मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|
रात्र एकविसावी

श्यामची आई - रात्र एकविसावी

’श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


"आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे; तिचे नाव व्दारकाकाकू. आमचे वडील वेगळे झाले, तेव्हा ती वडिलांकडे राहावयास आली. तिचे शेतभात होते. त्याची व्यवस्था वडील बघत. वडिलांवर तिचा लोभ होता. म्हणून ती वडिलांकडे राहत असे. या आजीचे नाव आम्ही ‘दूर्वांची आजी’ असे पाडले होते. चातुर्मास्यात बायका देवाला दूर्वांची लाखोली वाहतात, कोणी पारिजातकाची लाख फ़ुले वाहतात, कोण बट्मोगर्‍याची लाखोली वाहतात, असे चालते. जिला दूर्वांची लाखोली वाहण्याची इच्छा असते, ती इतर बायकांना दूर्वा तोडावयास बोलावते व त्यांच्या मदतीने लाखोली पुरी करते. आमची आजी या कामासाठी नेहमी तयार असे ‘तुका म्हणे व्हावे सत्यधर्मा साह्य ’ चांगल्या कामाला नेहमी मदत करावी. चांगल्या कामात कोणाला निरुत्साह करणे म्हणजे मोठे पाप आहे. ‘घातलीया भय नरका जाणे’ हे काम होणार नाही, तुला त्रास पडेल, अशी भीती जो घालतो, तो नरकास जातो. सत्कर्म सिध्दीस जावे म्हणून सर्वांनी झटावे. आमची आजी कोणाही बाईसाठी दूर्वा खुडायच्या असोत, तेथे हजर. आम्हांस जर कोणी विचारले, ’आजी कोठे आहे’, तर आम्ही सांगावे, ‘गेली दूर्वाना’ असे करता करता त्या आजीचे नावच मुळी ‘ दूर्वांची आजी’ असे पडले. आम्ही मोठे झाल्यावरही तिला दूर्वांची आजी असेच म्हणत असू.
दूर्वांच्या आजीमध्ये अनेक गुन होते. उन्हाळ्यामध्ये जर पाणी आटले, तर खोल विहिरीत उतरुन ती तपेल्याने पाणी घागरीत भरी व आई वर ओढून घेई. रात्रीची ती शेतावर एकटी राखण करी. एकदा तिने चोर पकडले होते! तिला भीती ही वस्तूच माहीती नव्हती. तिला अंगारा मंतरता येत असे. मुले आजारी पडली, गुरे एकदम दूध देतनाशी झाली, तर आजीकडे अंगारा यावयाचा. अंगारा जपत असता तिला जर सारख्या जांभया आल्या,तर दृष्ट फार वाईट पडली, असे ती म्हणे. गुरांच्या अंगार्‍याबरोबर पेंडीचा तुकडा आणीत. तो मंतरलेला पेंडीचा तुकडा म्हशीस वा गाईस खावयास द्यावयाचा. दूर्वांच्या आजीस दुखत असलेल्या भागास तेल चांगले लावता येत असे. कोणाचे पाय वळत असले, पोट दुखत असले, पाठीत कळा येत असल्या, तर दूर्वांच्या आजीस तेल लावावयास बोलावणे यावयाचे. तिने चोळले, की गुण यावयाचा. तिच्या हातात जणू धन्वंतरी होता. माझे डोळे बिघडले होते, तेव्हा माझ्या तळपायास रोज गाईचे दूध ती चोळीत असे व भराभर ते जिरवीत असे.
दूर्वांच्या आजीजवळ सर्व प्रकारचे बी-बियाणे असावयाचे.तिच्याजवळ एक मोठे नळकांडे होते. त्यात भेंडी, पडवळ, सहस्रफळी, दोडका, चिबूड, काकडी, कारेती इ. सर्व प्रकारचे बी असावयाचे. सोंगट्यांनी किंवा कवड्यांनी खेळण्यात ती पटाईत होती. कवड्यांच्या खेळासाठी खडूने नाटसुध्दा ती जमिनीवर किती आखल्यासारखे काढी. रेषा सरळ असावयाच्या. मंगळागौर वगैरे असली, म्हणजे दूर्वांची आजी तेथे असावयाची. मुलामुलींना नाना प्रकारचे खेळ खेळावयास ती लावावयाची. आगीनपासोड्याचा खेळ तिच्या आवडीचा. या खेळात मुले पांघरुणात लपवावयाची असतात व दुसर्‍या बाजूकडच्या माणसाने येऊन कोण कोण लपविलेली आहेत, त्यांची नावे सांगावयाची. आजी आम्हांला लपवावयाची लपणारा मुलगा किंवा मुलगी अंगाने मोठी असल्यास ती सांगावयाची "जरा लहान हो. अंग चोरुन घे. " लपणारा लहान असला, तर त्याला ती सांगे, ‘जरा मोठा हो! " हेतू हा, की ओळखायला कठीण जावे. हा खेळ मोठा गमतीचा. दूर्वांच्या आजीला देवादिकांची, तशीच देवावरची किती तरी गाणी येत असत. दशावतार, चिंधी, उषाहरण, पारिजातक किती तरी गाणी तिला येत.
दूर्वांच्या आजीचे घरातील रोजचे काम म्हणजे भाजी चिरण्याचे असे. लहान मुले असली, तर ती खेळवावयाची, हेही काम असे, त्या दिवशी आमच्या घरी भाजणी करावयाची होती. भाजणी दळताना जाते जड जाते. आजी हात लावील, ह्या भरवशावर आईने भाजणी कराण्याचे ठरविले होते; परंतु आजी जरा लहरी होती. आदल्या दिवशी तीच म्हणाली होती, " उद्या करु हो भाजणी." परंतु उजाडत आजीला खर्‍यांकडून बोलावणे आले. खर्‍यांकडे आजीचे दूरचे माहेरचे नाते होते. मधून मधून ती त्यांच्याकडे जात असे. बाकी आजी म्हणजे गावाआजी होती. सर्वांकडे तिचा घरोबा व सारी जणे तिला बोलावीत असत. खर्‍यांच्या घरी काही पापड घालण्याचे काम होते, म्हणून आजीला तिकडेच जेवायला वगैरे व पापड घालण्यास बोलावण्यासाठी तो मनुष्य आला होता. आजीने त्या माणसाला "येत्ये. तू जा" असे सांगून पाठविले.
आई राग आला. आता भाजणी कशी होणार? जाते कसे ती एकटी ओढणार?
आई आजीला म्हणाली,"तुम्ही जाणार, येथे भाजणी कशी होईल?"
"मी काय पत्कर घेतला आहे, की काय, तुझ्या कामाचा? वाहवा?वाहवा ग! म्हणे, भाजणी कशी होईल? माझ्याने नाही ओढवत जाते, समजलीस," आजी मोठ्याने बोलू लागली.
आईलाही चेव आला, संतापली ती. " म्हणे, ओढवत नाही! तुम्हांला लोकांकडे काम करायला शक्ती आहे. घरी तेवढे हात मोडतात! सार्‍या गावाने चांगले म्हणायला हवे ना; परंतु येथे हात लावतील तर शपथ! येथे काम कराल, तर बाटाल जशा! येथे जरा हात लावायला हात दुखतात. येथे घरी अयाई ग, बया ग, परंतु लोकांकडे उभे राहून पोहे कांडाल व कमरेवर हांडे घेऊन पाणी भराल! ढोंग आहे सारे तुमचे, ढोंग."
"हो, करणार लोकांकडे काम करणार. तू कोण मला बोलणार? मी का तुझ्या घरचे खाते आहे? माझे शेत आहे. तू मला, येश्वदे, असे बोलत जाऊ नकोस. ते माझ्या कामा येणार नाही. म्हणे, लोकांकडे काम करतात. तुम्हांला असतील लोक मला नाही कुणी लोक. जशी तुम्ही; तशीच खर्‍यांकडचीही. ढोंगी-कोणाला, गं, म्हणतेस ढोंगी! असले नव्हते बाई कधीच कोणाचे ऐकून घेतले बोलणे! फारच शेफारलीस तू. "आजी भांडू लागली.
"मग काल कशाला सांगितले उद्या करु भाजणी, म्हणून? मी तयारी केली, जाते धुऊन ठेवले. परंतु आयत्या वेळी तुमचा पाय आपला तिसरीकडेच! दुसर्‍याला तोंडघशी पाडता येते तुम्हाला. आम्ही मेले मरमर करावे तर तुम्ही जरा हातही लावू नये का? " आई म्हणाली.
"मी का हात लावीत नाही? शर्थ आहे बाई, तुझ्या बोलण्याची! नाही जात खर्‍यांकडे, हो तुझ्या डोळ्यांत खुपत असेल, तर नाही जात! जगाने चांगले म्हणावे म्हणून मी हपापल्ये, होय? बाई, तू चांगले म्हण."
मित्रांनो! पुष्कळ लोकांचे असे स्वभाव असतात की, ते घराबाहेर फार साळसूद असतात. दुसर्‍याकडे ते चार धंदे करतील; परंतु घरी इकडची काडी तिकडे करावयाचे नाहीत. लोकांच्या स्तुतीला, बाहेरच्या जगाच्या स्तुतीला, मनुष्य लालचावलेला असतो, घरच्यांना तळमळत ठेवून तो बाहेरच्या दुवे घेण्यासाठी जात असतो. हे त्याचे करणे प्रेमामुळे नसते, तर स्वार्थामुळे. वाहवा मिळावी म्हणून असते आणि म्हणून ते त्याज्य होय. माझ्या आईच्या म्हणण्यात बरीच अतिशयोक्ती असली तरी त्यात थोडे तथ्यही होते.
आई  व आजी यांची भांडणे अशी नेहमी होते असत. ते काही नवीन नव्हते. परंतु त्यांचे भांडण फार वेळ टिकत नसे. परस्परांच्या मनात जमलेले विष ओकून बाहेर पडे, घाण बाहेर निघून जाई व पुन्हा मने स्वच्छ होत. वादळ येते, ते शांत होण्यासाठी येते. रोग येतात, ते शरीरातील घाण जाळण्यासाठी येतात व मरण येते, ते पुन्हा जीवनरस देण्यासाठी येते.
माझी आई शांत झाली. बोलोनाशी झाली. आजीचे थोडा वेळ सुरुच होते मधून मधून. "लोकांकडे म्हणे काम करतात. माझे हात, मी वाटेल तेथे काम करीन. तू कोण माझ्यावर लादणार, सक्ती करणार?
तुला का माझा हेवा? मला लोक वोलवतात, तर तुला का मत्सर?"
आईचे तोंड बंद झाले, म्हणून आजीचेही बंद झाले. थोड्या वेळाने आई आजीजवळ गेली व म्हणाली, " मी चुकल्ये, हो. बोलू नये ते बोलल्ये. तुम्हांला मी कोण बोलणार? तुम्ही किती मोठ्या ! परंतु अलीकडे या सार्‍या दगदागीने, काळजीने व दुखण्यांनी मी अगदीच वेंगल्ये आहे. मला नाही राहात मग सुमार. भान जणू मी विसरल्ये. मी मग कोणाला बोलत्ये, याची शुध्दही मला राहात नाही. मेले, असले जगून तरी काय करायाचे? चुकल्ये हो."
"जगून काय करायचे, असले अभद्र काय ग बोलतेस? तुझी पोरेबळ आहेत अजून लहान. तू नाही जगलीस तर त्यांचे कोण करील? पुष्कळ जग. मुलाबाळांची लग्ने होऊ देत. सुना घरात येऊ देत, वेडेविद्रे नको बाई मनात आणू ! तू बोललीस म्हणजे मलाही जोर येतो. मागाहून वाईट वाटते." आजी म्हणाली.
"तुम्ही जा खर्‍यांकडे. येत्ये म्हणून कळविले आहेत तुम्ही, तर जा. भाजणी उद्या होईल. तसेच जात धुतलेले ठेविले, म्हणजे झाले. वरती दुसरे काही दळले नाही, की झाले. तुम्हांला आज चहा देत्ये करुन; म्हणजे दम नाही लागणार. आज गारवा आहे बाहेर फार." आई गोड बोलली.
अलीकडे घरात चहाची पूड असे. कधी कोणी आजारी असले. कोणाला दमा लागला, तर आई करुन देई. आईने दूर्वांच्या आजीला तिचे रामपात्र भरुन चहा दिला. आजीच्या राग गेला. आजी खर्‍यांकडे जावयास निघाली व जाताना म्हणाली"जात्ये, ग, येश्वदे. रागावू बिगावू नकोस, हो मनात धरु नकोस."
"तुम्हीच नका धरु मनात, म्हणजे झाले. कशा झाल्यात तरी तुम्ही वयाने मोठ्या. मी तुमच्या सुनेसारखी, लेकीसारखी, माझे बोलणे पोटात घालीत जा. " आई म्हणाली.
आजी गेली व आई घरकाम करु लागली. मित्रांनो! माझी आई म्हणजे निर्दोष नव्हती. दोष कोणाच नाहीत? चुका कोण करीत नाही? निर्दोष फक्त एक परमेश्वर. बाकी सर्वांना चुकांची भूषणेच अंगावर घालून त्या जगन्माऊलीसमोर जावयाचे आहे! चुका हे मानवाचे भूषण व क्षमा हे देवाचे भूषण. माझी चुका करी; पण सावरुन घेई. चुका करण्यातच ती ऐट मिरवीत नसे."

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP