मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|
रात्र सतरावी

श्यामची आई - रात्र सतरावी

’श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


"मी लहानपणी पोथ्यापुराणे पुष्कळ वाचली; परंतु संस्कृत स्तोत्रे वगैरे मला फारशी येत नव्हती. प्रणग्य शिरसा देवं...अनन्तं वासुर्कि शेषं,...अच्युतं केशवं विष्णु..., अशी दोन-चार लहान लहान स्तोत्रेच येत होती. ’अनन्तं वासुर्कि ’ हे नागाचे स्तोत्र आहे. ते एका नागपंचमीच्या दिवशी आजोबांनी मला शिकविले होते. परंतु रामरक्षा हे अप्रतिम स्तोत्र मला काही येत नव्हते. विष्णुसहस्त्रनाम मी रोज वडिलांच्या पुस्तकावरुन म्हणत असे. त्यामुळे तेही मला पाठ होऊन गेले होते. वडिलांना रामरक्षा येत होती; परंतु त्यांनी ती मला शिकविली नाही. रामरक्षेचे पुस्तकही आमच्याकडे नव्हते. मी लहानपणी रामाचा भक्त असल्यामुळे रामरक्षा आपल्याला येऊ नये, याचे मला वाईट वाटे."
आमच्या शेजारी गोविंदभटजी परांजपे राहात होते. त्यांचा एक मुलगा भास्कर, त्याच्याजवळ रामरक्षेचे पुस्तक होते. तो रोज एक-दोन श्लोक पाठ करीत होता. संध्याकाळ झाली. म्हणजे भास्कर आमच्याकडे येऊन ते श्लोक म्हणे, ते ऐकून मला लाज वाटे व भास्करचा राग येई. आपला अहंकार  दुखावला गेला की, आपणांस राग येत असतो. आपण नेहमी आपल्या भोवती असणारांची स्वत:बरोबर तुलना करीत असतो. या तुलनेत आपण जर हिणकस ठरलो, तर आपणाला राग येत असतो. उंच मनुष्य पाहून जो खुजा बुटबैंगण असतो, त्याला त्याचा तिरस्कार वाटतो. आपल्याहून दुसरा हुशार आहे, असे पाहून आपण  दु:खी होतो. भास्करला रामरक्षा येते, याचे मला वैषम्य वाटे आणि तो मुद्दामच परवचा, स्तोत्र वगैरे म्हणण्याच्या वेळेस आमच्याकडे येऊन ते श्लोक जरा ऐटीने म्हणे. त्यामुळे मला जास्तच चीड येई. हा आपणांस मुद्दाम चिडविण्यास ऐटीने येतो, असे पाहून मी फार संतापे.
एके दिवशी भास्कर मला म्हणाला, " श्याम! आता दहाच श्लोक माझे राहील. आणखी पाच-सहा दिवसांनी माझी सारी रामरक्षा पाठ होईल. तुला कोठे येते?"                                                    
मी एकदम संतापलो व चिरडीस गेलो. मी त्याच्या अंगावर धावून गेलो व ओरडलो, " भाश्या! पुन्हा येशील तर बघ मला असे हिणवायला. तुम्हांस येते ते आहे माहीत आम्हांला. एवढी ऐट नको. तुमच्याजवळ पुस्तक आहे म्हणून. माझ्याजवळ असते तर तुझ्याआधी पाठ केली असतो.. मोठा आला आहे पाठ करणारा. जा आपल्या घरी. येऊ नको आमच्याकडे. मी मारीन नाही तर "
आमची शब्दाशब्दी व बाचाबाची ऐकून आई बाहेर आली. तिने भास्करला विचारले, " काय रे झाले भास्कर? श्यामने का तुला मारले?"
भास्कर म्हणाला, " श्यामच्या आई ! मी नुसते म्हटले, की आणखी पाच-सहा दिवसांनी सारी रामरक्षा माझी पाठ होईल, तर तो एकदम चिडून माझ्या अंगावर धावून आला व म्हणे, तुला मारीन, नाही तर चालता हो.
आई माझ्याकडे वळून म्हणाली, ’ होय का रे श्याम? असे आपल्या शेजारच्यांना म्हणावे का? तूच चारदा त्यांच्याकडे जाशील."
मी रागातच म्हटले, " तो मला मुद्दाम हिणवायला येतो, ‘तुला कोठे येते रामरक्षा?’ असे मला हिणवीत तो म्हणाला. विचार त्याला, त्याने असे म्हटले की नाही ते जसा अगदी साळसूद. स्वत:चे काही सांगत नाही. खोटारडा कुठला."
आई म्हणाली, "मला रामरक्षा येते व तुला येत नाही. असे त्याने म्हटले, यात रे काय त्याने चिडविले? खरे ते त्याने सांगितले. आपला कमीपणा दाखविला म्हणून रागवावे कशाला? तो कमीपणा दूर करावा. तू सुध्दा रामरक्षा शिकावी असे भास्करला वाटते, म्हणून तो तुला चिडवितो. रामविजय हरिविजय पुन्हा पुन्हा वाचतोस, पण रामरक्षा पाठ का नाही करीत?"
मी म्हणालो, "भाऊ शिकवीत नाहीत. व मजजवळ पुस्तक नाही."
आई म्हणली, " भास्करचे पुस्तक आहे ना, ते त्याला नको असेल तेव्हा घेत जा. नाही तर त्याच्या पुस्तकावरुन ते उतरुन घे व पाठ कर."
भास्कर आपल्या घरी गेला व मी मनातल्या मनात काही निश्चय करीत होतो. येत्या रविवारी सारी रामरक्षा उतरुन घ्यावयाची, असे मी ठरविले. मी कोरे कागद घेऊन त्यांची वही शिवली. लेखणी चांगली तयार करुन ठेवली व रविवारची वाट पाहात बसलो. रविवार उजाडताच मी भास्करच्या घरी गेलो. भास्कर कदाचित पुस्तक देणार नाही, म्हणून एकदम भास्करच्या आईजवळ मी गेलो व तिला गोड शब्दांत म्हटले, "भीमाताई! भास्करला रामरक्षेचे पुस्तक आजच्या दिवस मला द्यावयाला सांगता का? मी रामरक्षा उतरुन घेणार आहे. मला पाठ करावयाची आहे. आज सुट्टी आहे. मी सबंध दिवसभर लिहून काढीन."
भीमाताईंनी भास्करला हाक मारिली व त्या म्हणाल्या, "भास्कर! श्याम एवढा मागतो आहे, तर आजच्या दिवस दे त्याला पुस्तक. तो काही फाडणार बिडणार नाही. शाईचे डाग वगैरे नको, हो, पाडू, नीट जपून वापर. दे रे त्याला" परंतु भास्कर देण्यास तयार नव्हता. तो म्हणाला, " आज सुट्टी असल्यामुळे उरलेली सारी रामरक्षा मी पाठ करणार आहे. मी नाही त्याला देणार पुस्तक. माझे पाठ करावयाचे राहील."
भीमाताई भास्करवर रागावल्या,"तुझे अगदी आजच अडले आहे, नाही का रे? उद्या परवा पाठ कर. तुझ्या शेजारच्या श्याम ना? त्याच्याजवळ, कसली अढी दाखवितोस?दे त्याला, नाही तर बघ." भीमाताईंचा राग भास्करला माहीत होता. भास्करने रागारागाने ते पुस्तक मला आणून दिले.
मी ते पुस्तक घेऊन घरी आलो. लिहावयास एकांत मिळावा, म्हणून गुरांच्या गोठ्यात जाऊन बसलो! गुरे चरावयास गेली होती. दौत, लेखणी, वही, सारे सामान सिध्द होते. रामरक्षा लिहावयास सुरुवात केली. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत बहुतेक रामरक्षा लिहून झाली. दुपारची जेवणे होताच पुन्हा लिहावयास बसलो. लिहिणे संपले, त्या वेळेस मला किती आनंद झाला होता, केवढी कृतार्थता वाटत होती. माझ्या हाताने लिहून काढलेली रामरक्षा! माझ्या आईच्या माहेरी जुन्या वेदादिकांच्या हस्तालिखित पोथ्या किती तरी होत्या. ठळक, वळणदार अक्षर, कोठे डाग नाही, अशा त्या पोथ्या मी पाहिल्या होत्या. पूर्वी हिदुस्थानात सर्वत्र हातांनीच पोथ्या-पुस्तके लिहून घेत. सर्व जगात तीच पध्दत होती व ज्यांचे अक्षर मोत्यासारखे सुंदर, त्याला मान मिळत असे. मोरोपंताच्या चरित्रात काशीतील किती तरी हस्तलिखित ग्रंथ त्यांनी स्वत:साठी स्वत:लिहून घेतले होते, ते दिले आहे. त्या काळात आळस माहीत नव्हता. छापखाने नव्हते. पुस्तकांची टंचाई. काशीहून पुस्तके मोरोपंत बारामतीस बोलावून घेत व त्यांचे हस्तलिखित करून पुन्हा काळजीपूर्वक परत पाठवीत! समर्थांच्या मठांतून ग्रंथालये असत व हजार हजार पोथ्या हस्तलिखितांच्या ठेवलेल्या असत. आज छापखाने गल्लोगल्ली आहेत, पुस्तकांचा सुकाळ आहे; तरीही ज्ञान बेताबाताचेच आहे. मनुष्याचे डोके अजून खोकेच आहे. जीवन सुधारले किंवा सुसंस्कृत झाले, अधिक माणुसकीचे झाले, अधिक प्रामाणिकपणाचे व कर्तव्यदक्षतेचे झाले, अधिक त्यागाचे व प्रेमाचे झाले, असे दिसत नाही. परंतु ते जाऊ दे.
"काय, रे श्याम! इतक्या लवकर लिहून झाले? भीमाताईने विचारिले.
मी म्हटले, हो! ही पाहा वही. भास्करला दुपारुन पाठ करावयास पुस्तक हवे, म्हणून मी सारखा लिहितच होतो."
"वा! छान आहे तुझे अक्षर. आता पाठ कर, म्हणजे भास्कर चिडवणार नाही." ती म्हणाली.
मी घरी आलो व रामरक्षा सारखी वाचीत होतो. एका आठ्वड्यात पाठ करुन टाकावयाची, असे मी ठरविले. पुढच्या रविवार वडिलांना एकदम चकित करावयाचे, असे मी ठरविले. पुढच्या रविवारी वडिलांना एकदम चकित करावयाचे, असे मनात मी योजिले. रोज मी रामरक्षेची किती पारायणे करीत होतो, देवच जाणे, परंतु वेळ मिळताच वही हातांत घेत असे, मला संस्कृत व्याकरण येत नव्हते, तरे मला पुष्कळ अर्थ समजत होता व पाठ करताना खूप आनंद होत होता.
शेवटी दुसरा रविवार आला. माझी रामरक्षा पाठ झाली होती. संध्याकाळी वडील केव्हा बाहेरुन येतात व मी त्यांना रामरक्षा म्हणून केव्हा एकदा दाखवितो, असे मला झाले होते. शेवटी संध्याकाळ झाली. घरात दिवे लागले व आकाशात तारे चमचम करु लागले. मी अंगणात फ़ेर्‍या घालीत रामरक्षा मनातल्या मनात म्हणून बघत होतो. वडील आले व हात-पाय धुऊन घरात गेले.
त्यांनी विचारिले, " काय, श्याम! परवचा, स्तोत्र वगैरे झाले का सारे?"
मी एकदम म्हटले," हो, सारे झाले. तुम्ही माझी रामरक्षा म्हणून घेता का?"
ते एकदम म्हणाले, " तू कधी शिकलास? आणि कोणी शिकविली?"
मी सांगितले, " भास्करच्या पुस्तकावरुन मी उतरुन घेतली व पाठ केली."
"बघू दे तुझी रामरक्षेची वही, "ते कौतुकाने म्हणाले.
मी माझी वही त्यांच्यापुढे ठेविली. वहीची पाने सुंदर आखरलेली होती. डाग कोठे नव्हता. परंतु अक्षर किरटे होते.
वडील म्हणाले, "शाबास, अक्षर नीट आहे; परंतु जरा लांबट काढावे. असे बुटके काढू नये. म्हण पाहू आता."
मी रामरक्षा खडाखड म्हणून दाखविली. वडिलांनी माझ्या पाठीवरुन हात फ़िरविला. त्यातील आनंद---तो कसा वर्णन करुन सांगता येईल?
जेवणे होऊन वडील बाहेर गेले व मी आईजवळ गेलो. "आई, बघ; कशी आहे माझी वही? मी तुला कोठे दाखवली होती? मी तुझ्यावर रागावलो होतो. "असे प्रेमाने म्हटले.
आई म्हणाली, "तू उतरुन घेतलेस, हे मला माहीत होते. तुझे अक्षर बघावे, म्हणून कितीदा मनात येत होते. परंतु तू आपण होऊन दाखविशील, अशी मला आशा होती. तू मला त्या रविवारीच दाखवायाला हवी होतीस! आपण चांगले केलेले आईला दाखवायचे नाही तर कोणाला? वाईटाबद्दल आई रागावेल, परंतु चांगले केल्याबद्दल आई जितके मनापासून कौतुक करील, तितके कोण करील? आपला मुलगा गुणी होत आहे, याचा आनंद आईला किती होत असेल? तो माझा आनंद तू माझ्यापासून आठ दिवस लपवून ठेवलास. रोज वाटे, श्याम आज आपली वही मला दाखविल व मी त्याला पोटाशी धरीन. परंतु आईवर रागावलास! होय ना! आईला वही दाखविली नाहीस. बरे,पण जाऊ दे. आता झाली की नाही रामरक्षा पाठ? पुस्तक नाही, म्हणून रडत बसला असता, तर झाली असती का? अरे, आपल्याला हात, पाय,डोळे सारे आहे. स्वत:च्या पायांवर उभे राहावे. ज्याला बुद्धी आहे, मनात निश्चय आहे, त्याला सारे काही आहे. असाच कष्ट करुन मोठा हो. परावलंबी कधी होऊ नको. परंतु त्यात एक गोष्ट लक्षात ठेव. दुसर्‍यापेक्षा आपल्याला अधिक काही येते, या गर्वाने कोणाला हिणवू नकोस. कोणाला तुच्छ लेखू नकोस. दुसर्‍यालाही आपल्या जवळचे द्यावे व आपल्यासारखे करावे." असे बोलून आईने वही हातात घेतली. तिला आनंद झाला. कृतार्थता वाटली."या पहिल्या पानावर रामाचे चित्र असले, की झाली खरी रामरक्षा! तो मोहन मारवाडी देईल तुला चित्र. त्याच्या दुकानातील कापडावरुन असतात. माग त्याच्याजवळ व चिकटव. तू आज देवाला फार आवडशील, हो श्याम! कारण तू स्वत: कष्ट करुन, सारे लिहून काढून त्याचे स्तोत्र पाठ केलेस!"

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP