वनपर्व - अध्याय अकरावा

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


प्रभु चित्रकोट टाकुनि, राहे गोदावरीतटीं उटजीं,
मानससरःसरसिरुहवनवासी हंसवर जसा कुटजीं. ॥१॥
वरि शोभवूनि कपटें वपु जें मळमूत्रमणिक रंडा तें
द्याया ये शूर्पणखा खचरी त्या सुगुणमणिकरंडातें. ॥२॥
तन्नासाकर्णांतें, दूषाया काय, कापवि त्रासी;
कीं, दुर्दानें दूषूं पाहे श्रीनायका पवित्रासी. ॥३॥
आला नर मानुनि खळ खर घेउनि मनुसहस्र बळ खाया,
किति तो ? मुनि हि न पुरति प्रभुला तत्वेंकरूनि वळखाया. ॥४॥
झाले भस्म चि, पडतां सर्व हि राक्षस कुवर्ण ते रामीं.
म्हणतों खरादि पाप्मे, प्रभुशर तन्मनुसुवर्ण तेरा, मीं. ॥५॥
बंधु खर सबळ बुडउनि धावत लंकेसि जाय ती नकटी,
कुदशाराज्ञीसिंहासन निजमुख दशमुखापुढें प्रकटी. ॥६॥
ती त्यासि म्हणे, ‘ दादा ! पंचवटीवासि कामिनीरत्न
तुज सर्वरत्नभोक्त्या द्याया गेल्यें करावया यत्न. ॥७॥
तत्पतिनें कर्णयुग छेदुनि केल्यें पहा विनासा, हें
त्वकीर्तिविरूपकरण; मानधना ! अन्य याविना साहें. ॥८॥
ती स्त्री सीता, तीचा जो पति तन्नाम राम, नर जात्या,
तदनुज लक्ष्मणनामा, जावुनि हो तूं प्रभंजन रजा त्या. ’ ॥९॥
अग्निज्वाळांसि वमे मुखरंध्रें दुष्टरक्ष कोपे तें,
ओकावा वन्हि जसा वल्मीकें क्रुद्धतक्षकोपेतें. ॥१०॥
श्रीसीतार्थ निघे अवलंबुनि वेगा भुजंगमारीच्या,
गांठी श्रीगोकर्णीं तो दशकंधरभुजंग मारीचा. ॥११॥
तो कळतां भाव म्हणे, ‘ राया ! हें स्पष्ट कर्म अविहित, रे !
व्यसनीं हरि हि बुडे वळ न पहातां, पाहिल्यासि अवि हि तरे. ॥१२॥
कोणी हें तुज कथिलें चक्षुर्विषनागपुच्छ तुडवाया ?
दाटुनि कां करिसी गा ! रामासीं वैर वंश बुडवाया ? ॥१३॥
शतयोजनें उडालों हा मीं रामेषुपक्षभूपवनें,
लीलेनें चि जलधिचीं शोषिल तो अस्त्रदक्षभूप वनें. ’ ॥१४॥
रक्ष म्हणे, ‘ रे मूढा ! भिवविसि, वर्णूनियां नरा, मातें ?
चाल उगा चि, मरसि कां स्तवुनि महेशासमान रामातें ? ’ ॥१५॥
असुहर दोघे हि, परि श्रेष्ठ गमे रामराय मारीच्या;
गंगेच्या करिं द्यावा धीरें वीरें न काय मारीच्या. ॥१६॥
होवुनि रत्नकनकमृग गेला रामाश्रमासि वेगानें,
पाहुनि त्यासि कराया वश ती रामा श्रमा सिवे गानें. ॥१७॥
ती रामासि म्हणे, ‘ जी ! अवलोका मृग असोन, सोन्या, या
भेद नसे चि, गृहा हा न्यावा, दुसरें असो नसो न्याया. ॥१८॥
आणा धरुनि मृग पहा, कैसा दिसतो मनोरम ? उठावें,
जातो कीं धांवा जी !, आहे कीं हरिणहृदय मउ ठावें. ’ ॥१९॥
ठेवी उटजीं अनुजा लंघाया शक्त ज्या न कीनाश,
कीं व्हावा न कपटपटु यातूंपासूनि जानकीनाश. ॥२०॥
त्या कपटमृगामागें धांवे प्रभु रुद्रसा शरी रानीं,
वरिति सुर यदंघ्रिरजस्पर्शें बहु मुद्रसा शरीरानीं. ॥२१॥
व्यर्थ पळे पशु; ऐसा कोण कृती, एक पळ विलय मातें
न घडो म्हणोनि, यत्नें जो दावुनि धाक पळविल यमातें ? ॥२२॥
प्रभुवर खरतर विशिखें जेव्हां मर्मीं च अस्रपा वेधी,
समयीं गुरूक्तिस, तसी त्याची कपटस्मृतीस पावे धी. ॥२३॥
‘ हा सीते ! हा लक्ष्मण ! ’ ऐसें मरतां म्हणोनि मोठ्यानें
अमृतप्रदीं करावें अहिनें, केलें तसें चि खोट्यानें. ॥२४॥
सीता म्हणे, ‘ अहाहा ! धांवा, हो ! मारितात हाकेला.
लक्ष्मणजी ! धावा हो ! म्यां चि बळें आत्मघात हा केला ! ’ ॥२५॥
सौमित्रि म्हणे, ‘ तुमचें व्हावें न त्रस्त मन अहो ! वहिनी !
हें मृगकपट; करावा गरुडाचा नाश काय हो ! अहिनीं ? ’ ॥२६॥
सीता म्हणे, ‘ न धांवसि जेव्हां तूं परिसतां चि हाकेला,
स्त्रीकामा ! गुरुघात श्रीकामापरिस तां चि हा केला. ’ ॥२७॥
ऐसें हि म्हणे बहुधा ‘ उटजीं परमाधमा ! नसावास ! ’
तो बोल करि व्याकुळ त्यास विषव्रततिचा जसा वास. ॥२८॥
युक्त चि, सीतेसि नमुनि तो बंधुकडे चि होय जाता, तें.
माय जया रडवी शिशु जाय कथाया स्वदुःख तातातें. ॥२९॥
त्यजितां उटज म्हणे, ‘ वनदेवी हो ! जानकीस रक्षा हो !
लाविल इला बळें कर जरि खळ परपुरुष सकुळ रक्षा हो. ’ ॥३०॥
गेला लक्ष्मण, तों यतिवेषें उटजीं दशास्य शिरला हो !
कीं, दैवमतें त्याचें प्रभुशस्त्रेंकरुनि पतन शिर लाहो. ॥३१॥
उटजीं न यातु शिरलें, तें अग्निगृहीं अभद्र कुतरें च.
हा उतरिता चि त्याचा असतां तरि मानवेंद्रसुत रेंच. ॥३२॥
जसि हे जयद्रथें तसि ती देवी त्या खळें बळें हरिली,
न करी च भस्म, जाणों बाळें भुजगी धृतव्रता धरिली. ॥३३॥
सीता म्हणे, ‘ मज हि पर हरितो हें काय हो ! अहा ! तात ! ?
अद्यापि कां न येती ? अबळेचा अंत किति पहातात ? ॥३४॥
लक्ष्मणजी ! बहु चुकल्यें, आधीं रक्षूनि जीवित, रुसा हो !
तुमचा भुज श्रितसुखद मरुमार्गजदीर्घजीवितरुसा हो. ॥३५॥
हा राम ! हा रघूत्तम ! धांवा हो ! न त्यजा स्वभावास,
रक्षूनि जोडवा मग मजकरवीं अंजलि स्वभावास. ’ ॥३६॥
वाहुनि रथीं, गगनपथ अवलंबुनि, जानकीस खळ पळवी,
तें व्यसन तिचें रोदन तछ्वशुरसखा जटायुला कळवी. ॥३७॥
गृध्र म्हणे, ‘ रे ! कोठें नेसी माझ्या सुनेसि फटकाळा !
मीं पक्षिप, तूं केवळ मदमत्त व्याळ पंक्तिफट काळा. ॥३८॥
बहु वृद्ध गृध्र जरि मीं, जरि तूं वज्रींदुराहु तरणा रे !
तरसिल न मज, जरि तुझें सुरबळजळधीस बाहु तरणारे. ’ ॥३९॥
रोधावें जेंवि वनीं अतिचपळा वानरा वणवयानें,
केलें तसें चि गृध्रें, वृद्धा हि तरे न रावण वयानें. ॥४०॥
सीता गृधासि म्हणे, ‘ नमित्यें व्हा मुक्तिहेतु मामाजी !
उचिता स्वतनूपेक्षा, कुदशा उचिता न हे तुम्हीं माजी. ’ ॥४१॥
गृध्रें क्षण सोडविली, विरथ करुनि शत्रुला, जसी तातें.
मृगदर्शनादि जें जें स्वप्न म्हणे धरुनि लाज सीता तें. ॥४२॥
गृध्रें प्रभुकीर्तिरतें खळ, लंघुनि कीर्ति, घाबरा केला;
विसरेल चकोर कसा, सेवुनि परळांत राब, राकेला ? ॥४३॥
चुकवूनि दृष्टि, खंडी खङ्गें तो दुष्ट गृध्रपक्षतिला,
पडतां मूर्च्छित वाटे, समजावी साधु गृधप क्षितिला. ॥४४॥
सीतेसि निजस्कंधीं बसवुनि तो राक्षसेंद्र चोर पळे,
ती तत्स्पर्शें तापे बहु, जेंवि मृगी दवांत होरपळे. ॥४५॥
खळ मूषक लंकातृणराशिस्थ स्वकुळ सर्व चाटून,
तो खाववावया ने त्या साध्वीवर्तिलागि दाटून. ॥४६॥
मृग मारूनि परततां भेटे लक्ष्मणमयूर अभ्रा त्या,
जाणुनि वृत्त म्हणे प्रभ, ‘ हें भ्रात्या ! तुज न उचित, अभ्रात्या. ॥४७॥
व्हावी च विकळहृदया वध जाणुनि भीरु बायको पतिचा,
त्वां वत्सा ! त्यजिली कसि ? करिता इतुक्यांत काय कोप तिचा ? ॥४८॥
धरिलें मृगरूप खळें, कीं, सोडुनि उटज हा निघो रानीं,
वाटे बहुधा केली मुग्धेची प्राणहानि घोरानीं. ॥४९॥
वत्सा ! मज पथ न सुचे, तूं च पुढें काढ चाल, बापा ! हूं,
किति आलों ? किति उरलें ? झाली गति काय ? चाल बा ! पाहूं. ’ ॥५०॥
येतां, राक्षस गणिला, पडला होता जटायु तो रानीं,
केलीं सज्ज धनुष्यें धावनविगलज्जटायुतोरानीं. ॥५१॥
तो त्यांसि म्हणे, ‘ तुमच्या हृदया जें भासलें, असेना तें,
सुत हो ! जाणा, दशरथसख गृध्र जटायु मीं, असें नातें. ॥५२॥
रावण घेउनि गेला स्ववधूरत्नासि करुनि अन्याया,
कीर्तिक्षति बहु बाधे, क्षतितति बाधति तशा न अन्या या. ॥५३॥
कपट न करितां, पडता क्षणमात्रें अंतकाननीं चोर,
तें पावतें अशा या चंचूनें अंत कां न नीचोर ? ’ ॥५४॥
श्रीराम म्हणे, ‘ ताता ! गेला कोणा दिशेसि तो हतक ?
गतकलुष हो यशोजळ त्यांत पडो तदसुनाश तें कतक. ’ ॥५५॥
स्वशिरःकंपें दावुनि दक्षिणदिग्गृध्र, ‘ याउपर मातें
शक्ति नसे तिळ हि ’ असें, पावे, कळवूनियां, उपरमातें. ॥५६॥
‘ हा तात ! मन्निमित्त भ्राते दोघे हि पावलां मरण,
बहुधा स्वर्गीं हि तुम्हां क्लेशकर चि मद्विपत्तिचें स्मरण. ’ ॥५७॥
ऐसें रडोनि, सुतवत्तद्दहन करूनि भूमिबाळेला
शोधी वनीं, प्रभु गमे, श्रीविरही जेंवि वृद्ध बाळेला. ॥५८॥
‘ हा सीते ! हा सीते ! टाकुनि जावें तुवां न रामातें,
राहूतें जेंवि सुधा, देवि ! न जिरलीस तूं नरा मातें. ’ ॥५९॥
वाहति न नद्या, न चरति हरिणी, चोंखी न थान तोक वनीं,
जेणें विलाप विभुचा मज वदवे सर्वथा न तो कवनीं. ॥६०॥
योजनबाहु कबंध क्षणदाचर लक्ष्मणासि धरि खाया,
मृगलाभें वृकसा तो लागे चित्तांत फार हरिखाया. ॥६१॥
सौमित्रि म्हणे, ‘ आर्या ! काळाचा होय हा सखा, यास
सांपडलों, अंतरलों तुज, मज नेतो सहाय खाययस. ॥६२॥
मारुनि रावण त्याचे दार तदस्रेंकरूनि न्हाणूण,
गेल्या निजकीर्तिसह श्रीमत्सीतासतीस आणून, ॥६३॥
जातां पुरासि यावें सामोरें भरतसह अनीकांहीं,
त्वां बैसोनि स्वपदीं नुरवावा काम जनमनीं कांहीं, ॥६४॥
ऐसें अवलोकावें, हें बहु माझ्या मनांत बा ! होतें,
दैवीं नसे, बरें, पुरसुरजन पाहोत दीर्घबाहो ! तें. ’ ॥६५॥
श्रीराम म्हणे, ‘ वीरा ! त्वां खङ्गेंकरुनि बाहु तो डावा,
हा म्यां हि एकदा चि, श्रीकांतें जेंवि राहु तोडावा. ’ ॥६६॥
खंडिति तद्वाहूंतें त्यांचे ते सुकरवाळकालाही,
काला हि उशिर लागे कापाया सुकर वाळकाला ही. ॥६७॥
झाला दिव्यशरीर प्रभुच्या जैं निर्मळासिनें तुटला,
विश्वावसु गंधर्व द्विजशापापासुनि क्षणें सुटला. ॥६८॥
त्या श्रीरामातें कां साधु न बहु मानितिल ? कबंधातें
मारी, तारी, वारी त्याच्या तो मानितिलक बंधातें. ॥६९॥
तो सांगे, ‘ श्रीरामा ! सीता नेली दशाननें, त्याची
होइल बहु, तसि शिशुची भुजगीच्या दुर्दशा न नेत्याची. ॥७०॥
स्वकरबळें, तेजस्वी लोकीं जैसा रवि, प्रसरसी तें
कथितों, पंपेप्रति जा, वर्णिति त्या फार विप्र सरसीतें. ॥७१॥
मग ऋष्यमूकनगग प्लवगपसुग्रीवसख्य साधूनीं
यश जोडिसील; अमृत हि सोडुनि तें सेविजेल साधूनीं. ’ ॥७२॥
गंधर्व जाय, तो हि श्रीरघुकुलसारसरवि सरसीतें.
ती त्यासि म्हणे, ‘ कैसें अनुभविलें सारसर विसरसी तें ? ॥७३॥
प्रभुला दे ताप तिचा वात, जरि सुगंध मंद शीतळ तो.
वाटे नलिनींत न, हा देह काढाईंत सर्वथा तळतो. ॥७४॥
‘ हा सीते ! तुजवांचुनि सर्व हि मज तापहेतु, हा सीते !
हा सीते ! तूं चि, मज व्यसनसमुद्रांत सेतु, हा सीते ! ॥७५॥
हा सीते ! हा न जगत्प्राण, खरा वाघ वायु हा, सीते
हा सीते ! व्याळ चि हा, व्यक्त पितो राघवाऽयु हा, सीते ॥७६॥
हा सीते ! मज देतो त्वन्मुखजित चंद्र ताप हा सीते !
हा सीते ! करितो द्विजराज हि म्हणवूनि पाप हा सीते ! ॥७७॥
हा सीते ! कसि कळली त्वद्व्यसनकथा पिकास, हा सीते !
हा सीते ! जर्‍हि नत मी, कसितो चि तथापि कास हा, सीते ! ॥७८॥
हा सीते ! जे त्वत्कचभारजितकलाप मोर, हा सीते !
हा सीते ! ते नाचति, मज पाहुनि, मजसमोर, हा सीते ! ॥७९॥
बहु लाजवीत होतों करिकेसरिकीरकेकिहरिणां मीं;
हांसत कर्म करावें, भोगावें रडत तें चि परिणामीं. ॥८०॥
हा सीते ! हा सीते ! अससिल अद्यापि तूं कसी सासु ?
ऐकुनि या वार्तेतें प्रियसखि ! वांचेल ती कसी सासु ? ॥८१॥
मेला श्वशुर, न समयीं आम्हीं आलों, भिवूनि उग्रास,
तूं भीरु ! व्यसु होउनि झालीस चि तन्मुखांत सुग्रास. ॥८२॥
हा सीते ! हा सीते ! हा सीते ! सुदति मुदतिशयसुखने !
मुख नेत्रा दावुनि, परलोकीं मज साध्वि ! द्यावया सुख ने. ॥८३॥
हा दयिते ! हा जानकि ! हा भामिनि ! हा सुगात्रि ! हा शीते !  
हा सुदति ! हा कृशोदरि ! हा सुंदरि ! हा वरोरु ! हा शीते ! ’ ॥८४॥
ऐसा विलाप करितां लक्ष्मण वंदुनि म्हणे, ‘ अहो आर्या !
धैर्य त्यजितां, कैसी, मारुनि खळ, सोडवाल ती आर्या ? ॥८५॥
करिती इष्टवियोगें जे प्राकृत ते चि नर विलापातें,
व्याकुळ होवूनि तमीं त्वां द्यावी लाज न रविला पातें. ॥८६॥
ल्याली आहे पातिव्रत्याशनिकवच, सर्वकाळ जिला
घडतें त्वद्ध्यानामृतपान हि, कां ती धरील काळजिला ? ॥८७॥
सुग्रीव ऋष्यमूकीं आहे, भेटों तयासि आधीं, तें
साधूं, अन्योन्यांच्या नाशूं, साधूनि सख्य, आधींतें. ॥८८॥
चिंतारत्नश्रीगुरुवरदान तुझ्या असे चि पदरीं तें
मग साधिसील न कवण सिद्धि, सुखें संहरूनि सदरींतें ? ॥८९॥
मीं बंधु सचिव भृत्य हि, हें लटिकें काय जी ! वदा, नातें ?
देईन कार्य सिद्धिप्रति जाया कायजीवदानातें. ’ ॥९०॥
पंपेंत स्नान करुनि विभु गेला ऋष्यमूकगोत्रास,
यातें दूरुनि पाहुनि पाचे सुकळप्लवंग तो त्रास. ॥९१॥
पवनसुतासि म्हणे, ‘ ते तापस परि कार्मुकी शरी रानीं
येतात कोण ? पुस जा, स्पष्ट गमति देवसे शरीरानीं. ’ ॥९२॥
‘ आज्ञा ’ म्हणोनि, भेटे गिरिखालें प्लवगपाळकपि त्यातें,
तत्काळ निवे पाहुनि बहुदिवसां जेंवि बाळक पित्यातें. ॥९३॥
दवतप्त द्विप निवतो जैसा पावोनि गांगतोयातें,
तेंवि निवे कप, राम हि सांगे निज्वृत्त सांग तो यातें. ॥९४॥
रुग्णा धनिकासि जसा वित्तार्थी वैद्य, पवनजें कपिला
भेटविला प्रभु, न जसि चुकल्या वत्सासि कामधुक्कपिला. ॥९५॥
सुग्रीवें सीतेचें साभूषणउत्तरीय दाखविलें,
पितृवृत्तिपत्रसें जें होतें त्या नगगुहेंत राखविलें. ॥९६॥
तेजें करि प्रकाशित तें अद्भुतधाम कानना चेल,
त्यातें पाहुनियां तो साधि श्रीराम कां न नाचेल ? ॥९७॥
‘ मोहूत भुजग; मोहा केंवि तुम्हीं मजसम स्तनग ? होतें
तुमचें हि सुकृत सरलें कां ? सांगा मज समस्त नग हो ! तें. ’ ॥९८॥
सुकळ म्हणे, ‘ रामा ! म्यां शोधावी जानकी, शपथ करितों. ’
राम म्हणे, ‘ कार्य तुझें जें, तें मीं जानकीश पथकरितों. ’ ॥९९॥
शिखिसाक्षिक सख्य करुनि रम करी कार्य मान्य; वालिशतें
क्षण ज्यापुढें नुरावें, प्रभुबळ नुमजे सुकंठ बालिश तें. ॥१००॥
तत्प्रत्ययार्थ एकें बाणें भेदूनि सप्ततालीला
वाळीस वधी ज्याची स्वजनीं नुरवी च तत्पता, लीला. ॥१०१॥
निववी कपिराज्यपदीं अभिषेचुनि तप्त अंग दासाचें.
कुरवाळुनि वाळीसुता दे प्रियपुत्रत्व अंगदा साचें. ॥१०२॥
प्रार्थी सुगळ बहु, परि प्रभु किष्किंधापुरीं न मन घाली;
माल्यवदगीं च राहे सानुज तो सन्मनोब्रुडनघाली. ॥१०३॥
लंकेंत अशोकवनीं जसि बाळमृगी वृकींत, तसि देवी
बहुराक्षसींत होती, न स्नान करी, न ती निजे, जेवी. ॥१०४॥
छळवी छळी परोपरि तीस वश करावयासि मायावी.
न वळे चि; परकरा कसि कुळभित्तिगता वधूत्तमा यावी ? ॥१०५॥
हें हि म्हणे, ‘ राक्षसि हो ! सेवटिम घेउनि महानसा जा, गे ! ’
न बळात्कारतम उठे, मनिं शापदिवा लहानसा जागे. ॥१०६॥
त्या नगगुहेंत वार्षिकमानचतुष्टय दिवानिश क्रमुनीं,
ऐसें अनुज्यासि म्हणे तो ध्वन्वियशस्विमानिशक्र मुनी. ॥१०७॥
“ जा वत्सा ! चापीं गुण चढवुनि एका चि सायका पूस,
‘ कापूस ज्वलनीं किति ? ’ ऐसें त्या प्लवगनायका पूस. ॥१०८॥
बहुधा कृतघ्न मिथ्यावादी दुष्परिहराघ वानर तो,
अंगद असो कपीश्वर, तारेसीं सुगळ, राघवा ! न रतो. ” ॥१०९॥
जातां चि लक्ष्मणातें धावुनि भेटे सुकंठ, तो भ्याला,
नमुनि म्हणे, ‘ स्वप्नीं मज कार्य दिसे, जेंवि वित्त लोभ्याला. ॥११०॥
लंघील कवण, जेणें वधिला एकें शरें कपीश तशा ?
सर्व दिशा शोधाया पाठविले असति म्यां कपी शतशा. ’ ॥१११॥
ऐसें सांगोनि निघे भेटाया त्या हि राघवा राया,
दिसलें कृतघ्नपण जें तें हि महादुर्धराघ वाराया. ॥११२॥
प्रभुतें पाहोनि निवे, जैसा निधिदर्शनें निवे दीन,
अंजलि बांधोनि म्हणे, ‘ जरि अभय असेल तरि निवेदीन. ॥११३॥
मज बोलवाल तैसें बोलेन चि मीं अजान कीर चि, तें
कार्य घडेल कसें, जी ! सुकृतें इतरें अजानकीरचितें ? ॥११४॥
देवीतें शोधाया पाठविले प्लवगवीर बोधून,
भरला चि अवधिमास, द्रुत येतिल ते दिशांसि शोधून. ’ ॥११५॥
श्रीराम म्हणे, ‘ साधो ! कृतकृत्य त्झा सखा नवा नर हो;
जा तिकडे, काय गुणें तूं ? बहुमत शतमखा, न वानर, हो. ’ ॥११६॥
तों पूर्वोत्तरपश्चिमदिक्शोध करूनि कीश कवि चार
आले म्हणति, ‘ न देवी ती आढळली, न तो हि अविचार. ’ ॥११७॥
राम म्हणे, ‘ कर्णीं कर ठेवू ती तरि न दक्षिणा आशा,
मज फार दक्षिणेची विप्रा जसि तसि च लागली आशा. ’ ॥११८॥
मासानंतर दधिमुख सांगे मधुवनविनाशबोभाट,
सुगळासि गमें तो निजभटसुयशातें चि वर्णितो भाट. ॥११९॥
दुसरे दिवसीं प्रभुला वंदिति कपि अंगदादि येवून,
तद्दर्शन तें जाणों, त्या शीतार्तीं यथेष्ट ये वून. ॥१२०॥
राम म्हणे, ‘ शोधक हो ! सकरुण हो ! जरि असेल सांगतें,
द्या जीवनौषध मला, कीं त्याचें स्थान कोण सांगा तें ? ॥१२१॥
वांचेन काय ? होइन साधूंसि, रसांत आज्यसा, मान्य ?
मरण बरें, यश ज्यांत श्रेष्ठ न, त्याहूनि राज्य सामान्य. ’ ॥१२२॥
हनुमान् वदे, ‘ प्रभो ! म्यां लंकेंत विलोकिली अनादिसती;
रविभा जसी उलूकीनयना तसि राक्षसीजना दिसती. ॥१२३॥
ज्या शिखिशिखेसि भुलला तो दुष्ट पतंग मत्त पाहून,
ती म्यां विलोकिली; तप गुरु अन्यांचें न मत्तपाहून. ॥१२४॥
वांछेल पतंग कसा लावुनियां वदन दीपकळिकेला ?
म्यां तों त्यासीं, लंगुनि शतयोजन नदनदीप, कळि केला. ॥१२५॥
पुर जाळिलें चि, चुरिला अक्षाख्य सहोपवन कुमारमणी,
वाटे प्रसन्न झाली सती प्रिया शंभुची उमा रमणी. ॥१२६॥
चूडामणि पाठविला या चरणावरि वहावयाला जो,
तो हा; पादाब्जस्था या पद्मासन महावया लाजो. ॥१२७॥
तुज ऐषीकास्त्राची कथिती झाली रडोनि खुण, गा ! ती
प्राणव्यसनीं पडली, करिवरमतिसी तुझे चि गुण गाती. ॥१२८॥
भस्म कराया घेउनि गेला तो दैवहतक लंकेला,
रक्षा स्वकीर्तिला रविकुळदीपा ! त्या हि गतकलंकेला. ’ ॥१२९॥
राम म्हणे, ‘ साधो ! त्वां वांचविलें, घेतलें विकत मातें,
मरणीं अमृत दिलें, जें उपकारीं न बुडवील कतमातें ? ’ ॥१३०॥
प्रभुच्या प्रहर्षसमयीं सुगळाज्ञेकरुनि यूथराज बळी,
बहुसंख्य सिद्ध होउनि आले साह्यार्थ ईश्वराजवळी. ॥१३१॥
नळ नील सुषेण पनस गज गवय गवाक्ष गंधमादन ही
आले जांबवदादि स्वबळभरें कांपविति समस्त मही. ॥१३२॥
कोटिसहस्रबळाधिक एकैक असंख्य तें मज न कथवे.
दिसती प्लवगर्क्षांचे जिकडे तिकडे जिताभ्रकनक थवे. ॥१३३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP