प्रसंग अकरावा - जाणतेनेणतेपणा-भेदाभेद

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


जाणीवेचे ठायीं आहे दोष । नेणिवेचे ठायीं थोर अपेश । तें श्रोत्‍यांपें सांगेन रहिरास । आत्‍मज्ञानें वोळखिलें ॥१६॥
नेणतपणीं करी पापाच्या कोडी । शाहाणपणीं श्रोत्‍यांचें मन तोडी । शिकल्‍या गोष्‍टी नित्‍य खडबडी । फुटका चौडका जैसा ॥१७॥
जाणतपणें चर्ची भांड कथनीं । तों तों फांटा फुटतसे वदनीं । हितोपूनि बोले श्रोत्‍यांलागुनी । मी जाणता तूं व्याहान ॥१८॥
जाणोनि जाणिवेचा निजबोध । सकळ सांडावा बाष्‍कळ अनुवाद । तरीच कांहीं न लगे जीवा बाध । परियेसा श्रोतृराज ॥१९॥
आपुले करणीनें उतरावें पार । परी सर्वांस करावा नमस्‍कार । हे दीक्षा ओळखा बहु्त थोर । गुरुत्‍वीं साधुत्‍वाची ॥२०॥
आपुलें निदान आपण वोळखावें । जगासी जगमित्र होऊनि राहावें । तरी दुःखाचें सुख होईल स्‍वभावें । तुम्‍ही जाणते हो जाणा ॥२१॥
आपणांस आपण केला नमस्‍कार । कोणी म्‍हणती याचा हीन विचार । तर मजविण दुजा नाहीं साचार । या त्रैलोक्‍यामाझारीं ॥२२॥
पृथ्‍वी आप तेज वायु आकाश । त्‍यामाजी स्‍वयंम वस्‍तूचा प्रकाश । जो दुजें दावील त्‍याचा दास । चरणसेवा करीन ॥२३॥

‘अंते मतिः सा गतिः’

आतां दुजी ते ऐका कल्‍पना । दाही दिशा धावंडी वासना । तें उगवण जन्ममरणा । स्‍थूळें अवतरतसे ॥२४॥
ते कल्‍पना कल्‍पनेभीतरी । सवाशें सवाशांची भरोवरी । स्‍वयें मरणीं मरोन मारिल्‍याउपरीं । पुहां जन्ममरण नाहीं ॥२५॥
जैसा बीजीं असे वट वटीं असें बीज । तैसा जीव वेष्‍टला वोळखा गुज । आतां शुद्ध करावयाची वोळखा वोज । पुढिले प्रसंगी सांगेन ॥२६॥
उंबर वाढे उंबराचिये झाडीं । फोडोनि पाहतां उडों लागती किडी । तैशी कल्‍पना घालितसे झोडी । चौर्‍यांशी लक्षींची ॥२७॥
जैसा जैसा कल्‍पनेचा विचार । तैसेंच धरणें लागे शरीर । हें तुम्‍ही ऐकावें जी उत्तर । शहाण्णव कुळांनीं ॥२८॥
मोळविका मोळी वाहे उदास । कल्‍पना धांवे राजपदास । जरी राज्‍य प्राप्त होय तयास । तरीच बोलणें खरें ॥२९॥
ऐशी असेल कोणा एकाची भावना । तरी तेहि सांगो विवंचना । अहं काम क्रोध घालावे दहना । कल्‍पना मुरऊनियां ॥३०॥
कळीचें पुष्‍प होईल विकसोनी । चहूंकडे सुगंध द्रवे विखरोनीं । कल्‍पना प्रकाशे त्रिभुवनीं । वासनासुगंधासंगें ॥३१॥
जो कल्‍पना पुष्‍पाची करी कळी । वासनागंध तयेमाजी मुरगाळी । तो जाणिजे महा योगिराज बळी । यमा इंद्रास नाकळे ॥३२॥
ऐका श्रोते हो ‘अंते मतिः सा गतिः’ ऐसेंच हो सिद्ध साधु बोलती । त्‍यांचे गुह्यार्थ भेद पुरतें । शेख महंमद सांगे ॥३३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP