अप्रकाशित कविता - To T. R.
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
लागावें सुख थोडकें तरि मला तुझ्यापासुनी
यासाठीच रहस्य मी हृदयिंचें नाही तुला साङगत;
मूकप्रीति धरी न काय फुसक्या शब्दांहुनी योग्यता ?
आहे काय नफा ? कशास उघडा ही मूठ जी झांकली ?
पाणी येथ असे, जसें समजती भूगर्भशास्त्रज्ञ ते
माझी प्रीति कळावया बहु तुला आहेत रस्ते तसे;
डोळ्याच्या कधि कोंपर्यांत लपला अर्धा तुला दीसतो
प्रेमस्मारक अश्रुबिन्दु ? कुठुनी ? तू अज्ञ, भोळी प्रिये !
जेव्हा मी तुज पाहिलें प्रथत त्या वेळीं मला वाटलें
जन्मींचें गत आपुल्या खचित गे नातें असें शाश्वत;
मी राहीन मुका परन्तु अजुनी; कैशी पुन्हा पेटवूं
ती ज्वाला भडका जिने करुनियां केली पहा राख ही !
थण्डी फार पडून छेडिल तुला वारा यदा चावरा
घे माझ्या हृदयांतली प्रियतमे, ही शेगडी तू तदा !
५ ऑगस्ट १९१४
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP