ॠषिकथित परमदुष्कर जिष्णुतपःश्रवण करुनियां धर्म,
सानुज सदार चिंता पावे, पावे चि ना मनीं शर्म. ॥१॥
देवर्षि, तीर्थयात्राफळ जें गंगात्मजा पुलस्त्य वदे,
तें आपण ही सांगुनि धर्माला धर्मसंग्रहोत्सव दे. ॥२॥
धौम्य हि विचार पुसतां सांगे धर्मासि तीर्थयात्रा त्या,
कविविस्तारभय न हरिति, जरि हि हरिति भक्तभवभया त्रात्या. ॥३॥
तों येउनि सांगें सितवाहचरित हरिनियुक्त लोमश तें,
प्रत्युत्थान जयाला द्यावें सच्छ्रोतृकर्णलोमशतें. ॥४॥
“ धर्मा ! दिव्यास्त्रज्ञ त्रिदशवरार्धासनस्थ वासवसा,
अर्जुन विलोकिला म्यां, स्वस्थ तुम्हीं करुनि वननिवास वसा. ॥५॥
शक्रें तुज कथिलें कीं, ‘ अर्जुन झाला कृतार्थ, पाठवितों,
त्वद्धृद्गतराधासुतभयशल्योद्धारयत्न आठवितों. ॥६॥
विजयार्थ तीर्थयात्रा लोमशकथिता अतामसी कर गा !
करगा होईल श्री, कृष्णामृतसिंधुनामसीकर गा. ’ ॥७॥
मज पार्थें हि प्रार्थुनि कथिलें; गा ! पार्थिवोत्तमा ! धर्मा !
करवीन तीर्थयात्रा, चाल, असें मीं सहाय या कर्मा. ” ॥८॥
चित्तांत तीर्थयात्राकाम, तया पुरविता प्रभु हि आला,
जैसा अंभोद तृषित चातकखग पसरितां चि वरि ‘ आ ’ ला. ॥९॥
सेवी पांडव सिद्धाश्रमतीर्थांतें तदीय महिम्यांतें,
विस्तरभयें न लिहिलें रसिकानुमतें मनोरम हि म्यां तें. ॥१०॥
तीर्थें करीत गेला, कीर्ति बहुत ऐकुनि प्रभासाची,
तेणें भेटविली, हो ! पुण्यर्द्धि नवांबुदप्रभा साची. ॥११॥
मुनि सर्व तीर्थयात्रा करवुनि ने गंधमादननगाते,
गातों; मन्मति म्हणत्ये, ‘ मानवतिल साधुपाद न, न गा तें. ’ ॥१२॥
कठिन पुढील पथ म्हणुनि, धर्म म्हणे, ‘ सद्गुणभ्रमरबकुळा
भीमा ! गंगाद्वारीं वस, एका मात्र येउ दे नकुळा. ॥१३॥
रक्षुनि पांचाळीला, सहदेवाला सहर्षिधौम्याला,
स्वस्थ रहा, नेतों मी त्वदनुमतेंकरुनि या चि सौम्याला. ’ ॥१४॥
भीम म्हणे, ‘ हें गुरुला विनवा, आम्हां तिघांसि न वदावें,
अर्जुनविरहग्रीष्मीं न जळावें त्वद्वियोगनवदावें. ॥१५॥
चौघांस हि वाहेन, त्यजितां दाटूनि कां नरविमाना ?
शिरतां पाताळबिळीं दीप हि पावेल कां न रविमाना ? ’ ॥१६॥
कृष्णा हांसोनि म्हणे, ‘ छायेला काय जी ! महायास ?
चाला, चालेल पहा, योग्या नोहे चि हे रहायास. ’ ॥१७॥
भेटे साधु कुलिंदक्षितिनाथ सुबाहु त्या अनन्यास,
परमाप्तास प्रभुवर धर्म म्हणे, ‘ रक्ष हा जनन्यास. ’ ॥१८॥
घेउनि जाय तयांला लोमश पाजूनि पुण्यपुंजरसा,
सुरसत्कृतबीभत्सुप्रेक्षोत्साह हि पतत्रिकुंजरसा. ॥१९॥
जातां दुर्गममार्गें अश्रुत चि पदार्थ नित्य नव दावी,
सांगे कथा अशा मुनि, गोष्ठि सुधेची हि ज्यांत न वदावी. ॥२०॥
वातें वर्षें पावे कृष्णेची गिरिपथांत तनु कंपा,
रंभासी पडतां ती, व्याकुळ करि पांडवांसि अनुकंपा. ॥२१॥
वीजी वल्कें वायुज, अंकीं शिर धर्म तो दयाघन घे,
धौम्य मुखीं जळ घाली; देवर्षि म्हणे, ‘ शमस्तु ते अनघे ! ’ ॥२२॥
तच्चरण अजिनशयनीं चुरिती, म्हणति, नवरी न यम तीतें,
साधूंच्या दुःखितजनहितकृत्यान्य न वरी नय मतीतें. ॥२३॥
धर्म म्हणे, ‘ बा भीमा ! घे स्कंधीं, योग्य ही न गमनातें,
निष्ठुरसा गमला हा सत्संश्रययोग्य ही नग मनातें. ’ ॥२४॥
भीम म्हणे, ‘ मीं ईस हि, तुज हि, यमांस हि, सुखें चि वाहेन,
अथवा होइल आज्ञा तरि आजि घटोत्कचासि बाहेन. ’ ॥२५॥
धर्मानुमतें स्मरतां द्याया गुरुदास्यपुण्य जनकानें,
ऐके ‘ घ ’ घरीं, ‘ टोत्कच ’ नमनीं, तो सत्य पुण्यजन कानें. ॥२६॥
धर्म नकुळ सहदेव द्रुपदसुता धौम्य भीमसेन मुनी,
प्रेमास्राशीर्वर्षी घनसे केले घटोत्कचें नमुनीं. ॥२७॥
भीम म्हणे, ‘ पुत्र सुखें पावुनि गुरुदास्यपुण्यपर्व तरे,
आम्हांसि गंधमादननामा हो सुगम पुण्यपर्वत रे ! ॥२८॥
हे कृष्णा त्वन्माता चालों न शके पथीं, इला वाहें,
तारक तुल्य, स्कंधग गुरुमूर्ती गंडकीशिला वा हें. ’ ॥२९॥
पुत्र म्हणे, ‘ भिन्न असति पंचायतनासि काय संपुष्ट ?
वाहो सर्वां माझा, आहे नीरोग काय संपुष्ट. ॥३०॥
पांच तुम्हीं धौम्य हि गुरु, दुर्लभ मज दास्य अन्यदा सांचें,
वाहेन तुम्हां, हे मुनि जनु सफळ करूत अन्य दासांचें. ॥३१॥
अथवा त्या देवीतें विंध्य, तसा मीं इला चि वाहेन,
स्वाश्रितरक्षःकृतभवदुद्वहनजसुकृतभाग लाहेन. ’ ॥३२॥
रक्षःस्कंधीं धौम्यप्रमुख ॠषि प्रथम बसविले, पावे
शिरसा सत्संग, न कां गरुडसखें गरळरस विलेपावे ? ॥३३॥
चक्षुर्विष अहि रक्षी अमृतघटातें, मुखीं न ओतुनि घे
हरितेजें; हें हि तसें; शिवशुकसेवेसि कां न ओतु निघे ? ॥३४॥
कपिच्या सीता, हरिच्या कीं विंध्यमहाद्रिच्या हि आदिसती,
देवी घटोत्कच्याच्या संधीं तसि होय त्या जना दिसती. ॥३५॥
शोभति घटोत्कचाश्रितरक्षःस्कंधीं चढोनि कुरुवर ते,
जाणों नभीं घनाच्या साक्षाद्रवि चंद्र शुक्र गुरु वरते. ॥३६॥
योगारूढ श्रीमुनि लोमश चाले पुढें जसा अर्क,
अर्कद्वय अद्भुत हें, हा क्षण खेचरमनीं उठे तर्क. ॥३७॥
दावुनि दूरुनि हरगिरि मंदर, नारायणाश्रमीं उतरी,
जेथ सदा संनिहिता गंगा भवसिंधुपारदा सुतरी. ॥३८॥
अर्काभ सहस्रच्छद सौगंधिक पद्म मरुतानीत
कृष्णेपुढें चि पडलें, होय जणों तन्मुखाब्जभाभीत. ॥३९॥
‘ ऐसीं च मदर्थ तुम्हीं आणा सौगंधिकें ’ म्हणे पतितें,
भीम निघे, श्रुतिचेंसें मान्य तिचें सांगणें तया अति तें. ॥४०॥
एकाकी ही शिरतां तो जेंवि महावनीं न भी मकर,
सिंहदिकांसि भासे यमदंडाहुनि उणा न भीमकर. ॥४१॥
ज्याच्या रामयशासह सुयशासि सदा सहर्ष नाक पितो,
कदलीवनांत मार्गीं भीमाल अदे स्वदर्शना कपि तो. ॥४२॥
रुचिर हि रूप कपित्वें प्रथम चि नयना न गोड वाटे तें,
पांडव सावज्ञ म्हणे, ‘ जावूं दे, ऊठ, सोड वाटेतें. ’ ॥४३॥
वानर म्हणे, ‘ न पथ मीं देइन, जावें तुवां न या वाटे.
होईल घात जातां, यास्तव मजला तुझी दया वाटे. ’ ॥४४॥
भीम म्हणे, ‘ हो कांहीं, पुसतो तुज कोण हात जोडून ?
होसील व्यथित वृथा, हो प्लवगा ! दूर मार्ग सोडून. ’ ॥४५॥
वानर म्हणे, ‘ उठाया शक्ति नसे मज, जराव्यथावश मीं,
जाणें तरि लंघुनि जा, पथ सोडाया शके न हा दशमी. ’ ॥४६॥
भीम म्हणे, ‘ परमात्मा व्यापक सर्वां घटीं असें जाणें,
मग लंघन करुनि तुझें प्लवगा ! माझें घडे कसें जाणें ? ॥४७॥
नसतें असें, तरि जसा हनुमान् लंघूनि जाय जळधीतें,
जातों या गिरिस हि मीं लंघुनि बहु लाजवूनि खळधीतें. ’ ॥४८॥
प्लवग म्हणे, ‘ गा ! साधो ! हनुमान् तो कोण सांग ? जळधीतें
लंघुनि गेला कां ? गा ! होय कसी काय लाज खळधीतें ? ’ ॥४९॥
भीम म्हणे, ‘ तो हनुमान् मद्बंधु, तुळा न ज्या; न कीशा तें
तेज श्रुत तुज ही ज्या जग गातें जेंवि जानकीशातें. ॥५०॥
रामवधू शोधाया तो अब्धि उडोनि जाय शतगावें,
जाळी लंका न जिच्या यशापुढें सुरपुरीयश तगावें. ॥५१॥
तो एक वीर मारुति मनुज्यांत मनुज्यांत सुरासुरांत बळकट कीं
मीं भीम; मज पहातां क्षण हि खळांच्या नुरे चि बळ कटकीं. ॥५२॥
कथिलें हें कळलें कीं ? रोधूं ये काय सिंधुवाट सरें ?
हो दूर, मर्दिजेतो पथकंटक सुज्ञ सदय वाटसरें. ’ ॥५३॥
चित्तीं हांसोनि म्हणे, ‘ भीता भय दाखवूं नको, पावें,
मत्पुच्छ दूर सारुनि जा, साधो ! दुर्बळीं न कोपावें. ॥५४॥
दूर झुगारूं पाहे वामकरें धरुनि पुच्छ सावज्ञ,
गरिमगुणें सुरगिरिगुरु होय भवांशभव भीमभावज्ञ. ॥५५॥
भीमबळें, विघ्नें रघुपतिपादाब्जस्थ चित्तसें, पुच्छ
तिळ हि न ढळे, गुरुपुढें भावबळ श्रेष्ठ, बाहुबळ तुच्छ. ॥५६॥
दोन्हीं हि भागले भुज, वर्षे घनसा चि भीम घांमातें.
चित्तांत म्हणे, ‘ आली कोठुनि ? नव्हती च भी मघां मातें. ’ ॥५७॥
जाय शरण होउनियां तो गतमदगद अदभ्रदय कपिला,
ज्याची लील प्रणताखिलवांछितसिद्धित्दा महाकपिला. ॥५८॥
जाणावया स्वरूप प्रार्थीं मोक्ष्च्छुजन वृषाकपितें,
भीम ताअ त्या हरिल्या स्ववशें श्रवणेच्छुजनतृषा कपितें. ॥५९॥
भीमासि असे सांगे की, “ मारुति आंजनेय, वीरा मीं
आहे रामगुणरसीं, पूर्वीं होतों निबद्धसी रामीं. ॥६०॥
‘ यावत् स्वकथा तावज्जीव ’ असा पावक सुवर दास,
हा ‘ रामायण ’ सेवुनि आहे तृप्त स्मरोनि वरदास. ’ ॥६१॥
भीम म्हणे, ‘ ज्या रूपें शतयोजन सिंधु लंघिला गा ! तें
दावावें आजि मला, ज्याला अद्यपि विश्व हें गातें. ’ ॥६२॥
मारुति म्हणे, ‘ असों दे, अत्युग्र न पाहवेल, भीमा ! तें; ’
पार्थ म्हणे, ‘ पाहों द्या, स्पर्शेल, दया करा, न भी मातें. ’ ॥६३॥
वाढों लागे सहसा कदलीखंडां नहीं महाकाय,
त्यातें पाहुनि पावें काळ हि भय, मग न भीम हा काय ? ॥६४॥
लोकांत राअमहिमा कीं प्रेमा आपुला जसा रामीं,
वढे तसा चि, योजूं दृष्टांता कां परा असरा मीं ? ॥६५॥
पावे, जेंवि पहातां क्षयरुद्रा रत्नसानु, कंपातें,
ओटोपाया पान्हांसें लागे यत्न सानुकंपा तें. ॥६६॥
भीम म्हणे, दादाजी ! केली दुर्योधनें दया वाटे,
हे पाय पाहतों मीं कैसे ? जरि लाभतों न या वाटें. ॥६७॥
देव म्हणे, ‘ रे । वत्सा ! ‘ हूं ’ . म्हण, जैसें वधूनि अहि तातें
गरुडें पृथुकासि, अभय द्यावें तुज म्यां, मथूनि अहितातें. ’ ॥६८॥
भीम म्हणे, ‘ गजगंडश्रीचा हरिनखरतेज नवरा कीं,
आर्या ! बहु तेजस्वी जे होती न खर ते जन वराकीं. ॥६९॥
तूळींझ तेजस्विकरानुगृहीत द्युमणिकांतसा, आर्या !
हा त्या तुच्छीं मिरवू तेज, प्रभु ! तूं न योग्य या कार्या. ’ ॥७०॥
आलिंगूनि म्हणे, ‘ बा ! हो दुःसह तूं नरामरा जा, गा !
शब्दें साह्य करिन मीं, परि चित्तांतूंन रामराजा गा. ’ ॥७१॥
सांगुनि सौंगधिकवनपुष्करिणीच्या सुनीतिच्या हि पथा,
आटोपी मूर्तिप्रति मारुति, हा कवि हि तद्विशालकथा. ॥७२॥
सौंगंधिकपुष्करिणी कैलासाच्या समीप पाहूनी,
हर्षे पांडव, ती ही; नेला गुण दाखवूनि बाहूनी. ॥७३॥
तद्रक्षक धनदानुग राक्षस धर्मानुज्यासि पाहूनीं,
‘ तूं कोण ? ’ असें पुसती तत्कृतधर्षण मनीं न साहूनीं. ॥७४॥
‘ सौगंधिकार्य आलों धर्मनृपतिबंधु भीम मीं आहें,
व्हा दूर, पळा, तोंडें झांका, करितां कशास रे ! ‘ आ ’ हें ? ’ ॥७५॥
राक्षस म्हणति, ‘ पहातां काय ? अरे ! या खळा नरा खावें,
क्षणभर हि महदतिक्रम करित्या सुविशृंखळा न राखावें. ’ ॥७६॥
आधीं क्रोधवशांला युद्धीं उत्साह, परम भी मग दे
ऐसें करी, म्हणे श्रीकाळी हि मनांत, ‘ साधु ! भीमगदे ! ’ ॥७७॥
आधीं हरिसा क्रीडा अरिहरिणचमूंत भीमसेन करी,
मग त्या नलिनींत गमे एक हि जैसा सभीमसेन करी. ॥७८॥
जर्हि पावले बहु करुनि भीमासीं आहवा निधन दास,
हतशेषमुखें कळतां, न गमे प्रभुभावहानि धनदास. ॥७९॥
इकडे धर्म म्हणे, ‘ हे कथिती उत्पात भावि भी मातें,
नकुळा ! सहदेवा ! व्हा सिद्ध, करा सावधान भीमातें. ॥८०॥
मज तद्दर्शन तैसें वृद्धां पितरांसि जेंवि तोकवच,
वद देवि ! दयित कोठें ? केला काय स्वकरग तो कवच ? ’ ॥८१॥
कृष्णा सांगे, “ उडवुनि सौगंधिकपद्म आणिलें वातें,
‘ व्हावीं असीं, ’ असें मीं वदल्यें दावूनि त्यांसि देवा ! तें. ॥८२॥
त्यावरि न देखिले ते, दाखविलें म्या कशास अगई ! तें ?
अतिकठिना हे वाटे हीरांचा ही नमील अग ईतें. ” ॥८३॥
धर्म म्हणे, ‘ रक्षील त्वद्व्रत, झालीस घाबरी कां ? गे ! ’
हें वृत्त लोमशाला, तैसें चि घटोत्कचासि, तो सांगे. ॥८४॥
हे मुक्तिची विशाला न रुचे आम्हांसि त्याविना शाला,
याच्या नाशा भीतों, भ्यालों न तशा हि त्या विनाशाला. ॥८५॥
भीमह्रदाप्रति आम्हां यादां द्यायासि तृप्ति परमा न्या.
मान्या उपकृति, न परा सिद्धि बुधा, जेंवि हरिस न रमान्या. ॥८६॥
नेला बंधुजवळि नृप, जाणों होता चि तो नसे नेला.
मुनिसिद्धिला न दुष्कर किमपि न त्या यातुधानसेनेला. ॥८७॥
धर्म म्हणे, ‘ भीमा ! हें ईश्वरसखसैन्यहनन अनुचित, रे !
न तरेल महल्लंघनकर्ता, तो एक वायुजनु चि तरे. ’ ॥८८॥
श्रीरामयणकृतिसी ती दिव्या अमृतसवती नलिनी
बहु दिवस सेविली, हो ! त्या धर्मप्रमुखसर्वसाध्वलिनीं. ॥८९॥
धर्म म्हणे, ‘ भीमा ! म्या राज्यश्री स्पष्ट लेखिली अ - सती,
निवती बहु दृष्टि सख्या ! अलका जरि काय देखिली असती. ’ ॥९०॥
तों गगनीं वात वदे, ‘ धर्मा ! येथूनि वर्त्म जें पर तें.
न नरोचित, मर्यादा न विलंघीं, चित्त आवरीं, परतें. ॥९१॥
जा आर्ष्टिषेणमुनिच्या स्थानीं तूं गंधमादनीं आधीं,
तेथूनि धनदफाल्गुनदर्शनसुखकार्यसिद्धीला साधीं. ’ ॥९२॥
परतोनि धर्म आला त्या श्रीनारायणाश्रमीं राहे,
तेथें हि विघ्न बाधे, सादर गावें असें चि तें आहे. ॥९३॥
आश्रय करूनि होता दुष्ट जटासुर धरूनि ऋषितेतें,
जाणे न धर्मराजा, न घटोत्कच ही, न अन्य ऋषि ते तें. ॥९४॥
भीमघटोत्कच नसतां कृष्णासहदेवनकुळधर्मातें
पळवी, करी दशमुखाद्यखिलकपटिमत्यशक्यकर्मातें. ॥९५॥
त्यासि म्हणे धर्म, ‘ पळ प्रेक्षक मार्गीं न भीम हो तूतें.
तो वांचेल कसा रे ! जो खळमूषक न भी महोतूतें ? ’ ॥९६॥
भीमाच्या, मन ठेवी धर्म, जसें विष्णुच्या इभ स्मरणीं.
प्राणव्यसनीं, पावे, दे अभय, खळा करूनि भस्म रणीं. ॥९७॥
वायूक्तपथें गेला त्या चि मुनिवराश्रमासि मग धर्म;
दे आर्ष्टिषेण आश्रय, तेथें निःसीम पावला शर्म. ॥९८॥
तेथें हि भीम कृष्णावचनें त्या गिरिशिरीं बळें चढला,
मथिलें धनदबळ रणीं कळतां कोपें कुबेर बहु कढला. ॥९९॥
जाय पुन्हां त्र्यंबकसखभटमथनेंकरुनि आव रायाचा;
योजी सामोपाय द्रुत जाउनि त्यासि आवरायाचा. ॥१००॥
इतुक्यांत श्रीद हि ये, फार निवे देखतां चि चवघांस.
दृष्टिसि संत चि देती अमृताचे न रसनेसि चव घांस. ॥१०१॥
नमिला पांडुसुतानीं, झाला श्रीद प्रसन्न सुजनकसा.
सदयप्रभुप्रसादा पात्र न होईल नम्र सुजन कसा ? ॥१०२॥
धर्मासि म्हणे, ‘ साधो ! संकोच नको धरूं मनीं कांहीं,
फळ भोगिलें महामुनिशापाचें आमुच्या अनीकांहीं. ॥१०३॥
भेमा ! अगस्त्यमुनिवर मत्सख मणिमान् महामदें थुकला,
मुकला स्वजीवना तो, संसर्गी पर हि जन, जरि न चुकला. ॥१०४॥
आलां स्वपितृगृहाला, स्वस्थ रहा, जन्म धन्य लेखाल,
येथें चि अर्जुनाला तज्जनका जिष्णुला हि देखाल. ॥१०५॥
धर्मा ! भजेल पुनरपि तुज चि हृदयवल्लभा विशंक रसा. ’
ऐसें वदोनि गेला जो जाणे भूतभावि शंकरसा. ॥१०६॥
स्वसदारबंधुलोचनचिरतृषितचकोरपारणा व्हाया
प्रकटे नरचंद्र, म्हणति मुनि अरिधैर्याब्जवारणाव्हा या. ॥१०७॥
त्यां तद्दर्शनलाभें सुख, तें अधना न रत्ननिधिलाभें.
सद्दर्शनलाभाला न खळाचें, फार रत्ननिधिला भें. ॥१०८॥
शक्र हि दर्शन देवुनि धर्मनृपाला म्हणे, ‘ अगा ! साधो !
स्थैर्यें श्री कीर्ति तुज, न तसि सुरमनिसंश्रया अगा साधो. ॥१०९॥
स्वरतासि तामसी धृति दे, तसि च निकाम राजसी, ताप;
जो सात्विकीप विजयी तो साक्षाद्रामराज सीताप. ॥११०॥
आलापा सिकवितसे तोष, इतर साधुचा विलापा, हें
जाणुनि दिव्यास्त्रकर त्वद्दासा अर्जुना दिला पाहें. ’ ॥१११॥
करुनि समाधान असें हरि जाय, तयावरि स्व - भावातें
धर्म पुसे, वृत्त कथी तो सकळ हि त्या शुचिस्वभावातें. ॥११२॥
सांगे स्वतप, किरातप्रभुदर्शन, खळवराहवधयुद्ध,
भगवत्प्रसाद, सद्वर, पाशुपतास्त्रादिलाभ जो शुद्ध. ॥११३॥
लोकपदत्तास्त्रकथा सांगुनि त्यांचीं विशुद्धतुरग मनें
गीतें हरिणकुळेंसीं मोही कथितें महेंद्रपुरगमनें. ॥११४॥
स्वमुखें अर्जुन करितां हरिदत्तार्धासनादि बहुमान
खालीं घाली केवळ न परांची, आपुली हि बहु मान. ॥११५॥
वरदर्पित कोटित्रय सुररिपु वधिले निवातकवच रणीं,
पार्थ म्हणे ‘ त्या विजयीं न मन परममुदित, आजि तव चरणीं. ॥११६॥
पौलोम कालकेय स्वरहित कामगहिरण्यपुरवासी
वधिले पाशुपतास्त्रें, भ्यालों तद्दारशोककुरवासी. ॥११७॥
म्यां या विजयें न मनीं, त्वदहितविजयें चि फार हरिखावें,
स्वागस्करगजमौक्तिक, कीं भलत्याचें म्हणेल हरि खावें ? ॥११८॥
त्वद्विरहें शक्रार्धासनग हि नव्हता चि हा बरा नाकीं,
वाटे क्षणक्षण असें कीं, चिंतुनि ताप घाबरानां कीं ? ॥११९॥
म्हणवित होते स्वर्गीं ही पांच हि ‘ हाय ! ’ वत्सर मला हो !
सुरभीचा तत्स्तन्येतरसुरसीं काय वत्स रमला हो ! ? ’ ॥१२०॥
धर्म म्हणे, “ बा वत्सा ! झालों कृतकृत्य; साधिली महि म्या;
मीं श्रीचतुर्भुजाच्या विजयिचतुर्बंधु पावलों महिम्या. ॥१२१॥
‘ गुरुदत्ता ही सिद्धिद्वारीं त्या प्रभुविना किली लाजे, ’
ऐसें ते साधु म्हणति, जाणति वरदा पिनाकिलीला जे. ॥१२२॥
या नेत्रानीं कीं ती श्रीमूर्तिं विलोकिली, अहो भाग्यम् ।
स्पृष्टः स बत नियुद्धे ब्रुवते श्रुतयो महन्महोभाग्यम् ॥१२३॥
काळाधीन शतक्रतु, शिवसेवक सत्य पांडवा ! सवते;
किति शक्रार्धासन तें ? सतत अमितसत्यपांडवासव ते. ॥१२४॥
जे लांब रुंद मायामयदेह सुरारि लाख वावें गा !
तन्नाशकास्त्रकौतुक मजला त्वां आजि दाख वावें गा ! ” ॥१२५॥
अर्जुन करी उपक्र, तों पावे रत्नसानु कंपातें;
वारिति सुरवर त्यातें त्रस्ताखिलसत्वासानुकंपातें. ॥१२६॥
तेथुनि धर्म फिरे, कीं, बंधुकथित हित अमान्य न करावें,
वनवासीं दशा गेलीं, तें त्या बारांत वर्ष अकरावें. ॥१२७॥