श्रीज्ञानेश्वरांची समाधी - अभंग ३१ ते ४०
श्रीसंतज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेली पाहून श्रीनामदेवांना भरून आले आणि त्यांनी श्रीसंतज्ञानेश्वरांच्या स्तुतीपर हे अभंग लिहीले.
३१
निवृत्ति सोपान मुक्ताई धाकुटी । धरियेली कंठी पांडुरंगें ॥१॥
कळवळिली मनीं करिती दीर्घ ध्वनी । आठविती मनीं ज्ञानदेव ॥२॥
विकळ जालें चित्त संत हे दुश्चित । नामा विकळ तेथ होत असे ॥३॥
३२
तिघांजणांलागीं केलें समाधान । सांगितली खूण अंतरींची ॥१॥
कलियुगी जग आत्याती करिती । साहवेना कीं यासी कांहीं केल्या ॥२॥
पापी उद्धरिले पतित तारिले । जड पावविले मोक्षपंथीं ॥३॥
नामा म्हणे याचें करितां समाधान । कळलें अंतःकरण मन यांचें ॥४॥
३३
निसंगाची संग न लगे आणिकाचा । परमार्थ हा साचा गहन केला ॥१॥
जड या जीवाचें हरविलें अज्ञान । नेले उतरुन भवसिंधु ॥२॥
ज्ञानियासि केली सिंधुसंजीवनी । जालें जनीं वनीं एक तारुं ॥३॥
नामा म्हणे सत्य बा माझ्याचें बोलणें । करी निंबलोण पदीं त्यांचें ॥४॥
३४
फार आठवतें निवृत्तीचे चित्तीं । सोपान स्फुंदती मुक्ताबाई ॥१॥
आम्हां माता पिता नित्य ज्ञानेश्वर । नाहीं आतां थार विश्रांतीसी ॥२॥
छळिलें ब्राह्मणें प्रतिष्ठानीं जातां । रेड्यामुखीं वेदांता बोलविलें ॥३॥
आला चांगदेव व्याघ्र वहान घेऊन । नेला अभिमान ज्ञानदेवें ॥४॥
नाना प्रकारचे आठविती शब्द । नामा म्हणे बोध भाविकाला ॥५॥
३५
देव म्हणे असे आठवाल फार । लागे उशीर समाधीसी ॥१॥
रुक्माबाई म्हणे याजलागी जाण । ब्रह्मीं ब्रह्म खूण मेळविली ॥२॥
अवतार हे चौघे जाले कैशापरी । सांगा आम्हां हरी उकलोनी ॥३॥
शिव तो निवृत्ती सोपान ब्रह्मास्थिती । ज्ञानदेव मूर्ति विष्णूची हो ॥४॥
ब्रह्मणी हे कळा माय मुक्ताबाई । विचारुनि पाही स्वयं मुक्ता ॥५॥
नामा म्हणे याला नाही पां उपाधी । पूर्ण हे समाधि ज्ञानदेवा ॥६॥
३६
अंतर बाहेर कळलें स्वरुपं । स्वयें नंदादीप उजळिला ॥१॥
येणें जाणें कोठें योगी पहा अवीट । सान वैकुंठ करुनि ठेवी ॥२॥
ज्ञानियाला मरण म्हणती अज्ञान । वायां तुम्ही शीण करुं नका ॥३॥
घटाचिया योर्गे प्रतिबिंब भासे । काय म्हणे नासे निरालंब ॥४॥
दर्पणाचे योर्गे दुसरें देखणें । काय मुखें दोन त्यांसी जालीम ॥५॥
दृष्याचियामुळें जीव दिसे येथें । काय पा परमार्थ विटंबले ॥६॥
तंतूचियामुळें पटाला विस्तार । काय निराकार वायां गेलें ॥७॥
रुक्मादेवीवरें केलें समाधान । नामा म्हणे मौन धरुनि ठेले ॥८॥
३७
छत्र चामरें उभा सन्मुख भोंवती । रुक्माईचा पति मध्यभागीं ॥१॥
निंबें आणि नारळ गोण्याची पोफळें । उदंड तिहीं केळें आणियलीं ॥२॥
आणिक बहुता परी घेतली सामुग्री । पीत पीतांबरी मृगछाला ॥३॥
भगवीं आभरणें घेतलें भस्म । अंगें परब्रह्य साह्य त्यासी ॥४॥
नामा म्हणे स्वामी तिष्ठताती अंगें । मेळविली सांगें साहित्यासी ॥५॥
३८
उगमापासुनी गंगा सागरासी गेली । काय दोन जालीं उदकें त्यांची ॥१॥
तैसा ज्ञानदेव जाला अनुभव । काय आम्हां देव दुरावला ॥२॥
सरिता सरोवरचे एके ठायीं झरे । लहान थोर सारे स्वरुपीं माझ्या ॥३॥
रुक्मादेवीवरें उगविलें गाबाळ । संत कृपाळ डुल्लाताती ॥४॥
नामा म्हणे येणें मोहिलें चित्त । राहिले तटस्थ चौघेंजण ॥५॥
४०
आणिक वाद्यें तेथें वाजताती अपार । उठावले भार वैष्णवांचे ॥१॥
चिद्रत्नमंडप दिसला कल्लोळ । जैसे दीपमाळ दीप ठेले ॥२॥
नक्षत्र गोंधळ उसळती भारी । चक्रें त्याजवरी उल्लाळती ॥३॥
मोतियें तोरणें लाविलीं अपार । झळकती तारे विभु ऐसे ॥४॥
नामा म्हणे देवा नवल केलें गहन । पुजाळिलें गगन ज्ञानदेवें ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : January 02, 2015
TOP