मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ग्रामगीता| अध्याय बारावा ग्रामगीता प्रस्तावना अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चवदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणीसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्वीसावा अध्याय सत्ताविसावा अध्याय अठ्ठाविसावा अध्याय एकोणतिसावा अध्याय तिसावा अध्याय एकतिसावा अध्याय बत्तिसावा अध्याय तेहतिसावा अध्याय चौतिसावा अध्याय पस्तिसावा अध्याय छत्तिसावा अध्याय सदतिसावा अध्याय अडतिसावा अध्याय एकोणचाळीसावा अध्याय चाळीसावा अध्याय एकेचाळीसावा ग्रामगीता - अध्याय बारावा जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते. Tags : grama gitatukadojiग्रामगीतातुकडोजी ग्रामशुध्दि Translation - भाषांतर ॥ श्रीगुरुदेवाय नम: ॥एका सज्जनें विचारिलें । म्हणे ग्रामराज्यांत काय ठेविलें ! जिकडे तिकडे गोंधळ चाले । अस्ताव्यस्तपणाचा ॥१॥कागदीं पुस्तकांत, काव्यांत । खेडयाचें वर्णन दिव्य बहुत । परि वस्तुस्थिति पाहतां तेथ । क्षणभरीहि राहवेना ॥२॥रस्ते सर्व घाणींनी भरले । आजूबाजूंस डबकें साचलें । एकहि काम न निभे तेथलें । शहराविण ॥३॥’ खेडयाकडे चला ’ म्हणतां । परि एकहि सोय नसे पाहतां । घरें कसलीं ? हुडेचि तत्त्वता । डुकरखोपडे खुराडे ॥४॥ नाही कसलें मनोरंजन । दंढारी-तमाशावांचून । उगेचि कां करावें वर्णन । खेडें उत्तम म्हणोनि ? ॥५॥मित्रा ! तुझें म्हणणें ऐकिलें । माझ्या मनीं योग्य तें पटलें । त्याचें कारण तेंहि ऐकिलें । पाहिजे श्रोतीं ॥६॥जेव्हा कार्यकर्ते होती आळसी । त्यांत उपभोगाची वाढे खुशी । तेव्हाच अंतर पडे कार्यासि । गांवशिवेच्या ॥७॥ एकदा चुकलें तरि चाले । पण नेहमी चुकतचि गेलें । त्यानेच राज्यांचेंहि मरण ओढवलें । गति काय गांवांची ? ॥८॥कार्यकर्त्यांनीच घेतली निशा । काय पाहतां मग गांवाची अवदशा । सुरू झाला गुंडांचाचि तमाशा । लोक झाले भलतैसे ॥९॥ वतनदार इजारदार । ग्रामजोशी वेशकर । पूर्वी ज्यांना ज्यांना ग्रामाधिकार । चुकलें त्यांच्या हातूनिया ॥१०॥चुकलियावरीहि कोणीच बघेना । मग लोक काढती वाटा नाना । जैसा ज्यास वाटे धिंगाणा । करूं लागती हौसेने ॥११॥कोणी हौसेने घर बांधलें । मार्गावरीच ओटे वाढले । कोणाचें छप्पर पुढे आलें । गाडी कांही जाईना ॥१२॥कोणी घाण नाली सोडूनि दिली । ती सर्व मार्गावरि आली । माणसें ढोरें सारीं फसलीं । घराभोंवती बिचार्याच्या ॥१३॥कांहींनी सांडपाणी साचविलें । मच्छर जंतु अति वाढले । रोगराईनी बेजार झाले । शेजारी सगळे ॥१४॥ कांहींनी सडकेवरि गुरें बांधलीं । त्यांतहि मारकुंडींच निघालीं । मार्गस्थांची फजीती झाली । सांगतां येना ॥१५॥कांहींनी दारीं दगड ठेविले । जाणाराचें गाडेंचि उलटलें । कांही ठोकर लागोनि पडले । अंधारामाजी ॥१६॥कांहींनी टाकला पुंजाणा । केरकैचणीं कांचखिळे नाना । बोचती येणार्या-जाणार्यांना । बोलूंच नका ॥१७॥साहेब चाले मोटारींनी । कांही जाती जोडे घालोनि । गरीबास विचारीना कोणी । पाय त्याचे फुटले तरी ॥१८॥सडकीं फळें शेंग टरफलें । कुजके सोप मार्गीच टाकले । आजूबाजूस पाहोनि फेकलें । ढोबर त्यावरि माऊलीने ॥१९॥गांवचे मार्ग विष्टेने व्यापले । आड कोने घाणींनी भरले । ठायींठायीं उकिरडे साचले । गांव वेढलें गोदरींनी ॥२०॥ घराघरांचे कुंप सडले । कांटे रस्त्यावरीच पडले । फास आणणारासहि न कळलें । साफ करावें म्हणोनिया ॥२१॥गांवीं खंडार्यांत माजलें रान । विंचू-सर्प राहती लपोन । पडक्या गढीचे हूडे भयाण । तेथील घाण पुसूं नये ॥२२॥विहिरी कोणी बांधून ठेविल्या । त्या पुन्हा नाही दुरुस्त केल्या । घुणार्या घाण करीतचि गेल्या । सडला पाण्यांत पाचोळा ॥२३॥ कोणी रस्त्यावर टाकिला गाळ । विहिरी मोर्या उपसोनि ओंगळ । टाकोले हीर, फुटके खपरेल । मेलेले उंदीरहि त्यावरि ॥२४॥ श्रीमंतांचे वाढले गोठे । रस्त्यावरीच आले ओटे । मार्गीच लाकडें विटा गोटे । कोण बोले तयांना ॥२५॥ गांवातील पंच झोपले । " काय म्हणावें ? नातलग मित्र आपलें ! " म्हणोनि त्यांनी डोळे लाविले । गांव झालें डोंगर हें ॥२६॥ ऐसीच विचित्र गांवाची स्थिति । हें आलें माझ्या अनुभवाप्रति । म्हणोनीच वाटे लावावी सुसंगति । गांवोगांवीं आतातरी ॥२७॥ हे सगळेंचि दुरुस्त कराया । शहाण्यांनी जावे खेडयांकडे या । आदर्श ग्राम हाचि पाया । राष्ट्राचा असे म्हणोनि ॥२८॥ जें जे गांवीं शहाणे झाले । शक्तियुक्तींनी पुढे निघाले । ते सर्व शहराकडे धावले । म्हणोनि माजलें रान येथे ॥२९॥भंगी साफ करिती शहर । तैसे पूर्वी कामदार महार । झाडीत होते गांवगल्ली सुंदर । पुढे केवळ पाटलांची ॥३०॥ पवित्र ठेवावा देवाचा मार्ग । हा भाविकांचा जाणोनि ओघ । देव मांडिले होते जागोजाग । तेथेहि माजले उकिरडे ॥३१॥नगरप्रदक्षिणेची प्रथा । ती प्रिय होती अनेक पंथा । तीहि गेली लयाला आता । उरलें सगळें करंटेपण ॥३२॥ दिंडया-मिरवणुकी होत्या मागे । उत्सव, दहीकाल्याच्या प्रसंगें । त्यांतहि शिरलें बेढंगें । नाचगाणें, दंढारी ॥३३॥लोक दिंडया-मिरवणूकी काढती । परि त्याचें तत्त्वचि आतां न जाणती । म्हणोनि वाढली गलिच्छता अति । दारोदारीं घरोघरीं ॥३४॥कधीकाळीं काढिती भजन । घरोघरीं बोलावया जाऊन । तुटका वीणा टाळ दोन । मृदंग गेला कामांतूनि ॥३५॥ मग राहिले वाजंत्रीबाजे । त्यांतहि तालस्वर अंदाजें । कसेंतरी लाविती, साजे । लग्नमौंज म्हणोनिया ॥३६॥ कर्णा शंख घंटया नगारे एकचि गोंधळ करिती सारे । बेताल होतां कोठूनि भरे । ताल जीवनीं गांवाच्या ॥३७॥ ऐसा झाला तालतितंबा । विस्कळित झाल्या कीर्तनें, सभा । म्हणती ’ दयायावी रुक्मिणीवल्लभा ’ । आपुली शुध्दचि नाही ॥३८॥गांव-देवळाची पालखी निघे । जो तो तमाशा म्हणोनि बघे । कसली भावना ? खिदळती तुंगे । आयाबाया पाहोनि ॥३९॥चालतांना शिस्त नाही । जनलोकांची अजीव घाई । कोणाचाहि पायपोस नाही । पायीं कोणाच्या ॥४०॥कोणी कोणाचें ऐकेना । पुढे घासावयासि करी धिंगाणा । याचे शिक्षणचि नाही कोणा । कैसे चालावें मार्गाने ॥४१॥नाही चालणारांसि शिस्त । चालती जैसीं जनावरें समस्त । माणसाचें चालणेंचि स्वस्थ । विसरले लोक ॥४२॥मार्गीं लागती ठोकरा । कितीकांच्या बोटांचा झाला चुरा । रेटा बसे मागे-सामोरां । करितां प्रदक्षिणा ही सारी ॥४३॥सध्याची ऐसीं प्रदक्षिणा । ही प्रदक्षिणेची विटंबना । मार्गाची घाण साफ होईना । प्रदक्षिणा काय कामाची ? ॥४४॥ म्हणोनीच काढली रामधून । व्हावयासि गांवाचें पुनर्निर्माण । सेवामंडळ संस्थेंतून । उदय केला कार्याचा ॥४५॥ मित्रहो ! रामधून नाही आजची । ही आहे परंपरा प्रदक्षिणेची । प्रदक्षिणेंत योजना होती कार्याची । तीच आहे रामधून ॥४६॥ मी समजतों गांवहि शरीर । त्यास राखावें नेहमी पवित्र । त्यानेच नांदेल सर्वत्र । आनंद गांवीं ॥४७॥ जैसें आपण स्नान करावें । तैसें गांवहि स्वच्छ ठेवीत जावें । सर्वचि लोकांनी झिजूनि घ्यावें । श्रेय गांवाच्या उन्नतीचें ॥४८॥आपण तेवढें स्वच्छ राहावें । भोवती गलिच्छ वातावरणचि पाहावें । याने सुमंगलता कधी न पावे । तनमन होई दूषित ॥४९॥म्हणोनि स्वच्छ ठेवावें दुकानघर । नाल्यामोर्या सडका चौफेर । मग रामधूनची फेरी सुंदर । काढावी आबालवृध्दांनी ॥५०॥रामधूनपूर्वी गांव पूर्ण । व्हावें स्वच्छ सौंदर्यवान । कोणहि घरीं गलिच्छपण । न दिसावें कोठे ॥५१॥त्यांत व्हावयासि मदत । घ्यावेत सेवाभावियांचे हात । ज्यांना सेवा हेंचि व्रत । पसंत आहे ॥५२॥ मिळोनि करावी ग्रामसफाई । नालीमोरी ठायींठायीं । हस्तेंपरहस्तें साफ सर्वहि । चहूकडे मार्ग ॥५३॥ त्यांत जी जी निघेल घाण । ती दूर न्यावी गांवापासून । अस्ताव्यस्त न देतां फेकून । नीट व्यवस्था लावावी ॥५४॥ त्यासाठी करावे खतखड्डे । गांवाबाहेर जागीं उजडे । जनावरांचें मलमूत्र सापडे । तेंहि त्यांतहि भरावें ॥५५॥तैसेचि करावे चरसंडास । मळ दिसोंचि न द्यावा कोणास । आपुल्या मळाची आपणांस । व्यवस्था लावणें सोयीचें ॥५६॥नदीकिनारीं वा बोरंगांत । शौचासि जाती स्त्रियादि समस्त । ती कुचंबणा आणि घाण निश्चित । दूर होईल चरसंडासे ॥५७॥तेथे बसलिया शौचास । माती झोकावी सावकाश । मलमूत्र येवोनि खतरूपास । कारणीं लागो म्हणोनिया ॥५८॥ सर्व गांवाचि ऐसी रीति । जे जे सांगती करोनि घेती । त्यांवरीच प्रसन्न राहे क्षिति । खताने तृप्ति होवोनिया ॥५९॥ एरव्ही तो वांढाळ गडी । जो वाटेल तिकडे मळा सांडी । ते खतद्रव्यांची करिती नासाडी । वानर जैसे ॥६०॥ अहो ! ही निसर्गाची रचना । समजलीच पाहिजे सर्वजना । खाद्यचि होतें खत जाणा । खतापासोनि खाद्योत्पत्ति ॥६१॥आपण जें जें कांही खातों । रसरक्तमांस तेणें जमवितों । त्यांतूनि वाचलें तें खत म्हणतो । भूमिवरि घालावया ॥६२॥त्या खताची झाली जोपासना । तीच फळते काढाया उत्पन्ना । खत नसतां भूमिची दैना । होऊं लागे ॥६३॥ मूत्रविष्टाहड्डी मिसळली । त्याने भूमीस स्फूर्ति चढली । पुन्हा पेरणी करितां उदभवलीं । प्रचंड कणसें ॥६४॥ परि गांव हें समजेना । याचें ज्ञानचि नुरलें कोणा । करिती विष्टेचा धिंगाणा । आपणासहित गुरांच्या ॥६५॥गोवर्या करोनि जाळिती । ते महालाभास आंचवती । शेणांत आहे लक्ष्मीची वसती । धर्मग्रंथींहि वचन ऐसें ॥६६॥म्हणोनि सर्व गांवाचें मलमूत्र । जमवोनि झाकावें जाणोनि तंत्र । त्याने गांवाची जमीन सर्वत्र । खतवोनि द्यावी ॥६७॥ याने दूर होईल घाण । थांबेल रोगराईचें नुकसान । आणि पिकेल अधिक धान्य । अनेक लाभ एकामाजी ॥६८॥हें समजाविण्याहि पाहिजे कमेटी । तिने करोनि नाना आटाआटी । जनता जागृत करोनि शेवटीं । उत्पन्न द्यावें वाढवोनि ॥६९॥गोखरू तरोटा तालीमखाना । ज्यांनी भूमि विढिली जाणा । त्यांचेंहि खत कराया सर्वांना । लावोनि पीक वाढवावें ॥७०॥मुबलक खत मुबलक पाणि । मुबलक श्रम मुबलक बी-भरणीं । मुबलक उत्पन्न गगनासि भेदूनि । दिसावें गांवीं ॥७१॥ हेचि खरी आहे सेवा । हेंचि आवडे देवाधिदेवा । उगीच मोठेपणाचा कांगावा । मिरवावा कासयासि ? ॥७२॥ सर्वांनी गांव स्वच्छ करावें । तेणें आरोग्य नांदेल बरवें । घाण-खतांतूनि नवनवें । वैभव येईल उदयासि ॥७३॥ग्रामसफाई झालियावरि । रामधून काढावी नाम-गजरीं । स्वच्छतेसवेंच पावित्र्यहि भारी । वातावरणीं यावयासि ॥७४॥ प्रात:काळीं सामुदायिक नामगजर । सुखस्वराज्य तो टिकवी सुंदर । त्यासाठीच ब्राह्ममुहूर्त रामप्रहर । वेदहि म्हणे ॥७५॥यावरि श्रोते विचारती प्रश्न । कैसी प्रदक्षिणेची रामधून ? जेणें घडेल ईश्वर-भजन । आरोग्य हेंहि संपादे ॥७६॥ रामधूनची ऐका रीति । आधी करा ग्रामशुध्दि ती । जेणें स्नान घडे गांवाप्रति । आरोग्यदायी ॥७७॥ निघण्यापूर्वी सूर्यनारायण । करावें सडासंमार्जन । सर्व गांवाने मार्ग झाडोन । आनंदभुवन निर्मावें ॥७८॥जिकडे तिकडे पाणी शिंपावें । मार्ग रांगोळयांनी सजवावे । ठायीं ठायीं ठेवोनि द्यावे । फोटो संतां-थोरांचे ॥७९॥सुंदर बांधावें आम्रतोरण । ठिकठिकाणीं शोभवावें मैदान । आपुलाल्या श्रमाचें प्रदर्शन । दारादारांत ठेवावें ॥८०॥मग जमोनि सकल सेवकजनें । रामधून काढावी गांभीर्याने । प्रथम रांग चातुर्याने । सजवावी शोभे ऐसी ॥८१॥लहान मुलें मुलांमाजी । तरुण युवक तरुणांमाजी । वयोवृध्द सहजासहजीं । वृध्दांमाजी योजावे ॥८२॥ स्वतंत्र चालवाव्या महिला मुली । मार्गीं आणावी शोभा चांगली । गीतें म्हणणारांची योजना केली । पाहिजे मधामधांतूनि ॥८३॥बाजूनी चालवावे सेवकजन । सेवक-गणवेषांत परिपूर्ण । त्यांनी सांभाळावी सेवकांची लैन । दोन दोन चालवावे ॥८४॥एकाने धरावी घंटा हातीं । दोन ठोके द्यावेत घाटेवरती । चालू लागेल ठरलिया पध्दतीं । रामधून जागेहूनि ॥८५॥’ रघुपति राघव राजाराम । पतितपावन सीताराम । ’ म्हणावें गायकाने प्रथम । मग म्हणावें सर्वांनी ॥८६॥अतिधीराची चाल धरावी । ओळ शिस्त सांभाळावी । मग गीतें गायकांनी म्हणावीं । राष्ट्र-भक्ति-भावनेचीं ॥८७॥कांही म्हणावीं ग्रामावर । कांही म्हणावीं भक्तिपर । कांही म्हणावीं निरंतर । चारित्र्यवान करणारीं ॥८८॥चौकांतूनि दारांतूनि । जात असतां शांतपणीं । जयघोष गर्जवावे भेदूनि । गगन सारें ॥८९॥गुरुदेवाच्या जयजयकारें । भारतमातेच्या नामोच्चारें । साधुसंतांच्या घोषें उदगारें । जागृति करावी आनंदें ॥९०॥ मार्गी थोरामोठयांचें चित्रदर्शन । वंदावें उभ्यानेचि हात जोडोन । थांबूं नये मार्गातून । रामधून सोडोनिया ॥९१॥ऐसी फेरी पूर्ण करावी । गुरुदेव-चौकीं स्थिरावोनि घ्यावी । आधीच सेवकांनी लैन लावावी । लोकांपुढे येवोनि ॥९२॥ मग तैसेचि लोक उभे करावे । मोकळे मोकळे ओळींत बरवे । लहान लहानांत ठेवावे । तरुण वृध्द ऐसेचि ॥९३॥महिलांची अलग रांग । करावी सुंदर यथासांग । ऐसा साजवावा लोकसंघ । चौकामाजी वा मैदानीं ॥९४॥मग सूचकाने सूचना द्यावी । जीं ’ सक्रियपाठीं ’ लिहिली बरवी । प्रार्थना, भाषण, प्रणाम योजावीं । योजनेपरी ॥९५॥भाषणीं हेंच सांगत जावें । जनतेने नीटनेटकें राहावें । सहकार्याने वागत असावें । गांवामाजी ॥९६॥जेव्हा वाढेल मार्गी घाण । तेव्हा होईल मलीन मन । तयायोगें विकास पूर्ण । राहील अडोन जीवांचा ॥९७॥सर्वांनी स्वच्छ शिस्तबध्द व्हावें । परस्परांशीं प्रेम करावें । तरीच गांव स्वर्ग व्हावें । सर्वतोपरीं ॥९८॥भाषणानंतरि जयघोष करून । मार्गी वळवावे सकळ जन । शांतपणें चालाया सांगोन । रामधून संपवावी ॥९९॥शेवटीं जावें सेवकजनें । अतिप्रसन्न होवोनि मनें । स्वर्ग उतरेल या योजनेने । ग्रामामाजीं ॥१००॥ लोकांना मार्गी चालतांहि नये । म्हणोनि काढला हा उपाय । गरीब-अमीर-अनपढ सर्व हे । शिकती चालणें यामाजीं ॥१०१॥ दोघादोघांच्या करिती रांगा । एकामागूनि एकाची जागा । गांव पवित्र करी भजनगंगा । वाढे संघटना गांवाची ॥१०२॥सहजचि चालणें बोलणें येतें । शिस्तीने बसणें उठणें कळतें । गाणें वाजविणेंहि कळों लागतें । गांवच्या दरबारीं ॥१०३॥घराघरांची होय दुरुस्ती । सौंदर्याची वाढे प्रीति । अस्वच्छतेची मिटे प्रवृत्ति । वाढे वृत्ति सहकार्याची ॥१०४॥’ आपण एक ’ ही वाढे भावना । दिगंतीं जाई आळसीपणा । कोणी न वाटे अधिक-उणा । गुणप्रदर्शना वाव मिळे ॥१०५॥सर्वांचें सर्वांकरितां वाढे मन । लोक राहती अतिप्रसन्न । ऐशी आहे रामधून । सहकार्याची बोधशाळा ॥१०६॥ऐशा योजना घेवोनि हातीं । करावी खेडयांची दुरुस्ती । तेणें आनंद लाभेल सकळांप्रति । तुकडया म्हणे ॥१०७॥इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभवसंमत । ग्रामस्नान-रामधून वर्णित । बारावा अध्याय संपूर्ण ॥१०८॥ ॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥*" मायबापहो ! ’ पशुकी होत पन्हैया नरका कछु न होय । नर करणी करे तो नरका नारायण होय ’ हें संतांचं म्हणणं लक्षांत घेऊन करणी करा अन स्वत: नारायण बना. तुम्ही हात फिरवाल तिथं लक्ष्मी उभी राहील अन गांव भूवैकुंठ होईल हें ध्यानांत ठेवा. " --श्रीसंत गाडगेबाबा N/A References : N/A Last Updated : September 20, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP