मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ग्रामगीता| अध्याय तेहतिसावा ग्रामगीता प्रस्तावना अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चवदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणीसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्वीसावा अध्याय सत्ताविसावा अध्याय अठ्ठाविसावा अध्याय एकोणतिसावा अध्याय तिसावा अध्याय एकतिसावा अध्याय बत्तिसावा अध्याय तेहतिसावा अध्याय चौतिसावा अध्याय पस्तिसावा अध्याय छत्तिसावा अध्याय सदतिसावा अध्याय अडतिसावा अध्याय एकोणचाळीसावा अध्याय चाळीसावा अध्याय एकेचाळीसावा ग्रामगीता - अध्याय तेहतिसावा जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते. Tags : grama gitatukadojiग्रामगीतातुकडोजी अवतारकार्य Translation - भाषांतर ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥श्रोतियांनी केला प्रश्न । संतसंगें मिळे संतपण । ऐसें झालें निरूपण । हें तों जीवा पटेना ॥१॥संत देवाचे अवतार । आम्ही गांवचे गवार । कैसें त्यांच्या बरोबर । व्हावें आम्ही ? अशक्य हें ! ॥२॥याचें ऐका समाधान । जग झालें ईश्वरापासोन । नर तोचि नारायण । दाविली खूण संतांनी ॥३॥जन्मासि आला तोचि अवतार । अवतार सर्वचि प्राणिमात्र । त्या अवताराचे अनंत प्रकार । प्रकट होती सत्कर्मे ॥४॥ कोणी आपुलें पोटचि भरी । कोणी कुटुंबाचें पोषण करी । कोणी गांवाची काळजी निवारी । आपुल्यापरीने ॥५॥कोणी होती प्रांतव्यापी । प्रांताकरितां कष्टी-तपी । जनाकरितां वाट सोपी । करोनि द्याया हौसेने ॥६॥हे अवतार साधारण । यापुढे विशेष अवताराचें लक्षण । जो मिरवी देशाचें भूषण । शरीरीं स्वयें ॥७॥" माझा देशचि माझें घर । देश दु:खी जणुं माझेंचि शरीर । त्यासाठी मी निरतर । कष्टी होईन सांभाळाया " ॥८॥ऐसें ज्याने मनीं धरिलें । किंबहुना कार्यें अनुभवा आलें । अनेक आपत्तींनी उजळलें । सत्कार्य ज्याचें ॥९॥त्यासि म्हणावा अवतार । जो करी सज्जन-चिंता निरंतर । दुष्ट बुध्दीचा तरस्कार । सदा जयासि सक्रिय ॥१०॥ जगाचें उद्दिष्ट आहे सत्य । तिकडे जग करावें प्रवृत्त । ऐसें ज्याचें ज्याचें कृत्य । तोचि अवतार निश्चयें ॥११॥ षडगुण ऐश्वर्याच्या प्रमाणांत । अंश, पूर्ण आदि प्रकार त्यांत । ज्ञानी कर्तबगार निरासक्त । उदार श्री-यशसंपन्न ॥१२॥ या अवताराचे पंथ दोन । एक हृदयपरिवर्तन दुसरा दमन । एका क्रांति करी सशस्त्र पूर्ण । दुसरा भावभक्तीने वळवी ॥१३॥ धर्मनीति सेवामार्गे गवसिली । त्यासि संत-अवतार संज्ञा लाभली । सामदामदंडभेदाने क्रांति केली । त्यासि म्हणती देवावतार ॥१४॥ देव-अवतार नित्य नसती । ते महाप्रसंगीं पुढे येती । संत-अवतार नेहमी चालती । लोकीं सुनीति वाढवाया ॥१५॥ कांही अवतारांची महिमा । विश्वव्यापक त्यांचा आत्मा । प्रकट करण्या मानवतेची सीमा । प्रचार त्यांचा ॥१६॥ ज्यांचा जैसा अधिकार । त्यांचा चाले तैसा व्यवहार । मार्ग एकचि परि मागे-समोर । पाय अनुभवें पडताति ॥१७॥ कोणी भक्ति शिकवोनि सुधारी । मंत्र शिकवोनि जनता तारी । कोणी ज्ञानमार्ग सांगोनि समर्थ करी । मानवता लोकीं ॥१८॥ अखेर मानवांची उन्नति करणें । तयां राष्ट्रधर्म निजधर्म शिकविणें । हेंचि संतांचें असतें लेणें । सर्वतोपरी ॥१९॥ वाउगा संकल्पचि नाही उठला । स्फुरला तो अनुभवचि ठरला । त्या दिव्यदृष्टीच्या पुरुषाला । संत-अवतार म्हणों आम्हीं ॥२०॥ कोणी कुटुंबासि त्रस्त करी । कोणी गांवाचे होती वैरी । कोणी देशांत उपद्रव करी । पाखांडपंथीं ॥२१॥ जो देशद्रोही धर्मद्रोही ठरला । प्रेमाने सांगतां न समजला । सर्व प्राण्यांना त्रास झाला । ज्याच्या योगें ॥२२॥ कांही केल्या न सुधारें । शिरलें क्रूरवृत्तींचें वारें । सज्जनांचें मनहि थरारे । ज्याच्या धाकें ॥२३॥ त्याची झाली परिसीमा । तेव्हा देवावतार येतो कामा । पाठवावयासि विरामा । देहा त्याच्या निरुपायें ॥२४॥ ते दुर्जन राक्षस-अवतार । जे जनतेसि दु:ख देती फार । त्यांना दंड द्याया देव-अवतार । प्रकट होती ॥२५॥ ऐसें हें नेहमीच चालतें । जैसें जन्ममरण-रहाट फिरतें । तैसेचि संत-देव येताति ते । भूमीवरि ॥२६॥ राक्षसी आणि देववृत्ति । रूपांतरें खेळते जगतीं । संतदेव स्थापूं पाहती । शांति प्रेमशक्तीने ॥२७॥ येथे श्रोत्यांनी प्रश्न केला । जरि दुष्ट तोचि राक्षस ठरला । तरि त्याने वरदहस्त कैसा मिळविला । दैवतांचा ? ॥२८॥ काय ठावे नव्हते त्याचे गुण ? कां दिले शक्तीचें वरदान ? आम्हां न कळे हें पुराण । कैसें आहे सांगा की ॥२९॥ याचें ऐकावें उत्तर । हा राक्षसहि आधी भक्त फार । त्याच्या तपानेचि देवता निरंतर । प्रसन्न त्यासि ॥३०॥ त्याचिया गुणकर्मे मिळालें वरदान । तें सहन न झालें मागाहून । त्याचा दुरुपयोग दारुण । केला त्याने मनमाने ॥३१॥ प्रथम हाती आली सत्ता । मग भुलला तो भगवंता । लागला उपभोगाच्या पंथा । नीतिप्रवृत्ति सोडोनि ॥३२॥ त्याची राखती संत मर्जी । तंव तो अधिकचि चढे समाजीं । जनतेमनीं वाढतांहि नाराजी । पर्वा न करी अहंकारें ॥३३॥ भरावया पापांचा रांजण । त्यासि देती प्रोत्साहन । जेणें त्वरित होय निकाल पूर्ण । पंख फुतलिया उधळीपरी ॥३४॥ कितीहि साधुसंत समजाविती । परि न वळे त्याची मति । म्हणोनि देवावताराहातीं । कार्य आलें तयाचें ॥३५॥ देव-अवतार समजाविती । नाना योजना करूनि पाहती । शेवटीं शस्त्र धारण करिती । दुष्टासाठी ॥३६॥ त्याच्या मोक्षाने सुटती जन । मुक्त होती दु:खापासून । म्हणोनि करावा लागे प्रयत्न । अवतारासि निर्वाणींचा ॥३७॥ ऐसें ज्याने ज्याने केलें । दु:ख जगाचें निवारिलें । ते सर्व अवतारचि ठरले । पुराणें झालीं तयांचीं ॥३८॥ तैसें कोणी करी अजून । त्यांचीं गुणकर्मे पाहून । पूर्वीच्या थोरांचे अवतार जन । मानिती तयां ॥३९॥ तुलसीदास आधी आसक्त । ते वैराग्यें झाले महाभक्त । रामकथा गावोनि तारिलें जगत । म्हणोनि वाल्मीकि-अवतार ॥४०॥ कोणी भिन्न देवां अवतार मानिती । हेहि आहे आपुलीच भक्ति । पुढे पुढे कळेल तयांप्रति । पायर्या अवतार-कार्याच्या ॥४१॥ कोणा म्हसोबा खंडोबा मान्य । कोणी शक्तिअवताराचें करी पूजन । कोणी अवतार राम-कृष्ण । म्हणती महाविष्णूचे ॥४२॥ कोणी दश अवतार मानिती । कोणी गुरुनानक-परंपरा वानिती । कोणी तीर्थकरचि अवतार म्हणती । कोणी गणती चोवीस ॥४३॥ कोणी बुध्द-अवतार पूजती । कोणी दत-अवतारा भजती । कोणी येशु ईशपुत्रावतार समजती । जगतीं झाला ॥४४॥ कोणी म्हणे महंमद प्रेषित-अवतार । कोणी म्हणे संत अंशावतार । लोक मानिती अनंत प्रकर । किती सांगों ? ॥४५॥ याचें एकचि कारण । जो जो उन्नतीसि लागला न्यूनपूर्ण । तोचि अवतार मानिला वेगळा समजोन । सज्जनांनी ॥४६॥ कोणी ब्राह्मा-विष्णु-हर । यांसि मानिती खरे अवतार । कोणी म्हणती देवचि भूमीवर । कधी नाही प्रकट झाला ॥४७॥ देव आहे आत्मशक्ति । तो देह धारण न करी कल्पान्तीं । त्यासि जाणणें यांतचि उन्नति । मानवाची ॥४८॥ ऐसीं भिन्न लोकांचीं भिन्न मतें । सत्य सर्वांतचि उणेंपुरें तें । परि संगति कैसी लावावी यातें । विसरोनि गेले ॥४९॥ जे जे पुरुष थोर झाले । त्यांसि अवतारचि संबोधिलें । ज्यांचें ज्यांना चारित्र्य पटलें । त्यांनी मानलें त्यांलागी ॥५०॥ जुने ते सोनें विशेष ठरले । येथे कोणाचेंचि नाही चुकलें । परि ज्यांनी सत्य अनुभवलें । तेचि पावले देव-पदा ॥५१॥ कोणी म्हणती देवता अयोनिसंभव । अवतार करी चमत्कारचि सर्व । हें म्हणणें आहे अर्थगौरव । भाविकपणाचा ॥५२॥ गर्भ, नर्क, वैकुंठपुरी । यांचें महत्त्व काय देवाअंतरीं ? हें पाहोनि भांति-मोह धरी । तरि तो देव कैसेनि ? ॥५३॥ देवास वैकुंठ गर्भ सारिखे । येणें-जाणें स्वाभाविकें । सुखदु:खें एकाचि कौतुकें । राहती तयापुढे ॥५४॥ योनीद्वारें जरी प्रकटला । तरी दु:ख न वाटे त्याच्या हृदयाला । म्हणोनीच तो अयोनिसंभव मानिला । ज्ञानियांनी ॥५५॥ एरव्ही जन्ममरण सकला सारिखें । सहनशक्ति अधिकारभेद राखे । जैसें जयाचें स्थानमान देखे । तैसें निकें नाम तया ॥५६॥ सर्व अवतार मानवीच असती । परि अधिकाराऐसें कार्य करिती । त्यांची धारणा जीवन्मुक्ति । तैसीच असते सर्वदा ॥५७॥ अनेक जन्मांची संस्कार-संगति । घेवोनि येताति सांगातीं । उध्दराया जड जीवांप्रति । मार्ग दाविती अवतार ॥५८॥ परि मानवीच कार्य करणें । मानवी मार्गानेचि येणें-जाणें । मानवांच्या भूषणापरी मिरविणें । अवताराचें ॥५९॥ मानवें सर्व प्राणिमात्रा सुखवावें । सर्व कार्य सुरळीत चालवावें । एक असोनि अनंत व्हावें । उल्हास हाचि अंतरीं ॥६०॥ हें समजोनि जो वर्तला । तोचि अवतार शेवटीं ठरला । ज्याने पृथ्वीचा संबंध जोडला । एकसूत्रीं प्रयत्नें ॥६१॥ ज्यांनी सर्व विश्व सूत्रांत गोविलें । सन्मार्ग मानवमात्रा शिकविले । तेचि थोर अवतार झाले । पुढेहि होतील निश्चयें ॥६२॥ म्हणोनि अवतार हा उन्नतिवाद । अधिकार तैसा प्रकटे विशद । विश्वात्मभावें स्वयंपूर्ण सिध्द । अवतार आम्ही मानतों ॥६३॥ तोचि सर्वांसि एक करी । एक करोनि अनेकत्वीं वावरी । त्यासीच पावली पूर्णता खरी । विश्वात्म्याची ॥६४॥ एवढी विशाल ज्याची धारणा । एवढा कार्याचा व्याप जाणा । विश्वाचिया मतभेदांना । मिटवूं शके जो ॥६५॥ तोचि शेवटचा अवतार । महामानव विकासकेंद्र । आपण तयाचे अंश अंकुर । मानवधर्मी ॥६६॥ निश्चय व्हावा श्रोतियाजना । अवतार म्हणजे अतिमानव जाणा । मानवाची पूर्णता म्हणा । अवतारकार्य ॥६७॥ देवताची करावी उपासना । उपासकासीच ये अवतारपणा । ऐसाचि आहे अवताराचा बाणा । आजवरीचा ॥६८॥ यांत एकचि तारतम्य पहावें । मानवा कोणाचेनि सुख पावे । कोण समाजकार्य करी बरवें । जनमानस रंगवोनि ॥६९॥ तोचि समजावा महाभला । जो जनहितार्थी लागला । दैवी शक्तीचा सागर भरला । अंगीं ज्याच्या ॥७०॥ अवतारासि सामर्थ्य पाहिजे । आत्मबल प्रखर तयासि साजे । बोलिजे तैसेंचि कार्य कीजे । अवतार तो या जनीं ॥७१॥ ऐशा शांति-अवतारांची कीर्ति । मानवांसि संत सांगती । देव-अवतार प्रकट होती । क्रांति कराया देशामाजीं ॥७२॥ शांति-अवतार क्रांति-अवतार । या दोघांचें कार्य भिन्न सर्वत्र । एक करी सदबोध मात्र । एक करी निर्णय ॥७३॥ दोघांचीहि असे जरूरी । म्हणोनि ही योजना मानिली चतुरीं । आपणहि व्हावें अवतारी । त्यांचिया ऐसें निर्धारें ॥७४॥ नाहीतरि अरत्र ना परत्र । हेंहि म्हणतां ये अवतार-वैचित्र्य । परंतु अवतार तो अवतारकार्य । करावयासि ॥७५॥ मानवधर्मासि उजळोन । दुष्कृतिनाशा सज्जनरक्षण । करणें हेंचि अवतारलक्षण । सर्वमान्य सेवात्मक ॥७६॥ ज्यांनी जगाची सेवा केली । त्यांसीच अवतार पदवी लाभली । त्यावांचूनि अवतार बोली । ही तों आपुल्या भावनेची ॥७७॥ सेवेएवढें महत्त्व नाही । ज्ञान ध्यान वैराग्यासहि । ह्या सर्व साधनीं सफलता ही । सेवेनेचि होतसे ॥७८॥ देव-देवता जगीं आली । जपतपें करूं लागली । परि पूर्णता नाही झाली । सेवा नाही तोंवरि ॥७९॥ जेव्हा सेवाकार्य प्रकट केलें । अनंत जीव संतुष्ट झाले । तेव्हाचि अवतार तयां मानिलें । भूलोकीं या ॥८०॥ रामचंद्रें राज्य त्यागिलें । रावणा संहारूनि सज्जन रक्षिले । म्हणोनीच अवतार ठरले । सर्वतोमुखीं ॥८१॥ श्रीकृष्णें कंस मर्दिला । दुर्योधनाचा नाश घडविला । सुख देवोनि गोरगरीबांला । मगचि ठरला अवतार तो ॥८२॥ ऐसें सेवाकार्य केलें ज्याने । त्यासीच जन अवतार म्हणे । त्या कार्यलीला आठवती जीवेंप्राणें । सर्वतोपरी ॥८३॥ आठवती तेहि अवतार होती । तैसी करितां सेवाकृति । परि कोरडी सहानुभूति । ही तों नव्हें उध्दारक ॥८४॥ ज्यांनी सेवाकार्यासि जीवन दिलें । स्वानंदीं बुडोनि जगा तारिलें । तेचि संत आणि अवतार झाले । कर्तव्यशील मानव ॥८५॥ साधुसंतें सेवा केली । अनंत हृदयें संतोषविलीं । व्यवहार-उपासनेने दाविली । सिडी मोक्षमार्गाची ॥८६॥ साधुसंतें सेवा केली । जीवासि ब्रह्मप्राप्तीची ओळख दिली । तैसी सेवा पाहिजे घडली । आपणांसीहि ॥८७॥ एक संत जन्मास आला । त्याने प्रांताचा प्रांत कीर्तीने व्यापला । परि काम जनसुधारणेला । अपुरा पडला व्याप त्याचा ? ॥८८॥ याचें कारण आम्ही लोक । संदेश ऐकतांना डोळेझांक । नमस्कार करायाचें कौतुक । आमुच्यापाशी ॥८९॥ लोक करिती त्यांचा उत्सव । गाती मनोभावें गौरव । परन्तु तैसा सेवाभाव । अंगीं न आणिती आपुल्या ॥९०॥ देव घेतील अवतार । म्हणोनि वाट पाहती उतराया भार । हा दुबळेपणाचा विचार । शिरला थोर या लोकीं ॥९१॥ अरे ! हें सर्व आता विसरावें । संतीं सांगितलें तेंचि करावें । मानवाने मानवां सुधारावें । याहूनि पुण्य कोणतें ? ॥९२॥ हें पवित्र अवतारकार्य । आपणचि होऊनिया निर्भय । कां न करावें टाकोनि पाय ? लाभेल जय निश्चयाने ॥९३॥ कोणी रोगराईने मरे । त्यास कोण पुसतो सांगा बरें ? परि सेवा करितां प्राण अंतरे । लोक श्रध्दाभरें कीर्ति गाती ॥९४॥ म्हणोनि बोललों सेवक बना । ओळखा मानव म्हणोनि आपणा । घेवोनि अवतार-तत्त्वाचय खुणा । उजळा भुवना कीर्तीने ॥९५॥ नका अज्ञानामाजी दडूं । नका बायकापोरांसाठी रडूं । नका स्वार्थासाठी अडूं । निघा मानवसेवा साधाया ॥९६॥ जो आपुल्या स्वार्थासि मुकला । विश्वस्वार्थ मानितो आपुला । तोचि अवतारकार्यी लागला । मानतों आम्ही ॥९७॥ यासाठी करा आपुली उन्नति । सेवा देवोनि गांवाप्रति । गांवापासोनि विश्वाप्रति । पोहचोनि जावें ॥९८॥ आपली समज वाढवावी । पैस तेवढीं कामें करावीं । म्हणजे लाभेल अवतारपदवी । क्रमाने आपणा ॥९९॥ सेवेंतचि आहे देवभक्ति । कार्य करण्यांतचि राष्ट्रशक्ति । यानेच मिळे शेवटीं मुक्ति । अवतारदीप्ति अंगीं येई ॥१००॥ कोणालाहि न वाटावें अवघड । कैसें अवतारकार्य प्रचंड । पावतां नये ऐसें उदंड । नाहीच कांही ग्रामजनहो ! ॥१०१॥ तैसें भयचि वगळावें । म्हणोनि बोलिलों साध्या भावें । तुकडया म्हणे समजोनि घ्यावें । तारतम्याने मर्म याचें ॥१०२॥ इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । कथिला अवतारकार्याचा पथ । तेहतिसावा अध्याय संपूर्ण ॥१०३॥ ॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥*चौपाई* दुष्ट उदय जग आरति हेतू । जथा प्रसिध्द अधम ग्रह केतू ॥ संत उदय संतत सुखकारी । विश्व सुखद जिमि इंदुतमारी ॥ * जब जब होइ धरमकी हानी । वाढहि असुर अधम अभिमानी ॥ तब तब प्रभु धरि विविध ससीरा । हरहिं कृपानिधि सज्जनपीरा ॥---गोस्वामी तुलसीदासजी N/A References : N/A Last Updated : September 20, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP