प्रसंग नववा - सगुण-निर्गुण
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
नित्य सव्वा लक्ष मोडे । हे वेदशास्त्रें बोलती बापुडे । निर्गुण महिमा कोणासी नातुडे । अभिनव भांडवल ॥५६॥
नित्य एकें दिवशी सव्वा लक्ष उत्पत्ति । नित्य सव्वा लक्ष प्रळयातें पावती । जैसे अणु द्वारांतुनी उडती । सम वायुतत्त्वें प्रळय ॥५७॥
गारेसी चकमक ठोकिते वेळे । अनेक उडती फुलांचे उबाळे । तैसा उत्पत्ति प्रळय इतरां न कळे । अति दुर्गमाविण ॥५८॥
नभ श्याम शुच सुनिळ निर्मळ । मेघःश्याम देखिले अति केवळ । जवळील दूर दिसे निश्र्चळ । स्फटिक शुभ्रवर्ण ॥५९॥
पर्वत दुरून पाहतां शुभ्र भासे । जवळीं न्याहाळितां कांहीं न दिसे । परी तें सर्वत्र ऐसेंच असें । घनवट शुभ्राकार ॥६०॥
निर्गुणें गुणावलें सगुण वसे । विरजोनि क्षीराचें दही जालें जैसें । मुसे मुसाऊनि मेण गळे सरिसें । ओतिओतितें वेळें ॥६१॥
सुवर्णाचें तकट करूनियां थोर । वर भगवती ठसाविली सुंदर । शिर छेदिलेंसें दिसें महिषासुर । संग्राम करितां ॥६२॥
सुवर्णाचा खंडेराव तेज्यावरी स्वार । सुवर्णाची बाणाई पाठीशीं सुंदर । घेऊन पळतां दिसे जाहीर । तेथें अनाचारी कवण ॥६३॥
सुवर्णाची केलीं शूकरें श्र्वानें । ते पदरी बांधिली आळंगिल्यानें । सराफें घेतलीं सोनेपणें । विप्र यातीचें असोनियां ॥६४॥
ऐसा ईश्र्वर कोंदला असे विश्र्वरूपें । तेथें कोणें म्हणावीं इंद्रियपापें । जैसा भिंतीसभोंवती चित्रलेपें । तैसे निर्गुणीं सगुण ॥६५॥
भिंत चित्र वेगळेपणें दिसें । तैसे निर्गुणावरी सगुण वसे । पुसलिया ऐकली भिंत दिसे । सगुण विराल्या तैसें ॥६६॥
आकार प्रतिमा वेगळ्या करून । पाहिजे निश्र्चळ निर्मळ निर्गुण । ऐसा ठाव रिता मजलागून । ज्ञाननयनीं न दिसे ॥६७॥
नदीचे तिरीं भिंत घातली असे । उफराटी छाया उदकीं दिसे । तैसे निर्गुण सगुणांत असे । मध्य शेवटां वेगळें ॥६८॥
डोळ्यांत डोळ्यावेगळी बाहुली । स्वयें करूनि जेधवां पाहिली । ते बाहुलीमाजी निर्गुण खोली । चिदचिद्धनपणें ॥६९॥
बुबुळाविरहित पहाणेंपण । पहाणेंपण गिळिल्या दिसे निर्गुण । गिळिल्यापण वेगळी ही सद्खुण । साधूंचें निज गुज ॥७०॥
ऐसा जालो जालेपण वेगळा । तंव प्रतिमा विषयें निजकळा । जिकडे तिकडे शुच सोंवळा । स्वयें माझा मी एक ॥७१॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP