पद १ लें
आले वैष्णव सद्गुरु श्रीमत् कृष्ण दयाघन उदयाला । मोहपसारा वारुनि केला, आनंदचि या समयाला ॥धृ०॥
अवतरले अद्वय पथरूपें, ताराया जडजीवांला । जोडुनियांकर नमितों भावें, चिन्मयपद राजीवांला ॥आले०॥१॥
केलें मुक्त जनांला पाजुनि, स्वरुप सुखामृत बोधाला । विस्मृतिला ग्रासुनियां दाविति, अनुपम अक्षय स्वपदाला ॥आले०॥२॥
ज्यांचें गळलें मीपण सारें, येइल हा अनुभव त्यांला । दास कृष्ण सुत कथितों ऐसें, प्रत्यय घेउनि सर्वांला ॥आले०॥३॥
पद २ रें
सुदिन गमे मज आजि खरा हा लाभ जाहला हरिभजनाचा ॥धृ०॥
सर्व मिळुनि आह्मी नाचूं प्रेमें, होय भला उत्साह मनाचा । अमित सुकृत जरि पदरिं असे तरि, घडतें दर्शन भक्तजनाचें । हें मज कळलें पुण्यचि फळलें, मीपण गळलें जड देहाचें ॥चाल॥ जयहरि विठ्ठल नाम गजर हा, तारक निश्चय हा साचा ॥सु०॥१॥
मिथ्या माया भज रघुराया, पार कराया हा भव सिंधु । प्रतिपालक जो भक्त जनाचा, कोणि नसे यासम दीन बंधु । जनन मरण हर अभय वरदकर, चिन्मय तनु जो आनंदकंदु । मुनि सनकादिक, नृपजनकादिक स्मरती त्या कर जोडुनी वंदुं ॥चाल॥ कृष्णात्मज या रंगिं रंगला, दास रघूत्तम चरणाचा ॥सु०॥२॥
पद ३ रें
टाळ धरुनियां बाळ सकळ हो, खेळखेळुंया परमार्थाचा ॥धृ०॥
संत जनाचा पंथ विवरुनि, योग साधुंया स्वस्वरूपाचा । कांहिं न केलें वय हें गेलें, ध्यास धरुनियां बहु विषयांचा ॥चाल॥ आतां होउनि सावध सेवूं, प्रसाद श्रीगुरुचरणाचा ॥टाळ०॥१॥
बाळपणी खेळांत रंगलों, तरुणपणीं संगम तरुणीचा । वद्धपणीं तिळ सौख्य न कांहीं, राहि न कोणी जवळीं साचा । चावाया नच दंत मुखांतुनीं लाळ गळे ती बोबडि वाचा ॥चाल॥ या परि तीन दशा या जाती, व्यर्थचि योग न स्वसुखाचा ॥टाळ०॥२॥
तरि सावध व्हा या बाळांनों, गाउनियां श्रीहरि गुण नाचा । करिल कृपा श्रीराम आह्मांवरि, अभिमानी जो भक्तजनांचा । निज सुख मेवा देउनि सेवा घडविल, भ्रम हा हरिल मनाचा ॥चाल॥ जोडुनियां कर मागतसे वर, संग कृष्ण सुत सुजनांचा ॥टाळ०॥३॥
पद ४ थें
आजि धन्य दिवस कळला । मज भक्तसमुह मिळला । लोळेन या संतचरणिं अभिमान सर्व गळला ॥धृ०॥
वाजवुनि टाळ हातीं । मुखिं रामकृष्ण गाती । भजनीं या त्रासद बहु षट् शत्रु पळुनि जाती ॥आ०॥१॥
घरदार सर्व खोटें । देईंच दुःख मोठें । श्रीहरिच्या चरणा वांचुनि सौख्य नाहिं कोठें ॥आ०॥२॥
मिळुनियां एक मेळा । गाऊं राम वेळोंवेळां । नाचत या एकसारिखे मांडुनियां खेळा ॥आ०॥३॥
चला अयोध्येसि जाऊं । रघुराज नयनिं पाहूं । विनवितसे कृष्ण तनय निज आत्मभाग्य लाहूं ॥आ०॥४॥