श्रीज्ञानेश्वरांची समाधी - अभंग ११ ते २०

श्रीसंतज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेली पाहून श्रीनामदेवांना भरून आले आणि त्यांनी श्रीसंतज्ञानेश्वरांच्या स्तुतीपर हे अभंग लिहीले.


११
पुसताती संत सांगा देवा मातें । पूर्वीं येथें होतें कोण क्षेत्र ॥१॥
देव म्हणे स्थळ सिद्ध हें अनादि । येथेंच समाधि ज्ञानदेवा ॥२॥
अष्टात्तरशें वेळां साधिली समाधी । ऐसें हें अनादि ठाव असे ॥३॥
नामा म्हणे देवा सांगितलें उत्तम । ज्ञानांजन सुगम देखों डोळां ॥४॥

१२
स्वानंदें देवभक्तां भेटी । वोरसोनि कंठीं आलिंगावें ॥१॥
देव म्हणे भले आठवलें तुज । ते हे संधी मज कळली असे ॥२॥
पदपदांतरें केला मार्ग सोपा । त्यांत माझी कृपा वोळली असे ॥३॥
देव म्हणे तुझी पुरवीन आळी । सुखी सही मंडळी वैष्णवांची ॥४॥
नामा म्हणे देवा आज्ञा देगा यासी । नेणूं काय आम्हांसी आरंभिलें ॥५॥

१३
उदित जालें मन आतां काय अनुमान । करी शीघ्र प्रस्थान आज्ञा माझी ॥१॥
देवाचा हो कर धरोनी ज्ञानेश्वर । निघाला बाहेर योगिराज ॥२॥
मागें पुढें संत चालिले मिरवित । कौतुक पहात इहलोकीं ॥३॥
नारा विठा गोंदा माहादा विरक्त । परसा भागवत उभें तेथें ॥४॥
समुदाय वैष्णव मिळालासे भारी । महोत्सव गजरीं आरंभिला ॥५॥
नामा म्हणे गुज दाविलें श्रीहरी । धन्य आळंकापुरीं पुण्यभूमी ॥६॥

१४
सारासार विचार करिती अवघे जन । हे ज्ञान अंजन दाविलें डोळां ॥१॥
पाहिलें गे माय अंतरींचें सुख । वैकुंठनायक उभा असे ॥२॥
ज्ञानदेवायोगें सकळांशी दर्शन । परब्रह्म निधान डुल्लतसे ॥३॥
अवघे जन कोडें घालिती सांकडें । सांगावे निवाडे नामयाचे ॥५॥
देव म्हणे नामा विचारिलें आम्हां । ते कां संधी तुम्हां कळली नसे ॥६॥

१५
देव म्हणे नामया ब्रह्मक्षेत्र आदी । येथेंचि समाधि ज्ञानदेवा ॥१॥
चौयुगां आदिस्थळ पुरातन । गेले तें नेमून मुनिजन ॥२॥
चालिले सकळ जाले ते विकळ । अनादि हें स्थळ ज्ञानदेवा ॥३॥
नामा म्हणे आम्हां सांगितलें हरी । दीर्घध्वनि करी वोसंडोनी ॥४॥

१६
खेद दुःख करी मनाचा कळवळा । प्रेमाश्रु डोळां दाटताती ॥१॥
नारा विठा गोंदा पाठविला महादा । साहित्या गोविंदा सांगितलें ॥२॥
काय काय आणूं सांगा हें प्रमाण । नेमियेला नेम पांडुरंगें ॥३॥
तुळसी आणि बेल दर्भ आणि फुलें । उदक हें चांगलें भागिरथीचें ॥४॥
नामा म्हणे देवा साहित्य करितां । आठवितें चित्ता खेद दुःख ॥५॥

१७
साडेतीन पाउलें टाकिलीं निश्चळ । नेमियेलें स्थळ उत्तरायणी ॥१॥
देव म्हणे ज्ञाना होई सावधान । माग वरदान मज कांहीं ॥२॥
ज्ञानदेव म्हणे शुद्ध कार्तिक मासीं । व्रत एकादशी स्वामीकडे ॥३॥
कृष्णपक्षीं व्रत हरिदिन परिपूर्ण । मागितला मान ज्ञानदेवें ॥४॥
नामा म्हणे देवा आवडीनें देतां । जोडलें हें संतां पियुष जें ॥५॥

१८
वोसंडोनी हरि आनंदला तेथें । पुण्य हें अगणित सांगितलें ॥१॥
सर्वांगालागीं न्याहाळिलें परिपूर्ण । केलें निंबलोण आवडीनें ॥२॥
आळंकापुरीं कोणी करील कीर्तन । तयालागीं येणें वैकुंठीचें ॥३॥
अस्ति नास्ति उदकीं करिल ब्रह्मरुप । कोटी कुळांसहित उद्धरीन ॥४॥
जेथें ज्ञानदेव तेथें मी निशिदिनीं । येथें सुखें ज्ञानी डुल्लताती ॥५॥
नामा म्हणे आतां वोसंडले हरी । जडमूढावरी कृपा केली ॥६॥

१९
वन वृक्ष वल्ली ईश्वरासमान । ऋषि मुनिजन राहाती जेथें ॥१॥
होऊनियां पक्षी कपोद कोकिळा । वेष्टियेलें स्थळा ब्रह्मबोधें ॥२॥
मृत्तिका पाषाण पंचक्रोशीचे खडे । जाले पहा धडफुडे ब्रह्मरुप ॥३॥
पंचमहापातकी गेले आळंकापुरीं । न चाले त्याजवरी काळ यम ॥४॥
सांगताती देव ऐकती रुक्मिणी । नामा म्हणे चक्रपाणि वर दिला ॥५॥

२०
चक्रतीर्थीं पाहा उभा तो गोपाळ । पुढें विणे टाळ वाजताती ॥१॥
स्वर्गींहुनि पुष्पें वर्षती सुरवर । उभे ऋषीश्वर समुदायेंसी ॥२॥
आणिक वाद्यें तेथें वाजती अपार । जाती ज्ञानेश्वर समाधीसी ॥३॥
नामा म्हणे देवा चुकों नेदी संधी । पोहोचविताम सिद्धि बाळकासी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP