पांडववृतश्रवणें धृतराष्ट उदंड काळजी वाहे,
कीं, दुखविले भुजगसे निश्चित होतील काळ जीवा हे. ॥१॥
सशकुनि कर्ण म्हणे, ‘ कुरुराया ! संप्रति धनेश तुज लाजे,
झाले भणग, मदानें हांसत होते सभेंत तुजला जे. ॥२॥
स्वश्री दावुनि द्याया दायादां दुःख, कानना चाला,
लाजतिल वाक्शिखीच्या हृतपक्षमयूर कां न नाचाला ? ’ ॥३॥
राजा म्हणे, “ म्हणेल चि पांदववत्सल सबुंधु जनक ‘ नका. ’
आम्हां, प्राणांसि, न बहु जपतो तो अंध, बंधुजनकनका. ” ॥४॥
कर्ण म्हणे, ‘ हूं, हें किति ? घोष - परामर्श - मिष पुढें कर, गा !
मज मंत्रदासि, देवुनि पीतजयसुधेकरूनि ढेंकर, गा. ’ ॥५॥
त्या चि मिषें आज्ञेला पुसती जों, नृप करी नकारा तों;
स्पष्ट म्हणे, ‘ बालिश हो ! मरणप्रदकुमतिसीं नका रातों. ॥६॥
द्वैतवनाश्रय करुनि छळिले ते पांडुपुत्र आहेत,
त्यांला पुन्हा छळावें, आहे तुमच्या मनांत हा हेत. ॥७॥
दिसतो भीमधनंजयकृष्णाक्षोभें सुयोधनाश मला,
म्हणतो वनप्रवेशें दहनापरि या सुयोधना शमला. ’ ॥८॥
शकुनि म्हणे ‘ गाईंतें पाहूं मृगया वनीं करूं, परतूं,
धर्माकडे न जावूं, व्यर्थ भिसी, धैर्यनिधि सुधी पर तूं. ॥९॥
धर्मज्ञ धर्म जपतो कृतसम्या, असति वश तया भ्राते;
कां विटवितील आज्ञा लंघुनि चातक तसे दयाभ्रा ते ? ॥१०॥
दायादाचें दर्शन घ्यावें काशास ताप साधाया ?
वल्किजटिदर्शनेच्छा तरि पाहूं साधुतापसा धाया. ’ ॥११॥
अधमतिकुमारीच्या ते मोहिति बोलनग मनाला हो !
अनुमोदन देइल कां प्रेमाचा डोल न गमनाला हो ! ? ॥१२॥
शिरला सदार सानुज सशकुनि सांगेन तो सकटक वनीं,
दूषावया शिरे खळ जैसा, निजदुर्गुणांसकट कवनीं. ॥१३॥
घोषीं सुयोधन वसे हरिसा, परि साच मुग्ध, न वनीं तें
यश संपादी, केवळ नाशी सेवूनि दुग्धनवनीतें. ॥१४॥
कुरुपति अनुगांसि म्हणे, ‘ मृगयाक्रीडा वनीं भली केली,
त्या द्वैतवनाख्यसरीं स्वप्रमदांसह चला करूं केली. ’ ॥१५॥
पूर्वीं च तेथे येउनि गंधर्वाधीश चित्रसेन रते;
दुर्योधनप्रहित जे झाले पाहोनि चित्रसे नर ते. ॥१६॥
गंधर्वांसि म्हणति नर, ‘ येताहे मनुजदेव शूर सरा,
हें द्वैतवनस्थान त्यागुनि आतां चि सर्व दूर सरा. ’ ॥१७॥
खेचर म्हणति, ‘ कुमति हो ! सिंहीचें काय रे ! करील शुनीं ?
मृगमदपरिभवकर गुण नायकिला लेशमात्र ही लशुनीं. ॥१८॥
गंधर्वराज करितो जळकेलि, निघा, पळा चि, पामर हो !
नातरि मराल, तुमचा पति तो हो सनरकोटि सामर हो. ’ ॥१९॥
तें ऐकुनि भूप म्हणे स्वभटांतें, ‘ शीघ्र सोडवा सर, हो !
पळवा गंधर्वांतें, हा स्वजयेंकरुनि गोड वासर हो. ’ ॥२०॥
कुरुपतिभट म्हणति, ‘ अरे ! सोडा, गंधर्व हो ! सरोवर तें,
आम्हांपासुनि खेचरबळ कुंठितगति न हो, सरो वरतें. ’ ॥२१॥
करितां मदें अतिक्रम, कळवुनि त्यांची स्वकुळवरा करणी,
गंधर्वानीं वधिले द्वैतवनानिकट बहु वराक रणीं. ॥२२॥
निजकटक भग्न पाहुनि कर्णें प्रकट करुनि प्रभावातें,
गंधर्वांची हरिली दीपांची ज्यापरि प्रभा वातें. ॥२३॥
त्यासि भट म्हणति, ‘ विजयश्रीचा अतुळप्रभाव नवरा हा;
याची प्रभा परा, जसि यज्ञवराहप्रभा वनवराहा. ’ ॥२४॥
त्या चित्रसेन भेटे, जैसा भगवान् अगत्य सिंधुरसा;
होउनि विरथ पळाला, सिंहपरित्रस्तचित्त सिंधुरसा. ॥२५॥
कर्णपरिभवांत असा झाला असतां सुयोधनाश रण,
होउनि विकळ भट म्हणति, ‘ आम्हांला हो सुयोधना ! शरण. ’ ॥२६॥
कलिपुरुष चित्रसेनावरि धावुनि जाय आशु, न कदापि
खळ भी, हरिसि, पिसाळे जो, तो पसरूनि आ शुनक, दापी. ॥२७॥
जयहेतु काय होइल अहिला बळयत्नकोटि केकिरणीं ?
मिरवे प्रकाश तिमिरीं खद्योताचा, न तो टिके किरणीं. ॥२८॥
करुनि विरथ दुर्योधन धरिला जैसा भुजंग खगपानें,
लघुहित न गुर्वतिक्रम, वदन न फाटेल काय नगपानें ? ॥२९॥
सानुज सदार दुर्जन दुर्योधन खेचरेश्वरें धरिला,
जाणों क्षितिहृदयींचा साक्षात् कांटा चि तो समुद्धरिला. ॥३०॥
दुर्योधनासि जिंकुनि नेतां बांधूनि आपुल्या अयनें,
धर्मासि शरण गेले सचिव भरुनि अश्रुच्या भरें नयनें. ॥३१॥
ते वृत्त कथुनि म्हणती, ‘ तव संदर्शनसुखोदया भ्राते
पावोत, सोडवावे बंधापासुनि तुवां दयाभ्रा ! ते. ’ ॥३२॥
भीम म्हणे, ‘ खळमत हें, आम्हां श्री दाखवूनि गांजावें.
त्या हितकरसुहृदासीं आम्हीं भांडावयासि कां जावें ? ’ ॥३३॥
धर्म म्हणे, ‘ रे भीमा ! शरणागत रिपु हि रक्ष्य सन्महित,
बा ! जरि घडेल भीताभयदान जगीं तरी च जन्महित. ॥३४॥
न सहावा अन्यकृतज्ञातिपराभव बुधें, उठा, रचितो
जन्मुनि सुयशासि न जो, जननीयौवनवनीं कुठार चि तो. ॥३५॥
आरंभिता न मख तरि जाता, हा पळ हि राय न रहाता,
सुयशोमृतासि पसरिति अमर, न पसरील काय नर हाता ? ’ ॥३६॥
चौघे हि म्हणति, ‘ तुमचे घेउनि येतों चि ते असुज्ञाती. ’
सुज्ञासि गुर्वनुज्ञा कामदुघा बहुमता, असुज्ञा ती. ॥३७॥
होवुनि सज्ज कुरुरथारूढ तयां गांठिती महाबळ ते,
खेचर फिरले, नसते मरणार, भिवूनि तरि न कां पळते ? ॥३८॥
गंधर्वासि म्हणति, ‘ र ! दुर्योधन बंधु आमुचा सोडा
ऐसी श्रीधर्माज्ञा, स्वमुखें ‘ चुकलों ’ म्हणोनि कर जोडा. ’ ॥३९॥
गंधर्व म्हणति, ‘ जो खळबळजळधीतें महातपा प्याला,
आम्हां मता तदाज्ञा, नातरि शिवता हा हात पाप्याला. ॥४०॥
प्राप्त सुधा हि अव्हेरुनि जीस सदा पसरितात आ ज्ञाते,
आम्हीं नरदेवाज्ञा - कांजी प्यावी, त्यजूनि आज्ञा ते ? ’ ॥४१॥
ऐसें निष्ठुर वदले कीं, ‘ खळमथनांत लेश अनय नसे, ’
झाले होते हि विजयजमदें सनयन असोनि अनयनसे. ॥४२॥
‘ कां मरतां ? सोडा रे ! सोडा गंधर्व हो ! ’ म्हणति चवघे;
त्यांवरि खवळोनि खचर खरतरशरनिकर सोडिती अवघे. ॥४३॥
त्या हरिचे आश्रित ते, या हरिचे प्रबळ दास हे तिपट,
झांकिति न त्यांसि, त्या ही खचरा त्यांचे विशाळ हेतिपट. ॥४४॥
गर्वे हरिसीं भिडतां काम होति शुद्ध चित्रसे न करी ?
जिष्णुपुढें तसि खेचरगति होतां, युद्ध चित्रसेन करी. ॥४५॥
तच्छस्त्रास्त्रैकार्णवमध्यंगत तो महाकिरी टिकला,
अपराजिता शिवासी समरीं विजयावहा किरीटि - कला. ॥४६॥
अन्यत्र नवल, परि त्या पांडुकुमारीं न व्हे नवल यश तें;
हरिहरदासपरिभवक्षम न सकळ देव दानव लयशतें. ॥४७॥
तो भेटोनि म्हणे, ‘ कां झालासि खळा सुयोधना शरण ? ।
केला शक्राज्ञप्तस्वहितकरामितसुयोधनाशरण. ॥४८॥
हें काय बरें सुज्ञा ? जो दारुण दंशकाम साप सदा,
तन्मथन अनिष्ट ? अभ्य द्यावें त्य असर्वतामसापसदा ? ’ ॥४९॥
अर्जुन म्हणे, ‘ सख्या ! मज अकृतज्ञ असें म्हणो नको, पावें,
कैसें अजातरिपुवरि अहितहितनिरत म्हणोन कोपावें ? ॥५०॥
जेंवि शरणागताच्या त्यागा, प्राणांचिया न, शिबि भ्याला,
सन्मति अपवादा भी, करणीच्या हि न वधू तसि बिभ्याला. ॥५१॥
सोशील मृत्यु, परि गुरु शरणागतताप पळ न सोशील,
तारिल सकळांसह त्या, बा ! तें क्षणमात्र चळ नसो शील. ॥५२॥
खेचरसिंहा ! दे कुरुसिंहाला, उचित भाग हरिला जो;
या कर्में तुज मुक्ताकवळ नुगळिता हठींद्र हरि लाजो. ’ ॥५३॥
तो खेचरनाथ म्हणे, ‘ कुरुवंशीं धन्य तो अजातारी,
खळरक्षकां तुम्हां प्रभु बहु बहु मानील, जो गजा तारी. ॥५४॥
धन्य तुम्हीं गुर्वर्पितवाक्चेतःकाय कीर्तिलाभरत,
आठवला मज आद्यें कविनें जो काय कीर्तिला भरत. ’ ॥५५॥
भेटुनि वर्णुनि धर्मा, गंधर्वश्रेष्ठ जाय नाकाला;
खळ बहु लाजे, जाणों तो न यशा ने हरूनि, नाकाला. ॥५६॥
मृत गंधर्व उठविले शक्रें तत्काळ अमृतसेकानें
स्वमरणकथेसि ऐकति सुप्तोत्थित सत्य अ-मृतसे कानें. ॥५७॥
धर्में सदार सानुज बंधु हित कथुनि पुरासि पाठविला;
आठविला तत्परिभवखेस चि, न तदीय दोष आठविला. ॥५८॥
मार्गीं भेटोनि म्हणे कर्ण, ‘ सख्या ! धन्य तूं महातेजा,
मज पळविलें जिहीं ते शत्रु न झाले रणीं सहाते ज्या. ॥५९॥
खेचरनाथपरिभवें तुजला सुरपाळ कां न कांपावे ?
चापश्रुतिजगदंबा समयीं प्रियबाळका न कां पावे ? ’ ॥६०॥
दुर्योधन त्यासि म्हणे, “ काय सख्या ! वर्णितोसि कर्णा ! तें
निजवृत्त काय सांगो ? होइल अति तत्प तैल कर्णातें. ॥६१॥
अरिनें केलें मजला विरथ करुनि सानुजासि बद्ध रणीं
सोडविलें धर्मानें, तें झालें दुःख बहु, न मद्धरणीं. ॥६२॥
अस्मन्मंत्रित कथिलें गंधर्वेंद्रें युधिष्ठिरासि खरें,
तेव्हां खचोनि पडलीं मजवरि दुःखाद्रिचीं महाशिखरें. ॥६३॥
प्राणांकडे न पाहुनि म्याम केला धरुनि मृत्युकाम रण,
कर्णा ! आलें नाहीं मज तच्छस्त्रेंकरूनि कां मरण ? ॥६४॥
वदलों शतदा मी कीं, ‘ घे पोटीं भूमिदेवि ! वरदे ! हा. ’
विश्वंभरा क्षमा, परि न शिराया भूमि दे विवर देहा. ॥६५॥
बुडविति तापविति श्रुतमात्रा सहसा चि दुर्दशा, न नया,
मद्दुःख बहु, न झाला पात्र समरनिहत तो दशानन या. ॥६६॥
प्रायोपवेश करितों, दावूं काय त्रपायहास्याला ?
पाव मला, मरणाज्ञा दे, लोकांच्या न पाव हास्याला. ॥६७॥
दुःशासना ! धृति धरुनि अंधपितृहितप्रियार्थ हो राजा,
अभिषेचितों पुढें ये, निजगुर्वाज्ञा चि होय होरा जा. ” ॥६८॥
‘ म्यां राज्यभर सहावा कैसा, प्रियपुत्रशोकभर तातें ?
गुरुदत्तराज्यभोगें संस्तविते काय लोक भरतातें ? ’ ॥६९॥
ऐसें वदोनि झोंबे कंठीं दुःशासन स्वभावाच्या,
सर्वांशि दुःख होतें भाविवियोगें समस्वभावाच्या. ॥७०॥
कर्ण म्हणे, ‘ बालांस हि हे ऐसें झोंबणें गळां ठावें,
कां रडतां भारत हो ! न शिरोनि तुम्हीं तमीं गळांठावें. ॥७१॥
प्रभुनें प्रजा, प्रजानीं प्रभु, रक्षावा चि संकटीं असुनीं,
कां न जपावें तुज त्या पांडुसुतानीं त्वदाश्रयीं असुनीं ? ॥७२॥
पावे हर हि पराभव, मग अन्य न कां सुयोध नाडावा ?
या अपयशें मळो पदनखर हि न तुझा सुयोधना ! डावा. ’ ॥७३॥
शकुनि हि म्हणे तयातें, ‘ यांत दिसे लेश न मज लाभाचा. ’
प्रिय हित सत्य हि सांगे, परि तद्वचनें न समजला भाचा. ॥७४॥
सुरजित पातालग दितिदनुसुत निजहितसुयोधनाश तदा
जाणुन कृत्याहस्तें नेउनि बोधिति सुयोधना शतदा. ॥७५॥
असुर असें वदले कीं, ‘ होतां हें त्वच्छरीर असु - रहित,
राज्या सुयोधना ! मग कोण पर प्रभु करील असुरहित ? ॥७६॥
सांबें दिलासि निर्मुनि पूर्वीं आम्हांसि तूं तपस्तुष्टें,
कीं व्हावीं असुरकुळें बहु सेउनि तव यशोमृतें पुष्टें. ॥७७॥
नाभूर्ध्व वज्रमय तव जगदीशें निर्मिला महाकाय,
पुष्पमय अधस्तन जगदंबेनें, त्यजिसि हा अहा ! काय ? ॥७८॥
भगदत्तादि तुज तुझ्या कार्यासि सहाय होतिल कराया,
अस्मत्पक्षश्रीच्या भाळीं तूं भव्य हो तिलक राया ! ॥७९॥
भीष्मादिकांत अंशें राक्षसवीर प्रवेश करितील,
तेणें निर्दय होउनि ते स्वसुहृज्जीवनासि हरितील. ॥८०॥
नरकासुर हि ससखयदुवरहननार्थी शिरेल कर्णांत;
तो हि अरिबळीं जैसा सिंधूच्या वाडवाग्नि अर्पांत. ॥८१॥
क्षत्रकुळीं दितिजदनुज बहु राक्षर जन्मले, अगा राया !
तुज ते सहाय होतिल, न उपेक्षीं भूतिच्या अगारा या. ॥८२॥
सुरगति धर्म, असुरगति तूं, यास्तव पसरितात आ शेतें
मेघा तुज, असुरकुळें जीवनलाभार्थ धरुनि आशेतें. ॥८३॥
स्वस्तुआर्जुनहितकामें याचकवेषासि वृत्रहा धरिल,
करिल कपट वामनसा, कर्णाचीं कवचकुंडलें हरिल. ॥८४॥
परि संसप्तक समरीं करितिल हरिपुत्रघात राक्षससे,
भीतील त्यांसि पांडव, सिंहांला जेंचि कातराक्ष ससे. ’ ॥८५॥
ऐसें पाताळीं दितिदनुज स्वमुखें रहस्य कळवूनि,
स्वस्थानीं पाठविती कृत्याहस्तें तयासि वळवूनि. ॥८६॥
प्रकट न तें वृत्त करी जाणों होईल त्या स्वनिधिला भें,
होय मनीं च प्रमुदित जैसा लुब्धांत लुब्ध निधिलाभें. ॥८७॥
प्रातःकाळीं रोदननमनार्जुनमारणप्रतिज्ञानीं
वळवी राधेय, जसा प्राणत्यागोद्यताप्रति ज्ञानी. ॥८८॥
कर्णासि म्हणे, ‘ सखया ! मित्रावांचुनि पडे चि साधि तमीं,
करितों त्वदुक्त, आलों त्वन्मंत्रें चि स्वकार्य साधित मीं. ’ ॥८९॥
जाय पुरा, दुर्योधन यश देवुनि बंधुशकुनिकर्णांतें,
वनवृत्त श्रुत झालें भीष्मद्रोणादिपूज्यकर्णां तें. ॥९०॥
भीष्म म्हणे, ‘ कथितों हित रिपुस हि, सांगेन कां न नातूतें ?
कां गेलासि, मदाज्ञा नसतां जायासि कानना तूतें ? ॥९१॥
स्वपरस्वरूप तुजला कळलें कीं ? कां ? कसा अजातारी ?
कर्ण कसा ? पार्थ कसा ? वत्सा ! पंकांत गज तारी. ॥९२॥
न स्तुत्या धेनुपरिस जरि बहु दुध दे अजा तरि पुराणा,
सद्वदना कर्ण तसा स्तुत्य न, सोडुनि अजातरिपु राणा. ॥९३॥
हर्षे कुलज भट तदा, होय रणीं बाणराजिलाभ यदा,
ती सूतसुता झाली, जसि पत्रिपदृष्टि राजिला भयदा. ॥९४॥
याचें जो तेज हरी त्याचें फाल्गुन, म्हणोनि जे कवि ते
कर्णखचरार्जुनां कां म्हणति न खद्योतरात्रिकरसविते ? ॥९५॥
या कर्णें उडुपें त्वां लंघाया पांडवाब्धिला जावें ?
हा ! बालिश हो ! न तुम्हीं या अविवेकेंकरूनि लाजावें. ॥९६॥
दे राज्य, संधि कर, कर जोड, गुरुयुधिष्ठिरासि हो नत रे !
नयसेतुपथाश्रय जो न करी व्यसनार्णवांत तो न तरे. ’ ॥९७॥
जें सन्मत भीष्मवचन पावे दुर्मतिपुढें अनादर तें,
गीचें हि अनादरिजे काय न गायन जडें अनादरतें ? ॥९८॥
होती प्राप्त जयाच्या स्वीकारें मंगळें अवधिरहितें,
कविशतसत्कृतकुळगुरुवचन न घे तो जर्ही अबधिर हि तें. ॥९९॥
जाय उठोनि कुमति कीं, हा राज्यानिष्टहेतु म्हातारा,
न वदोनि वदे नातू, ‘ बुडतां म्हणतिल न हे तुम्हां तारा. ’ ॥१००॥
कर्ण म्हणे, “ कुरुराया ! मजसीं सुश्राव्य शांतवन न वदे,
कर्णासि ताप बहु कटुभाषी हा अप्रशांत नव नव दे. ॥१०१॥
धिक्कारूं त्यासि कसें ? गुरुधिक्कारेंकरूनि पाप डसे,
नाहीं तरि म्यां ऐसें चुरिले असते धरूनि पापडसे. ॥१०२॥
आहे पांडुतनयकृतदिग्विजयाचें नृपा ! पडप यास;
माझा अभिमान असो तुज, जैसा वारिला जड पयास. ॥१०३॥
दिग्विजय स - सेनाहीं केला त्यांहीं न तो अ - सेनाहीं,
परि म्हणतो, ‘ विजयी भुज कोणाचे ही जगीं असे नाहीं. ’ ॥१०४॥
दिग्विजय करुनि येतों, एकाकी एकरथ अ - सेन हि मीं,
किति हें ? त्वदर्थ वर्षीं उघडा, ग्रीष्मातपीं, असेन हिमीं. ” ॥१०५॥
गांधारि म्हणे, ‘ सखया ! आहे मज बहु तुझा चि विश्वास,
वीरा ! एकाकी ही तूं यद्यपि जिंकिसील विश्वास . ॥१०६॥
परि शोभार्थ असों दे, त्याग करावा न आत्मसैन्याचा,
माझा सखा तसा हो क्षितिला वश करुनि त्या हि वैन्याचा. ’ ॥१०७॥
दिग्विजयार्थ सुदिवसीं तो तेजोराशि शूरज निघाला,
घालावया अनम्राकरदाहितसर्वशूरजनिं घाला. ॥१०८॥
दुर्योधन बहु मानी शकटशतानीत मणिकनक दातें
भरिलें घृतें, भरावें जें तैलानें हि मणिक न कदा तें. ॥१०९॥
त्यावरि तो दुर्योधन निजकुळगुरुला म्हणे, ‘ पुरोहित हो !
मत्काम राजसूयक्रतु करणें, हा सुखें परो, हित हो. ’ ॥११०॥
तो साधु म्हणे, ‘ वैष्णवसत्र करावें तुवां नयज्ञा !, तें
ऐसें चि फळद; असतां धर्म उचित तूं हि या न यज्ञातें. ’ ॥१११॥
तें मान्य करुनि रायें ‘ वैष्णवसत्रोत्सवा पहायास
यावें ’ म्हणुनि नृपांप्रति पाठविलेम दूत बहु बहायास. ॥११२॥
मरता चि, न मरता जरि म्हणता चि सदा हि अन्य सत्रप ‘ हा ! ’
दूतमुखें दुर्योधन धर्मासि म्हणे, ‘ मदीय सत्र पहा. ’ ॥११३॥
धर्म म्हणे, ‘ गांधारे ! साधु करिसि कर्म भारतोचित रे !
जो धर्मसेतुसंश्रित वाहुनि गुरुराज्यभार तो चि तरे. ॥११४॥
बा ! येती पुण्ययशःसंपत्ती जोडितां न येरा या;
यावें, परि संप्रति वनवासव्रत सोडीतां नये, राया ! ’ ॥११५॥
भीम म्हणे, ‘ धर्मासह निश्चित येईन समरसत्रास,
रुचतो हा चि रस मना, देतो पर अमृतसम रस त्रास. ’ ॥११६॥
तें सत्र पूर्ण होतां, कर्ण म्हणे, ‘ पांडवायु हरिशील
ऐसा चि, कुरुपते ! तूं विश्वस्तुत राजसूय करिशील. ॥११७॥
जोंवरि न अर्जुनातें मारीन रनांगणांत मी निकरें,
तोंवरि न पादधावन करवीन, करीन आपुल्या चि करें. ॥११८॥
सेवीन न मांसातें, जैसा मोक्षेच्छु सुजन न सुरेतें,
न तदुक्त मृषा, ज्याचें सुक्षेत्रामाजि सुजनन सुरेतें. ’ ॥११९॥
गांधारि म्हणे, ‘ कर्णा ! पूर्ण भरवसा मला तुझा चि असे;
त्वद्भुज संश्रितकामद, ते मंदारादि पांच ही न असे. ’ ॥१२०॥