तिकुडचें पहिलें पत्र - प्रस्‍तावना

हे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले.


प्रस्‍तावना
स्‍त्रियांकरितां कविताबद्ध काही बोधपर पुस्‍तकें लिहावीत ही प्रथम कल्‍पना मनांत येऊन ‘सासरची पाठवणी’ हें पुस्‍तक मूळ ‘केरळकोकिळ’ मसिक पुस्‍तकांतून छापण्याकरितां तयार केलें. आमचे परम मित्र कै. जनार्दन महादेव गुर्जर, मुंबई येथील प्रसिद्ध बुकसेलर, हे त्‍यावेळी ‘केरळकोकिळचे’ प्रोपरायटरहोते. त्‍यांना ही मूळ प्र. वाचून पहावयास सवड झाली नव्हती. म्‍हणून त्‍यांनी त्‍यांची प्रुफें खिशांत घालून ते गडबडीनें कोंकणच्या बोटींत जाऊन बसले व बोट चालू झाल्‍यावर रिकामपणीं ती ‘सासरच्या पाठवणी’चीं प्रुफें वाचून पाहिली. तेव्हां ती कविता पाहून त्‍यांचे मन इतकें प्रसन्न झाले कीं, त्‍यांनी त्‍याचवेळी पेन्सलीनें तेथूनच आम्‍हांला एक पत्र लिहिले आणि त्‍यांत असें म्‍हटले आहे की, ‘‘काय हो करूं? मी गरीब पडलों. हाच जर मी श्रीमान्‌ असतों तर ह्याच सासरच्या पाठवणीला एक गांव आपणांस इनाम करून दिला असता. खरोखर तिची योग्‍यताच तितकी आहे. तथापि व्यापारीदृष्‍टीनें जितका अधिक मोबदला मला देणें शक्‍य आहे तेवढा मी आपणांस मोठ्या आनंदानें देईन.’’ रा. गुर्जर हे मोठें रसिक व मार्मिक गृहस्‍थ होते. तेव्हां त्‍यांचा हा अभिप्राय गांव इनाम देण्यापेक्षांही अधिक योग्‍यतेचा आहे व त्‍यांच्या मंगल आशीर्वादाप्रमाणें तिचा खपही पण जारीनें होत आहे.

तसेंच कै. गणेश नारायण जोशी ‘विजय’ प्रेसचें मालक ह्यांनीही ‘सासरच्या पाठवणीच्या’ धर्तीवर दुसरें पुस्‍तक करून मागितलें. तें तयार करून त्‍यास दिल्‍यानंतर त्‍यांनी वाचून पाहिल्‍यावर असे उद्गार काढले कीं, ‘‘आमची व आमच्या मित्रमंडळींची अशी ठाम समजूत होती की, आपल्‍याला सासरच्या पाठवणीसारख्या कविता पुनरपि साधावयाच्याच नाहींत. फार तर काय, पण ‘सासरच्या पाठवणी’ इतके गोड व प्रेमळ नांव सुद्धां सुचणार नाहीं. कारण हा वेळ आहे. एखाद्या वेळीं एखादी गोष्‍ट साधून जाते. तशीच गोष्‍ट त्‍याच गृहस्‍थानें करूं म्‍हटलें तरी ती पुनः साधत नाहीं. परंतु आपलें ‘माहेरचें मूळ’ पाहून ती आमची कल्‍पना सर्वस्‍वी चुकीची ठरली. ‘माहेरचें मूळ’ हें नांव व आंतील विषय इतका प्रेमळ, मधूर व कोमल वठला आहे कीं त्‍यापुढें सासरची पाठवणी खरोखर फिकी वाटते. आपल्‍या गुणाचा मोबदला देण्यास कोण समर्थ आहे?’’ असें म्‍हणून त्‍यांनी ठरावापेक्षां अधिक पांच रुपये दिले. त्‍यानंतर ‘दंपत्‍यसुखाचा ओनामा’ झाला. त्‍यांती किती एक पद्यें एका थोर व मातृभक्त गृहस्‍थांस अत्‍यंत प्रिय व रमणीय वाटतात. नंतर रा. रा. फडनीस बुकसेलर ह्यांच्या सूचनेवरून त्‍यांसही ‘मुलीचा समाचार’ हें पुस्‍तक करून दिलें. ह्या चारही पुस्‍तकांतील पद्यें ज्‍या मुलीच्या शाळांत चालत नाहींत अशी शाळा नाहीं, व जिला एकही ह्यांतील पद्य येत नाहीं अशी मुलगीही पण सहसा आढळणार नाहीं. इतकीं ही पद्यें लोकप्रिय झालेली आहे. मुंबईमध्ये एक गुजराथी मनुष्‍य तर ही चारच पुस्‍तकें विकून आपला निर्वाह चालवितो. दुपारच्या वेळीं मुंबईत्‍ील प्रत्‍येक चाळींतून ह्याची आरोळी कानी पडतांना बहुतेकांनी ऐकलेंच असेल. असो.

वरच्या चार पुस्‍तकांच्या जोडीला आजचें हें ‘तिकुडचें पहिलें पत्र’ तयार झाले आहे. परंतु वरच्या पहिल्‍या चार पुस्‍तकांतील विषय व ह्या आजच्या पांचव्या पुस्‍तकांतील विषय मात्र फार भिन्न आहे. पहिल्‍यांतील विषय, लग्‍न, गृहस्‍थिति, व सासरची वागणूक इत्‍यादि गृहस्‍थाश्रमांतीलच होता. परंतु ह्या पुस्‍तकांतील विषय परदेशाच्या स्‍थितीसंबंधाचा आहे. तेव्हां तो लोकांस कसा काय पसंत पडतो पहावें. ह्यांत एक तरुण गृहस्‍थ आपल्‍या प्रियपत्‍नीला येथेंच ठेवून सांप्रत चालू असलेल्‍या युद्धाच्या मोहिमेवर गेला असल्‍याचें कल्‍पिलें आहे. तेव्हां त्‍याची पत्‍नीही तिकडील ऐकलेली संकटें, तिकडील रीतिरिवाज, अडचणी ज्‍या ज्‍या तिच्या ऐकिवांत होत्‍या त्‍या त्‍या आठवून ती विलाप करीत आहे व पति आपले युद्धाचें काम सांभाळून फावल्‍या वेळांत तिकडील परिस्‍थिती पाहून तिकडेही पुष्‍कळ गोष्‍टी घेण्यासारख्या व मुनष्‍याच्या उन्नतीस कारणीभूत होण्यासारख्या आहेत व त्‍या देशाविषयीं आमच्या ज्‍या ऐकिव कल्‍पना आहेत त्‍या केवळ भ्रामक आहेत; हा विषय पहिल्‍या या पत्रांत गोंवला आहे. हा सर्व लोकांस पसंत पडला तर दुसर्‍या पत्रांतही अनुक्रमानेंच तिकडील अनेक गोष्‍टींचा उलगडा होऊन त्‍या देशाविषयी आपल्‍या स्त्रियांस बरेच ज्ञान होईल अशी आशा आहे. विषय थोडासा भिन्न असल्‍यामुळें समजुतीकरितां ठिकठिकाणीं टीपा दिल्‍या आहे. हा विषयही आमच्या सर्व भगिनीवर्गास प्रिय होवो.

पुणें, १ नोव्हेंबर १९१७.

ग्रंथकर्ता.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:30.0630000