राया ! धृतराष्ट्राचा प्रिय जामाता विवाहकाम वनीं
आला, जयद्रथाख्य स्वबळभरें कांपवीत ती अवनी. ॥१॥
मृगयार्थ पांडुनंदन गेले असतां, निजाश्रमद्वारीं
होती उभी द्रुपदजा, जैसी शंपा नवांबुभृद्वारीं. ॥२॥
तीतें पाहुनि झाला तो रावणसा चि पात्र अन्याया,
मित्रासि म्हणे, ‘ चित्ता हे चि बहुमता, नको चि अन्या या. ॥३॥
जा कोटिका सख्या ! तूं पूस तिचें वृत्त, होय मत्करगा
ऐसें आधीं चतुरा ! साम चि निजकार्यसिद्धिमत् कर गा ! ’ ॥४॥
सांगुनि निज वृत्त, तिचें वृत्त पुसे तीस कोटिक विहितसें,
स्वल्पांत ती हि सांगे, बोलों शकती न कोटिकवि हि तसें. ॥५॥
कळलें कोटिकवदनें ती कृष्णा स्वभगिनी असें नातें,
तर्हि भय न धरी लज्जेसह, पळ कामातुरीं असेना तें. ॥६॥
कृष्णेसि म्हणे, ‘ माझी राणी हो, लाजतीस कां ? बस ये,
अंकावरि घेवूं दे, आइक सुखकर मदुक्त, थांब, सये ! ॥७॥
राज्यच्युतसंगें श्रमपात्र करिसि दिव्यदेह कां गे ! हें ?
श्रीमद्गेह मिळाल्यां सेवावीं निर्धनें चि कां गेहें ? ॥८॥
त्वां फेडिलें चि त्यांचें तत्संगें कृश करूनि देह रिण,
हो मद्दयिता, देइन मन तुज, गानासि जेंवि दे हरिण. ’ ॥९॥
कृष्णा म्हणे, ‘ कुबुद्धे ! खद्योतीं कीटकाधमीं मलिनीं
द्युमणिप्रति सोडूनि प्रियभाव धरील काय रे ! नलिनी ? ॥१०॥
क्षणमात्र स्वप्नीं ही वरिली कुशळेच्छुनें न विटलीला,
हे आवडली बहुधा त्वन्मतिला जीवनासि विटलीला. ॥११॥
स्पर्शीं च मृतिप्रद हा वीरपरिग्रह, महाहिचा मणि कीं !
अंडघटीं द्युमणिद्युति योग्या नांदावयासि कीं मणिकीं ? ॥१२॥
त्यजितिल भट तुज समयीं, त्यजिति हरि जसे नगासि नगदाहें;
भीमप्रिया प्रियसखी लव हि न साहेल लंघन गदा हें. ’ ॥१३॥
कामांध खळ करीना, अन्य करी लेश तरि विवेक पिसा,
धांवोनि बळात्कारें ‘ हां हां ’ म्हणतां हि तो शिवे कपिसा. ॥१४॥
पावे व्यसन अनाथा, जाणों विजनांत तापसी ते तें.
खळ दे तिला, जसा तो पापमति दशास्य ताप सीतेतें. ॥१५॥
कृष्णेनें भाविनरकपाताच्या प्रत्ययासि जड लाहो
म्हणउनि कृष्ट निजोत्तरपट आसुडितां चि, दुष्ट पडला हो ! ॥१६॥
धौम्यासि म्हणे, ‘ देहांवा, मजला हें मूर्ति पातक विटाळी;
रक्षा मज कीर्तिस ही; कीं, स्वपरव्यसनपात कवि टाळी. ’ ॥१७॥
पुनरपि कपिसा च पिसा क्षिप्र धरायास तीवर उगारे;
तों धाउनि धौम्य म्हणे, ‘ न उठ धराया सतीवर, उगा, रे ! ’ ॥१८॥
ती नमुनि म्हणे मुनिला, ‘ न वदावें व्यर्थ, दुष्ट हा निपट,
ओढिल तरि जीवन ही, पावेल न एक मात्र हानि पट. ॥१९॥
भवदाज्ञेनें बैसो हे दुष्टरथीं वृकोदरगदासी.
न हरिप्रसादकविची आपन्ना खळवृकोदरग दासी. ’ ॥२०॥
बसतां स्वरथीं हर्षे तो, जेंवि दशास्य जानकीलाभें,
धरि पररथासि ती, कीं. स्पर्शाया अंत्यजा न कीला भें. ॥२१॥
ती बहु त्यासि दटावी, कार्पासा काय दापिना कीला ?
काय बधेल पराला सती, त्यजुनि कायदा पिनाकीला ? ॥२२॥
दुष्टरथासह धांवत धौम्य मुनीश्वर म्हणे, ‘ अगा राहो !
राहो मद, तूं न तया जाल्मत्वख्यातिच्या अगरा हो. ॥२३॥
जरि तूळराशिमध्यस्थबिळीं नेईल आखु वातीतें
तरि वाति आखुतें वा सहसा भक्षील आखु वा तीतें ? ॥२४॥
रे ! तत्काळ चि साध्वीधर्षणकर, जर्हि महातपा, मरतो, ’
धौम्य मुनि असें सांगे हित, परि जोडी न हात पामर तो. ॥२५॥
कृष्णा हि म्हणे, ‘ काय न कापिल गिळितां वृकानना शस्त्री ?
वधि दशमुखा, मग करिल एकमुखाचा हि कां न नाश स्त्री ? ’ ॥२६॥
अपशकुनज्ञ युधिष्ठिर समजोनि अनिष्ट सानुज परतला,
जो मृगयेंत न, चित्तें त्यजुनि दया रामनामजप, रतला. ॥२७॥
तों मार्गीं भृत्याची भार्या धात्रेयिका चि आढळली.
धांवे, पडे हि असकृन्नगशिखराहुनि जशी शिला ढळली. ॥२८॥
वृत्त कथुनि कोपानळ दीप्त करायासि पांडुयोधमनीं
सरला सुवंशजा ती झाली धात्रेयिका चि, हो ! धमनीं. ॥२९॥
रिपुला गांठाया ते पांडव देती भरों न घटिकेतें,
खळबळ बहु भी, जाणों न पळ हि साधूं पुढें अघ टिके तें. ॥३०॥
गांठिति रिपुकटकातें, हरिणांच्या सिंह जेंवि कळपातें,
रक्षील काय पतिला तें व्यसनीं, होय जें विकळ पातें ? ॥३१॥
स्वरथावरूनि भूवरि उतरुनि देवीस, जरि हि नाकद न
वरिलें पलायन खळें, कीं, न पहावे चि लोचना कदन. ॥३२॥
धर्म स्वरथीं स्त्रीतें मुनितें घेउनि म्हणे पुरोध्यातें,
‘ व्हा शांत, असें चि प्रिय राज्यश्रीमोचनें पुरो, ध्या तें. ’ ॥३३॥
अर्जुन भीमासि म्हणे, ‘ न करावें व्यर्थ भीतभटकदन,
गेला पळोनि बहुधा दुष्ट जयद्रथ न दाखवी वदन. ’ ॥३४॥
भीम म्हणे, ‘ सपुरोहित राया ! तूं आश्रमांत जायेतें
निववीं, तें चि करावें तेणें, जें स्वच्छ कर्म ज्या येतें. ॥३५॥
जा सहदेवा ! नकुळा ! तूं ही जा, यां तिघांसि सांभाळा,
लाववा गेलें धन येतां हातासि, बोल कां भाळा ? ॥३६॥
येतों आतां चि, नको साधाया शत्रुवध मला उशिर;
कृष्ण असो; जा आर्या ! त्वच्चरणा तो न अधम लाउ शिर. ’ ॥३७॥
धर्म म्हणे, ‘ रे ! बा ! त्यानिजभगिनीच्या न उग्र हो तिलकीं,
नित्य सुतासौभ्यागक्षयशोकें पितर साश्रु होतिल कीं. ’ ॥३८॥
कृष्णा म्हणे, ‘ अहो ! जरि मत्प्रिय करणें, वधा चि तरि त्यातें;
मारावें चि नयज्ञें श्रीतें स्त्रीतें बळें चि हरित्यातें. ’ ॥३९॥
क्रोशमितांतर असतां, बीभत्सु म्हणे शरांस, ‘ कळवा जी !
आलों असें अरिस, तो दूर न जावा, वधा सकळ वाजी. ’ ॥४०॥
अर्जुननामांकितशरहत हय पाहूनि फार तो भ्याला,
कुजनासि कुजीवित ही प्रिय, जैसें पापवित्त लोभ्याला. ॥४१॥
धावोनि त्यासि सार्जुन भीम महाबळ पळांत आटोपी,
ज्याचें चित्त म्हणे स्वक्रोधा, ‘ और्वा ! खळाब्धि आटो, पी. ’ ॥४२॥
अर्जुन म्हणे, ‘ उभा रे ! सिंहत्व त्यजुनियां न कुतरा हो.
उत राहो, क्षण पाहों, जा यमभट हो ! तळीं न उतरा हो ! ॥४३॥
रे ! रे ! जयद्रथा ! हें योग्य नव्हे तुज पलायन, परत रे !
अभिमुख मरोनि च तरे, पळतां न महाबलायन पर तरे. ॥४४॥
भीम रथावरुनि उडी टाकुनि धावुनि धरी तया अरितें.
वाटे, प्रभुचें भीमाकृति खलबलदलनलब्धयश अरि तें. ॥४५॥
व्यसनीं न पडेल कसा व्याघ्रबिळीं जो मदांध ओतु निघे ?
कीं पद्मराग मानुनि जो पदरीं विंगळांसि ओतुनि घे. ॥४६॥
बुकली भीम, बुकलिती जैसें यज्ञांत बोकडाला हो !
कीं तो साध्वीधर्षणदोषफळानुभव रोकडा लाहो. ॥४७॥
विकळ जयद्रथ होतां, वारी धर्मानुजा गुडाकेश,
कीं तत्सत्सेव्यगुणा कोप न दूषू, जसा गुडा केश. ॥४८॥
भीम म्हणे, ‘ गुरुदुःखद तो स्त्रीजितसा चि हा दयाजित कीं,
चालों न दे चि कर्में मीं करितों जीं हितोदया जितकीं. ॥४९॥
हा धर्म दयाजित तुज योग्य सखा स्त्रीजिता दशरथा ! रे !
शर सह्य पार जाता, हृदयीं च जनापवादशर थारे. ॥५०॥
वत्सा ! जैसा तो गुरु होतोसि तसा चि तूं हि कां ? पावें,
या पापातें पाहुनि सन्नयनें न, नरकें हि कांपावें. ॥५१॥
देवूं दे प्राणांतप्रायश्चित्त; स्वकीय हा नर कीं,
मूर्खा ! सुहृत् वसावा स्वर्गीं चिरकाळ कीं महानरकीं ? ’ ॥५२॥
वधसम विडंबन, असें समयीं च स्मरण शास्त्रपाटव दे.
अर्धेंदुशरें त्याच्या माथां काढूनि पांच पाट वदे :- ॥५३॥
“ ‘ मीं पांडवदास ’ असें स्वमुखें सर्वत्र बोलशील तरी
देईन जीवित तुला, तारी विपदब्धिमाजि शीलतरी. ” ॥५४॥
वंदुनि म्हणे जयद्रथ, ‘ ऐसें च म्हणेन मीं सदा साचें;
मारूं नका बुक्यानीं, रक्षावें जीवित स्वदासाचें. ’ ॥५५॥
ज्यापासूनि धरावी प्रबळतरारातिच्या हि भी मानें,
बांधुनि केतुस्तंभीं खळ नेला स्वाश्रमासि भीमानें. ॥५६॥
प्रेषूनि कोटरेतें प्रेम्यानें जेंवि बाण राखविला,
तैसा चि निजाज्ञेनें जेणें तो त्या प्रभूसि दाखविला. ॥५७॥
धर्म तशासि विलोकुनि भीमासि म्हणे, ‘ अगा ! महाबाहो !
सोड, न विलोकवे मज, द्याया असु मृत्युला न हा बाहो. ’ ॥५८॥
भीम म्हणे, ‘ देवीला सांगा; ती जरि म्हणेल, सोडीन;
नाहीं तरि मीं याचा सत्यंचलकर्षि पाणि तोडीन. ॥५९॥
कां सोडितां ? असों द्या; हा निजदासांत दास राबावा;
या कामहता रक्षा पायांचा द्या चि आसरा, बावा ! ’ ॥६०॥
कृष्णा धर्मासि म्हणे, ‘ देवा ! सोडावयासि सांगा, जी !
मज देखवे न शिवती निर्दयतेसह अकीर्ति आंगा जी. ’ ॥६१॥
धर्म म्हणे, ‘ रे साधो ! जावूं दे, सोड, दे मला बा ! हें;
जातें त्यजुनि भलेपण, न विटावें सुयश तें, तया बाहें. ’ ॥६२॥
भीम म्हणे, “ मीं पांडवदास, ’ असें तीन वेळ मोट्यानें,
हा खळ म्हणो; भल्याला विनवावें धरुनि पाय खोट्यानें. ” ॥६३॥
धर्म म्हणे, ‘ गा भीमा ! तुज जरि आम्हीं प्रमाण, तरि सोडीं,
न वदें निष्ठुर कांहीं, अभयवितरणें सदीड्य यश जोडीं. ’ ॥६४॥
भीमें, गुरुमंत्रवश्यव्याघ्रें मृगसा चि, सोडितां, नमनें
धर्मासि करि, लवे वरि मात्र शिरें, दुष्ट अंतरीं न मनें. ॥६५॥
नृप त्यासि म्हणे, ‘ घ्याया भुजगीच्या झोंबता नर मणीतें
वांचेल, परि पराच्या चित्तें हि स्पर्शता न रमणीतें. ॥६६॥
जा, यावरि न करावें पाप असें, मागतों मला दे हें;
जें कर्म धर्मशर्मद, त्यास चि संपादितो भला देहें. ’ ॥६७॥
खळ न खळत्व त्यागी, जरि सामें गौरवूनि बोळविला,
लकुच कटु चि अमृतकराकरवीं ही शर्करेंत घोलविला. ॥६८॥
हरदर्शनार्थ गंगाद्वारीं तपतां तया कृपापर तो
भेटोनि म्हणे, ‘ घे वर, कष्टापासूनि मति नृपा ! परतो. ’ ॥६९॥
‘ युद्धांत पंचपांडवपरिभवन हो मत्करें ’ असें च वदे,
प्रभुकर्णीं तें बहु कटु वच, जाणों गर मुखीं रसें चव दे. ॥७०॥
शंभु म्हणे, ‘ नारायणसख नर अर्जुन पुराणऋषि, तातें
धनसें, पाशुपत हि म्यां त्याशि दिलें, जेंवि अमृत तृषितातें. ॥७१॥
मजपासीं तुज द्याया तद्भंगावह असा नसे च वर;
हो मशकमक्षिकाहर, गरुडा उडवी असें नसे चवर. ॥७२॥
यश एकदा चि अर्जुनरहितां चवघां रणांत भंगुनि घे;
मेरु असो, बहु हें ही, जरि लंघुनि कुळगिरींसि पंगु निघे. ’ ॥७३॥
झाला गुप्त महेश्वर, तो बालिश मनुजदेव वेदा त्या
प्रभुस हि विटवी मागुनि, जें तैशा ही न देववे दात्या. ॥७४॥
मागावा कामाद्यरिपरिभववर वरदनायका, परि तो
सत्परिभववर मागे, खळ न पराहित निजाहित हि करितो. ॥७५॥
स्वगृहा जाय जयद्रथ विसरुनियां दुःख तें परिभवाचें,
दासासमंजसत्वें क्षोभे मन शांत ही परि भवाचें. ॥७६॥