आमच्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गाव आहे. तो फडक्यांचा गाव. तेथे फडके इनामदार अजून राहतात. हरिपंत फडके प्रसिध्द सरदार त्यांच्यांतीलचे ते आहेत. आमच्या वडिलांचा व त्यांचा घरोबा असे. लाटवणचे बळवंतराव फडके वडिलांकडे नेहमी येत असत. आम्हां मुलांजवळ ते प्रेमाने गप्पा मारीत. त्यांना अहंकार नव्हता. फार साधे व भोळे होते. त्यांच्या बोटातील अंगठी काढून घेऊन मी लपवून ठेवीत असे. तेव्हा मला म्हणायचे, " श्याम! तुला पाहिजे की काय अंगठी?" त्यांनी असे विचारले, म्हणजे ती माझ्या बोटात मी घालीत असे; परंतु एकाही बोटात ती बसत नसे! ती खाली पडे. " अरे, जाडा हो जरा, मग बसेल हो ती. " असे मग ते हसून म्हणावयाचे.
मी दापोलीहून घरी आलो होतो. बळवंतराव व दुसरे कोणीतरी असे आमच्याकडे पाहुणे आलेले होते. दापोलीला मला वाचनाचा नाद लागला. परंतु चांगली पुस्तके मिळत ना. दाभोळकर मंडळींची पुस्तके मी वाचीत असे; परंतु काही समजत नसे. स्पेन्सरचे चरित्र मी वाचलेले थोडे मला आठवते. त्याच सुमारास रामतीर्थांचे खंड भास्करपंत फडके काढू लागले होते. माझ्यावर या फडक्यांचा लेखाम्चा फार परिणाम झालेला आहे. यांतील तेजस्वी, सोज्ज्वल, सावेश मराठी भाषा मला गुदगुल्या करी. ते भाग मी जणू पाठ केले होते. परंतु त्या वेळेस मला हे भाग मिळाले नाहीत. माझ्या कोणातरी आप्तांच्या घरी एक दिवस मी एक भाग पाहिला व तो मला फार आवडला. परंतु त्या गृहस्थांनी एकदम माझ्या हातांतून तो घेतला व म्हणाले, " तुला रे काय समजणार त्यात?" मला वाईट वाटले. त्यांच्यापेक्षा मलाच तो भाग जास्त समजला असता. कारण मी सह्रदय होतो. मी कविह्रदयाचा होतो. मायबापांनी माझी मनोभूमिका तयार केली होती. मराठीतील पोथ्या-पुराणे वाचून माझे मन प्रेमळ व भक्तिमय, श्रध्दामय व भावमय झालेले होते. मला वाटाले, "आपण भाग विकत घ्यावे." परंतु पैसे कोठून आणायचे! वर्गातील पुस्तकेही सारी मजजवळ नसत. इंग्रजी शिकत होतो; परंतु एकही कोश मजजवळ नव्हता. अंदाजाने मी शब्दांचे अर्थ काढून नेत असे. रामतीर्थांचे भाग आपणांस पाहिजेतच, असे मला वाटले.
आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांच्या खिशात पैसे होते. बर्याच नोटा होत्या. त्यांतील एक लांबवावी, असे मी ठराविले. दुसर्याचे पैसे चोरणे हे पाप होते; परंतु हे पाप करुनही पुस्तक वाचण्याने पुण्य मिळवावे, असे मला वाटले! माझ्या धाकट्या भावास मी श्लोक शिकवीत होतो.
‘आस ही तुझी फार लागली दे दयानिधे बुध्दि चांगली’
बुध्दी चांगली देण्याबद्दल मी श्लोक शिकवीत होतो; परंतु चोरी करुन बसलो होतो! माझे वडील व ते पाहुणे एकत्र बसले होते. पुन्हा पुन्हा त्यांनी नोटा मोजल्या. एक पाच रुपायांची नोट कमी!
"भाऊराव! पाच रुपये कमी भरतात.. एक नोट नाही. "ते पाहुणे म्हणाले.
नीट पाहिल्यात का सार्या खिशांतून? कोणाला दिली तर नाहीत?"
माझे श्लोक शिकवणे सारे थांबले, चोरला कोठला झोप? घरात आई जेवत होती. तिच्याजवळ जाऊन मी गप्पा मारीत बसलो.
"आई? तुला इतकासा भात कसा पुरेल? आज उरली नाही, वाटते?" मी विचारले. "बाळ, इच्छा कोठे आहे? दोन घास कसेतरी बळेच पोटात दवडावयाचे दोन धंदे झाले पाहिजेत ना? पाणीउदक करता आले पाहिजे ना? तुम्ही कधी मोठे व्हाल-इकडे लक्ष आहे सारे. " आई म्हणाली.
"आई! मी खरेच मोठा होईन. पुष्कळ शिकेन. खूप वाचीन!" मी म्हटले.
"शीक, पण चांगला हो. शिकलेले लोक बिघडतात, म्हणून भीती वाटते. फार शिकलेत नाही, फार मोठे नाही झालेत, तरी मनाने चांगले राहा. माझी मुले नसली तरी चालतील; परंतु गुणी असू देत, असे मी देवाला सांगत असते, " आई म्हणाली. ती प्रेमळ, थोर माता किती गोड सांगत होती! माझ्या अशिक्षित आईला असे चांगले चांगले विचार कसे सांगता येत, याचे मला आश्चर्य वाटे. महंमदाला लोक म्हणत, " तू देवाचा पैगंबर असशील, तर चमत्कार करुन दाखव. "तेव्हा महंमद म्हणाला, " सार्या सृष्टीत चमत्कार आहेत. मी आणखी कशाला करु?समुद्रावरुन तुमच्या लहान लहान नावा वार्याने जातात, हा काय चमत्कार नाही? त्या अफाट सागराच्या वक्षस्थलावर निर्भयपणे त्या नाचतात, डोलतात, हा चमत्कार नाही का? रानात चरावयास गेलेली मुकी गुरे तुमच्या घरी प्रेमाने परत येतात, हा चमत्कार नाही का? वाळवंटात झुळ्झुळ झरे दिसावे, वाळवंटात मधुर अशी खजुरीची झाडे असावी, हे चमत्कार नाहीत का?" असे सांगत शेवटी महंमद म्हणाला, "माझ्यासारख्या एका अडाण्याच्या तोंडातून तो कुराण वदवितो, हा चमत्कार नाही का? मित्रांनो, माझ्या आईच्या मुखातून तो कुराणच बोलवीत होता. कुराण म्हणजे पिळवटून निघालेले उदगार. आईसुध्दा कळकळीनेच मला सांगत होती. ह्रदय पिळवटून निघालेलेच ते शब्द होते. ह्रदयगाभार्यातील जी पवित्र शंकराची पिंडी, तिचाच तो ध्वनी होता. तिने बोलणे माझी श्रुतिस्मृती होती.
"मोठा नाही झालास, तरी गुणी हो. "थोर शब्द. ते ऐकत असतानाच माझ्या ह्रदयात मला विंचू डसत होते, साप दंश करीत होते. मित्रांनो! इंग्लंडात ट्यूडर राजे झाले. त्यांच्या कारकिर्दीत जिकडेतिकडे गुप्त पोलीस असत. एका इतिहासकाराने असे लिहिले आहे, की, "त्या वेळेस प्रत्येक उशीखाली विंचू होते. " कोठेही विश्वासाने डोके ठेवावयास त्या राज्यात जागा नव्हती. ह्रदयाच्या राजातसुध्दा विंचू आहेत. ते तुम्हांस झोपू देत नाहीत. सारखे तुमच्या पाठीमागून येत असतात. कोठे पाताळात गेलात, मेलात, तरी ते गुप्त दूत आहेतच. सदसव्दिवेकबुध्दीची टोचणी ती सदैव आहेच आहे.
"घरात तर कोणी आले नाही. चमत्कारच म्हणावयाचा!" वडील म्हणाले.
"श्यामला वगैरे विचारा, कोणी मुलगा वगैरे आला होता का? वाईट असतात काही मुले. अलीकडे मुलांना वाईट सवयी लागत आहेत. लहानपणीच विडी व विडा यांशिवाय त्यांचे चालत नाही. श्याम! अरे श्याम!" बळवंतरावांनी हाक मारली.
मी गेलो. "काय?" मी विचारले. बळवंतराव म्हणाले, " श्याम! तुझा कोणी मित्र वगैरे आला होता रे? एक नोट नाहीशी झाली आहे."
मी म्हटले, " नाही, बोवा. मीच आज बाहेर खेळावयास गेलो होतो. संध्याकाळी आलो. कोणी आले नव्हते."
वडील म्हणाले, " श्याम! तू तर नाही घेतलीस? घेतली असलीस तर सांग."
"छे हो! कसा घेईल?" बळवंतराव म्हणाले.
आई हात धुऊन आली. तिलाही सारा प्रकार कळला. वडिलांनाच चुटपट लागली. स्वत:च्या घरात पैसे नाहीसे होणे म्हणजे ती लाजच होती. वडिलांनी पुन्हा मला विचारले. " श्याम! अगदी खरेच नाही ना घेतलेस पैसे तू? कंपासपेटी किंवा कशाला घेतले असशील? कंपासपेटीसाठी पैसे मागत होतास."
आई म्हणाली, " श्याम नाही हो घ्यायचा. तो रागावला रुसला, तरी कोणाच्या वस्तूस हात लावावयाचा नाही. मागे एकदा एक वडी घेतली होतीन त्याने. तेव्हा विचारल्याबरोबर त्याने कबूल केले व म्हणाला, " मी घेतली हो, आई." श्याम घेणार नाही व घेईल, तर कबूल करील. "श्याम! तू नाही ना बाळ हात लावलास?"
आईचा माझ्यावर केवढा विश्वास!" आधी घेणार नाही, घेईल, तर कबूल करील." तिची माझ्यावर केवढी श्रध्दा! आईचा विश्वासघात मी करु का? तुकारामाच्या एका अभंगात आहे :
‘विश्वासाची धन्य जाती’
ज्याच्यावर विश्वास टाकता येतो, त्याची जात धन्य होय. ते लोक धन्य होत. माझा असत्याचा किल्ला ढासळला. आईच्या साध्या व श्रध्दामय शब्दांनी माझा किल्ला पडला, जमीनदोस्त झाला.
माझ्या डोळ्यांतून पाणी येऊ लागले. त्या दुबळ्या अश्रूंनी पाप-पर्वत पडला. " श्याम, रडू नकोस. तू घेतलेस म्हणून का मी म्हटले? तू नाहीस घ्यायचास. मला माहीतच आहे. उगी!" असे आई म्हणाली.
आईच्या शब्दांनी मी अधिकच विरघळलो. मी एकदम आईच्या जवळ गेलो व केविलवाणे रडत आईला म्हटले, " आई, तुझ्या श्यामनेच ती नोट घेतली आहे. ही घे ती नोट. आई, आई!"
माझ्याने बोलवेना. आईला वाईत वाटले. " माझा मुलगा घेणार नाही!" केवढा तिचा विश्वास! स्वत:च्या मुलाबद्दल तिला जो अहंकार होता. अभिमान होता, तो गेला; परंतु सर्व गेला नाही. देवाने तिची अब्रु राखली घेणार नाही; परंतु घेईल तर कबूल करील. " तिचा मुलगा सर्वस्वी कसोटीस उतरला नाही; परंतु अर्ध्या कसोटीस तरी उतरला.
"श्याम, पुन्हा नको हो हात लावू. हाच पहिला व शेवटचा हात लावलास हो. तू कबूल केलेस, चांगले झाले. उगी!" आईने माझी समजूत घातली.
बळवंतरावांनी माझे कौतुक केले. त्यांनी मला एक रुपया दिला; परंतु तोही मी आईजवळ दिला.
"श्याम! तू का रे घेतले होतेस ते पैसे?" आईने विचारले.
"आई! मोठा होण्यासाठी, पुस्तके वाचून मोठा होण्यासाठी!" मी म्हटले.
"अरे, पण पहिलीच्या पुस्तकात ‘चोरी कधी करु नये’ असे वाचलेस, ते तर अजून शिकला नाहीस? मग आणखी दुसरी पुस्तके कशाला?" माझी आई बोलली; परंतु ते बोलणे फार खोल होते.
गड्यांनो! पतंजलीच्या भाष्यात, म्हणे असे एक वाक्य आहे, की"एक: शब्द: सम्यक ज्ञात: स्वर्गे लोके कामधुग्भवति ।" एकच शब्द; परंतु जर त्याचे नीट ज्ञान झाले असेल, तर मनुष्याला मोक्ष मिळतो. " सम्यक ज्ञात:" नीट समजलेला; वाचलेला नव्हे, घोकलेला नव्हे, तर समजलेला. जे खरोखर समजले, ते आपण अनुभवात आणतो, आचरणात आणतो. लहान मूल कंदिलाला धरु पाहते, कंदिलाची काच तापलेली असते. आई लेकराला दूर करते. पुन्हा ते कंदिलाजवळ जाते. शेवटी आई म्हणत, " लाव,लाव हात!" ते लहान मूल हात लावते. हाताला चटका बसतो. पुन्हा ते मूल काच धरीत नही. ते ज्ञान पक्के झाले. सॉक्रेटिस म्हणूनच ज्ञानाला सदगुण म्हणतो. संस्कृतमध्येही परमज्ञानाला अनुभूती हा शब्द लावतात. अनुभूती म्हणजे अनुभव. जे जीवनात अनुभवितो, तेच ज्ञान. "चोरी करु नये" हे वाक्य मी पढलो होतो; परंतु शिकलो नव्हतो. सत्य, दया, प्रेम अहिंसा, ब्रह्मचर्य-लहान शब्द. आपण पटकन ते उच्चारतो; परंतु त्यांची अनुभूती व्हावयास शेकडो जन्मही पुरणार नाहीत!