श्रीज्ञानेश्वरांची समाधी - अभंग ६१ ते ७२
श्रीसंतज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेली पाहून श्रीनामदेवांना भरून आले आणि त्यांनी श्रीसंतज्ञानेश्वरांच्या स्तुतीपर हे अभंग लिहीले.
६१
निवृत्तिदेव म्हणे करितां समाधान । कांही केल्या मन राहात नाहीं ॥१॥
बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट । ओघ बारा वाट मुरडताती ॥२॥
बांधल्या पेंढीच्या सुटलासे आळा । तृण रानोमाळा पांगलेसे ॥३॥
हरिणीविण खोपी पडियेली वोस । दशदिशा पाडसें भ्रमताती ॥४॥
मायबापें आम्हां त्यागियेलें जेव्हां । ऐसें संकट तेव्हां जालें नाहीं ॥५॥
नामा म्हणे देवा पेटला हुताशन । करा समाधान निवृत्तीचें ॥६॥
६२
देव रुक्माबाई आणिक साधुजन । करिती समाधान निवृतीचें ॥१॥
ज्ञानियांनी ऐसी करावी जंव खंती । अज्ञानाचा किती पाड आला ॥२॥
धन्य तुमचा महिमा बोलती पुराणीं । दृश्य कांहीं मनीं आठवूं नये ॥३॥
आकाशाचे ठायीं अभ्रें येती जाती । कोण त्याची खंती करुं पाहे ॥४॥
अवतारादिक गेले आले अपार । जैसा का विस्तार मृगजळाचा ॥५॥
नामा म्हणे देवें धरियेलें हातीं । उठविली विभूति निवृत्तिराज ॥६॥
६३
गरुड हनुमंत मुक्ताई सोपान । देव साधुजन आनंदले ॥१॥
मागें पुढें संत पताकांचे भार । मध्यें ज्ञानेश्वर मिरवतो ॥२॥
टाळ आणि विणे मृदंग गायन । करिती कीर्तन सुस्वरेंसी ॥३॥
जयजयकार ध्वनि करिती सुरगण । वर्षती सुमन स्वर्गींहुनी ॥४॥
हरिपाठ गजन करिती अपार । नामा म्हणे भार उठविले ॥५॥
६४
सर्व स्वस्ति क्षेम वैष्णव मंडळी । बैसलेती पाळी समाधीच्या ॥१॥
पताकांची छाया दुणावली फार । सिद्ध ज्ञानेश्वर तेव्हां जाले ॥२॥
अजानवृक्षदंड आरोग्य अपार । समाधीसमोर स्थापियेला ॥३॥
कोरड्या काष्टीं फुटियेला पाला । तेव्हां अवघियाला नमस्कारी ॥४॥
नामा म्हणे देवा घार गेली उडोन । बाळें दाणादाण पडियेली ॥५॥
६५
मुंग्यांचिये विवरीं लागलीसे आग । पुढें आणि मागें जालें नाहीं ॥१॥
राही रुक्माई आणि सत्यभामा । ओवाळिती प्रेमा ज्ञानेश्वरा ॥२॥
उभारिल्या गुढिया आणि तोरणें । छाया सुदर्शन धरियेलें ॥३॥
नारा विठा गोंदा भेटला महादा । उभे जागोजागा राहिलेती ॥४॥
विसोबा खेचर चांगा वटेश्वर । केला नमस्कार अवघियांनीं ॥५॥
गोरा कुंभार सांवता माळी । नामा तळमळी वत्सा ऐसें ॥६॥
६६
प्रसा भागवतें केला नमस्कार । सारे लहान थोर जमा जाले ॥१॥
सकलांचिया पायीं नमियलें नमना । केली प्रदक्षिणा समाधीसी ॥२॥
प्रथम पायरी बाहेरील जेथ । उभा पंढरीनाथ भेटावया ॥३॥
देव म्हणे बापा अमृत नेदी पाट । फार केले कष्ट जगासाठीं ॥४॥
नामा म्हणे यांनीं अनुभवाच्या नौका । पार केलें लोकां जडमूढां ॥५॥
६७
देव निवृत्ति यांनी धरिले दोन्ही कर । जातो ज्ञानेश्वर समाधीसी ॥१॥
नदीचिया माशा घातलें माजवण । तैसें जनवन कलवलें ॥२॥
दाही दिशा धुंद उदयास्ताविण । तैसेंचि गगन कालवलें ॥३॥
जाऊनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरी । पुढें ज्ञानेश्वरी ठेवियेली ॥४॥
ज्ञानदेव म्हणे सुखी केलें देवा । पादपद्मीं ठेवा निरंतर ॥५॥
तीन वेळां जेव्हां जोडिलें करकमळ । झांकियेले डोळे ज्ञानदेवें ॥६॥
भीममुद्रा डोळा निरंजनीं लीन । जालें ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव ॥७॥
नामा म्हणे आतां लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ॥८॥
६८
निवृत्तीनें बाहेर आणिले गोपाळ । घातियेली शिळा समाधीसी ॥१॥
सोपान मुक्ताई सांडिती शरीरा । म्हणती धरा धरा निवृत्तीसी ॥२॥
आणिकांचीं तेथेम उद्विग्न तीं मनें । घालिताती सुमनें समाधीसी ॥३॥
नामदेवें भावें केली असे पूजा । बापा ज्ञानराजा पुण्यपुरुषा ॥४॥
६९
अवघी जयजयकारेम पिटियेली टाळी । उठली मंडळी वैष्णवांची ॥१॥
सह मंडळी सारे उठले ऋषीश्वर । केला नमस्कार समाधीशी ॥२॥
पंचद्वारे संत रिघाले बाहेर । सखा ज्ञानेश्वर आळंकापुरीं ॥३॥
इंद्रायणी केलें अवघ्यांही आचमन । करिती समाधान निवृत्तीचें ॥४॥
सोपानासी पोटीं धरिलें देवानें । संवत्सरगांवी जाणें नेम केला ॥५॥
मुक्ताबाईलागीं सांगितली खूण । जाय तो सोपान स्थिर असा ॥६॥
त्रिवर्ग तीं ऐसीं राहिलीं एकमनें । जाणोनियां खूण नामा म्हणे ॥७॥
७०
देवसमागमें परतले भार । केला हरिगजर समाधीसी ॥१॥
नव दिवस संत समाधीजवळी । देव चंद्रमौळी कीर्तनासी ॥२॥
शुद्धमार्गेसर दशमी भोजनें । विधि नारायणें संपादिली ॥३॥
एकादशीं कीर्तन द्वादशीं पारणीं । मग ऋषि मुनि संतोषले ॥४॥
त्रयोदशीं देव रिघाले बाहेरी । धन्य आळंकापुरीं ज्ञानराज ॥५॥
नामा म्हणे धन्य पलाटण पाउलीं । पंचक्रोश ठेलीं सकळ तीर्थें ॥६॥
७१
धन्य आळंकापुरी शिवपीठ शिवाचें । अगस्ति ऋषीचेम पूर्वस्थळ ॥१॥
त्रिवर्गीं म्हणितलें जाताम जातां हरी । आम्हां कौंडण्यपुरीं आज्ञा द्यावी ॥२॥
इंदनीळ पर्वत नेमिला सोपान देवा । तोंवरी करुं सेवा अंबिकेची ॥३॥
देव म्हणे भलें आरंभिलें तुम्ही । आज्ञा घेतों आम्हीं पंढरीसी ॥४॥
इंद्रनीळ पर्वती समाधि सोपान । सर्वत्र आमंत्रण देवेम दिलें ॥५॥
देवभक्तालागीं जालें समाधान । मग सुरगण आंवतिले ॥६॥
नामा पुंडलिक निघाले बाहेरी । गरुडावरी देव स्वार जाले ॥७॥
७२
समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर । उठविले भार वैष्णवांचे ॥१॥
आळंकापुरीं सव्य घेतली ते संतीं । दिली भागीरथी ज्ञानालागीं ॥२॥
भैरवापासुनि उगम निरंतर । रानोमाळ झरे तीर्थ गंगा ॥३॥
सैघं इंद्रायणी वाहाती मिळोनी । अखंड क्षणीं वोघ जाती ॥४॥
चालिलें विमान गंधर्व सुरगण । यात्रा परिपूर्ण जाली म्हणती ॥५॥
तीर्थ महोत्साह जाला सारासार । देव ऋषीश्वर परतले ॥६॥
वैष्णवांचे भार निघाले बाहेर । केला जयजयकार सर्वत्रांनीं ॥७॥
पंढरीचा पोहा निघाला बाहेर । गरुडावरी स्वार देव जाले ॥८॥
नामा म्हणे ऐसा सुखी ज्ञानेश्वर । जाला असे स्थिर ब्रह्मबोधें ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : January 02, 2015
TOP