श्रीज्ञानेश्वरांची समाधी - अभंग २१ ते ३०
श्रीसंतज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेली पाहून श्रीनामदेवांना भरून आले आणि त्यांनी श्रीसंतज्ञानेश्वरांच्या स्तुतीपर हे अभंग लिहीले.
२१
कोण जाणे माझे जीवींचा कळवळा । प्रेमाश्रु डोळां लोटताती ॥१॥
अवघियांचे मन दूषित तटस्थ । लहान थोर संत वोसंडती ॥२॥
तारियेले जड बा माझ्या कीर्तनीं । आठवती मनीं गुण तुझे ॥३॥
नामा म्हणे येथें बोलवेना मज । जातसे निजगुज आवडीचें ॥४॥
२२
काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती । वेद म्हैशामुखीं वदविले ॥१॥
कोठवरी वानूं याची स्वरुप स्थिती । चालविली भिंती मृत्तिकेची ॥२॥
अविद्या मायेचा लागों नेदी वारा । ऐसें जगदोद्वारा बोलविलें ॥३॥
नामा म्हणे यांनीं तारिले पतित । भक्ति केली ख्यात ज्ञानदेवें ॥४॥
२३
अनुभव हा सागर गुह्य आणि ब्रह्म । उघडे अध्यात्म बोलियेलें ॥१॥
प्रगट हें गुह्य उकलिलें गाबाळ । केलें करतळमळ ज्ञानयानें ॥२॥
कोणाची कल्पना नुरेचि बा येथें । उघडा गुह्यार्थ सिद्ध केला ॥३॥
करणें न करणें सांगितला पंथ । तिहीं लोकीं कीर्त वाढविली ॥४॥
ज्ञान हें अंजन साधी संजीवनी । नामा म्हणे यांनीं ख्याती केली ॥५॥
२४
अहंकार पोटींचे उतरिले जहर । केला उपकार जगामाजीं ॥१॥
कामक्रोध उतें उतरिले दंभ । करपले कोंभ संशयाचे ॥२॥
विकल्पाचे पायीं घातियेली बेडी । केली ताडातोडी इंद्रियांची ॥३॥
स्वर्गादिक सुखें कमाविली रोकडीं । वैकुंठासी शिडी लावियेली ॥४॥
नामा म्हणे धन्य उभारिल्या ध्वजा । घातयेल्या शेजा सुखाधामीं ॥५॥
२५
कासाविस प्राण मन तळमळी । जैसी कां मासोळी जीवनाविण ॥१॥
दाही दिशा वोस वाटती उदास । करिताती सोस मनामाजीं ॥२॥
घातियेली घोण प्राण आला कंठीं । ज्ञानेवासाठीं तळमळीं ॥३॥
नामा म्हणे देवा वाटतसे खंती । चालली विभूति योगियाची ॥४॥
२६
नानापरी मन आवरितों भारी । कांही केल्या हरि विसर न पडे ॥१॥
दृश्यादृश्याच्या दूर केल्या गोष्टी । उघडिली दृष्टि ज्ञानदेवें ॥२॥
गीतेवरी टीका ग्रंथ केला सार । केवळ ईश्वर ज्ञानाचा हा ॥३॥
नामा म्हणे आतां देहासी विटला । स्वरुपीं पालटला ज्ञानदेव ॥४॥
२७
गंध आणि अक्षता पंचामृत उदक । धूप आणि दीप आणियेले ॥१॥
संत सज्जनांचा मिळाला समुदावो । मध्यें ज्ञानदेवो चालतसे ॥२॥
क्षेत्र प्रदक्षणा करावया उद्देशी । मुहूर्त देवापाशीं विचारिला ॥३॥
दशमीचे दिवशीं रिघावें बाहेर । हरिदिनीं जागर निशिदिनीं ॥४॥
द्वादशी पारणें सोडावे निश्चळ । नेमियेलें स्थळ सिद्धेश्वरी ॥५॥
नामा म्हणे हरि नेमिला सिद्धांत । काय माझा अंत पाहातसां ॥६॥
२८
ज्ञानेश्वरापाशीं आनंदी आनंद । नाचतो गोविंद कीर्तनासी ॥१॥
दशमीच्या दिवशीं महोत्सव आळंकापुरीं । करितसे हरि आवडीनें ॥२॥
हरिदिनीं जागरण होत सारी रात्र । बसोनि पंढरीनाथ स्वयें अंगे ॥३॥
द्वादशी पुण्यतिथी केली ज्ञानेश्वरा । पांच दिवस सारा महोत्सव ॥४॥
अमावस्ये दिवशीं केला गोपाळकाला । मग वैष्णवाला लाभ मोठा ॥५॥
नामा म्हणे देवा आनंद आळंकापुरी । कांही दिवस हरि राहा येथें ॥६॥
२९
विनविति संत आणिक सज्जन । नव्हे समाधान कांहीं केल्या ॥१॥
नानाचि प्रकार करितसे घोर । कांहीं केल्या स्थिर चित्त नव्हे ॥२॥
काय पाहावें याला विरक्त पुरुषाला । स्वरुपीं मिळाला ज्ञानदेव ॥३॥
नामा म्हणे यांचें उचंबळलें प्रेम । म्हणोनि परब्रह्म मागें पुढें ॥४॥
३०
निवृत्ति सोपान आणिक मुक्ताई । जाताती पाहीं कोणीकडे ॥१॥
देवासी गुह्यार्थ केला पां एकांत । ज्ञानदेवें हित आरंभिलें ॥२॥
नामा म्हणे अवघे बसा एकीकडे । ऐको द्या निवाडे गुज याचें ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : January 02, 2015
TOP