मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ग्रामगीता|
अध्याय अकरावा

ग्रामगीता - अध्याय अकरावा

जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते.


॥ श्रीगुरुदेवाय नम: ॥

ईश्वरसेवाचि गांव-सेवा । तो सर्वांच्याचि सुखाचा ठेवा । परि कांही असुरहि असती गांवां । यज्ञभंग करावया ॥१॥
एका सज्जनें प्रश्न केला । गांवीं बाग फुलूं लागला । परि दुष्ट लाविती आग त्याला । काय उपाय नित्यासाठीं ? ॥२॥
आम्हीं केली संघटना । निवडोनि आणिलें सज्जना । परंतु दुर्जनापुढे बनेना । कांही केलें तरीहि ॥३॥
त्यांना दावा आदर्श जीवन । अथवा प्रचारें द्या पटवून । किंवा सेवा रात्रंदिन । करा त्यांची हवी ती ॥४॥
परंतु ते न जुमानिती । उपदेश देतां उलटे चिडती । कार्यकर्त्यांसि हाणूनि पाडिती । पदोपदीं अडवोनिया ॥५॥
चांगल्यातूनहि काढिती वाईट । हवा फैलाविती रोगट । सज्जनांवरि आणिती संकट । कारस्थानें करोनि ॥६॥
कमलकसाई बोलभांड । मुडदेफरास गांवगुंड । कज्जेदलाल धनाढय धेंड । हातीं तयांच्या ॥७॥
सत्तेचाहि पाठिंबा सतत । घेवोनि आणिती पेचांत । बसली लोकांना त्यांची दहशत । सांगा काय करावें ? ॥८॥
मित्रा ! जो जो जेयीचा रोग । तेथेचि त्याची औषधि सांग । योजकचि पाहिजे कराया उपयोग । कुशलपणाने ॥९॥
सत्य पडताहे कमजोर । म्हणोनीच असत्य होई शिरजोर । यास्तव सत्यासि करावें कठोर । सामर्थ्यशाली सेवेसाठी ॥१०॥
सत्याचें बळ वाढेल कैसें । तेंहि सांगतों ऐका शांतसे । सज्जनांनी न बसावें आळसें । अथवा हताश होवोनि ॥११॥
लोकांचिया मनीं जरी दहशत । तरी तुमच्यासारिखेचि कांही त्यांत । असतील हृदयीं तळमळत । चांगलें व्हावें म्हणोनि ॥१२॥
ऐसी ज्यांना ज्यांना आवडे सेवा । जे सत्याचा जपती ठेवा । त्या लोकांचा करोनि मेळावा । सक्रिय संघटन वाढवावें ॥१३॥
जनतंत्राचा हा काळ । शक्ति लोकांअंगींच सकळ । जनतेच्या निश्चयाचें बळ । साम्राज्यासहि नमवूं शके ॥१४॥
हत्तीस आवरी गवती दोर । मुंग्याहि सर्पासि करिती जर्जर । व्याघ्रसिंहासि फाडिती हुशार । रानकुत्रें संघटोनि ॥१५॥
संघटनेने काय नोहे ? । बिंदू मिळतां सिंधुपणा ये । गांवचा बाग बहरोनि जाय । फुलाफळांनी संघटनेच्या ॥१६॥
ग्रामसुधारणेचा मूलमंत्र । सज्जनांनी व्हावें एकत्र । संघटना हेंचि शक्तीचें सूत्र । ग्रामराज्य निर्माण करी ॥१७॥
गांव करी तें राव न करी । ऐसें सांगोनि ठेविलें चतुरीं । जरी दाद न घेतील अधिकारी । तरी गांव तय सुधारूं शके ॥१८॥
यासाठीच पाहिजे सशक्त संघटन । जें करी अन्याय-निर्मूलन । देवोनिया न्यायदान । करी रक्षण गांवाचें ॥१९॥
संघटन गांवीं मजबूत असावें । आपापलें दु:ख त्यासि सांगावे । कोणावरि अन्याय होऊं न द्यावे । कार्य संघटनेचें ॥२०॥
त्यासाठी मिळोनि लोक नेमावे । जे असतील इमानी बरवे । त्यागी निर्भय, चरित्र असावें । उज्जल ज्यांचें ॥२१॥
गांवाचे जे पवित्र सेवक । तेचि प्रसंगी होती सैनिक । ज्या गांवी ऐसे सावध पाईक । तेथ विघ्न न ठाके ॥२२॥
कांही अपराध घडतां गांवांत । त्वरित कळवावी खबरमात । सर्वांनी भाग घेवोनि त्यांत । ठीक करावें बिघडेल तें ॥२३॥
गांवचा प्रत्येक सज्ञान । यांचें असावें सहकार्य पूर्ण । हांक देतां सर्वजण । जमोनि यावेत एकत्र ॥२४॥
एकाने कोणी गुन्हा केला । शहाणपण सांगावें सकळांनी त्याला । गुन्हेगार ऐकेनासा झाला । शिक्षा द्यावी गांवाने ॥२५॥
जेथे समजदार प्रलोभनीं पडला । सोंग करोनि घोरूं लागला । चिमटे घेवोनीच त्याला । उठविलें पाहिजे ॥२६॥
कोळसा साबूने धुवा उगाळा । परि तो शेवटवरि काळा । अग्निसंस्कारी जळतां उजाळा । येई त्यालागी ॥२७॥
म्हणोनि बहिष्कार असहकार । करोनि त्याचे तोडावे आधार । नाक दाबतां तोंड सत्वर । उघडों लागे ॥२८॥
ऐसी सर्वांनी पाठ पुरवावी । जो कोणी गांवास बिघडवी । ऐकेनासा होतां सत्ताप्रभावीं । मुक्त करावा गांवांतूनि ॥२९॥
उत्तमांचाचि संग्रह बरवा । वाईटाचा निषेध करावा । जराहि पनपूं न द्यावा । वृक्ष वाईटाचा ॥३०॥
सर्वांनी झटावें यासाठी । करावी लागेल ती आटाआटी । प्राण गेला तरी संकष्टीं । सहन करावें सेवेस्तव ॥३१॥
ऐसी असावी गांवाची तयारी । तरीच गांव बनेल स्वर्गपुरी । नलगे सत्ताधीशांची तुतारी । पाठीमागे ॥३२॥
ऐसा होतां आचार-विचार । गांव होईल न्यायभांडार । जागृत असतां सज्जन चतुर । सेवेसाठी ॥३३॥
ऐसें जें जें गांव वागलें । त्या गांवाचें भाग्य उघडलें । नाहीतरि टक्केटोणपे आले । नशिबीं त्याच्या ॥३४॥
हें ऐकोनि एक बोलला । म्हणे तुम्ही शांतीचा पुरस्कार केला । आणि तुम्हीच ससेमिरा लाविला । दुराचार्‍यांपाठीं ॥३५॥
सज्जन आणि दुर्जन । सर्वांत सारखाचि भगवान । एकासि देतां दंड धावोन । तेव्हा सेवा कुठे राहे ? ॥३६॥
दया क्षमा आणि शांति । हीच सात्विकाची संपत्ति । निष्ठुरपणें दंडावें विरोधकांप्रति । हें सज्जनपण कशाचें ? ॥३७॥
ऐका ऐसी विचारसरणी । ऐकोनि भुलूं नये कोणी । तारतम्यचि ठेवोनि मनीं । गांव सुधारावें विचारें ॥३८॥
काय केलें म्हणजे होतो सज्जन । याचें आहे मोजमाप जाण । हें प्रथमक्षणींच ओळखोन । हुशार व्हावें गांवाने ॥३९॥
सेवा द्यावी कोणे ठायीं । हें तारतम्य असावें हृदयीं । याची दृष्टि ज्यांस नाही । होतील फजीत ते प्राणी ॥४०॥
ज्यासि करणें चोरबाजार । त्यासहि नोकर पाहिजे इमानदार । त्यासि देतां सेवा सुंदर । पुण्य लाभेल कोणासि ? ॥४१॥
साधुसंतें जनसेवा केली । परि सत्यासाठीच काया झिजविली । कधी आसचि नाही ठेविली । राजेरजवाडयांची ॥४२॥
जगीं अनंत राजे झाले । परि सर्वचि नाही पूजिले । संतसज्जनचि देव मानले । हृदयमंदिरीं तयांनी ॥४३॥
म्हणोनि कोणी कोणास सेवा द्यावी । हेचि प्रथम दृष्टी यावी । मग सेवेसाठी उडी घ्यावी । हाचि धर्म मानवाचा ॥४४॥
सदैव दया असावी चित्तीं । मनास परोपकाराची प्रीति । राहूं न द्यावी उणीव कोणती । दिसतां कोठे ॥४५॥
क्षमाशांतिमय हृदय । विश्वासूपणाचें वर्तन निर्भय । प्राण गेलियाहि निर्दय । न व्हावें आम्ही ॥४६॥
परि जेथे निर्दयपण हवें । तेथे दगडापेक्षाहि कठिण व्हावें । हेंहि सांगणें लक्षांत घ्यावें । तारतम्याने ॥४७॥
नाहीतरि दया केली । उलट आपुल्यासचि  भोवली । जिने गांवाची नासाडी झाली । नव्हे ती दया ॥४८॥
भिकार्‍यास भीक दिली । त्याने दारू-गांजांत उडविली । सांगा काय दया घडली । ऐशियापरीं ? ॥४९॥
कांही चोरटे गांवीं फिरती । दिवसां साधुवेष घेती । रात्रौ तेचि डाका मारिती । वेषभूषा बदलोनि ॥५०॥
ते लोकांनी सहन करावें । साधु म्हणोनि सोडोनि द्यावें । ऐसे दयेचे वेडे गोडवे । गाऊं नयेत वीरांनी ॥५१॥
दयाधर्म दानधर्म । यांचें ओळखावें वर्म । वेडयापरी न करावें कर्म । पोषक आळसा विकारा ॥५२॥
एरव्ही संसार सोडोनि बुवा झाले । दारोदारीं भिकेसि लागले । सदाचार सर्व बुडविले । ऐसे झालें याच गुणें ॥५३॥
कष्ट नाही करणें अंगीं । नाही संग्रहाचे खरे त्यागी । वेष घेवोनि फिरती ढोंगी । नांव बुडवाया संतांचें ॥५४॥
यांना दानधर्म द्यावे । तरि सर्व पापांसि स्थान मिळावें । म्हणोनि तारतम्य ठेवावें । दानधर्मियाने ॥५५॥
गांवीं मागती माधुकरी । खुशाल खेळती फिचर जुगारीं । दारूगांजा भांग पोरी । गुप्त राखती मठामाजी ॥५६॥
ऐशा लोकां दान द्यावें । गांव बुडवावें, बदनाम व्हावें । ऐसा धर्म कोणत्या देवें । सांगितला सांगा ? ॥५७॥
दया हें मुख्य धर्मलक्षण । परि दया म्हणजे प्राण्यांचें पालन । आणि कंटकांचें निर्दालन । बोलिलें संतीं ॥५८॥
सज्जनांचें संरक्षण । आणि दुर्जनांचें दमन । हेंचि अवतारांचेंहि कार्यलक्षण । न्यायसंगत ॥५९॥
म्हणोनि गांवीं कोणी अन्याय केला । दु:ख दिलें कोणा गरिबाला । त्याचा प्रतिकारचि पाहिजे झाला । गांवामाजी ॥६०॥
नाहीतरि गुंडांस फावे । सुटती जैसीं स्वैर गाढवें । दुष्टासि दया करोनि सोडोनि द्यावें । नव्हे हा धर्म ॥६१॥
अन्याय होतां प्रतिकारचि करावा । प्रथम अन्याय समजूनि घ्यावा । निश्चित कळतां आवाज द्यावा । संघटनेचा ॥६२॥
अन्याय नाना तर्‍हेचे असती । कांही धनाचे मानाचे दिसती । कांहींनी वाढे व्यसन अनीति । लोकांमाजी ॥६३॥
त्या सर्वांतूनि मार्ग काढावा । गांवीं दुराचार होऊं न द्यावा । हाचि खरा धर्म ओळखावा । विचारवंताने ॥६४॥
न्यायाचा कांटेकोरपणा । भिनावा आपुल्या हृदयीं जाणा । एका बाजूने दयेचा बाणा । दुसर्‍या बाजूने न्यायदंड ॥६५॥
हेंचि खरें मानवाचें लेणें । उगीच आहे सोनें मिरविणें । अंगीं वीरता नसतां मरणें । चोराहातीं ॥६६॥
कांहीलोक भोळे असती । आपुलें मानव्यभूषण खोविती । लोक त्यांसीच सात्विक म्हणती । वेडयापरी ॥६७॥
ज्यास करवेना ब्रीदाचें रक्षण । नाही अंगीं न्यायाचें भूषण । तो कैसा सात्विकजन । म्हणावा आम्हीं ? ॥६८॥
जो चोरांनी नागवावा । गुंड लोकांनी फसवोनि द्यावा । परस्त्रियेने भोंदवावा । तो सात्विक कैसा ? ॥६९॥
तोंडावरची न उडवी माशी । दच्के पाहतांचि पोलिसासि । न कळे आपुला हक्कहि ज्यासि । सात्विक त्यासि म्हणों नये ॥७०॥
त्यास म्हणावें दुबळा प्राणी । भित्रा विकासहीन अज्ञानी । ज्यांत नाही पुरुषार्थाचें पाणी । रक्षणासाठी ॥७१॥
त्यास कोणीहि उचलोनि न्यावें । दारूगांजादिक पाजोनि द्यावें । त्याने भोळा म्हणोनि पिऊनि घ्यावें । वारे भोळा ऐसा ॥७२॥
हा तो निर्बुध्दसा पाषाण । उत्तम वागण्याचें नाही ज्ञान । गंभीर शांत म्हणती जन । मुकामैंद म्हणोनिया ॥७३॥
खरा शांत तोचि नेमाने । जो न फसे कोणाच्या फसविल्याने । कधीहि चकाटया पिटणें ज्याने । पाहिलें नाही ॥७४॥
परनिंदा नावडे ज्यासि । परदु:ख न पाहवे डोळयांसि । धांवोनि जाय अडल्या-पडल्यासि । सहकार्य द्याया ॥७५॥
उगीदुगी ऐकतां कानीं । लगेच जाय तेथोनि उठोनि । लोकां सांगे उगीच बोलणीं । बोलूं नयेत ॥७६॥
कोणाची लपोनि टीका न करी । बोलणें ज्याचें तोंडावरि । निर्भय निर्मळ अंतरीं । स्फटिक जैसा ॥७७॥
गंदेपणा मुळीच नावडे । सुजनांचे गातो सदा पवाडे । सत्संगतीसि जीव धडपडे । सदैव ज्याचा ॥७८॥
सर्वांशीं बंधुत्वाचें वागणें । मन-मिलाफ संपादणें । लोकसंग्रह कुशलतेने करणें । जागृतीसाठी ॥७९॥
सुखीं अहंकारें न चढावें । संकटीं घाबरोनि न जावें । न्यायाने वागावें वागवावें । सर्व जना ॥८०॥
हें ज्यांनी अंगीं बाणविलें । तेचि शांतसात्विक बोलिले । तयांनीच गांवाचें हित झालें । समजतों आम्ही ॥८१॥
याऐवजीं दुबळेपण आलें । तरि गांवचि मग विलया गेलें । सांभाळितां न जाय सांभाळिलें । कोणाकडोनि ॥८२॥
म्हणोनि पाहिजे न्यायनिष्ठुरता । दयेमाजींहि तारतम्यता । उन्नति करील तीच सेवा तत्त्वता । हरप्रकारें ॥८३॥
द्वेष न करितां दुर्जनदमन । हें त्यांच्याहि उन्नतीसचि कारण । डॉक्टरें करावें अवयवच्छेदन । ती दयाचि तयाची ॥८४॥
सर्वाभूतीं परमेश्वर । त्यासि बाधक नसे सत्यव्यवहार । करावें संघटनेने गांव सुंदर । ही पूजाचि तयाची ॥८५॥
सर्वाभूतीं प्रेमभाव । वाढवावा गुणगौरव । दूर सारोनि उपद्रव । गांवचे आपुल्या ॥८६॥
’ जग तरि आम्हां देव । परि हा निंदितों स्वभाव ’ । म्हणोनि गुंडांसि आणिला खेव । संत तुकारामांनी ॥८७॥
’ हरिभक्त राहती जेथे । परचक्र यावें कैसें तेथे ? ’ ऐसें म्हणोनि लाविला पणातें । जीव त्यांनी ॥८८॥
आपुले वारकरी भाविक । तेचि वारकर्ते पाईक । करोनि दुष्टांसि  लाविला धाक । शिवाजीच जणुं सर्वहि ॥८९॥
तीच घेवोनि प्रेरणा । गांवी उभारावी न्यायसेना । जेणें कांही नुरे धिंगाणा । गांवीं आपुल्या ॥९०॥
दारू गांजा भांग अफीम । जुगार वेश्यादि वाईट काम । यांचें उरूं न द्यावें नाम । आपुल्या गांवीं ॥९१॥
त्यासाठी गांवच्या कांही सज्जनांनी । लागावें व्यसन-निर्मूंलनीं । उत्तम गुणांच्या अनेक श्रेणी । वाढवाव्या गांवीं ॥९२॥   
गांवचे चार सज्जन मिळोनि । अनिष्टप्रथा बंद कराव्या त्यांनी । ज्याने गांवास पावे नुकसानी । न ठेवावें तें ॥९३॥
कांही उन्मत्त शेतकरी । टोचती बैलासि तुतारी । रक्त काढूनि वासना पुरी । करिती आपुली ॥९४॥
देवाचिया नांवाखाली । कांही देतात जीव बळी । बंद करावी प्रथा असली । भावना सुधारोनि लोकांची ॥९५॥
कोणी घुमारे लुबाडिती । बुवा लोकांस फसविती । भ्रमिष्ट मतें व्रतें शिकविती । सावध करावें त्याठायीं ॥९६॥
परस्परांना मदत करावी । अडीअडचण ती निभवावी । सर्वांकडोनि करोनि घ्यावी । योग्य सेवा ॥९७॥
गांवसेवेंत आली अडचण । तिला द्यावें अग्रस्थान । आपापली जागा-जमीनहि देऊन । सोय करावी सर्वांची ॥९८॥
सर्वांकडोनि ऐसी सेवा नव्हे । तरि गरजूंना सहकार्य द्यावें । होईल तेवढें तरी करावें । निष्कपटपणें ॥९९॥
मुलाबाळांचें असतां लग्न । सर्वांनी जावें धावोन । पडोंचि न द्यावें ओझें, न्यून । आईवडिलांसि तयांच्या ॥१००॥
थोडेंथोडें सर्वांनी आणावें । वरवधूंना साहित्य द्यावें । भोजनापासोनि उरकवावें । सर्वतोपरीं ॥१०१॥
मांडवावरी पांच डहाळे । टाकावे हा धर्म गांवकर्‍या कळे । तैसेचि निभवावे प्रसंग सगळे । सहकार्याने ॥१०२॥
जैसें जैसें सहकार्य वाढे । तैसें गांव उन्नतीस चढे । न पडे विपत्तीचें कोडें । गांवीं कोणा मानवासि ॥१०३॥
ऐसी सेवा बिंबतां जीवनीं । कांहीच गांवीं न पडे उणी । तरीहि असावा स्वतंत्रपणीं । सेवकांचा विभाग ॥१०४॥
सुसज्ज असावेत गांवचे तरुण । कोणतेंहि संकट येतां ऐकून । आपुलीं सर्व कामें सोडून । धांव घ्यावी तयांनी ॥१०५॥
आग लागणें, विहिरींत पडणें । कॉलरा होणें, मूर्च्छा येणें । प्रत्येक प्रसंगीं धांवून जाणें । कर्तव्य त्यांचें ॥१०६॥
ऐसी ग्रामसेवेची योजना । जागृत जेथे ग्राम-सेना । तेथे स्वर्गींच्या नंदनवना । बहर येई सहजचि ॥१०७॥
ऐसें संघटनांनी गांव । भोगूं लागेल दिव्य वैभव । ग्रामराज्यचि सुखाची ठेव । तुकडया म्हणे ॥१०८॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्रस्वानुभवसंमत । ग्रामरक्षणाचा वर्णिला पंथ । अकरावा अध्याय संपूर्ण ॥१०९॥

॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥

*
अभंग

दया तिचें नांव भूतांचें पाळण । आणिक निर्दळण कंटकांचें ॥
धर्मनीतीचा हा ऐकावा वेव्हार । निवडिलें सार-असार तें ॥
पाप त्याचें नांव न विचारितां नीत । भलतेंचि उन्मत करी सदा ॥
तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी । देवासहि आटी जन्म घेणें ॥
---श्रीसंत तुकाराम महाराज

N/A

References : N/A
Last Updated : September 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP