संत चोखामेळा - अभंग ११ ते २०

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


११) ज्या काणें वेद श्रुति अनुवादिती । तो हा रमापती पंढरीये ॥१॥
सुखाचें ठेवणें क्षीरसागर निवासी । तो हा पंढरीसी उभा विटे ॥२॥
भाविकाकारणें उभवोनी हात । उदारपणें देत भक्ति-मुक्ति ॥३॥
न पाहे उंच नीच याती कुळ । स्त्री क्षूद्र चांडाळ सरते पायीं ॥४॥
चोखा म्हणे ऐसा भावाचा भुकेला । म्हणोनियां स्थिरावला भीमातटीं॥५॥

१२) ज्या सुखाकारणें योगी शिणताती । परी नव्हे प्राप्ती तयांलागी ॥१॥
तें प्रेमभावें पुंडलिका वोळलें । उघडेंचि आलें पंढरीये ॥२॥
कर ठेवोनी कटीं उभा पाठीमागें । भक्ताचिया पांगे बैसेचि ॥३॥
युग अठ्ठावीस होऊनिया गेलें । नाहीं पालटलें अद्यापवरी ॥४॥
चोखा म्हणे ऐसा कृपाळु श्रीहरी । कीर्ति चराचरीं वानिताती ॥५॥

१३) दुर्लभ होतें तें सुलभ पैं झालें । आपण नटलें सगुण रूप ॥१॥
धरोनी आवडी पंढरीये आलें । उभेंचि राहिलें कर कटीं ॥२॥
युगें अपरंपार न कळे ज्याचा पार । वैष्णवांचा भार शोभतसे ॥३॥
दिंडया गरूड टके पताका शोभती । बागडे नाचती हरिदास ॥४॥
चोखा म्हणे ऐसें धरोनियां भीड । उभ उभी कोड पुरवितो ॥५॥

१४) देखिला देखिला योगियांचा रावो । रुक्मादेवीनाहो पंढरीचा ॥१॥
पुंडलिकासाठीं युगें अठ्ठावीस । धरोनी बाळवेष भीमातटीं ॥२॥
गाई गोपाळ वत्सें वैष्णवांचा मेळा । नाचत गोपाळ विठ्ठल छंदें ॥३॥
चोखामेळा तेथें वंदितो चरण । घाली लोटांगण महाद्वारी ॥४॥

१५) निगमाचे शाखे आगमाचें फळ । वेद शास्त्रा बोल विठ्ठल हा ॥१॥
पुराणासी वाड योगियांचें गुज । सकळां निजबीज विठ्ठल हा ॥२॥
निगम कल्पतरू भक्तांचा मांदुस । तोही स्वयंप्रकाश विठ्ठल हा ॥३॥
चोखा म्हणे तो तूं जगाचें जीवन । संतांचें मनरंजन विठ्ठल हा ॥४॥

१६) पाहतां पाहतां वेधियेला जीव । सुखाचा सुखसिंधु पंढरीराव ॥१॥
माझा हा मीपणा हरपला जाणा । कळल्या आगम निगमाच्या खुणा ॥२॥
भवसागराचा दाता । विठ्ठल विठ्ठल वाचे म्हणतां ॥३॥
उभा राहुनि महाद्वारीं । चोखामेळा दंडवत करी ॥४॥

१७) बहुत कनवाळु बहु हा दयाळु । जाणे लळा पाळू भाविकांचा ॥१॥
जात वित गोत न पाहेचि कांहीं । घालावी ही पायीं मिठी उगी ॥२॥
न मागतां आभारी आपेंआप होती । भाविकासी देतो भुक्ति मुक्ति ॥३॥
चोखा म्हणे ऐसा लाघवी श्रीहरी । भवभय वारी दरूशने ॥४॥

१८) बहुतांचे धांवणे केलें बहुतापरी । उदार श्रीहरी वैकुंठीचा ॥१॥
तोचि महाराज चंद्रभागें तीरीं । उभा विटेवरी विठ्ठल देवो ॥२॥
भक्तीचा आळुका भावाचा भुकेला । न कळे ज्याची लीला ब्रम्हादिका ॥३॥
चोखा म्हणे तो हा नांदतो पंढरी । दरूशनें उद्धरी जडजीवां ॥४॥

१९) भक्तांचिया लोभा वैकुंठ सांडिलें । उभेंचि राहिले पंढरीये ॥१॥
कनवाळु उदार तो हा श्रीहरी । जडजीवा उद्धरी नामें एका ॥२॥
बांधियेलें ब्रीद तोडर चरणीं । त्रैलोक्याचा धनी पंढरीये ॥३॥
चोखा म्हणे आमुचा कैवारी विठ्ठल । नलगे काळ वेळ नाम घेतां ॥४॥

२०) भाविकांच्या लोभा होऊनी आर्तभूत । उभाचि तिष्ठत पंढरीये ॥१॥
काय करों प्रेम न कळे या देवा । गुंतोनिया भावा राहे सुखें ॥२॥
वर्ण अभिमान न धरी कांही चाड । भक्तिसुख गोड तयालागीं ॥३॥
चोखा म्हणे ऐसी कनवाळु माउली । कृपेची साउली दीनां करी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP