श्रीवेंकटेशाचीं पदें
श्रीसमर्थ रामदास वैष्णव सद्गुरु श्रीकृष्ण जगन्नाथ चरणारविंदेभ्यो नमः ।
पद १ लें
श्रीवेंकटरमणा संकटहरणा करितों वंदना । प्रेमें करितों वंदना ॥धृ०॥
तूं एकचि तारक साचा । प्रतिपालक निजभजकांचा । चालक तैसा त्रिजगाचा । हे वाचा रमवुनि नामिं भवाच्या तोडी बंधना ॥श्रीवेंकट०॥१॥
निर्विकार मुळिंचा होसि । परि घेउनि अवतारासि । निजभक्तजना सुखदेसि । नाशी दुरित तें करुनि । सकल दुष्टांच्या कंदना ॥श्रीवेंकट०॥२॥
हृदयांत स्फुरत सुख तो तूं । जो व्यापक निज निर्हेतु । तव नम भवजलधि सेतु । हें गुह्य परम गुरुराज कथित कृष्णाच्या नंदना ॥श्रीवेंकटरमणा संकटहणा करितों वंदना॥३॥
पद २ रें
वेंकटेश क्लेश हरुनि तो परेश सुखवी मजला । घेउनियां नानारूपें भक्त कार्य करण्या सजला ॥धृ०॥
सगुणमूर्ति पाहुनीयां अंतरंग प्रेमें भिजला । न बोलवे सुख तें वदनिं सख्या काय सांगूं तुजला ॥वेंकटेश०॥१॥
श्रीभूदेवि दक्षिण वामीं विराजती ज्याच्या विमला । कृष्णतनय वंदुनि चरणा जन्ममरण हरण्या भजला ॥वेंकटेश०॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP