ॥२॥शांत झालिया महावात । ईप सबाह्य प्रकाशवंत । तैसाचि देवकीचा वृत्तांत । बाह्य अत्यंत न शोभे ॥३॥कीं खलज्ञाची सरस्वती । जैशी विराजे देहाभोंवतीं । छात्रद्वारा प्रकाशकीर्ति । जेवीं दिगंतीं प्रकटेना ॥४॥तेवीं पावोनि समाधान । स्वयें झाली आनंदघन । बाह्यप्रवृत्तिबंधन । यालागीं जन नेणती ॥२०५॥प्रवृत्तीची गरोदरी । अहं संभवे जिचे उदरीं । विराजमान इंद्रियद्वारीं । मिरवे नगरीं निजगजरें ॥६॥निवृत्ति गुर्विणी तैशी नोहे । जे कां स्वानंदातें प्रसवे । प्रवृत्तीमाजीं नोहे ठावें । निजानुभवें संतृप्त ॥७॥कोणी मानील श्रीनायक । प्राप्त होतां कैचें दुःख । देवकीनिर्बंधनाचें अटक । आध्यात्मिक न वदावें ॥८॥तरी यत्तदग्रे विषमिव । भगवद्गीते वासुदेव । आत्मसुखाचा प्रादुर्भाव । होतां आडव हे बोले ॥९॥असो देवकी अंतर्निष्ठ । स्वसुखानुभवें झाली पुष्ट । बाह्यसाधनाचे कष्ट । देखती स्पष्ट पौरजन ॥२१०॥नाना दोहदविलास । न वाटे आप्तलोकां हर्ष । झणीं ऐकेल दुष्ट कंस । हृदयीं त्रास सर्वांचे ॥११॥तां वीक्ष्य कंसः प्रभया जितान्तरां विरोचयन्तीं भवनं शुचिस्मिताम् ।आहैष मे प्राणहरो हरिर्गुहां ध्रुवं श्रितो यन्न पुरेयमीदृशी ॥२०॥देवकीतें पाहोनि कंस । म्हणे इचा हृदयकोश । आश्रयोनि हृषीकेश । स्वप्रकाश राहिला ॥१२॥ते देवकी म्हणाल कैशी । जिच्या दर्शनें कंसासी । शंका उपजली मानसीं । देहभावासी विसरला ॥१३॥हें पांचां श्लोकीं निरूपण । शुक रायासी सांगोन । पुढें गर्भस्तुतीचें कथन । करील पूर्ण अध्यायीं ॥१४॥तैं देवकीचें तेज फांके । जिसी देखोनि कंस धाके । हास्यवदनाच्या आलोकें । अवघा झांके भूगोल ॥२१५॥परंतु रुद्ध कारागृहीं । म्हणोनि प्रकाश तेचि ठायीं । दाटला जैसा सूर्योदयीं । क्रीडालयीं ऐंद्रीच्या ॥१६॥कीं क्षीराब्धीच्या अंतरावकाशीं । पूर्ण प्रकटोनि धवली शशी । तैशी देवकी स्वप्रकाशीं । बंदिशाळेसी शोभवी ॥१७॥मग कंस आपुले मनीं । म्हणे जे बोलिली गगनवाणी । तो हा माझी प्राणहानि । चक्रपाणि करूं आला ॥१८॥हा निर्धारें होय हरि । वदली नारदाची वैखरी । तो निश्चयें माझा वैरी । इचे उदरीं संभवला ॥१९॥ऐकोनियां गगनवाणी । मी प्रवर्त्तलों इच्या हननीं । तेव्हां होती दीनवदनी । भासे ये क्षणीं दुर्धर्षा ॥२२०॥पूर्वीं मारिलें गर्भषट्क । तेव्हां नव्हती भयानक । आतां ध्रुव म्हणजे निष्टंक । माझा अंतक गुहाश्रित ॥२१॥देवकीदर्शनें कंस दैत्य । ठेला विस्मयें तटस्थ । जैसा सर्पदर्शनें वस्त । पावे अस्त स्मृतीचा ॥२२॥समीप देखोनि अंतकाळ । विचार हरपला सकळ । न चले कांहीं उपायबळ । बोले विकळ मनेशीं ॥२३॥असतां सामादि उपाय । कांहीं न चले करूं काय । या शत्रूचा भंग होय । तो व्यवसाय सुचेना ॥२४॥ N/A References : N/A Last Updated : April 25, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP