प्रसंग नववा - जनाचें अवलक्षण

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


ऐका सकळ संत श्रोतेजन । सांगतों जनांचें अवलक्षण । उन्मत्त अनाचारें सद्‌गुणं । विसरोनियां गेले ॥८३॥
चतुर म्‍हणविती आपले ठायीं । स्‍वहिताविण झकले वांई । सच्चिद्‌ श्री निर्गुणाच्या ठायीं । भाव प्रेमें न लाविती ॥८४॥
सांगतों जन ऐसे निदसुरे । खोटें आचरोनि म्‍हणविती खरें । अंतकाळी गांजिलें तस्‍करें । वर्में कर्में धरूनियां ॥८५॥
जैसा सिंदळासी ठाणगा मारीं । हुजुर नेऊन पुरतेसें मारी । तैसें जना तुजलागीं परोपरी । यम ईश्र्वर करितील ॥८६॥
वेव्हारी कळंत्राचें आशेलागून । आधीं सोडून देतसे होन । ऐसें मुद्दल करावें जतन । बहुत गुरुदास्‍यत्‍वें ॥८७॥
जैसा दुर्बळाचे हातीं होन पडे । कळंत्रासाठी थितें मुद्दल बुडे । तैसे करिती उन्मत्त वेडे । तत्त्व गमाऊनियां ॥८८॥
हिंवाचें हुडहुडीनें कापूं लागला । पांघरूण जाळून जरी तापला । पुन्हां बहुत दिवस हिवें मेला । तैसी विषयाची गोडी ॥८९॥
दूध वरपितां हात पोळला । निववावया वारुळांत हात घातला । तेथें परतोनिं काळानें डंखिला । बोल नाहीं दुधा वारुळासी ॥९०॥
दुधन्यायें विषयासंगें लागले । अंतकाळ मांडलिया आरंदळे । यालागीं सांडा विषयाचे चाळे । नातरी काळ डंखील ॥९१॥
आपले पदरी बांधोनियां अग्र । पलंगावरी करी सुखें शयन । मंदिरासहित जालिया दहन । बोल अग्‍नीस नाहीं ॥९२॥
कस्‍तुरी देखोनि राजाच्या भाळा । दुर्बळें लाविला बिबव्याचा टिळा । चिडोन डाग पडला कपाळा । बिबव्यास दुषूं नये ॥९३॥
अग्‍न टाकून आपल्‍या घरावरी । तांतडीनें खाणों धांवे विहिरी । तैसा मृत्‍युकाळीं म्‍हणे हरि हरि । हरि कैसेनि पावेल ॥९४॥
तरुणपणीं करी विषय धंदा । वार्धक्‍यीं म्‍हणे पाव गोविंदा । तों तों श्रीहरि पावतील द्वंदा । यमास चिथाऊनियां ॥९५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP