वनपर्व - अध्याय पहिला

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


डमरुधरप्रियगुणसख पांडव गेले वनासि सांगन, तें
यश परिसा, बुध हो ! म्यां कथिजेल भवद्वरें चि सांग नतें. ॥१॥
जाय वनासि युधिष्ठिरनृपसहवासार्थिभूमिसुरसहित,
ज्याला न विप्रसंगाहुनि वाटे स्वर्गिसेव्य सुरस हित. ॥२॥
ब्राह्मणकुळ वृत्त्यर्थ प्रार्थी कौंतेय भानुला भावें;
कीं, त्या प्रभुप्रसादें प्रणतें मोक्षादि इष्ट लाभावें. ॥३॥
जसि नंदिनी वसिष्ठा, दे धर्मा लोकबांधव स्थाली;
तीं चिंता हरि, जैसी शुद्ध ब्रह्मज्ञता अवस्थाली. ॥४॥
धर्माश्रितांसि रक्षी ती हरिची जेंवि सर्वथा लीला,
‘ हे ’ म्हणति, ‘ अन्नपूर्णा ’ ते पांडव, विप्र सर्व थालीला. ॥५॥
अमृतरसातें हांसति ते ते सर्व हि पदार्थ, ती जे वी;
तोंवरि चतुर्विधान्नें प्रसवे, जोंवरि न पार्षती जेवी. ॥६॥
सब्राह्मणगण पांडव बसले जावूनि काम्यकवनांत;
ग्राम्यालाप त्यागुनि जेंवि सुमतिरसिक काम्य - कवनांत. ॥७॥
धृतराष्ट्र स्वहित पुसे, त्यासि म्हणे विदुर, ‘ खेद कां ? टाकीं
या खळसुतासि, करिता हा केवळ हृदयभेद कांटा कीं. ॥८॥
अद्यापि तरी राया ! हृदय तुझें पांडवांसि आपंगू,
ते सुगति सहाय बरे तुज भवमार्गांत, काय हा पंगू ? ’ ॥९॥
अंध म्हणे, ‘ रे विदुरा ! खोटा, हितशत्रु तूं न भाउ खरा;
न सुसंगतिगुण लागे दुष्टा, कीं वृष्टिगुण नभा उखरा. ॥१०॥
औरस पुत्र प्रौढ ज्येष्ठ त्यागार्ह काय हा निखळ ?
कळलें स्पष्ट मला कीं, करितो चित्तीं शिरोनि हानि खळ. ॥११॥
आकारें चि परेंगित कळतें, बोलें न काय हो ! कळतें ?
असती सुसांत्विता हि त्यजिती, जें तत्प्रियोक्त पोकळ तें. ॥१२॥
जिकडे असे मन तुझें, आश्रय तुज तो चि युक्त, जा तिकडे. ’
हंसीं हंस, बकीं वक मिसळे; जन ओढतो स्वजातिकडे. ॥१३॥
दशकंधरें बिभीषणसा तो अपमानिला कवि क्षत्ता.
तत्ताप किति वदावा ? बसल्या हृदयीं दुरुक्ति त्या लत्ता. ॥१४॥
रामाकडे बिभीषण, गेला धर्माकडे तसा च कवी;
शास्त्राभ्यास खरा गुरु, समयीं रक्षी, न मानसा चकवी. ॥१५॥
दूरुनि विदुर विलोकुनि धर्म म्हणे, ‘ दृष्टि निवविली वढिलें,
कुरुकुळकल्याण चि हें वरि विधिनें लोकरीतिनें मढिलें. ॥१६॥
जे न्यायामृत टाकुनि दाटुनि अन्यायमद्य कु - नर पिते,
जाणों करणार हरण शस्त्रांचें द्यूत करुनि पुनरपि ते. ’ ॥१७॥
धर्म म्हणे त्यासि ‘ पित्या ! टाकुनि आलां किमर्थ अंधातें ?
जें स्वीकृत यष्टित्व त्यजिलें त्वां केंवि सत्यसंधा ! तें ? ’ ॥१८॥
विदुर म्हणे, ‘ बा ! न रुचे जेंवि कुमारीस पळ हि पति पिकला,
तेंवि नृपतिमतिला हा क्षत्ता न रुचे, सुनीति जरि शिकला. ॥१९॥
घालविलें मज रायें मानुनियां मदुदितें हितें अहितें ?
ह्मणुनि तुजकडे आलों; कोण उपासील कोपल्या अहितें ? ॥२०॥
प्रेमें काककुळास चि संतर्पायासि आम्र पिकला जो,
त्याच्या गळां पडाया साहुनि अपमान कां न पिक लाजो ? ’ ॥२१॥
धर्म विदुरासि निववी घर्मदवार्ता शिखीस घन जेवीं,
प्रार्थुनि म्हणे, ‘ पित्या ! हो स्वस्थ, स्थिर करुनियां स्वमन जेवीं. ’ ॥२२॥
राहुनि समीप शिकवी धर्माला त्या महर्षिसुत रीती
विपदर्णवांत होउनि नौका ज्या स्वाश्रितांसि उतरीती. ॥२३॥
धृतराष्ट्र म्हणे, ‘ चुकलों, विदुर न तो दवडिला कुशळ - विसर;
करितों तळमळ गतधन जनसा, न पडे चि एक पळ विसर. ॥२४॥
भलतें वदलों भ्रात्या, वदतो जैसें अबंधु अभ्रात्या,
पाहुनि होतील सुखी पांडवचातकमयूर अभ्रा त्या. ’ ॥२५॥
परवृद्धि नसावी हा भाव प्रकटुनि न बोध मळवीला.
रडला, पडला मूर्छित, तळमळला, विदुरविरह कळवीला. ॥२६॥
नृप संजयासि धाडी भ्रात्या विदुरासि शीघ्र आणाया,
शिकवी पुनःपुन्हां कीं, “ बा ! म्हण घालूनि त्यासि आणा, ‘ या. ’ ” ॥२७॥
सर्वस्व परित्यागुनि ज्याचें स्मरताति पादकंज यमी
त्या हरिच्या आप्तां तो नमुनि म्हणे, “ दास सूत संजय मीं, ॥२८॥
आलों राजाज्ञेनें, गुरुदास्यमहर्धि भविदुरापा, हें
जाणसि, ‘ कवे ! पहा निजगुरुला चि, मुहूर्त न विदुरा पाहें. ॥२९॥
बहु म्हणतो नृप अनुदिन गतधन कृपणा जनापरिस ‘ हाय ! ’
व्हावें सुज्ञें बुडतां भलत्या हि निवारिलें परि सहाय. ” ॥३०॥
भीम म्हणे, ‘ बापाजी ! जा समयीं, येधवां चि कां घाई !
तूं येथ नसावें, या भावें करितो वरी च कांघाई. ’ ॥३१॥
धर्म म्हणे, ‘ ताता ! तो तुजविण वर्तेल वृद्ध अंध कसा ?
सत्संगशिवाविण त्या दुःसह भव, वासवास अंधकसा. ’ ॥३२॥
भेटे विदुर गजपुरीं असदाचरणोनितप्रभा वढिला,
ज्याचा झाला साधुद्वेषें स्वाभाविक प्रभाव ढिला. ॥३३॥
जरि अप्रसन्न चित्तीं वरि दावी प्रेम, बैसवी अंकीं,
अंध ह्मणे, ‘ हर्ष जसा मज, न तसा राज्य पावल्या रंकीं. ॥३४॥
जें काहीं मीं वदलों वत्सा ! तुझिया मनीं न राहो तें,
पुण्य यश प्राप्त सहनशीलत्वें सज्जनीं नरा होतें. ’ ॥३५॥
विदुर म्हणे, ‘ दादाजी ! परम गुरु प्रभु हि तूं क्षमाकर गा !
आम्हां पदाश्रितांची वृत्ति - स्थिति - कीर्ति ही भवत्करगा. ॥३६॥
ते हे मज सम, परि मन पाहुनि दीना मुलास कळकळतें,
गुरुजनशील असें चि प्रायः, प्रभुजी ! तुला सकळ कळतें. ’ ॥३७॥
समजावुनि पांडवहित विदुर पुरा आणितां पुन्हा तातें,
दुर्योधन करि चिंता, कल्पुनि चित्तीं निजार्थघातातें. ॥३८॥
स्वहितकरशकुनिकर्णप्रमुखांसि ह्मणे, ‘ गृहांत अहि तातें
हा आणिला, दुखविला, सर्वांच्या ही करील घातातें. ॥३९॥
मोहुनि वृद्धमतीतें दायादांतें फिरोनि आणवितो,
हा त्यां हातीं आम्हां बालतरूंला समूळ खाणवितो. ॥४०॥
न पहावे, न सहावे तें, मरतों, आजि भक्षितों विष मीं,
एवंविधमरणीं सुख, न मला काळीं तशा महाविषमीं. ’ ॥४१॥
शकुनि ह्मणे, ‘ प्राणाहुनि रक्षिति सत्यव्रताप्रति ज्ञाते,
शंका धरिसि वृथा कां ? त्यजितील कसी कृता प्रतिज्ञा ते ? ॥४२॥
जरि आले चि तरि, पुन्हां, योजूनि अपाय लक्षशा उडवूं.
रंध्रान्वेषी आम्हीं बहु, त्यातें व्यसनसागरीं बुडवूं. ’ ॥४३॥
सांत्वन करि दुःशासन, कर्ण हि परि आग्रही न तो समजे;
टाकूं पाहे पंचप्राण, प्रियबंधु ते हि, त्यांसम जे. ॥४४॥
कर्ण म्हणे, ‘ हें न रुचे, तरि अरिकरिहरि असों, अगा राया !
जें चित्तीं तें चि करूं, न उपेक्षीं भूतिच्या अगारा या. ॥४५॥
पडले व्यसनीं केवळ ते तेजोहीन दीन दायाद,
ग्रीष्माल्पसरीं सोडुनि गेलें जैसें नदीनदा याद. ॥४६॥
बळपति गुहसा मीं, त्या अधिक बहुभुजास्यगात्र आया सा,
चाल, करूं शत्रुक्षय, पळ हि न होसील पात्र आयासा. ’ ॥४७॥
ऐसें अनुमोदन दे दुष्टाला, जेंवि मद्य वेडसरा,
धांवे साधुवरि श्वा खवळविला जेंवि पाळकें डसरा. ॥४८॥
सबळ सुयोधन पांडवहननार्थ निघे, अशांत अयनांत
व्यास प्रकटे, ज्याच्या नांदे करुणा मनांत नयनांत. ॥४९॥
वारुनि त्यांसि मुनि म्हणे, ‘ धृतराष्ट्रा ! तनुज हा तुझा खळ गा !
विनिपातहेतु मार्गामाजि रजःपिहितमुख जसा खळगा. ॥५०॥
हा हरुनि पांडवांचीं सर्वस्वें, जीवितें हि उर्वरितें
हरणार, कसें म्हणसी तूं हितकर या अशा हि उर्वरितें ? ॥५१॥
देईल शोक, बुडवुनि कुळ, आपण ही बुडोनि, तुज राया !
सांग हित, सुज्ञ गुरु तूं आहेसि समर्थ यासि उजराया. ॥५२॥
श्रमदा हि अन्यरोगा मानिति बहु, विटति साधु सुतरोगा;
किंवा हा धर्माचें दास्य करुनि दुर्गुणाब्धि उतरो गा ! ॥५३॥
अथवा कशास हें ही ? सुगंध कर्पूर हि न करी लसुणा,
सिंहगुणस्वीकृतिला तत्संगें काय गा ! करील सुणा ? ॥५४॥
स्वपरयशोवृद्धि रुचे सुजनास, स्वपरकीर्तिहानि खळा;
बैसविला भूभूषणपदपदकीं काय काच ? हा निखळा. ॥५५॥
मज वाटे हा कुरुचा वंश सुखें या जनांत नांदावा;
काय करूं ? खळ करितो साधूंसीं स्वक्षयार्थ कां दावा ? ’ ॥५६॥
धृतराष्ट्र म्हणे, ‘ ताता ! जें हें द्यूतादि दैवकृत सारें,
भावि कसें टाळावें लोकें प्रारब्धकर्महृतसारें ? ॥५७॥
दुष्टसुतोत्थापयशें कर्पूरविशुद्ध आत्मकुळ मळतें,
कळतें; तदपि स्नेहें मन टाखायास यास कळकळतें. ’ ॥५८॥
व्यास म्हणे, ‘ सत्य वदसि वत्सा ! आत्मा चि पुत्र वेदमतें,
ऐसें चि चित्त माझें पुत्रस्नेहेंकरूनियां भ्रमतें. ॥५९॥
एक कृषीवळपीडित दुर्बळ वृष पाहताम चि महिवर ती
ख्याता सुरभी देवी स्नेहें झाली उदंड गहिवरती. ॥६०॥
तूं पांडु विदुर मज सम, परि माझा पांडवांकडे ओढा;
निम्नाकडे चि धांवे, नाटोपे जेंवि अद्रिचा ओढा. ॥६१॥
कीं नाहीं जनक कनक, वन कदनकरांसि सेवणें पडलें,
वाटे बहु अवघड, जें न घडावें ज्यांस, त्यांस तें घडलें. ॥६२॥
पुष्कळ सुख भोगावें ऐसें चित्तीं असेल, तरि त्यातें
हित सांग, कळेल तसें, साधुद्वेषें स्वघातकरित्यातें. ’ ॥६३॥
राजा म्हणे, ‘ करावें आजि तुम्हीं सुमतिधाम नातुंड;
शिकवा स्वहित, पुरवितें तुमचें कीं विश्वकामना तुंड. ’ ॥६४॥
व्यास म्हणे, ‘ पाजी घन वन, खग असतो करूनि आ जो बा !
बापासि बाप न म्हणे ऐशाला काय होय आजोबा ? ॥६५॥
पांडव पाहुनि आतां मैत्रेय महर्षि येथ येईल,
बोधील ऐकिल्यावर, नाहीं तरि उग्र शाप देईल. ’ ॥६६॥
ऐसें वदोनि, सोडुनि दुर्मतिसंसर्ग, मुनि पळाला हो !
कीं ताप आपणाला दुःसह शप हि न त्या खळाला हो. ॥६७॥
आला मैत्रेयमुनि प्रार्थुनि शिकवावया हित ज्ञानी,
‘ खळबोधश्रम निष्फळ ’ ऐसें कथिलें जरी हि तज्ञ्ज्ञानीं. ॥६८॥
पूजुनि ध्रुतराष्ट्र म्हणे, ‘ माझा तापें न काय पळवा हो,
पळवा हो ! अघ, मजवरि तुमचा करुणासुधाब्धि पळ वाहो. ॥६९॥
हे ते बंधु प्रेमें नांदोनि जगीं सुकीर्ति करितिल कीं,
व्यसनार्तीं या दासीं करिल कृपा देव, जेंवि करितिलकीं. ’ ॥७०॥
मैत्रेय म्हणे, ‘ राया ! आहे हातीं तुझ्या चि बापा ! हें,
त्यांच्या त्यांच्या ठायीं समतेसि पुढें तरी हि बा ! पाहें. ॥७१॥
तूं ज्या सभेंत, तेथें ती कुलच्या तेंवि काय गांजावी ?
कुरुकुलकीर्ति श्रीमद्भीष्म हि असतां लयासि कां जावी ? ॥७२॥
कां दंडिले न ते त्वां ? स्वसभेंत चि घालिते दरवडा जे,
हा ! हा ! तो साधुमनीं अद्यापि असाधुवादरव डाजे. ॥७३॥
झाली तस्करवसती जी होती कुरुसभा जनकशाला.
अद्यापि इचें करिती भीष्म विदुर कवि सभाजन कशाला ? ॥७४॥
आतां सर्व असो तें, वत्सा ! दुर्योधना ! पहा हित रे !
सदतिक्रमकर न तसा, जेंवि गरुडलंघनें महाहि तरे. ॥७५॥
संसार दों दिसांचा, यश जोडी जो कुलीन तो चि तरे;
घ्यावें बरें म्हणोनि स्वपरमुखें; तें कुलीनतोचित रे ! ॥७६॥
भ्राते साधु यशस्वी शस्त्रास्त्रज्ञ प्रसिद्ध वासवसे,
पद्म चि ते ज्यांत सदा श्री गुणगणरसयशःसुवास वसे. ॥७७॥
भासति तसे चि सत्वें जैसे होते सविप्र भवनांत,
अद्यापि वल्कलाजिनवसन हि दिसती न विप्रभ वनांत. ॥७८॥
भीमें हिडिंबबकखळ वधिले मागें, जसे करी हरिनें,
किर्मीरनाम राक्षस सांप्रत, भ्यावें मनीं जया हरिनें. ॥७९॥
ऐशा प्रबळांसीं तूं सख्यें जरि वर्तसील, तरशील;
सुख भोगिशील पुष्कळ, नाहीं तरि हा ! वृथा चि मरशील. ’ ॥८०॥
ऐसें सत्य हित वदे, परि न तयाला धरूनि तोख वळे,
शापासि यत्न मांडी, मांडी ताडि, कुदेव तो खवळे. ॥८१॥
ज्याच्या, सुहित करावें, अहितकरानयविषा दमुनि, पानें,
उपदेशामृत थुकितां, कां न धरावा विषाद मुनिपानें ? ॥८२॥
मैत्रेय म्हणे, “ पापा तापावह सदुपदेश परिसविता,
घूका दृष्टीस नको सर्वज्गत्तोषहेतु परि सविता. ॥८३॥
दुर्योधना ! तुज जरि न शिक्षावें, तरि म्हणेल मत्तप ‘ हा !
खळ मल्लंघन करितो, तूं हि न हो क्षांतिभाग्यमत्त, पहा. ’ ॥८४॥
यास्तव घे शाप, तुझ्या भीमगदा करिल चूर्ण मांड्यांतें,
वाढिल काळा, बाळा जसि वाढी माय तूर्ण मांड्यांतें. ” ॥८५॥
पाय धरुनि अंध म्हणे, ‘ फिरवा जी ! शाप; ’ मुनि म्हणे, “ न रडें,
‘ वाक् करिन, ’ म्हणो, स्वोषधिवदनाचें व्याघ्र न चघळी नरडें. ॥८६॥
धर्मन्यायें वर्ता, तिळ हि न करिजेल हानि शापानें,
तापद नव्हे चि, केला स्वसुहृन्मैत्रेय हा निशापानें. ” ॥८७॥
मुनि गेल्यावरि राजा विदुरासि म्हणे, ‘ भया अ - दभ्रा त्या
वत्स वृकोदर कैसा परिहरिता जाहला ? वद भ्रात्या ! ’ ॥८८॥
विदुर म्हणे, “ कथिलें जें धर्में किर्मीरहननवृत्त मला,
तें फार काय सांगों ? त्या कर्में भीम भीमसा गमला. ॥८९॥
निर्मी किर्मीर महामाया, तो काळसा करी लगट,
वनदेवांसि वाटे सर्व प्राण्यांसि हा करील गट. ॥९०॥
तन्नाद कांपवी बहु कृष्णेतें, जेंवि वायु कदलीतें;
पांचां ही वीरां, ती तेव्हां जें ‘ हाय ! हाय ! ’ वदली तें. ॥९१॥
‘ कोण तुम्हीं ? सांगा रे ! ’ वदत असें दुष्ट ये जवळ खाया,
धमोक्त वृत्त कारण होय बकारातितेज वळखाया. ॥९२॥
दुष्ट म्हणे, ‘ होउनि परलोकीं तवद्रक्ततृप्त बक राहो,
भीमा ! स्वभ्रात्यांसह किर्मीरव्याघ्रभक्ष्य बकरा हो. ’ ॥९३॥
वारुनि धनंजयातें, घालुनि दृढ कास, धरुनि नग हातें,
भीम भिडे रक्षासीं, प्रथम म्हणे, ‘ हूं ’ रणांत, मग ‘ हा ’ तें. ॥९४॥
वधिलें भीमें जेव्हां हरिस हि तें रक्ष नावरायाचें,
सुर वदले याचिपरि, ‘ स्वरिपु वधुनि रक्ष नाव रायाचें. ” ॥९५॥
भीमाच्या विजयातें विदुर सविस्तर नृपासि आयकवी,
तें ग्रंथविस्तराला भ्याला जो, तो वदेल काय कवी ? ॥९६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP