वनपर्व - अध्याय चवथा

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


कुशलप्रवृत्ति न कळे जिष्णूची, बहुत लोटले अब्द,
धर्मासि भीम लावी ‘ राज्य तुवां बुडविलें ’ असा शब्द. ॥१॥
बृहदश्व द्विजराज श्रीधर्माच्या समीप आला, जो
ताप उरों चि न देतां, त्यासि विधु न कां ह्मणोनि ‘ हा ! ’ लाजो ? ॥२॥
पूजुनि त्यासि नृप म्हणे, ‘ परिसावें स्वकृत मीं निवेदीन,
पूज्यांसि दुःख सांगुनि अमृतदनिमग्नसा निवे दीन. ॥३॥
जर्‍हि धर्मन्यायद्विजदेवसपर्यापथीं सदा रत मीं,
द्यूत करूनि बुडालों सानुग सानुजसुहृत् सदार तमीं. ॥४॥
द्यूतपणीं हारविली, ओढुनि नेली सभेंत मज्जाया;
काय वदों ? तें केलें म्यां चि व्यसनीं स्वराज्य मज्जाया. ॥५॥
संप्रति हा दास असा स्वीकारुनियां अरण्यावास वसे,
झाली पहा कसी हे, हे ही जे तैं सभाग्य वासवसे. ॥६॥
दिव्यास्त्रें साधाया पाठविला तो हि वत्स न परतला;
वाटे मज कितवासि त्यजुनि, मुनिजनीं वरूनि तप रतला. ॥७॥
वाटे दुःखी मत्सम मीं च, वदा, जरि असेल आढळला.
न असा अयशःपद कीं भूपदकपदीं जडोनि हा ! ढळला. ’ ॥८॥
हांसोनि मुनि म्हणे, “ बा ! नळभूप जसा दुजा न साधि तसा,
न तुम्हीं दीन, न दुःखित, साधावें तें वनीं हि साधितसा. ॥९॥
आज्ञेंत बंधु चौघे, धृतमूर्ति उपायसे, सुनय शस्त्री;
साक्षाच्छ्रीसी च सती, होऊं दे म्लान न मुख न यश, स्त्री. ॥१०॥
परिसा नळगति, तुमची श्रुतिरति हे ही सती, अनळसा, हो !
होता नळ तेजस्वी भास्करसा इंदुसा अनळसा, हो ! ॥११॥
श्रीवीरसेनसुत नळ निषधेश्वर सुगुणमणि करंडक हो !
ब्रह्मण्यप्रभु दुर्गतदारिद्र्यसमुद्रवरतरंडक हो. ॥१२॥
तो पुण्यश्लोक रणीं करिता रिपुवीरहानि वासवसा,
तत्कीर्ति म्हणे, ‘ गी - श्री - धी हो ! या, योग्य हा निवास, वसा. ’ ॥१३॥
वैदर्भ भीमराजा होता बहु खिन्न हीन संतानें,
तो भेटोनि सुखविला दमनानें स्वपदलीनसंतानें. ॥१४॥
नृपदास्यतुष्ट मुनिचें मन त्या मुनिला म्हणे, ‘ सखे दमना !
ब्रह्मर्षिवरें दमनें वर दिधला त्या नृपासि संततिचा,
झाले तीन सुत, सुता चवथी, गाती गुणौघ संत तिचा. ॥१६॥
ठेवी दम, दांत, दमन, दमयंती, हीं असीं तयां नावें,
ज्यां मुनिवरप्रसादप्रभवांतें त्रिभुवनें हि मानावें. ॥१७॥
भीम नृपति दुग्धोदधि, दमयंती श्री च, वपु सुरुचिर तिचें;
त्याहूनि देह, दिवसोदिवस दिसे दीन, जर्‍हि सुरुचि रतिचें. ॥१८॥
जाणों कळे भविष्यद्दमयंतीची स्मरा रुचिरतरता,
हरदृगनळीं जळाला, रतिच्या विटला चि तो रुचिरत रता. ॥१९॥
ती पाहिल्यावरि गमे कोणास हि न स्वरूप सुंदरसें ?
श्रीवनमाळे हि पुढें मिरवील स्वमद काय कुंद रसें ? ॥२०॥
श्रीकृष्ण रुक्मिणीला, श्रीकृष्णा रुक्मिणी जसी आतां,
दमयंतीस नळ, नळा दमयंती आयके जनें गातां. ॥२१॥
नळ नृप म्हणे, ‘ शिवा ! ती नवरी हो, मन दुजीस न वरी हो. ’
भैमी म्हणे, ‘ शिवे ! तो नवरा हो, प्रेम नित्य नव राहो. ’ ॥२२॥
एका समयीं धरिला हंस नळें तो म्हणे, ‘ कृपा कर, गा !
सोड मला, जरि व्हावी ती दमयंती वधू, नृपा ! करगा. ॥२३॥
करिन तुझें गुणवर्णन जेणें होइल तुझी च नवरी ती. ’
सत्य प्रिय हित वदती शुद्धात्मे न धरिती न नव रीती. ॥२४॥
राधाप्राप्त्यर्थ जसा तो स्वकरगतामळा यशा सिनळ,
सोडी दमयंत्यर्थ क्षिप्र चि अतिदुर्लभा तशासि नळ. ॥२५॥
नळमुक्तराजहंसांसह हंसांची नभःपथें आली
आली प्रमदवनीं, तों भैमी ही घेउनि प्रिय आली. ॥२६॥
भैमी म्हणे, ‘ मराळग्रहणेच्छा मन्मनांत आली हो !
एकासि तरि धरूं या, विखरा मुक्ता वनांत आली हो ! ’ ॥२७॥
इतरा हंसानीं त्या नेल्या बहु लोभवूनि दूरवर,
भैमी त्यासि धरूं ये, ज्या दे असुदान दानशूरवर. ॥२८॥
एकांतीं तीपासीं स्तविला निषधेंद्र तो खगानें हो !
जाणों राधेला दे खगभगवद्वेणु तोख गानें हो ! ॥२९॥
‘ काय द्विजें, तुला द्विजराजें ही काय ? मान - वसु - तनये !
जों त्वत्करासि तो सुरपसुतशतप्रवर मानवसुत न ये. ॥३०॥
पुण्यश्लोक निषधपति नळ खळबळजळधिवाडवानल गे !
लोकां महोत्सवप्रद तो चि सदा, त्यांसि पाडवा न लगे. ॥३१॥
स्मरबुधदस्ररुचिरतर ऐसें म्हणणार जे न ते लटिके,
हैय्यंगवीन जैसें सुरसिकरसनेपुढें न तेल टिके. ॥३२॥
अनुपम अनुरूप अनघ जरि वरिला त्वां नृपात्मजे ! न नळ,
होइल केवळ तापद, कीं जो नर नळ न होय तो अनळ. ॥३३॥
नळकस्तूरी टाकूनि कां तूं घेसील अन्यनर माती ?
जरि वरिती न हरिप्रति घेती म्हणवूनि धन्य न रमा ती. ॥३४॥
नररत्न तो चि, तूं चि स्त्रीरत्न, उदंड आडनावांचीं;
न बुडविति न वा तारिति चित्रें बरवीं हि आडनावांचीं. ’ ॥३५॥
ती सुमति म्हणे, ‘ आर्या ! त्वां तिकडे ही असें चि कळवावें,
साधो ! हळुहळु मृदु मधु हित भित बोलोनि चित्त वळवावें. ’ ॥३६॥
‘ आज्ञा ’ म्हणोनि येथुनि कळवुनि हें प्रेम तेथुनि उडाला.
हंस प्रत्युपकारीं हर्षी, कामज्वरीं नळ, बुडाला. ॥३७॥
झाली स्मरज्वरार्ता द्याया ही योग्य हें पिता समजे,
जाणति, न सांगतां सुख असुख पराचें जगीं सदा सम जे. ॥३८॥
योजी स्वयंवरोत्सव, रायांसि सुख प्रकाम दे वार्ता,
आले नाद्वत हि, मति कोणाची तैं न कामदेवार्ता ? ॥३९॥
देवर्षिमुखें परिसुनि शक्र करी धरुनि हरिख गमनातें;
त्याच्या विमान येइल काय ? न येता चि हरिखग मनातें. ॥४०॥
जों निकट कुंडिनाच्या आले यम वरुण भूभृदर्यनळ.
तों तो हि सकळसद्गुणनिधि पुण्यश्लोक वीरवर्य नळ. ॥४१॥
ते सुर म्हणति, ‘ अहाहा ! नळ चि सकळ पुरुषमुकुटहीरमणी,
नवरी न वरील कसी, याला पाहोनि सुमति ही रमणी ? ॥४२॥
आम्हांला चि न केवळ लावितसे व्यक्त लाज हा रविला;
आम्हीं निजतेजोमद याचिपुढें सर्व आज हारविला. ’ ॥४३॥
न सुचति जरि भलतैसी युक्ति प्रियकार्यसाधिका, मुकते
त्या साधुसंगतिमहालाभास हि सर्व साधि कामुक ते. ॥४४॥
भेटोनि त्यासि म्हणती, ‘ कार्यपरें सर्वथा न लाजावें,
हो अस्मद्दूत, विमुख न जनें सत्यव्रता नला ! जावें. ’ ॥४५॥
‘ होतों दूत ’ नळ म्हणे, ‘ कार्य वदा, कोण हो ! तुम्हीं चवघे ? ’
ओळख देउनि म्हणती, ‘ आम्हीं भैम्यर्थ पातलों अवघे. ॥४६॥
भैमी स्वयें वरू या आम्हां चवघांजणांत अन्यतमा,
हें कार्य, दूत हो गा ! जा गा ! बा ! तीकडे चि धन्यतमा ! ’ ॥४७॥
सस्मितवदन नळ म्हणे, ‘ प्रभुजी ! जो हेतु सुरवरागमनीं
माझ्या हि तो चि; सर्वां हि मृगांच्या तुल्य सुरवराग मनीं. ॥४८॥
दूत करुनि मज तिकडे कार्यास्तव पाठवूं नको, पावा,
कोण्हावरि हि सुनय न स्वातिक्रम आठवून कोपावा. ’ ॥४९॥
शक्र म्हणे, ‘ वदलासि प्रथम तसें वचन, मग असें वदसी.
अचळ करीं च असावा व्यवहारीं शब्द संगरीं सदसि. ’ ॥५०॥
भूप म्हणे, ‘ या कर्मीं पवन हि होईल मज न सांगती,
अंतःपुरप्रवेशीं, जी प्रभुजी ! साधु युक्ति सांगा ती. ’ ॥५१॥
शक्र म्हणे, ‘ जा गा ! तूं, चिंता आधीं च करिसि कां गा ! ती ?
आम्हांसि हें कठिन जरि तरि सुज्ञ प्रभु म्हणोनि कां गाती ? ’ ॥५२॥
शक्रवरें नळ गेला, शिरला अंतःपुरीं सुखें सुरसा,
भैमीच्या हा, याच्या ती, सेवी रूपसंपदा सुरसा. ॥५३॥
भैमी हर्षे त्याच्या, विधुच्या तसि कुमुदिनी न आगमनीं;
सत्कारूनि म्हणे, ‘ जी ! यावें मद्भाषणें न आग मनीं. ॥५४॥
सुंदरवर कोण तुम्हीं ? गुरुच्या वाटो न हें पराग मना,
कीं जें जें अंतःपुर तें तें हि विषय नव्हे परागमना. ॥५५॥
आलां कसें अवारित ? कार्यार्थ प्रकट आयकों दावा;
वाटे कर्णीं तुमचा वाड्मय सौवर्णआय कोंदावा. ’ ॥५६॥
बाहों लागे गुरुघनसपूरित वीरसेनभूपनळ.
‘ सुंदरि ! मीं पाशिपितृपपावकपुरुहूतदूत भूप नळ. ॥५७॥
सुमुखि ! प्रार्थिति बहु तुज ऐसें प्रभु लोकपाळ ते चवघे,
अवघे उणे चि रस, तूं दिव्यरसाची च सर्वदा चव घे. ॥५८॥
सुज्ञे ! तुवां वरावा आम्हां चौघांजणांत अन्यतम,
धन्यतमत्व तुला यो, न शिवो पळ दयितविरहजन्यतम. ’ ॥५९॥
हांसोनि म्हणे भैमी, “ ‘ प्रणतिप्रिय देव गुरु, ’ असें म्हणती,
त्यांहीं क्षमा करावी, स्वीकारावी यशोर्थ मत्प्रणती. ॥६०॥
वरिले हे चि चरण म्यां, त्यजितां ज्वलनांत काय होमीन;
यज्जीवन जीवन तो दुग्धीं वांचेल काय हो मीन ? ” ॥६१॥
नळ नृप म्हणे, ‘ सुबुद्धे ! या दासावरि तिहीं न कोपावें,
मदधिक कोटिगुणें ते, आग्रह कांहीं करूं नको, पावें. ॥६२॥
मृत्यु असो, परवंचन करुनि सुधेच्या जिणें नको पानें;
त्वत्पाणिग्रहणें मीं देवांच्या बहु शिणेन कोपानें. ’ ॥६३॥
विदुषी म्हणे, ‘ म्हाणा जा कीं ‘ म्यां कथिलें परोपरी, पण ती
प्रणति प्रभूंसि करिती, ‘ अनुकंप्या मीं स्वयंवरा ’ म्हणती. ’ ॥६४॥
सत्संमतस्वय्म्वरविधिनें वरितां तुम्हीं न अपराधी;
काय करूं  ! त्यजुनि तुम्हां माझी पळ अनुसरे न अपरा धी. ॥६५॥
ओईल देह रंगीं सुरपतिनरपतिसमक्ष नळगामी,
हा जन तुमच्या चि असे इतरा कोण्हाचिया हि न लगामी; ” ॥६६॥
होय अकृतकार्य हि नळ सुरवरसंमत खरें निवेदून;
सत्यें जसा तसा न प्राज्यें हि सुधारसें निवे दून. ॥६७॥
रंगीं सर्व मिळाले, तेव्हां आली तयांत दमयंती;
जाणों चकोर ते, ती मूर्तज्योत्स्ना चि तापदमयंती. ॥६८॥
साहे न परोत्कर्षा ज्याची मति सच्छळीं सदानळसा,
बैसे तिघांजनांसह हरि हि अधिष्ठूनि त्या सदा नळसा. ॥६९॥
रंगीं पाहों जाताम दिसले चौघे हि ते धवासम जे;
भैमी देवकृतच्छळ ऐसें चित्तांत तेधवा समजे. ॥७०॥
पांचा नळांत जेव्हां काय दिसेना चि भेद लव ती,
बुद्धि म्हणे, ‘ कां भीसी ? गुरुचरणीं त्यजुनि खेद लवतीस. ’ ॥७१॥
कर जोडूनि म्हणे ती, ‘ नळ भर्ता भीमकन्यकेला हो,
प्रभुजी ! स्वप्नांत हि जरि संकल्प नसेल अन्य केला हो ! ॥७२॥
नळ पति, इतर पुरुष पितृबंधु जरि मनांत मानिले असती,
तरि तराल इला हो ! प्रभुजी ! कैसी तरेल जी अ - सती ? ’ ॥७३॥
तीचा बळवान निश्चय सुरहृत नळरूप घे हिरावूनीं,
बहु तेज प्रकट करी शुचि सत्वगुण च्छळीं, हिरा ऊनीं. ॥७४॥
शुद्ध सवांग कुश नळद, परि उपभोगोचितत्व नळदासी,
ऐसें मनांत आणुनि दमयंती सुमति होय नळदासी. ॥७५॥
पतिरूप सोडवुनि ती लोकेशांचा प्रसाद साधूनीं,
घाली नळासि माला स्तविली प्रेमप्रसन्नसाधूनीं. ॥७६॥
नळ तीस म्हणे, ‘ कुलजे ! त्वां जरि देवांसमक्ष मज वरिलें,
जों सासु तों तुझा मीं होतां हि प्रेम ऊन मजवरिलें. ’ ॥७७॥
‘ प्रत्यक्ष दर्शन मखीं, सुगति, ’ असे वर नळासि वासव दे,
‘ प्रगटेन इच्छितां, मम लोकीं येसील ’ हें हुताश वदे. ॥७८॥
‘ पाकीं पटुत्व, धर्मीं स्थिति, ’ हे वर दोन धर्म दे त्यातें,
वरुण ‘ जललाभ माल्याम्लानत्व ’ हि त्या प्रमोद देत्यातें. ॥७९॥
गेले सुरपति नरपति पाहुनि तो साधुतोषकर जोडा,
बहु वदले, ‘ या पुण्यश्लोका, जाया स्वदोष, कर जोडा. ’ ॥८०॥
झाला विवाह, गेला स्वपुरा, मग नळ तिसी सदा रमला;
भूमि म्हणे, ‘ ताराया अवतरला विष्णु हा सदार मला. ’ ॥८१॥
कन्येसि ‘ इंद्रसेना, ’ पुत्राला ‘ इंद्रसेन ’ हें नाम
ठेवी, प्रजांसि दे बहु सुख पुण्यश्लोक तो जसा राम. ॥८२॥
सद्वापरकलि मार्गीं भेटे हरिला सलोकपाळाला,
कळतां वृत्त क्रोधें घे बहु बुडवूनि तो कपाळाला. ॥८३॥
त्यांसि म्हणे, ‘ केंवि तुम्हीं प्रभुनीं हि स्वाभिमान मोकलिला ?
नळ गुरु काय तुम्हांहुनि ? सोसे न स्वापमान तो कलिला. ॥८४॥
देवांसमक्ष कैसा दमयंतीनें मनुष्य हा वरिला ?
दंड्या ती; दंडार्हीं उठला प्रभुनीं न हात आवरिला. ’ ॥८५॥
शक्र म्हणे, ‘ गा ! पुण्यश्लोक नळ गुणाढ्य रामसा च कवी,
दे सत्व सात्विका सुख सज्ज्ञानें, तम चि तामसा चकवी. ॥८६॥
योग्या ती च तयाला, तो चि तिला योग्य, जेंवि काम रती,
अनुरूप योग्य सन्मत; साधूत्कर्षें असाधु कां मरती ? ॥८७॥
कामा, क्रोधा, लोभा अनुसरतां लोक फार बा ! ठकले,
न करावा सद्वेष, स्वहिता देवूं नये चि पाठ कले ! ’ ॥८८॥
ऐसें शिकवुनि गेला स्वर्गाला शिष्यराय जीवाचा;
मलिन कलि न मान्य करी, ती त्यासि शिवेल काय जी वाचा ? ॥८९॥
रंध्रान्वेषण केलें कलिनें वर्षें समग्र बारा हो !
खळ न विटे चि, जरि म्हणे द्वापर, ‘ हा दुष्प्रयत्न बा ! राहो. ’ ॥९०॥
नळ भूप मूत्रशौचीं करि, पदधावन चुकोनि संध्या हो !
जाणों तो साधु म्हणे, कलिची हि प्रार्थना न वंध्या हो. ॥९१॥
त्या रंध्रीं शिरला त्या श्रीच्या गेहीं हळू च कलि कवडा,
छेदाया श्रितसुखदा जेंवि भजे शस्त्रपाणि हलिक वडा. ॥९२॥
आपण शिरे नळीं कलि, शिरवी त्या द्वापरासि पाशांत;
व्यसनीं भल्यासि पाडी खळ, हरिणा व्याध जेंवि पाशांत. ॥९३॥
‘ द्यूत कर ’ असें शिकवी मग नळदायाद पुष्करासि कली,
न शिकावें परि तन्मति त्या दुर्मंत्रा सुदुष्करा सिकली. ॥९४॥
पुष्कर म्हणे, ‘ करावें द्यूत, ’ नळ म्हणे, ‘ अहा ! भलें सुचलें,
अमृतापरीस माझ्या कर्णयुगाला त्वदुक्त हें रुचलें. ॥९५॥
द्यूतीं आनंद जयें थोडा त्या पुष्करासि, अति कलिला,
हानि नळाला नुमजे, केली मलिनें शिरोनि मति कलिला. ॥९६॥
दुष्कर साधन जीचें त्या श्रीतें मेळवूनि पुष्करसा
पुष्कर साजे, नळतनु जसि सरसी ग्रीष्मकाळशुष्करसा. ॥९७॥
बहु मास भरीं भरला, प्रियसख सचिवांसि विसरला निपट,
स्त्री हि श्री हि बहु रडे; कलिनें दाटूणि पाडिलें विपट. ॥९८॥
सर्वस्वनाश होतां सचिवमतें ती करूनि यत्नातें,
धाडी माहेराला रथरत्नासह अपत्यरत्नातें. ॥९९॥
सर्वस्व हरुनि पुष्कर नळराजाला म्हणे, ‘ उदारपणें
सेवट गोड करावा द्यूतरसाचा तुवां सुदारपणें. ’ ॥१००॥
गरळरसाच्या अब्दें, या तच्छब्दें अतीव तळमळला;
परि न दुरुक्तें आपण तो पुण्यश्लोक धीर नळ मळला. ॥१०१॥
जाय विभूषण दारानुगत नळ त्यागुनि स्वनगरातें;
बहु लाजवी, म्हणति तैं जें ‘ हा ! हा ! ’ पौर तो स्वन गरातें. ’ ॥१०२॥
त्या पुण्यश्लोकाला आश्रय देती न दिन पुरोपवन,
नळ जठराग्नीस म्हणे, ‘ जळ कीं तुज तृप्तिला पुरो पवन. ’ ॥१०३॥
पुष्करभयें न पुसती कोण्ही ही आप्त त्या नळाला हो !
हिंडे वनोवनीं तो अन्नावांचूनि बहु गळाला हो ! ॥१०४॥
यत्पादतळमृदुत्वें लाजावें कामधेनुनवनीतें,
वरमिथुन पादचारें हिंडे, पावें फळें हि न वनीं तें. ॥१०५॥
हेमच्छद खग पाहुनि कल्पी आहार - हेम - लाभ वनीं,
वस्त्रें धरी, म्हणे, ‘ हा ! प्राप्त न झालें चि हे मला भवनीं. ’ ॥१०६॥
वस्त्रीं धरितां गेले वस्त्र हरुनि ते उडोनि खग नीच,
‘ वस्त्रहर अक्ष ’ ऐसें कळवुनि झाले अदृश्य गगनीं च. ॥१०७॥
वनदेवता न पाहों शकती लज्जानता नलास्याला;
करिति न रोमंथाला हरिण, मयूर हि तदा न लास्याला. ॥१०८॥
साध्वीनें स्वपटार्धें स्वतनु तसी झांकिले स्वपतितनु ती;
वेद हि अस्या सतीची करिति सदा, परि न पळ हि पतित नुती. ॥१०९॥
वर्णी नदीनगांतें दावूनि तिला विदर्भदेशपथ.
त्यास समजोनि रडतां, समजाउनि नळ सतीस दे शपथ. ॥११०॥
एका सभेंत रात्रौ निजला मग आठवूनि निजलीला,
कलिमलिनबुद्धि तो नळ सोडूं पाहे श्रमोनि निजलीला. ॥१११॥
‘ जावें कसें न कळतां ? मज पाश चि दारसंग हा निपट.
आपण असोनि अक्षत होऊं देइल न संगहानि पट. ॥११२॥
फाडावा स्वकरें तरि आतां पट जागवील निजलीला,
होता मदर्थ जरि हरि असि असि म्हणता दुजी न निजलीला. ’ ॥११३॥
शोधुनि सभा पहावी ऐसी आधीं दिली नळास मती,
मग खङ्गलता कलिनें; वाटे त्या सुकृतसत्फळासम ती. ॥११४॥
कलियोगें जें धरिलें रायें तीक्ष्णत्व कापितां वस्त्रा
न धरील कधीं च तसें शाणशतें गरळलेपनें वस्त्रा. ॥११५॥
खङ्गें पट कापविला न तिचा अर्धा गळा चि तो कलिनें,
न मळावें चि कधीं तें प्रेम कसें मळविलें खळें मलिनें ? ॥११६॥
जाय पुन्हा नळ परते, पाहे येउनि तिच्या मुखाला हो !
साश्रु नळ म्हणे, ‘ देवा ! हे वामाक्षी सती सुखा लाहो. ’ ॥११७॥
जाय पुढें, या मागें, परतोनि सवें चि जेंवि दोला हो !
तो लाहो भेटीचा घे कीं न पुढें स्वदृष्टि लोला हो. ॥११८॥
‘ विश्वंभरे ! क्षमे ! या साध्वीला रक्ष, म्यां निरविली हो !
सर्वंसहे ! तुजपुढें न स्वाधिकता इणें मिरविली हो ! ॥११९॥
बापा ! सतीव्रता ! हे तुज बहु जपली, न जीवितासि सती,
तूं हि इला बहु जप गा ! त्वां त्यजिल्या न स्त्रिया बर्‍या दिसती. ’ ॥१२०॥
कलि दमयंतीप्रेमा हे दोघे ओढिती नळाला हो !
प्रेम्याला त्याचें मन सांपडलें, देह त्या खळाला हो ! ॥१२१॥
सत्याश्रित गुणमय शुचि कापुनि घे, परि न दे चि हाक, पट,
पुण्यश्लोकीं राहुनि उघडिल त्याचें चि केंवि हा कपट ? ॥१२२॥
नळ गेल्यावरि कलिनें जागविली कीं तिचे असु खपावे,
पति न दिसतां म्हणे, ‘ हा ! ’ राज्यभ्रंशें न ती असुख पावे. ॥१२३॥
‘ अजि नाथ ! अहो नरवर ! अजि इकडे एक वेळ हेरा हो !
एकाकी जाल कसे ? दासी सेवा करील हे, राहो. ॥१२४॥
चुकल्यें, क्षमा करा, जी ! न चुकेन पुढें कदापि सत्कार्या,
त्यजिली दया अकस्मात्, त्यागार्हा काय ती हि सत्कार्या ? ॥१२५॥
माझें मन बहु तुमचा चिंतूनि असाधुवाद तळमळतें;
अजि पुण्यश्लोक ! पहा मत्त्यागें कीर्तिपादतळ मळतें. ’ ॥१२६॥
व्याघ्रांला ही रडवी भ्रमतां गहनीं तदा विलाप तिचा,
पदमुद्रित पथ हि तिला कलिवशदैवें न दाविला पतिचा. ॥१२७॥
ज्याच्या चरणाचें गुरु म्हणुनि धरावें शिरीं रज गरानें
त्या शोकें गिळिलीला गिळिलें विजनीं वनीं अजगरानें. ॥१२८॥
त्या समयींचा तीचा गणिला दवसा च पळ विलाप वनें,
व्याधासि आर्तरव तो कर्णीं लागोनि कळविला पवनें. ॥१२९॥
तो व्याध अजगरातें खरशस्त्रेंकरुनि होय हो ! चिरिता,
कुतुकें म्हणे, ‘ शिखिशिखा न जिरेल, इला वमूनि हो चि रिता. ’ ॥१३०॥
त्यास हि ती कीर्तिसुधा न पचे, कीं योग्य तो न राहु तिला,
देवीकोपानळ घे निजधर्षणकामपामराहुतिला. ॥१३१॥
मग तीन अहोरात्रें पतिविरहार्ता घनीं वनीं भ्रमली,
वृकसंत्रस्ता यूथभ्रष्टा बाला मृगी तसी श्रमली. ॥१३२॥
पाहे रम्याश्रमपद सीतासी, त्यांत ती निवे कांहीं,
पूजूनि सांत्विली बहु मुनिवर्यांहीं महाविवेकांहीं. ॥१३३॥
‘ होईल भेटि पतिची, कलिचें हें कृत्य, नळ न दे विपदा,
लागेल तिळप्राय हि तुमच्या अपवादमळ न देवि ! पदा. ॥१३४॥
शीघ्र चि राज्यपदीं पतिसह बहु सुख भोगिसील शीलवती !
लवती श्री सत्वरता, अन्याला दे न एक ही लव ती. ’ ॥१३५॥
सांत्वन करितां हो तें भैमीचें स्वस्थ चित्त कांहींसें.
तदुःख तसें अद्भुत, तें आश्रमपद हि होय नाहींसें. ॥१३६॥
विस्मित होउनि तेथुनि पुनरपि शोधी तया शरण्यातें;
पाहे न कंटकक्षत वपुतें ती पाहतां अरण्यातें. ॥१३७॥
अग नग खग मृग पाहुनि त्यांसि म्हणे, ‘ नळ विलोकिला, बोला, ’
त्या शोकगररसाच्या पानीं मुनि शंभुची च मति लोला. ॥१३८॥
सार्थ वनीं आढळतां जवळ करी ती मृगी च कळपा त्या,
नळकृष्णसारविरहें जीच्या न पडे चि पळ हि कळ पात्या. ॥१३९॥
निजवृत्त सार्थवाहा कथुनि पुसे जो मनांत देव नळ,
सार्थप म्हणे, ‘ मनुष्य न आढळले, बहु वनांत देवनळ. ’ ॥१४०॥
पुसतां सांगे सार्थप, ‘ जाणें चेदिप सुबाहु - देशाला, ’
तत्सहवासें चाले धरुनि मनीं निषधजनपदेशाला. ॥१४१॥
रात्रौ निद्रावश तो सार्थ वनीं विजन - दाव - नगजानीं,
सार्थगजदानगंधक्षुब्धानीं मर्दिला वनगजानीं. ॥१४२॥
पामर म्हणती, ‘ आली जी शोध करीत बायको पतिचा,
ती कृत्या, न पिशाची, ऐसा अत्युग्र काय कोप तिचा ? ’ ॥१४३॥
‘ दिसतां चि तीस मारूं ’ ऐसें म्हणति स्वकार्यपटु वाणी;
ती कांपवी बहु गजत्रस्ता भैमीस कर्णकटु वाणी. ॥१४४॥
तेथुनि पळोनि शिरली गहनीं भैमी, मनांत कांप तिच्या;
स्वकृतासि बोल लावी, लावील सती पदासि कां पतिच्या ? ॥१४५॥
ब्राह्मणसमागमें ती चेदिपतिपुरासि पावली सांजे,
टाकित होत्या उतरुनि जीवरुनि गृहागमीं सख्या सांजे. ॥१४६॥
शच्याद्यमरी म्हणती, ‘ आम्हीं योग्या इच्या नसों गतिला, ’
परि वेष्टिति पौरांचीं पोरें मानुनि मनांत सोंग तिला. ॥१४७॥
प्रासादावरुनि तिला पाहे प्राज्ञा सुबाहुजननी ती,
धात्री धाडुनि धामीं ने; कीं, ठावी तिला सुजननीती. ॥१४८॥
तीच्या लावण्यगुणें द्रवली, दावी स्वमातृसम रीति,
गमली तिला सुकृतलयनाकभ्रष्टा सुमूर्ति अमरी ती. ॥१४९॥
पुसतां स्ववृत्त सर्व हि सांगे, पतिरीतिची कथी थोरी,
‘ सैरंध्री ’ म्हणउनि घे, पतिनाम स्वात्मनाम ही चोरी. ॥१५०॥
‘ उच्छिष्टाशन पादक्षालन परपुरुषभाषण स्पष्ट
न घडेल, द्याल तरि निजपतिशोधावधि करीन मीं कष्ट. ॥१५१॥
बोलेन प्राणप्रियशोधार्थ ब्राह्मणासवें मात्र,
मदधीन असावें हें व्रत माझें देवि ! आणि हें गात्र. ’ ॥१५२॥
राजप्रसू म्हणे, ‘ मज मान्य असे सर्व हें असें चि, रहा,
हो मत्सुता प्रियसखी, विरहानळ उपरमो, नसो चिर हा. ॥१५३॥
सुख नृपसुतासुनंदाज्योत्स्नासख्यें सतीव्रता पाहे,
पावे भवार्तमतिसी सत्संगतिनें न तीव्रतापा हे. ॥१५४॥
स्त्रीपट चोरूनि पळे तेव्हां कैंचींनळास पायतणें ?
सिंहासनीं मिरवले, ते चिरले हो ! वनांत पाय तणें. ॥१५५॥
जातां वनांत ऐके दूरूनि हाक. ‘ वणव्याला
भ्यालों, पुण्यश्लोका ! रक्ष; दुजा अभयदा कवण व्याला ? ’ ॥१५६॥
धावोनि जाय नळ, कीं, न विपत्पूरीं पदप्रवण वाहो,
पाहे तों अहि आहे, आलासे त्यासमीप वनवा हो ! ॥१५७॥
पुसतां नळासि सांगे, “ घडलें मज गुर्वतिक्रमें पाप;
‘ स्थावरसा हो, जों नळ नुचली तों ’ हा सुरर्षि दे शाप. ॥१५८॥
त्वद्धित करुनि यशातें हा नागसखा नवा नळा ! लाहो.
यातें रक्षुनि तुजला, तोष न भक्षुनि दवानळाला हो. ” ॥१५९॥
अंगुष्ठमात्र झाला तो कर्कोटक असें वदोनि हित,
दावविवर्जितदेशीं त्यातें नळ भूप ने, करी विहित. ॥१६०॥
सोडावा भूवरि तों राहे अवलंब करुनि तो खातें,
मग बोले क्षण द्याया रोखातें, मग अनंत तोखातें. ॥१६१॥
‘ करितों हित कांहीं बा ! स्वपदें मोजीत सज्जना ! चाल,
साधु तुम्हीं कां न नतोद्धारीं होवूनि सज्ज नाचाल ? ’ ॥१६२॥
‘ एकद्वित्रीणि ’ असें मोजी नळ लंघितां धराभाग,
दशमीं पदीं म्हणे ‘ दश, ’ तों चावे कल्पिताज्ञ तो नाग. ॥१६३॥
तत्काळ विकृत झाला नळ, त्यातें नाग तो म्हणे, “ देवा !
सेवा हे; बा ! माझा किति पचवाया कृतघ्नपण केवा ? ॥१६४॥
डसलों यास्तव कीं, या कुदशेंत तुला जनें न वळखावें,
त्वद्गतकलिचें राघवनामेंसें मद्विषें हि बळ खावें. ॥१६५॥
माझें बहुहितकर तव देहीं न गमो चि, विष, मरणद, मनीं;
लेवविलें कवच तुला हें सुखजयहेतु विषम - रण - दमनीं. ॥१६६॥
शीघ्र अयोध्येप्रति तूं ऋतुपर्णनृपासमीप जा, गा ! तो
जागा तोषाचा बहु, जन त्याचा गुण जसा तुजा गातो. ॥१६७॥
‘ मीं बाहुक सूत ’ असें सांग, रहा तत्समीप सेवकसा,
या व्यसनीं सेव्य नव्हे रविवंशज तो मनुष्यदेव कसा ? ॥१६८॥
सत्संगीं न शिरे बा ! लवमात्र हि ताप, जेंवि न दव सरीं,
दावावा हयहृदयज्ञानचमत्कार त्यासि सदवसरीं. ॥१६९॥
देइल अक्षहृदय तुज, द्यावें त्वां अश्वहृदय ऋतुपर्णा;
द्याया नवर्धि राहों देना चि नगीं वसंतऋतु पर्णा. ॥१७०॥
तैसें जें गेलें तें सर्वस्व पुन्हां अनंत देणार,
स्वस्थ स्वसत्वजीवनमात्र असो, फार भाग्य येणार. ॥१७१॥
निजरूप प्रकटावें, हृदयीं जेव्हां उठेल हा काम,
हें दिव्यांबर देहीं घे, ‘ कर्कोटक ’ असें मुखीं नाम. ” ॥१७२॥
गेला नळासि सुखउनि, दुखउनि तच्छळक रासभा सदही,
सद्धितकर कर्कोटक मात्र न तो, जिष्णुचा सभासद ही. ॥१७३॥
नैषध ऋतुपर्णाला भेटोनि म्हणे, “ निजाश्रयीं ठेवा,
देवा ! बाहुकनामा सारथि आहें, करीन मीं सेवा. ॥१७४॥
आज्ञा कराल तरि हय घटिकेंत हि चालवीन शतगावें,
पाक करीन असा कीं, अमृतें वासापुढें हि न तगावें. ॥१७५॥
जाणें कविता, गायन, मुख्य कळा या चि दोन, येरा ज्या
त्या ही ठाव्या म्हणति, ‘ स्वगुण स्वमुखें वदों नये ’ राज्या ! ” ॥१७६॥
पंक्तिसहस्र सुवर्ण प्रतिमासीं करुनि वेतन स्थापी,
वरिली वृत्ति नळें ती जसि हंसें मानसच्युतें वापी. ॥१७७॥
तेथें असतां नित्य हि निद्रासमयीं च उत्तमश्लोक
आठवुनि स्वमनांत स्त्रीस म्हणे एक उत्तम श्लोक. ॥१७८॥
‘ कोठें असेल मंदें त्यजिली क्षुत्तृट्समाकुळा बाळा ?
मागेल अन्न कोणा :? वांचेल कसी वनांत ? हा ! भाळा ! ’ ॥१७९॥
जीवन सखा पुसे, ‘ ही कोण तुझी ? जसि नित्य शोचिसि रे ! ’
बाहुक म्हणे, “ भल्याच्या हृदयीं परशोकवन्हिशोचि सिरे. ॥१८०॥
आठवते मज कोणी मंदें त्यजिली वनांत हे बाळा,
सीतेसि राक्षसीशा बहु चिंता जीस म्हणति ‘ हेबाला. ’ ॥१८१॥
कितवें मंदें पापें देउनि विश्वास कापिला च गळा,
देउनि गेला चिंतावृद्धव्याघ्रीस कीं ‘ इला चगळा. ” ॥१८२॥
अज्ञातवासकाळीं भीमें शोधासि धाडिले विप्र,
ते साधु बहु यशोधनलोभें सर्वत्र धांवले क्षिप्र. ॥१८३॥
त्यांत सुदेव ब्राह्मण होय यशस्वी, कपींद्रसा सुकृती,
जो व्यसनीं थोरांच्या कामा ये तो चि धन्य सासु कृती. ॥१८४॥
पुण्याहवाचनीं तो चेदिपतिगृहांत जाय सन्महित
दुरुनि दमयंतीतें वळखे, मानी मनीं स्वजन्महित. ॥१८५॥
भेटे हळू चि आधीं प्रार्थुनि तो आप्तराज साश्रु तिला,
वर्णें वळखे, कलिनें मळविलियां ही सुधी जसा श्रुतिला. ॥१८६॥
‘ दम - दांत - दमनसख मीं कुंडिनवासी सुदेव आइकसी ?
बाइ ! कसी गे ! व्य्सनीं पडलीस ? न ती रडेल आइ कसी ? ’ ॥१८७॥
गहिवरली ओळखितां बंधुसखा वाडवा सुदेवातें,
जेंवि मुमुक्षुमति जगीं वसत्या त्या आड वासुदेवातें. ॥१८८॥
तें मातेसि सुनंदा सांगे, ती त्या द्विजासि बाहूनीं,
भाव पुसे, ‘ रडली कां सैरंध्री आज तूज पाहूनीं ? ’ ॥१८९॥
विप्र म्हणे, ‘ नळमहिषी भीमसुता हे विलोकितां कळली,
भ्रूमध्यग पिप्लु पहा, व्यक्त न तद्रुचि दिसे, मळें मळली. ’ ॥१९०॥
मळ धूतां चि अविप्लुत पिप्लु तमविमुक्त भानुसा साजे.
लाजे सुबाहुमाता, विषसें स्वाज्ञान तन्मनीं डाजे. ॥१९१॥
प्रेमें भेटोनि म्हणे, ‘ वत्से ! केलें असें तुवां कां ? गे !
त्वन्माता मद्भगिनी, ’ ऐसें नातें रडोनि ती सांगे. ॥१९२॥
भैमी म्हणे, ‘ सुनंदा तसि हे हि असें चि पाहिलें कीं तें
कोटि गमे; प्रीतिपुढें तुच्छा अमृतप्रपा हि लेंकींतें. ॥१९३॥
जाणोनि दया केली ते तों तुच्छा चि मावसी, हेमीं
रत्नीं हि न रुचि, शीलीं; धाल्य तेणें चि मावसी ! हे मीं. ॥१९४॥
होतां पतिप्रवृत्ति द्यूतीं, जाणोनि भावि बाधा मीं
पाठविलीं स्वापत्यें, रडतो पाहोनि त्यांसि बा धामीं. ’ ॥१९५॥
भैमीस मायसी जें सत्कारी फार मावसी ते, तें
वाटे श्रीअनसूया पूजी सप्रेमभाव सीतेतें. ॥१९६॥
भैमी म्हणे, ‘ पितृगृहा पाठवितां देवुनि स्वसेनेला,
मावसि ! उगी; लया त्वां ताप सुनंदे ! सखे ! स्वसे ! नेला. ’ ॥१९७॥
येतां भैमी, आधीं धादुनि आनंद हेर माहेरा
दृष्टींसि म्हणति कन्या, ‘ धन्या व्हा, सत्य हे रमा हेरा. ’ ॥१९८॥
माता, तात, भ्राते, स्वापत्यें, पुर विदर्भ मात्र न ती
सुखवी, विश्वास हि, परि एक मलिन कलि न होय तुष्टमती. ॥१९९॥
भैमी मातेसि म्हणे, ‘ गांजी साधूंसि, दे वियोगाऽधी
स्नेह चि विश्वामित्र, न पर, एतन्नामका वियो गाधी. ॥२००॥
दयित चि सुजनाकरवीं, स्वमुखाकरवीं, च आणवा हू न;
हें न करितां मरेन चि, सांगावें काय आण वाहून ? ’ ॥२०१॥
राज्ञी म्हणे पतिस, ‘ जरि भुजगी द्यायासि मृत्युभी डसती,
न च गडबडती वत्सा, न असें वदति त्यजूनि भीड सती. ’ ॥२०२॥
भीमें नळ शोधाया केले जे विप्र सिद्ध त्यांसि कवी
नळ उमगाया भैमी, सर्वत्र असें वदा, असें सिकवी. ॥२०३॥
‘ पुण्यश्लोका ! त्यजिली निजली असतां वनीं कसी भार्या ?
नसतां दोष सतीचा योग्य परित्याग काय गा ! आर्या ! ? ’ ॥२०४॥
येउनि असें चि सांगति नळविरहें जीस पितृभवन कारा,
‘ आलों पाहुनि देवा, साकारा मात्र, त्या न अनकारा. ’ ॥२०५॥
पर्णाद द्विज सांगे, “ एक चि ऋतुपर्णपुरुष साकेतीं,
त्वां शिकविलीं वचें जीं श्रवणीं पडतां सखेद ठाके तीं. ॥२०६॥
तो ह्रस्वबाहु बाहुक पुरुष म्हणे, ‘ त्यागिजे स्वतनु, न सती;
करिता बळ, जरि विधिनें विधिची धरिली यशोर्थ हनु नसती. ॥२०७॥
व्यसनविलुप्तविवेक न पावे चि, उपेक्षितां स्वतनु, कंपा,
ऐशा दैवहतावरि साध्वी न विटो, त्यजूनि अनुकंपा. ’ ॥२०८॥
वदला असें पुरुष तो, आहे केवळ विरूप, परि पाक
कीं शीघ्रयान येथें नळसा; अवितर्क्य कर्मपरिपाक. ” ॥२०९॥
पूजुनि पर्णादातें, भैमी घेउनि मतीं स्वमातेतें,
योजी जें काम कुतुककीर्तिकर सरस्वतीसमा ते तें. ॥२१०॥
त्या चि सुदेवासि म्हणे, “ द्यावें त्वां एक दान दादानें,
हें शुष्यज्जीवन सर पूर्ण असो एकदा नदादानें. ॥२११॥
ऋतुपर्णाला म्हण कीं ‘ नळ नुगमे, तो नसेल या भावें
होतो पुनःस्वयंवर दमयंतीचा; प्रभो ! तुम्हीं जावें. ॥२१२॥
गेले पुष्कळ राजे राजकुमार स्वयंवरासि, अहा !
परि तो उद्यां चि कीं हो ! जा, जरि जाणें घडेल; शक्ति पहा. ’ ” ॥२१३॥
तद्भावज्ञ द्विज तो साकेतीं शिकविलें तसें च वदे;
ऋतुपर्णा श्रवणीं तें वृत्त जसें अमृत हि न तसें चव दे. ॥२१४॥
तें वृत्त बाहुकाला सांगोनि करूनि फुल्ल गाल वदे,
‘ साधो ! मित्रत्वें द्विजराजीं पद काय गा ! न गालव दे ? ॥२१५॥
मीं कुंडिनगमनोत्सुक, जाणसि तूं शीघ्रयान, ने मातें,
‘ हूं ’ म्हण, उद्यां स्वयंवर, व्हाया प्रत्यूह या न नेमातें. ’ ॥२१६॥
नळ वरि म्हणे, ‘ बहु बरें; ’ स्वमनीं हा लागला खरखरा हो !
प्रथम गमे सुज्ञमतें खर योषिद्भाव तो खर खरा हो. ॥२१७॥
मग पुण्यश्लोक म्हणे, “ न सतीचा दोष हा नियतिचा कीं,
भ्रमवी बळें भ्रमाच्या करुनि स्थिरनियमहानि यति चाकीं. ॥२१८॥
पुत्र असोनि असें कां ? हां ! म्यां वरिली वनांत विटलीला,
नाम न रुचेल मग, सुत मानेल कसा मनांत विटलीला ? ॥२१९॥
न बुडाळों यामागें, आजि हि आहें, उद्यां बुडेन तमीं,
बत ! मीनकेतन ! कथं घटितं ते ? काय तुज नसें नत मीं ? ॥२२०॥
विटली न वामनातें श्री अन्या ही सती न दीनातें;
सुकतां सिंधु सरासीं लावील कसें महानदी नातें ? ॥२२१॥
न्यावा चि हा बहूत्सुक, वदलों या सूर्यवंशभूपा ‘ हूं ’,
ज्याला वरील भैमी तो सुकृती भगवदंशभू पाहूं. ” ॥२२२॥
योजी ॠतुपर्णरथीं स्वाद्भुतविद्याबळें हयां सजुनीं,
स्वजना दारिद्र्येंसीं स्मरवूं हि न दे गतें तयांस जुनीं. ॥२२३॥
विद्याप्यायित बाहुकबाहुकलितरश्मि ते चपळ वाजी,
फुरफुरति म्हणों जाणों, ‘ आम्हां रविहयमदां हि पळवा जी ! ’ ॥२२४॥
ॠतुपर्ण आपणास हि ‘ धन्य ’ म्हणे होय सव्यथरथ रवी,
क्षितिहृदयातें बाहुक दावुनि रथवेग भव्य थरथरवी. ॥२२५॥
ॠतुपर्णाचा सारथि वार्ष्णेय म्हणे मनीं, ‘ असा मान्य,
होता नळ कीं संप्रति या लोकीं येक हा असामान्य. ॥२२६॥
हा ! पुण्यश्लोका ! बा ! होतों मीं सारथी तुझा पहिला,
काय तुझी गति झाली ? कां त्वां दिधला वियोग या महिला ? ॥२२७॥
रूपें न, गुणें शुचि कवि दाता सकरुण अनुग्र हा नळसा,
ती च गति दृष्टि रीति स्थिति आर्तीं जी अनुग्रहानळसा. ’ ॥२२८॥
त्या नृपवार्ष्णेयांचे दाटति पाहोनियां जवास गळे,
तों स्यंदनावरुनि भूपृष्ठीं साकेतराज - वास गळे. ॥२२९॥
भूप म्हणे, ‘ पडला गा ! भूपृष्ठीं उत्तरीयपट, थांब. ’
बाहुक म्हणे, ‘ पडों द्या, तो योजन येक राहिला लांब. ’ ॥२३०॥
पाहुनि बिभीतकद्रुम भूप म्हणे, ‘ बाहुका ! प्रसंख्यानीं
मत्सम हि पटु न कोण्ही, मजला कर जोडिले असंख्यानीं. ’ ॥२३१॥
ऐसें म्हणोनि सांगे तो त्या तरुचीं फळें दळें गणुनीं
बाहुक म्हणे, ‘ पहातों मोजुनि, संदेह वाटतो म्हणुनीं. ’ ॥२३२॥
‘ संख्यान अक्षहृदय हि जाणें मीं सत्य, तुज नमो, जावें
सूर्यास्तापूर्वीं, कीं लागेल विलंब बहु, न मोजावें. ’ ॥२३३॥
बाहुक म्हणे, ‘ असें तरि जा, भो वार्ष्णेय ! सूत ! रथ हाकीं,
काय कठिन हो ! जातो कुंडिननगरासि नीट पथ हा कीं. ’ ॥२३४॥
राजा म्हणे, ‘ शरण तुज आलों, ने क्षिप्र कार्य तें साधो. ’
बाहुक म्हणे, ‘ मुहूर्त स्थिर हो, मोजीन तूर्ण मीं, साधो ! ॥२३५॥
नेऊं, परि पाहों द्या, बहु कौतुक वाटतें मना म्हणुनीं. ’
भूप म्हणे, ‘ तरि इतुकीं या शाखेचीं च तूं पहा गणुनीं. ’ ॥२३६॥
शाखा छेदुनि मोजी प्रथम फळें, मग तसीं च नळ पानें,
भरतां होय गतश्रम, विहिरा उकरूनि जेंवि जळपानें. ॥२३७॥
‘ अश्वहृदय मीं देतों, द्या मज संख्यान अक्षहृदय हि तें, ’
ऐसें मागितलें त्या दातृवरें सर्वदक्षहृदयहितें. ॥२३८॥
द्रुतकुंडिनगमनार्थी शिकवी त्या बाहुकासि तो कवि तें,
जाणों दिव्यौषध दे अंतर्गतकळिविषासि ओकवितें. ॥२३९॥
विद्या दुष्टीं भय दे, जसि रघुची परमनीं चमू ढकली
कीं स्वस्था नहुषा मुनिहुंकृति, भी परम नीचे मूढ कली. ॥२४०॥
वर्णिति कवि ते प्याले गुरुकरुणामृतहारसाला जे,
स्पर्शोनि कळि नळाला श्रोत्रियमुनिला महारसा लाजे. ॥२४१॥
नळशक्तिपुढें कलिची शक्ति हि सिंहीपुढें जसी कुतरी,
चाले न लंघनीं गुरुच्या माया, जेंवि सिंधुच्या कु - तरी. ॥२४२॥
शापूं पाहे नळ, परि सुचलें जें वज्रकवच कलिला तें;
सद्भीतें नमनातें, दवभीतें सेविजे सुसलिलातें. ॥२४३॥
नमुनि म्हणे कलि, ‘ देवा ! पुण्यश्लोका ! महायशा ! पावें;
दे अभय मुखीं याया स्तोत्र, न यायास ‘ हाय ! ’ शापावें. ॥२४४॥
दुष्कर न शिखिनिषेवण हालाहलनामगरनिषेवण वा,
शिरला या तनुकक्षीं भैमीशापाहिवरविषें वणवा. ॥२४५॥
पूजिति अतापदा बहु, देवा हि न तापदा अरण्यनळा;
सत्पद चि, न हरि हरि  ! हरि ! हरिचें हि नतापदा अरण्य नळा ! ॥२४६॥
स्मरणें त्वद्भावातें पाहेन जनीं लवें हि अनळसमीं,
अनळसमीर चि तूं तों मज कक्षा, पदिं असेन अनळस मीं. ’ ॥२४७॥
कोपासि आवरी नळ, सन्मति केवळ न रुक्षता सिकली.
आधीं दूषी याचकसुरतरुला, मग बिभीतकासि कली. ॥२४८॥
तें स्वमुखें प्रकट करुनि दत्ताभयदानधर्म न विटाळी,
खळकृतसच्छाळकथन - प्रस्तावातें कुलीन कवि टाळी. ॥२४९॥
बैसोनि रथीं पुनरपि अश्वांतें तो प्रियंवद पिटाळी,
कुंडिनपुर दावुनि, भय ऋतुपर्णमनांत जें तदपि टाळी. ॥२५०॥
कळतां, ऋतुपर्णाला भीमें भेटावयासि आणविलें,
भैमीस रथरवें ‘ नळ आला ’ हें, ‘ नळ ’ हयां हि जाणविलें. ॥२५१॥
वळखे वार्ष्णेयाला, त्या ही रविवंशभवनदीपा हे,
नळसिंधुप्रति च न ती भीममुकुंदांघ्रिभवनदी पाहे. ॥२५२॥
तो ह्रस्वबाहु सारथि तिसरा, चवथा रथीं नसे नळ कीं.
हा ! कीं भ्रमलीं नेत्रें अश्रुभरें सर्वकाळ ही मळकीं. ॥२५३॥
ऋतुपर्णाची सत्कृति करुनि म्हणे भीम भूप वासवसा,
‘ गोड करा, हंस तुम्हीं, हा स्वीकारूनि कूपवास, वसा. ’ ॥२५४॥
वार्ता स्वयंवराची स्वप्नीं हि नसे, कथील तो आर्य ?
आगमनहेतु पुसतां, ‘ नमनावांचूनि कोणतें कार्य ? ’ ॥२५५॥
भैमी दूतीस म्हणे, ‘ मद्धृदयीं तर्क हा असा वागे,
ॠतुपर्णाचा सारथि बाहुक जो तो चि नळ असावा, गे ! ॥२५६॥
केशिनि ! जा, शोध करीं; मळलें विमळ स्वरूप बहुधा त्या
मलिनकलिनयनपातें; जाणों सदहित चि मान्य बहु धात्या. ’ ॥२५७॥
जाउनि रथशालेंत प्रार्थुनि बहु बाहुकासि ती वदवी,
शोधुनि पाहे भैमीहृदयाच्या कार्यसिद्धिची पदवी, ॥२५८॥
पर्णादाजवळि जसें वदला तैसें चि केशिनीजवळ,
धवळ मधुर ते वर्ण श्रुतिला गमले तिच्या सुधाकवळ. ॥२५९॥
ती भैमीस म्हणे, ‘ जी ! येइल भलत्या जनासि न गहिवर;
दिसतें सत्व असें कीं, पडतां न चळेल हेमनग हि वर. ॥२६०॥
गहिवरला जी ! बाई ! परि आवरिला बळें चि गहिवर तो,
योगें रूप फिरविलें, सूत नव्हे हो ! समर्थ महिवर तो. ’ ॥२६१॥
पुनरपि पाठविली ती, येउनि सांगे हळू च कीं, ‘ अनळ
जळ हि घटांत निघालें, बाइ ! म्हणावें कसें तया न नळ ? ॥२६२॥
चुरलीं हि फुलें झालीं पूर्वाधिक, अग्नि हि न करा पोळी,
खिडकी हि होय मोटी, येइल तसि एक हि न करा पोळी. ’ ॥२६३॥
‘ तत्कृत पदार्थ कांहीं आण, कर तदर्थ जा मिषाला गे ! ’
ऐसें म्हणतां आणी, चाखाया त्या चि आमिषा लागे. ॥२६४॥
लागे खमंग पळ, परि तनुचें स्तोकावशिष्ट हि मग रसें
तें सर्व भान पळवी, पळ वीर्यें मिष्ट हिम गरसें. ॥२६५॥
सावध होऊनि म्हणे, ‘ ओळखिला तो चि सुरस मासाचा;
झांकूनि रूप होसी कां लटिका ? हो चि सुरसमा ! साचा. ’ ॥२६६॥
मग बाहुकाकडे ती स्वापत्यें न्यावया तिला सिकवी,
तीं पाहतां चि धावे, धरुनि उरासीं रडे विलासि कवी. ॥२६७॥
‘ स्वापत्यस्मृतिनें मीं झालों ऐसा ’ असें म्हणे सुकवी;
त्या सुदृढप्रेममहापाशांत हि सांपडोनि तो चुकवी. ॥२६८॥
हें ऐकुनि साध्वीनें मातेकरवीं पित्यासि जाणविलें,
तदनुमतें चि तया बहु विनउनि अंतःपुरांत आणविलें. ॥२६९॥
ती पाहतां धृतिमृगीकर्णीं कटुशोकसिंहहाक सिरे,
स्वमनीं नळ कलिस म्हणे, ‘ केली वरकांतिहानि हा ! कसि रे ? ’ ॥२७०॥
अन्योन्य दृष्टि मिळतां, शोकभरें ती हि साधि, तो हि रडे.
विधिहृतमति जन हरउनि करग अमृतफळ हि साधितो हिरडे. ॥२७१॥
दुःसहनिजविरहव्रतकृशतनुला देखतां चि कळवळला;
तीवरि शुष्यत्सस्याक्षितिवरि घनसा दयाळु नळ वळला. ॥२७२॥
जीनें पतिपदपंकजरेनुपुढें तुच्छ लेखिला काय,
ती त्यासि पुसे, ‘ सुप्तस्त्रीत्यागी साधु देखिला काय ? ॥२७३॥
पाईं भ्रमली श्रमली निजली भिजली निजाश्रु - नीरानीं,
धार्मिक न पाहिला तो, जो जाय असीस टाकुनीं रानीं. ॥२७४॥
पति निजला मग निजली, तेव्हां चि प्रथम न उठली, चुकली.
आग त्यागविहित हें ? सुज्ञ मरे तों हि फळहरा बुकली ? ॥२७५॥
विटला जाणों प्रभु कीं वरिला नर, सुरवरास न बधूनीं;
हें अघ, तरि न वरावें काय सुगुणगणवरासन वधूनीं ? ॥२७६॥
जळविरहें मत्स्यीसी मरती कीं प्रेम दाविती बोलीं,
पाहों बरी परीक्षा, नेत्रें करिती क्षणक्षणीं ओलीं. ॥२७७॥
पुण्यश्लोकें रामें सीतासी हे हि अग्निच्या कुंडीं
टाकूनि पाहिली, तों राग शुकीच्या, तसा इच्या तुंडीं. ॥२७८॥
बहुधा या भावेम ही त्यजिली स्त्री, पंडितें जसी असती;
काळें हि कीं न पुण्यश्लोक त्यजिता, जरी बरी असती. ’ ॥२७९॥
पुण्यश्लोक म्हणे, ‘ गे ! राज्यश्रीस्त्रीवियोगहेतु कली,
शतमरणविपत्तीसीं मतिमति ! सति ! अतिविपत्ति हे तुकली. ॥२८०॥
देवि ! कलि तुझ्या शापें, बहु कर्कोटकविषें हि तळमळला,
गेला पळोनि, जेणें विधुंतुदें विधु तसा चि नळ मळला. ॥२८१॥
आलों तुजकरितां चि, श्रीमति ! साध्वि ! प्रसन्न हो महिते !
न सतीप्रसादसम सुखदायक सत्तीर्थवास होम हि ते. ॥२८२॥
दुःखांत पाडिले ॠजमति ! दुःसंगें तुझे असु खगानें,
व्याधाच्या मधुरें ही हरिणीला सेवटीं असुख गानें. ॥२८३॥
कैंचें सुख दहनासीं, स्वच्छ करो सख्य वा रण करो रू,
तेंवि कळत्रास कितवसंग न सुखहेतु, वारणकरोरू ! ॥२८४॥
जरि तूं स्वयंवरीं वरणार परीक्षूनि गुणसुखनिधीतें,
युक्त चि कवि गातील चि तुझिया निर्दोषगुणसुखनिधीतें. ॥२८५॥
प्रेमें जरि खळ वरिला, तरि लावी मानसीं खरखरा, गे !
लोपविला न अकार चि, आकार हि, नळ न हा, खर खरा गे ! ॥२८६॥
ॠतुपर्ण पावता म्यां केला समयीं न देवि ! मीं चुकलों,
कळत चुकेन कसा हो ! ? नकळत चुकतां महा सुखा मुकलों. ’ ॥२८७॥
भैमी थरथर कांपे, नमुनि म्हणे, ‘ हा उपाय आगमनीं,
वाहीन शपथशत मीं, न धरावें यावरूनि आग मनीं. ॥२८८॥
त्यजुनि सुर, चरण वरिले हे, कीं सौंदर्य पदनखापरतें
चंद्रीं ही न, पराचें सादर पाहे न वदन, खापर तें. ॥२८९॥
उत्तर तुम्हीं दिलें तें पर्णादें कळवितां चि मातेतें,
कथुनि असें केलें जी ! सत्पदरतचित्त जें न माते तें. ॥२९०॥
ऋतुपर्णाजवलि तुम्हीं सूतपणें जरि असाल, तरि त्यातें
एकदिनीं शतयोजन आणाल चि आत्मपोषकरित्यातें. ॥२९१॥
सम शुद्ध भाव सोडुनि मति अनुसरली असेल विषमातें,
तरि हें चि दर्शनामृत मारू होवूनि उग्र विष मातें. ॥२९२॥
प्राण्यांच्या प्राणांचे पोषक वातार्कचंद्र हे असती.
आतां चि प्राणांतें, सोडूत, जरी असेल हे अ - सती. ’ ॥२९३॥
आकाशीं वायु वदे, ‘ पुण्यश्लोका नळा ! न गांजावें;
ऐसें हि होय समयीं कीं स्थैर्य त्यजुनियां नगां जावें. ॥२९४॥
परि शीलें कोणा हि व्यसनीं क्षणभरि हि सोडिली न सती;
तरतासि कसा स्त्रीनें जरि शीलसमृद्धि जोडिली नसती ? ॥२९५॥
असतीस सतीत्व जसें त्या श्रीमद्रामपादतामरसें
देवा ! इच्या हि द्यावें ‘ दमयंती ’ या विशुद्धनामरसें. ’ ॥२९६॥
गर्जति नभीं न केवळ माती त्या सुरपुरांत न नगारे,
पुष्पघन पडे, म्हणती गंधर्वा सुर, ‘ पुरातन न गा रे ! ’ ॥२९७॥
दिव्यांबरें स्वतनुला झांकुनि, कर्कोटकासि नळ भूप
स्मरला जों, स्मर लाजों लागेसें प्रकटलें रुचिर रूप. ॥२९८॥
स्वपतिगळां पहिली श्री जों, साध्वी स्त्री हि तों, बळें चि पडे.
ते दंपती न, डोळे व्यर्थ विना प्रेम बोबळें चिपडे. ॥२९९॥
आलिंगुनि अंकावरि घेउनि, नेत्रें पुसूनि तो हातें,
बाष्पभररुद्धगळ नळ समजावी हरुनि शोकमोहातें. ॥३००॥
हर्ष इला नळलाभें बहु, न तसा कुमुदिनीस शशिलभें;
पुण्यश्लोकपदें हे किंवा ते धरि मनांत न शिला भें. ॥३०१॥
हळुहळु चि रडत होत्या दमयंतीच्या दयाळु ज्या माता
त्या मोट्यानें रडल्या होतां चि प्रकट साधु ज्यामाता. ॥३०२॥
भीम रडे, न प्रकटी, पूर्वीं जो वेपमान साधि रडे,
केलें होतें चिंतावाळविनें जरि हि मानसा धिरडें. ॥३०३॥
ऋतुपर्ण हि सुख पावे, स्वार्थाग्रह लेशमात्र न कुलीनीं.
साधुमतिनीं न धरिजे परभोगीं द्वेष काम न कुलीनीं. ॥३०४॥
नळदत्ताश्वहृदयवरविद्येनें तो हि सुखविला साचा,
झाला लाभ नळासम ज्यास सुगतिभोगसुखविलासाचा. ॥३०५॥
च्यार घटिका हि दुःसह ज्यां, त्यांसि वियोग च्यार हायन हो;
हाय न होरपळविला मीन, म्हणे अरि हि, न विरहायन हो. ॥३०६॥
आधीं लीळेनेंश्रीहर भैमीताप जिंकिला भूपें,
मग तो पुष्कर हि, कसें हरवावें वारिराशिला कूपें ? ॥३०७॥
पुण्यश्लोकानें त्या श्रोतृदुरिततूलसंपदनळानें
गौरविला अहितकर हि पुष्कर, कलिहृदयकंपदनळानें. ॥३०८॥
केलें राज्य बहु दिवस पुण्यश्लोकें नळें जसें रामें,
कलि कांपतो थरारां ज्याच्या कविकोटिकीर्तितें नामें. ॥३०९॥
नळ पुण्यश्लोक तसा तूं हि; कलि तसा सुयोधन हि खोटा.
द्यूतें पदच्युति समा, परि या तापापरीस तो मोटा. ॥३१०॥
अनुकूळा स्त्री भ्राते ब्राह्मण शतशः समागमें वसती.
धर्मा ! तुझी वनींची प्रमदवनवसतिसमा गमे वसती. ॥३११॥
करुनि खळपराभव तूं निष्कंटक राज्य सुचिर करिसील,
घे अक्षहृदय, पडल्या योग तसा दुष्टगर्व हरिसील. ” ॥३१२॥
बृहदश्व अक्षहृदया देउनि संध्या करावया गेला,
केला प्रमुदित पुण्यश्लोकयशें धर्म चित्रसा ठेला. ॥३१३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP