श्रीलक्ष्मीनारायणदेवाचा झुला

श्रीसमर्थ रामदास वैष्णव सद्गुरु श्रीकृष्ण जगन्नाथ चरणारविंदेभ्यो नमः ।


गोमांतक - सिवोली येथील श्रीलक्ष्मीनारायण देवाच्या शिबिकोत्सवाच्या वेळीं ह्मणण्याकरितां स्वतंत्र तयार केलेला -

श्रीलक्ष्मीनारायणदेवाचा झुला

श्री लक्ष्मी नारायण हृदयीं भावूं । नाम तयाचें गाउनि सन्निध राहूं ॥धृ०॥
साधन या रिति करितां चित्सुख पावूं । दुस्तर हा भव सागर तरुनी जाऊं ॥१॥
तुजविण दुसरा देव न या जगिं मातें । पुरवीं सत्त्वर निज दर्शन कामातें । करुनि कृपा मज पावविं सुखधामातें । किति विनवूं तुज मुनिमन विश्रामातें ॥२॥
गृह धन दारा सर्वहि दुःख पसारा । व्यर्थचिं गेलों भुलुनी या संसारा । सोडविं मजला यांतुनि करुणागारा । वाटे त्रिजगीं तारक तूंचि उदारा ॥३॥
नाहीं केलें प्रेमें तव भजनासी । मन हें गुंतुनि गेलें आशा पाशीं । करुनि कृपा हें सकळहि दुरित विनाशीं । लक्ष्मीनाथा तव पद गंगा काशी ॥४॥
तव गुण कीर्तन कानीं श्रवण करावें । रूप तुझें हें सुंदर नयनिं भरावें । पूजन या करिं घडउनि पाप हटावें । पुरवुनि या परि हेतू पदरिं धरावें ॥५॥
रक्षुनि धर्मा निज भजकां ताराया । नाम रुपात्मक धरिसी अवतारा या । भक्त त्रासद दुष्टां संहाराया । प्रघटसि हें तव ब्रीदचि असुख हटाया ॥६॥
आवडि चित्ता निशिदिनिं या विषयांची । अनादिकाला पासुनि वाटे साची । पूर्ण कृपा तव होतां स्वस्वरुपाची । गोडी लागुनि तळमळ जाइल त्याची ॥७॥
चिन्मय भेटी दे मज लक्ष्मीनाथा । सज्जन संगति मागतसें तुज आतां । तूं करुणेंचा सागर दीन अनाथां । तारिसि आला अनुभव तव गुण गातां ॥८॥
नारायण गुरु राघव एकचि झाले । कृष्णजगन्नाथात्मजमीपण गेलें । निजरंगीं रंगुनियां सहजचि डोले । असंग चिन्मय होऊनि मन हें ठेलें ॥९॥

॥ श्री लक्ष्मी नारायणदेवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP