श्रीज्ञानेश्वरांची समाधी - अभंग ५१ ते ६०

श्रीसंतज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेली पाहून श्रीनामदेवांना भरून आले आणि त्यांनी श्रीसंतज्ञानेश्वरांच्या स्तुतीपर हे अभंग लिहीले.


५१
मुगुट मनोहर कुंडलें मकाराकार । कांसे पीतांबर कसियेला ॥१॥
खोविले गोशे स्वार गरुडावर । उठविले भार वैष्णवांचे ॥२॥
केलें आचमन तीर्थीं त्या तांतडी । आले उठाउठी सिद्धेश्वरीं ॥३॥
परमार्थ स्वार्थ जाल्या गुह्य गोष्टी । होताती भेटी ज्ञानेदेवा ॥४॥
नामा म्हणे भेटा लहान थोर सारे । जातो ज्ञानेश्वर समाधीसी ॥५॥

५२
ब्रह्मादिक तेथेम करिताती पूजा । घालिताती सेजा समाधीसी ॥१॥
चिद्रत्न आसन उन्मनीची धुनी । समाधि सज्जनीं पाहियेली ॥२॥
धुवट वस्त्राची घडी ते अमोल । तुळसी आणि बेल आंथरिले ॥३॥
दुर्वा दर्भ वरी टाकिले मोकळे । पुष्पें तीं सकळें समर्पिलीं ॥४॥
नामा म्हणे येथें छाया निरंतर । सुखी ज्ञानेश्वर सुखावला ॥५॥

५३
लावियेला दीप निरंजन ज्योति । प्रकाशल्या दीप्ती तन्मयाच्या ॥१॥
पूजूनि समाधि निघाले बाहेर । प्रेमें ज्ञानेश्वर डुल्लतसे ॥२॥
अनुमानिलें स्थळ सभोंवतीं सारें । धन्य ज्ञानेश्वरें कृपा केली ॥३॥
देव आणि नामा रुक्माई राही । स्फुंदती ठायीं ठायीं संतजन ॥४॥

५४
निवृत्ति सोपान पुढें मुक्ताबाई । देवा सांगा कांहीं निजगुज ॥१॥
देव ज्ञानेश्वर बैसले जवळीं । घेतियेली आळी सोपानानें ॥२॥
ज्ञानदेवें खूण सांगितली देवा । पूर्ण तूं विसांवा सज्जनांचा ॥३॥
सोपानाचे हात देवाचिये हातीं । तेव्हां आपमूर्ति कासविस ॥४॥
म्लान वदनें निवृत्ति सद्‌गुरु सागर । येऊनि ज्ञानेश्वर चरणीं लागे ॥५॥
नामा म्हणे याचे अंतर परिपूर्ण । नाहीं देहीं भान निवृत्तीसी ॥६॥

५५
पांडुरंग निवृत्ति उभे दोघेजण । आरंभिलें नमन ज्ञानदेवें ॥१॥
नामा पुंडलिक उभे दोहोंकडे । ज्ञानराजा पुढें उभे ठेले ॥२॥
गंध आणि अक्षता पुष्प परिमळ । आणियेले जळ भागिरथीचें ॥३॥
अनंत स्वरुपाचीं अनंत हीं नावें । नमन ज्ञानदेवें आरंभिलें ॥४॥
नामा म्हणे देवा नमनाची रीती । नमन सर्वांभूतीं मान्य जालें ॥५॥

५६
पुढें ज्ञानेश्वर जोडोनियां कर । बोलतो उत्तर स्वामिसंगें ॥१॥
पाळिलें पोसिलें चालविला लळा । बा माझ्या कृपाळा निवृत्तिराजा ॥२॥
स्वामीचिया योगें जालों स्वरुपाकार । उतरलों पार मायानदी ॥३॥
निवृत्तीचें हात उतरिला वदना । त्यागिलें निधाना आम्हालागीं ॥४॥
नामा म्हणे देवा देखवेवा मज । ब्रह्मीं ज्ञानराज मेळविला ॥५॥

५७
वोसंडोनि निवृत्ति आलिंगों लागला । आणिकांच्या डोळां अश्रु येती ॥१॥
अमर्यादा कधीं केली नाहीं येणें । शिष्य गुरुपण सिद्धी नेलें ॥२॥
गीतार्थाचा अवघा घेतला सोहळा । गुह्यगौप्यमाळा लेवविल्या ॥३॥
फेडिलीं डोळ्याचीं अत्यंत पारणीं । आतां ऐसें कोणी सखे नाहीं ॥४॥
काढोनियां गुह्य वेद केले फोल । आठवती बोल मनामाजीं ॥५॥
नामा म्हणे संत कासावीस सारे । लाविती पदर डोळियांसी ॥६॥

५८
देव म्हणे ऐसें आठवाल कोठवर । होईल उशीर समाधीशी ॥१॥
निरंजनीं समाधि निरंतर तुम्हांसी । व्यर्थ कासाविसी होऊं नये ॥२॥
निवृत्तीसी पोटीं धरिलें देवानें । केलें समाधान अवघियांचें ॥३॥
ब्रह्माणि ही कळा पुढें मुक्ताबाई । देवा सांगा कांहीं आम्हांलागीं ॥४॥
देव म्हणे तुज येणें जाणें नाहीं । अनुभवोनि पाही जीवन्मुक्ती ॥५॥
म्हणे मुक्ताई सख्या ज्ञानेश्वरा । प्रार्थना तुम्ही करा देवालागीं ॥६॥
ज्ञानदेवें वचन घातलें देवांवर । विश्वाचें मनोर पांडुरंग ॥७॥
नामा म्हणे स्वामि प्रेमाचिया रंगें । बोलावणें स्वांगें करुं आम्ही ॥८॥

५९
ज्ञानदेवें देवा घातलें वचन । करा समाधान सोपानाचें ॥१॥
समुद्रायेसीं तुम्हां करुं बोळवण । ऐसाचि सोपान ब्रह्मकरु ॥२॥
तीर्थावळी वेळें नेमियलें स्थान । तेथें पोचविणें मजलागीं ॥३॥
विठठल रुक्माई उभी समाधान । दिधलें वचन ज्ञानदेवा ॥४॥
नामा म्हणे देवा स्थिरावलें मन । करितां समाधान अवघियांचें ॥५॥

६०
निवृत्तिदेव म्हणे सांगतो या वाचे । राहाणें चौघांचें एकरुप ॥१॥
त्रिवेणीचा ओघ जैसा एके ठायी । तैसी मुक्ताबाई आम्हांमध्यें ॥२॥
ब्रह्माविष्णुहर जैसे एके ठायीं । तैसी मुक्ताबाई आम्हांमध्यें ॥३॥
रज तम गुण सत्व गुणाठायी । तैसी मुक्ताबाई आम्हांमध्यें ॥४॥
भूचरी खेचरी चांचरी ते पाही । अगोचरा ठायीं मुक्तगंगा ॥५॥
प्रथम ज्ञानेश्वरें काढियेली वाट । धरियेलें वैकुंठ आळंकापुरीं ॥६॥
इंद्रनीळ पर्वत नेमिला सोपाना । निवृत्तीसी जाणा त्रिंबकेश्वर ॥७॥
चौथी मुक्ताबाई नेमियली तापी । नामा म्हणे ख्याती केली यांनीं ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP