स्वप्नीं द्विजरूपी दिनकर कर्णाला म्हणे, “ अगा ! राया !
कांहीं विहित हित तुला आलों सांगावया अगारा या. ॥१॥
‘ तूं ब्रह्मण्य वदान्य श्रेष्ठ ’ असें विश्व सुमहिमा गातें,
म्हणतें त्वन्मुख, ‘ न क्षम ज्या द्याया स्वर्द्रुसुम हि मागा तें. ’ ॥२॥
विप्रांसि म्हणसि ‘ इच्छित तें ‘ द्या ’ हा मात्र वर्ण न वदा, न्या; ’
करिति कवि तुझें होउनि रोमांचितगात्र वर्णन, वदान्या ! ॥३॥
देयार्थें पात्रेच्छापूर्ति बुध म्हणेल बा ! कशास न हो ?
परि वंचाया विप्रच्छद्में येणार पाकशासन, हो ! ॥४॥
अमृतोद्भव कुंडलयुगसहजकवच हें तया न ओपावें,
तदितरसर्वस्वार्थी जो विप्र तया म्हणोनि ‘ ओ ’ पावें. ” ॥५॥
कर्ण म्हणे, ‘ कोण तुम्हीं ? ’ विप्र म्हणे, ‘ मीं तुजा पिता सविता;
तळमळतो वाराया अहिता, साधावया हितास, विता. ’ ॥६॥
कर जोडुनि कर्ण म्हणे ‘ करिति न गुरुवर्य कूपदेशाला,
नेती न मानसींच्या निजशिशुतें हंस कूपदेशाला. ॥७॥
हा केल्या शुद्धव्रतसख्यातें करुनि पातळ मळेल’
स्वामी ! मन तुमचें ही पाहुनि मज निस्त्रपा तळमळेल. ॥८॥
स्वर्द्रु सुरभि चिंतामणि वश ज्या, जो सुरांत सुपदेश,
सत्पात्र विमुख नोहे, ऐसा चि करा सुतासि उपदेश. ॥९॥
हानि नसो उपदेशें तुमच्या, बहु वृद्धि मद्यशाला हो,
सत्कीर्ति अमृतशाला गुरुजी ! अपकीर्ति मद्यशाला, हो ! ॥१०॥
शोभा यशें चि, न असी लोकीं धृतदिव्यकुंडलें कानें;
जोडुनि अयश न व्हावें पितृहृदयीं अग्निकुंड लेंकानें. ’ ॥११॥
भास्कर म्हणे, ‘ बुडावें त्वच्छोकविषार्णवांत पुत्रा ! म्यां;
हें वाटेल उचित तरि दे कुंडलकवचदान सुत्राम्या. ’ ॥१२॥
कर्ण म्हणे, “ जो अयशा गुरुशोकद तो चि मंद नर मेला;
विष्णु हि म्हणेल ‘ व्हाया सुयशा शोकद हि नंदन रमेला. ’ ” ॥१३॥
सूर्य म्हणे, ‘ मागावी बा ! दिव्योमोघशक्ति हरिकरगा;
वत्सा ! स्ववधेच्छुधनंजयवधसाहित्य हें चि तरि कर, गा ! ’ ॥१४॥
‘ हें करिन, हरिन अरिनरदेवप्राण हि, विचिंत तूं जा, गा ! ’
ऐसा स्वप्न विलोकुनि तो श्रीमान् कर्ण जाहला जागा. ॥१५॥
स्वस्वप्नवृत्त कथितां करुनीं आपृष्ठताप जप नमन,
कर्णमन, दृष्टि मिळतां, सप्रत्यय होय, तप्त तपनमन. ॥१६॥
द्विजकामपूर्तिपर्वीं मंत्र जपाच्या जपोनि अवसानीं
ये द्विजतनु हरि, दुर्लभ ज्याचें दर्शन जनासि नवसानीं. ॥१७॥
शक्र म्हणे, “ तुज चि पुढें ‘ दे ’ हें उच्चारितां न भी कवि, भो !
साधो ! म्हणवुनि आलों, कांही मागावयास भीक, विभो ! ” ॥१८॥
कर्ण म्हणे कर जोडुनि, ‘ पुसतो हा विप्रदास, कळवा जी !
काय तुम्हां द्यावें म्यां ? धन कन्या ग्राम वा सकळ वाजी ? ’ ॥१९॥
ब्राह्मण म्हणे, ‘ अदेय स्वप्राण इ बा ! बुधा ! न दात्यातें;
जें सत्कृतियश कैंचें जीवनदा ही सुधानदा त्या तें ? ॥२०॥
निजकवचकुंडलें मज दे, दात्या ! याविणें नको कांहीं;
तापद हि मानिजेतो, तापहर हि सेविजे न, कोकांहीं. ’ ॥२१॥
कर्ण स्मित करुनि म्हणे, ‘ ऐसें द्यावें तुम्हीं च वरदानीं;
अजि ! देवेश्वर हो ! मज कां योजितसा अशक्यवरदानीं ? ॥२२॥
द्यावें कसें स्वजीवनहेतुसरोदान मीनयादानें ?
द्यावें हि कसें जलदें ? देवा ! वांचेन मीं न या दानें. ॥२३॥
होईन वध्य मीं, तूं उपहास्य, असें करूं नको, पावें;
प्रभुनें काय न्यायव्रतवर्तिच्छळ करून कोपावें ? ॥२४॥
घ्या कवचकुंडलें, ग्रहणाग्रह जरि, परि असें तरि करा, जी !
द्या शक्ति ती अरिवधीं, बहुमान्यां अरिधरा हरिकरा जी. ’ ॥२५॥
शक्र म्हणे, ‘ घे, देतों, मागें कोण्हास ही न दिधलीला,
कृत्याव्याल्यशनींच्या दावितसे शक्ति नैकविध लीला. ॥२६॥
सोडावी हे प्राणव्यसनीं एकीं, करील कृत्यासि;
नाहीं तरि परतोनि त्वत्प्राणातें हरील कृत्यासि. ॥२७॥
एक रिपु वधुनि येइल मद्धस्त,अ श्री जसी स्वकरवीरा;
स्मरण असों दे, ईच्या मोक्षीं बरवा विचार कर, वीरा ! ॥२८॥
कर्ण म्हणे, ‘ मीं समयीं ईतें एकीं नरीं च सोडीन,
मग हे जावू, मज न त्यागी ऐसी सुकीर्ति जोडीन. ’ ॥२९॥
शक्र म्हणे, ‘ परि जपतो जो सम सर्वत्र परम हि तदवना,
लोकीं प्रभुप्रियत्वें होय, गुणें अल्प पर महित दवना. ’ ॥३०॥
कापूनि कर्ण दे जें वज्रसम अभेद्य सहजकवच रणीं,
ऐसे चि सत्वशील श्रीवर वाहे स्वनेत्र भवचरणीं. ॥३१॥
त्या शुचि सत्वसमुद्रा दात्यांच्या नायका पिता काय
धन्य म्हणे, हरि हि मनीं तो जेव्हां होय कापिता काय. ॥३२॥
त्या कवचकुंडलांतें घेउनि बहु करुनि वर्णन वदे हें,
‘ साधो ! तुझ्या वरावा आतां चि सुरम्यवर्ण नव देहें. ’ ॥३३॥
दातृत्वव्रत अद्भुत कीं गुर्वाज्ञेसि ही हठें मोडी,
पहिल्यापरीस पुष्कळ सद्यश सद्वर्ण कर्ण तो जोडी. ॥३४॥
सज्ञान म्हणति, ‘ तरला, बळि कीं हा साधु कर्ण न बुडाला. ’
खळ तळमळति जसे घटझष पडतां छिद्र सूक्ष्म हि बुडाला. ॥३५॥