मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|
रात्र तेविसावी

श्यामची आई - रात्र तेविसावी

’श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


"मे महिन्याच्या सुटीत मी घरी गेलो होतो. इंग्रजी चवथीत मी गेलो होतो. मी घरी गेलो, म्हणजे आईला आधार वाटे. कारण ती नेहमी आजारी असे. एक दिवस ताप येई; दुसर्‍या दिवशी ताप निघाला, की ती पुन्हा कामाला लागावयाची. ताप आला की निजावयाचे, ताप निघताच उठावयाचे. ती फार अशक्त झाली होती. मी आलो, म्हणजे तिला बरे वाटे. मी तिला पाणी भरण्यास, धुणे धुण्यास मदत करीत असे. अंगणाची झाडलोट करीत असे. आईचे पाय चेपायचे, हा तर सुटीतील माझा नेमच झालेला असे.
एक दिवस बाहेर स्वच्छ चांदणे पडले होते. जेवणखाणे झाली होती. वडील जेवून बाहेर गेले होते, धाकटे भाऊ झोपी गेले होते. आईचे उष्टे, शेण वगैरे झाले. आई मला, म्हणाली, "श्याम! थोडे द्ळायचे का रे? का तुझे हात दुखताहेत? संध्याकाळी तू खणले आहेस. घोळीचा दळा केलास ना? हात दुखत असले तर नको."
मी म्हटले," मुळीच हात दुखत नाहीत. जात्याच्या खुंट्याला तुझा व माझा हात दोन्ही असतात. तुझा प्रेमळ हात माझ्या हाताला लागून मला शक्ती येते. चल, मी अंगणात जाते घालतो. पोत्यावर जाते घालतो." आईने घाल म्हणून सांगितले.
मी अंगणात जाते घातले. आईने दळण आणले. दुसर्‍या दिवशी आंबोळ्या करावयाच्या होत्या. मला आंबोळ्या फार आवडत असत. मायलेकरे अंगणात दळत होती व चंद्र वरुन अमृताचा वर्षाव करीत होता. मंद गार वारा सुटला होता. आई ओव्या म्हणत होती व त्या ओव्यात"श्याम बाळ" असे माझे नाव गुंफीत होती. मला आनंद वाटत होता.
द्ळण्याचे काम मला लहानपणापासून आवडते. कारण त्यामुळे आईची सेवा करता येत असे. आईबरोबर दळीत असता मी जात्यात वैरण घालावयासही शिकलो होतो.
आम्ही दळीत होतो. दळणाचा आवाज ऐकून शेजारच्या जानकीवयनी आल्या.
"बाई, हे काय, श्याम का दळतो आहे? मी म्हटले, ‘आज रात्री एकट्या कशा दळीत बसल्यात, म्हणून पाहायला आले. श्याम, हे रे काय? तू इंग्रजी ना शिकतोस?" जानकीवयनी मला म्हणाल्या.
मी आईला विचारले, " आइ! दळायला हात लावला, म्हणून काय झाले?"
आई म्हणाली, " श्याम! अरे जानकीबाई थट्टा करतात हो तुझी. त्यांचे तुझ्यावर प्रेम आहे, म्हणून पाहावयाला आल्या. अरे, काम करणाराला का कोणी नावे ठेवतील? आणि आईला मदत करण्यात रे कसली कोणाची लाज? आईला मदत करणार्‍याला हसेल, तो रानटीच समजला पाहिजे. तुझ्या भक्तिविजयात जनाबाईबरोबर प्रत्यक्ष पांडुरंग नव्हता का दळायला लागत?"
"हो, खरेच आहे! पण खरे असेल का ग ते? देव कबिराचे शेले विणू लागे, जनावाईचे दळण दळू लागे, धुणी धुऊ लागे; नामदेवाच्या पाठीमागे उभा राहून कीर्तनात टाळ वाजवी, नाचे खरे का, ग, हे सारे?" असे मी विचारले.
"बसा ना, जानकीबाई, अशा उभ्या का?" असे जानकीबाईस विनवून आई मला म्हणाली, "श्याम, अरे खरेच असेल ते. देवावर ज्यांची श्रध्दा असते व त्याचे स्मरण ठेवून जे काम करतात, त्यांना देव मदत करतो. तू मला मदत करीत आहेस. ती देवानेच पाठविली. मे महिना आला, की देव मला मदत करण्यासाठी तुझ्या रुपाने जणू येतो. अनेकांच्या रुपाने मदत करावयास देव उभा राहतो. कधी श्यामच्या रुपाने, कधी जानकीबाईंच्या रुपाने."
"आई, मला भेटेल का, गं, देव?" मी एकदम विचारले.
"पुण्यवंताला भेटतो. पुष्कळ पुण्य करावे. सर्वांच्या उपयोगी पडावे. म्हणजे देव भेटतो." आई म्हणाली.
जानकीवयनी मला म्हणाल्या, " श्याम, का बोवा वगैरे व्हायचे आहे की काय; मग शिकतो आहेस कशासाठे? इंग्रजी शिकून चांगली मोठी नोकरी कर. आईला नोकरीवर ने."
मी म्हटले, "मला साधू व्हावेसे वाटते, भक्त व्हावे, असे वाटते, आई!, ॐ नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत ध्रुव बसला होता. मी बसलो, तर मला भेटेल का देव?"
आई म्हणाली, "बाळ, ध्रुवाची पूर्वपुण्याई केवढी थोर! त्याचा निश्चय किती अभंग! बाप राज्य द्यावयास लागला, तरी तो फिरला नाही. इतके दृढ वैराग्य कोठून आणावयाचे? या जन्मी चांगला होण्याचा प्रयत्न कर. मग केव्हा तरी देव भेटेल!"
जानकीबाई म्हणाल्या, " आई, तूच जरा हात सोड. जानकीवयनी व मी दळतो. जानकीवयनी, मला वैरण घालता येते. डोळे मिटूनसुध्दा घालता येते. मी आता तरबेज झालो आडे. आई, सोड ना हात थोडा वेळ."
मी आईचा हात सोडविला व जानकीवयनी आणि मी दळू लागलो. मी वैरण घालू लागलो. "जानकीवयनी! पाहा, कसे पीठ येत आहे, ते? डोळ्यात घातले, तरी खुपायचे नाही. पाहा ना. "मी त्यांना म्हणालो.
जानकीवयनी आईला म्हणाल्या, "बाई, श्यामला तुम्ही अगदी बायकोच करुन टाकलेत!"
आई म्हणाली, "माझ्या घरात कोण आहे मदत करावयास? अजून सून थोडीच आली आहे घरात? श्याम नाही मदत करणार, तर मग कोण करील? जानकीबाई! बायकांना कधी कधी पुरुषांची कामे करावी लागतात. त्यांना कमीपणा थोडाच आहे? श्याम मला डाळ-तांदूळ निवडावयाला लागतो, धुणी धुवायला लागतो, भांडी विसळायला - सर्व कामांत मदत करतो. त्या दिवशी माझे लुगडे धुतलेन हो. मी म्हटले, ‘श्याम, लोक तुला हसतील.’तर म्हणे कसा, ’आई! तुझे लुगडे धुण्यात माझा खरा आनंद आहे. तुझी चौघडी मी पांघरतो, मग धुवावयाला का लाज वाटेल? जानकीबाई! श्यामला काही वाटत नाही. मी श्यामला बायको करुन टाकले आहे, तरी त्याला ते आवडते. "
मित्रांनो! आईचे ते स्फूर्तिमय शब्द मला अजून आठवतात. पुरुषांच्या ह्रदयात कोमलता, प्रेम, सेवावृत्ते, कष्ट सहन करण्याची तयारी, सोशिकता, मुकेपणाने काम करणे या गोष्टी उत्पन्न झाल्याशिवाय त्यांचा पूर्ण विकास झाला आहे, असे म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ह्रदयात धैर्य, प्रसंगी कठोर होणे, घरी पुरुषमंडळी नसेल, तर धीटपणे घरची व्यवस्था पाहणे, हे गुण येतील, तेव्हाच त्यांचा पूर्ण विकास झाला, असे म्हणता येईल. ह्यालाच मी लग्न म्हणतो, लग्न करुन हेच साधावयाचे. लग्न करुन पुरुष कोमलता शिकतो, ह्यदयाचे गुण शिकतो. स्त्री बुध्दीचे गुण शिकते. विवाह म्हणजे ह्यदय व बुध्दी, भावना व विचार यांचे मधुर मिश्रण, मधुर सहकार्य होय. पुरुषांच्या ह्रदयात स्त्रीगुण येणे व स्त्रीजवळ पुरुषगुण येणे म्हणजे विवाह होय. अर्धनारीटेश्वर हे मानवाचे ध्येय आहे स्वत:पुरुष अपूर्ण आहे. स्वत: एकटी स्त्री अपूर्ण आहे. परंतु दोघे एकत्र येऊन दोन पूर्ण व्यक्ती बनतात. दोन अपूर्णांच्या लग्नाने दोन पूर्ण जीव जणू बनतात. निराळे लग्न लावण्याची आई मला जणू जरुरचे ठेवीत नव्हती. प्रेम,दया, कष्ट, सेवा या स्त्री-गुणांशी आई माझे लग्न लावून टाकीत होती."

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP