मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ग्रामगीता| अध्याय चवदावा ग्रामगीता प्रस्तावना अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चवदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणीसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्वीसावा अध्याय सत्ताविसावा अध्याय अठ्ठाविसावा अध्याय एकोणतिसावा अध्याय तिसावा अध्याय एकतिसावा अध्याय बत्तिसावा अध्याय तेहतिसावा अध्याय चौतिसावा अध्याय पस्तिसावा अध्याय छत्तिसावा अध्याय सदतिसावा अध्याय अडतिसावा अध्याय एकोणचाळीसावा अध्याय चाळीसावा अध्याय एकेचाळीसावा ग्रामगीता - अध्याय चवदावा जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते. Tags : grama gitatukadojiग्रामगीतातुकडोजी ग्राम-आरोग्य Translation - भाषांतर ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥एक श्रोता महाभाविक । म्हणे गांवहि केलें ठीक । तरी देवाने मारली मेख । ती निघूं शकेना ॥१॥प्रत्यक्ष शहर जरी झालें । तरी देवापुढे ताब न चाले । तेथे खेडें शहरापरी केलें । तरी काय होतें ? ॥२॥देवीदेवतांचा कोप झाला । कॉलरापटकीचा झटका आला । म्हणजे सुधारूंच न शके कोणाला । बाप वैद्याचा ॥३॥म्हणोनि देवता राहती प्रसन्न । ऐसें करावें पूजन । गांव असो की शहर संपन्न । सुखी त्याविण न राहे ॥४॥मित्रा ! ऐक याचें उत्तर । देवदेवता किंवा परमेश्वर । हे कृपेचेचि अवतार । कोपचि नाही त्याठायीं ॥५॥कोप करिती ते दुष्टावरि । त्यांतहि उध्दार भावचि अंतरीं । तेथे निरपराध्यांस छळती जरि । तरि त्या देव न म्हणावें ॥६॥सर्व लोक लेकरें त्याचीं । छळणा कां करील कोणाची ? कृति आपुलीच आपणा जाची । शत्रु आपणचि आपुले ॥७॥चहूबाजूंनी केली घाण । त्यांत जंतु झाले निर्माण । त्यांतूनि रोगांच्या सांथी भिन्न भिन्न । वाढ घेती ॥८॥ नाही नेमाचा आचार । शुध्द नाही आहारविहार । अशुध्द हवापाणी, संहार । करिती जनांचा ॥९॥कांही केव्हा कुठेहि खाणें । कधी झोपणें कधी जागणें । सप्तहि धातु कोपती याने । रोगरूपाने फळा येती ॥१०॥’ हाटेलीं खाणें मसणा जाणें ’ । ऐसें बोलती शहाणे । त्यावरि नाना तिखट व्यसनें । आग्यावेताळासारिखीं ॥११॥ कशास कांही नियम नुरला । कोण रोगी कोठे थुंकला । कोठे जेवला संसर्गी आला । गोंधळ झाला सर्वत्र ॥१२॥त्याने रोगप्रचार झाला । लागट रोग वाढतचि गेला । बळी घेतलें हजारो लोकांला । वाढोनि सांथ ॥१३॥मग कोणी म्हणे कोपली देवी । कोणी मांत्रिकांसि बोलावी । बाहेरभितरचें समजोनि गांवीं । काढती आरत्या अंधारीं ॥१४॥कोणी करणी कौटाळ म्हणती । कोणी पिशाच्चास भारती । औषधेंहि न देतां रोगी मारती । मूर्खपणाने ॥१५॥भगत मांत्रिक अरबाडी जाणते । घुमारे बघती भाविक कोणते । पोटासाठी नाना मतें । फैलाविती लोकांमाजी ॥१६॥ करविती नवस सायास थोर । देवीपूजेचा जोरसोर । रेडे बकरे कोंबडे पामर । कापिताति अज्ञानें ॥१७॥देवानेचि केले जीव । त्यास कैची मारण्याची हाव ? मधले दलाल करिती ठेव । आपुली हौस पुरवावया ॥१८॥ संतें देवास केलें प्रसन्न । तेव्हा बळी दिले कोण ? चोखोबा, श्रीचक्रधर, रामकृष्ण । म्हणती ’ प्रसन्न देव भावें ’ ॥१९॥देवासि पाहिजे बलिदान । तो पशु आपुला भ्रम अभिमान । गांवचें गेल्याविण अज्ञान । सुखी जीवन न होई ॥२०॥गांव असो अथवा शहर । तेथील बिघडले आचारविचार । म्हणोनीच रोगराईने बेजांर । जाहले सारे जन लोक ॥२१॥गांव व्हावया निरोगी सुंदर । सुधारावें लागेल एकेक घर । आणि त्याहूनहि घरांत राहणार । करावा लागेल आदर्श ॥२२॥ व्यक्ति व्हाया आदर्श सम्यक । पाहिजे दिनचर्याच सात्विक । सारें जीवन निरोगी सुरेख । तरीच होईल गांवाचें ॥२३॥नियमीं बांधला एकेक दिन । त्यानेच सुधरे जीवन संपूर्ण । गांवहि होय आरोग्यसंपन्न । सारे प्रसन्न देवीदेव ॥२४॥नियमांचा मुख्य आधार । मजबूत पाहिजे निर्धार । त्यावरीच उत्कर्षाची मदार । ऐहिक आणि आध्यात्मिक ॥२५॥नाहीतरि मानवाने नियम केले । सर्व जीवन सुरळीत चाले । परि एकदा दुर्लक्ष झाले । की चुकतचि जातें ॥२६॥एकदा रात्रभरि जागला । मग सकाळीं उठणेंच कशाला ? आळसांत सर्व दिवस गेला । नियम मोडोनि ॥२७॥त्यास धाक नाही काळजी नाही । घरचे लोक बोललेच नाही । हा उठला दुसरे दिवशींहि । दहा वाजतां दिवसाचे ॥२८॥ कांही दिवस अलक्ष झालें । उशीरां उठणें अंगवळणीं पडलें । मग बदलेना, कांही केले । उपचार जरी ॥२९॥ऐसें कासया घडूं द्यावें । रोज सकाळींच उठावें । न उठतां घरच्यांनी जागवावें । झोपणारासि निश्चयें ॥३०॥कांही म्हणती उशीरां उठणें । हें तों भाग्यवंताचें लक्षणें । त्यास काय आहे उणें । पोट भराया धनवंता ? ॥३१॥ऐसें समजोनि आळशी केला । अरे ! हा भाग्यवान कसला ? निजण्यावरि भाग्यवान ठरला । तरि बीमार महाभागी कां नव्हे ? ॥३२॥तो तर निजलाचि राहतो । झोपूनचि खातों-पितों ॥ काय अधिक भाग्यवान म्हणवितो ? सांगा सांगा ॥३३॥भाग्यवंताची उलटी व्याख्या । करणें शोभतें का शहाण्यासारख्या । अरे ! सकाळीं उठणारासचि सख्या । भाग्यवंत म्हणावें ॥३४॥ श्रमांतूनचि उपजे भाग्यसंपत्ति । निजणारे तिची हानि करिती । इतरां श्रम अधिक पडती । उत्साह घटे आपलाहि ॥३५॥ झोपी गेला घरचा धनी । सुर्य चालला डोक्यावरोनि । उन्ह पडले तरी निजूनि । कड फेरितो झोपेचा ॥३६॥ नोकरचाकर आळस करिती । म्हणती घरधनीच झोपती । मग आपणचि कैशा रीतीं । काम करावें जावोनि ? ॥३७॥ ऐसा सारा अंधार पडे । वाजती श्वानांचे चौघडे । मूलबाळ रडेओरडे । झोप काढिती आयाबाया ॥३८॥घरदार कोठूनि पवित्र ? जागल्यावरीहि आळसलें गात्र । अव्यवस्था माजे सर्वत्र । बध्दकोष्ठता वाढ घे ॥३९॥यांतूनचि वाढती सर्व रोग । वैद्य डॉक्टरांचा लागला भोग । तिकडे बिघडत गेले उद्योग । शिरलें दुर्भाग्य त्या घरीं ॥४०॥ प्रात:काळची आरोग्यदायी हवा । सदासर्वदा मानवते जीवा । प्रसन्नता देई ऋतु तेधवा । सर्व प्राणीमात्रासि ॥४१॥सर्व वनेंरानें जागीं होतीं । पुष्पें सारी विकास पावतीं । पशुपक्षीहि नेहमी उठती । प्रात:काळीं ॥४२॥पहाटे दोहतां गाय-म्हैस । त्यांत अधिकचि सार-अंश । पहाटवारा चढवी रक्तास । लाली रोगप्रतिकारक ॥४३॥म्हणोनि प्रात:काळीं उठावें । ब्राह्ममुहूर्ता डोळयांनी बघावें । उठतांच प्रात:स्मरण करावें । आसनस्थानीं ॥४४॥ प्रात:स्मरण म्हणजे नवीन स्फूर्ति । उगवल्या दिवशीं व्हाया प्रगति । उत्तम कार्य घडावें पूर्ण गतीं । म्हणोनि प्रार्थना देवाची ॥४५॥ त्यावेळीं जो संकल्प करतो । वाईट न घडो ऐसें चिंतितो । तो सुसंस्कारें वाढत जातो । उन्नतिमार्गे वेगाने ॥४६॥म्हणोनि प्रात:स्मरण करावें । नैसर्गिक उत्साहभरें भरावें । मग प्रातर्विधी आटोपावे । नित्यनेम हा अमोलिक ॥४७॥पहाटेस शौचमुखमार्जन । त्याने वायुदोषांचें होय शमन । शरीरीं नवा जोम निर्माण । होय निर्मळपण लाभोनि ॥४८॥सकाळीं करावें उष:पान । त्याने अंतरींद्रियांचें शांतवन । नंतर करावें शीतजलस्नान । अति प्रसन्न चित्त राहे ॥४९॥शीतजलस्नानाचें महिमान थोर । तेणें त्वचाशक्ति जागे सुंदर । शरीर राहे सदा तरतर । उत्साहाने ॥५०॥ मेंदूचा भाग थंड राहिला । तरीच बुध्दीचा उत्कर्ष झाला । ऐसा थोरांना अनुभव आला । कितीतरी ॥५१॥उष्ण पाण्याने स्नान करणें । म्हणजे बीमारचि तो समजणें । ऐसी संवय नेहमी लावणें । हानिकारक देहासि ॥५२॥ स्नानोत्तर अरुणोदयापूर्वी । सामुदायिक ध्यान-उपासना करावी । प्रार्थनामंदिर अथवा पडवी । ध्यानास्तव पहावी निर्मळ ॥५३॥ अरुणोदयाची सुवर्णप्रभा । दिसे लावण्याची शोभा । निसर्ग वाढवी शांति प्रतिभा । अलभ्यलाभा पावती योगी ॥५४॥जन म्हणती योग्यांनी ध्यान करावें । आपण कासया उठावें स्मरावें ? हें म्हणणें कदापि नोहे बरवें । कोणाचेंहि ॥५५॥ योगी आपली समाधि घरी । साधक सन्मार्गाचा योग करी । जीवन-उज्ज्वलतेचा योग संसारीं । प्रात:काळीं साधतसे ॥५६॥ ध्यानापरीच सहल प्रात:काळची । जरूर करावी संवय रोजचि । त्याने देह मन राहे निर्मल शुचि । प्राणवायुस्पर्शाने ॥५७॥ कोणी धावती कोणी चालती । कोणी आसनें सूर्यनमस्कार घालती । कोणी गाती चिंतन करिती । हें दृश्य दिसो प्रभातीं ॥५८॥कांही पठण-पाठण करावें । शरीरमनासि वळण लावावें । आयुष्य सुंदर होतें आघवें । ऐशा क्रमें ॥५९॥ घरीं असो वा आश्रमी । प्रवासीं असो वा तीर्थधामीं । प्रात:काळीं नित्यनियमीं । अभ्यासक्रम उरकवावा ॥६०॥ घरा-आश्रमाची करावी सफाई । स्वच्छता मार्गी ठायीं ठायीं । गायीम्हशींचे गोठे सर्वहि । आरशासारखे करावे ॥६१॥गडीमाणसांनी सहाय्य द्यावें । परि प्रत्येकाने काम करावें । आईबाई मिळोनि उरकवावे । कामधंदे चटचट ॥६२॥ कोणीहि बघे अरुणोदयीं । सडासंमार्जन रांगोळी रई । आंतबाहेर गलिच्छता नाही । कामें झालीं सकळांचीं ॥६३॥ ऐसें ज्या गांवीं झालें । समजावें लक्ष्मीचें मन मोहिलें । आरोग्याचें राज्य आलें । तया गांवीं ॥६४॥तेथे उदंड आयुष्य वाढतें । जेथे प्रात:काळीं स्वच्छता होते । कोणीहि न दिसे झोपला जेथे । प्राणीमात्र ॥६५॥म्हणोनि ऐसे नियम करावे । चुकलियाहि चुकों न द्यावे । पुन:पुन्हा सावरावें । वर्तन आपुलें ॥६६॥ऐसा अभ्यास जडल्यावरी । आरोग्य भाग्य नांदे संसारीं । औषधांची गरजचि नुरे शरीरीं । वाढे अभ्यंतरीं नवें तेज ॥६७॥ पूर्वी प्रात:काळीं माध्यान्हा । आणि सायंकाळीं जाणा । होती त्रिकाळ संध्याप्रार्थना । संस्कारास्तव लाविली ॥६८॥ तें सर्वकाळचि उचित । म्हणोनि प्रातर्ध्यान नियमित । आणि सायंप्रार्थनाहि नेमस्त । करीत जावी सर्वांनी ॥६९॥ निद्रेचिया आदिअंतीं । दिवस-रात्रीच्या संधीप्रति । आणि भोजनसमयीं संकल्प होती । ते बनती दृढ संस्कार ॥७०॥जनींभोजनीं हरि आळवणें । गीतापाठादि उच्चारणें । सात्विक भाव हृदयीं भरणें । शुध्द करी जीवनासि ॥७१॥ श्रोतयांनी प्रश्न केला । भोजनीं आळवावें भगवंताला । याचें फळ सांगा आम्हांला । काय कैसे ? ॥७२॥ भोजन म्हणजे आहार घेणें । तेथे कशाला देवाचें गाणें ? हास्यविनोद कां न करणें । उल्हासास्तव ? ॥७३॥ऐका याचेंहि उत्तर । भोजन म्हणजे पिंडसंस्कार । यज्ञहि यासि म्हणती थोर । वैश्वानर अग्निमाजी ॥७४॥भोजनाचे वेळीं प्रसन्न । केलिया विचार शुभचिंतन । तैसेचि भिनती निर्मळ गुण । अन्नासवें ॥७५॥ पवित्र धूप सुगंध सात्विक । तेणें वातावरण रोगनाशक । रांगोळया आदि प्रसन्नकारक । स्वच्छ असावी जागा तरी ॥७६॥ स्वच्छतेविणा जें भोजन । समजावें तें मलीनपण । अग्नि वाढाया हातपाय धुवोन । पुसोनि भोजन करावें ॥७७॥ कांही करावें भोजनापूर्वी काम । जेणें मिळे सकळांसि आराम । कार्य होतसे सुगम । सर्व जनां मिळोनि ॥७८॥ कोणी आसने, पाट टाकावे । कोणी वाढावे, पाणी ठेवावें । कोणी उदबत्ती, धूप लावावे । सुगंधासाठी ॥७९॥प्रथम बसोनि पाठ म्हणावा । गंभीर सुरें रंग भरावा । वाढणें संपता शांतिमंत्र गावा । गांभीर्याने ॥८०॥मग करावें ब्रह्मार्पण । आदराने करावें अन्नसेवन । भोजनींहि श्लोक, मधुरवचन । उल्हासाने बोलावें ॥८१॥ भोजनापूर्वी आचमन । त्याचा उद्देश अग्निदीपन । चित्राहूति जलआवर्तन । समर्पण हाचि भाव त्याचा ॥८२॥ ईश्वरें उपजविलें अन्न । तें अन्न ईश्वरी कृपादान । ज्यावरि सर्वांचें असे जीवन । त्याचें ऋण आठवावें ॥८३॥ त्याचीं लेकरें जीवजन । त्यांना आधी लाभावें अन्न । यासाठी विश्वदेवाचें संतर्पण । यज्ञमय भोजन या भावें ॥८४॥भोजन म्हणजे भूमातेचा प्रसाद । समजोनि सुखें घ्यावा आस्वाद । ज्यांत शेतकर्यांचे कष्ट विशद । तें अन्न सेवावें सेवेस्तव ॥८५॥ऐशा सदभावें आदरें सेवावें । उत्तम श्लोक भोजनीं गावे । वेडेंवाकुडें न बोलावें । क्रोधा न यावें भोजनसमयीं ॥८६॥हास्यविनोद जरी असला । तरी अश्लीलता न यावी प्रसंगाला । उच्छिष्ट कण न पाहिजे टाकला । भोजनप्रसंगीं ॥८७॥ राजस तामस सात्विक । भोजनाचे प्रकार अनेक । त्यांत आपली शक्ति पाहूनि सम्यक । पचेल तैसें करावें ॥८८॥ कोणी सज्जन म्हणती भले । पचनासाठी सर्वचि खाद्य निर्मिलें । परंतु पचनाचें तारतम्य पाहिलें । पाहिजे जुळवोनि ॥८९॥ कोणी खाद्य रोग करी । कोणी खाद्य भोग भरी । कोणी खाद्य वाईट संस्कारी । करितें प्राण्या ॥९०॥कांही जीव चुनखडीहि खाती । कांही मांसकिडे भक्षिती । परंतु त्यांची स्वभाव-प्रकृति । त्याचि परी राहे ॥९१॥मानवाने काय खावें । म्हणजे मानवपणेंचि शोभावें । हेंचि येथे पाहावें । लागतें सज्जनांसि ॥९२॥ शुध्द सात्विक अन्न घेतलें । त्याने सात्विक विचार प्रवर्तले । तामस राजस खाद्य सेविलें । तैसें झालें आचरण ॥९३॥मद्यमांसाहार करिती कोणी । विकारबुध्दि वाढे मनमानी । भलतेचि रोग जाती लागोनि । सांसर्गिक आदि ॥९४॥ हें तों निश्चितचि आहे । खाद्यें रसरक्त उत्पन्न होय । रक्तापासूनि मांस मेद वीर्य । नि:संशय होती शरीरीं ॥९५॥जैसे ज्याचे रक्तरसगुण । तैसे विचार होती स्फुरण । क्रूर-शूर मंद-बुध्दिमान । रक्तमिश्रणें दिसताति ॥९६॥कांही आनुवंशिक गुण येती । रक्तरेताचिया मिश्रस्थितीं । कांही खाण्यापिण्याचेहि होती । संस्कार अंगीं ॥९७॥कांही संगतीने वळण लागे । भूमिपात्रें कांही परिणाम जागे । कांही प्रयत्नशीलतेचे धागे । वळविती जीवा ॥९८॥हें सर्व जरी खरें असलें । तरी मुख्य अंग खाद्यपेयचि झालें । कारण त्यानेच बनलें-घटलें । रक्तमांस जीवांचें ॥९९॥उत्तम रक्ताचें असावें शरीर । तरि अन्नहि उत्तमचि खावें सुंदर । बाष्कळ खातां मेंदू-इंद्रियांवर । बाष्कळताचि येईल ॥१००॥मग विषय-वासना नावरे । लागेल बहिरंगाचें वारें । झगडती जैसीं जनावरें । तैसे अनावर मानवहि ॥१०१॥ ज्यासि क्रूरकर्मचि करणें आहे । त्याने तेंचि खावें नि:संशय । तैसेचि भोगावेत अपाय । झालिया अंगीं ॥१०२॥ज्यासि मनुष्यपण लाभावें । ऐसें वाटे जीवेंभावें । त्याने सात्विक अन्नचि सेवावें । सर्वतोपरीं ॥१०३॥ एकाने ऐसा प्रश्न केला । सात्विक अन्न कुठलें गरीबाला ? त्याने काय करावें बोला । जीवनासाठी ? ॥१०४॥ मित्रहो ! सात्विक अन्नचि सहज मिळतें । जें श्रमाने शेतींत पिकतें । भाजीभाकरी भातपोळी लाभते । अल्प प्रयासें ॥१०५॥ सूर्यकिरणांनी तयार झालीं । कंद भाज्याफळें बागेंत पिकलीं । सत्वांशयुक्त सर्व तीं भलीं । आरोग्यदायी ॥१०६॥ साधें सहज ताजें पावन । तेंचि असे सात्विक अन्न । नाना विकृतींचें मिष्टान्न । तें सात्विक नव्हे ॥१०७॥ कळणाकोंडाहि सात्विक । ज्या सत्त्वें तगती गरीब लोक । सात्विक म्हणजे शरीरपोषक । आरोग्यदायी सुसंस्कारी ॥१०८॥ तळलें विटलें खाऊं नये । आंबट खारट सेवूं नये । तैसें अति गोडहि जेवूं नये । भोजनीं कोणी ॥१०९॥मिष्टान्न नेहमीं सेवूं नये । तंळण मसाले खाऊं नये । मिरचीवरि सोकावूं नये । सर्वांनीच ॥११०॥ स्वच्छ असावें सात्विक अन्न । ताजें रुचिकर आणि रसपूर्ण । पालेभाजी फळभाजी विभिन्न । स्वाद संपन्न मुळांतचि ॥१११॥उगीच आटवून आटवून रबडी खाणें । वाटून वाटून पुरणपोळी करणें । तळून तळून भजेपुर्या जेवणें । उन्मत्तांचें भोजन हें ॥११२॥ चाळून गाळून केला रवा । पिसून किसून भरला खवा । खातांना जीभ करी वाहवा ! पोट जाई कामांतूनि ॥११३॥कांहींनी खाण्याचीच वाढविली कला । भात खाती टोपला-टोपला । वरोनि चिंचपाणी पेला पेला । भातावरि घेती ॥११४॥कांही लाडूपेढे खूपचि खाती । रबडी हलवा तंडोनि घेती । पैसे ठरवोनि माप लाविती । खावयाचें ॥११५॥ मग त्याने पचन होईना । सारा शरीराचा होय धिंगाणा । नाना रोग जडती, यातना । द्यावयासि ॥११६॥ कोणी स्वादासाठी भोजन करिती । नको असलें तरी पोटांत कोंबती । मग बिमारी घेऊन उठती । कॉलरा, अपचन, संग्रहणी ॥११७॥ कांहींना होते उदर-कुंदी । चाले अपानांतून दुर्गधी । लोक हसती ’ खाणेंपिणें स्वच्छंदी । कां करतो ’ म्हणोनिया ॥११८॥ प्रकृतीच्या विरुध्द आहार । नाही काळवेळाचा सुमार । आंबट तेलकट आदि विषम मिश्र । ऐसा आहार विषारी ॥११९॥कांही लोक ऐसेंचि खाती । प्रकृति बिघडलिया औषध घेती । गरीबास कुठली इतकी संपत्ति ? वैद्य होती घरोघरीं ॥१२०॥ डॉक्टर म्हणती पथ्यचि नाही । तेणें रोगाचें मूळ तैसेंचि राही । रोगी पाहती तेंच नित्यहि । मृत्यूची घाई झाल्यापरी ॥१२१॥ पहिलें खावोनि मस्त व्हावें । मग औषधि घेवोनि पचवावें । ऐसे उपद्रव कासयासि करावे । उन्मत्तपणें ? ॥१२२॥ उगीच आहे ऐसें खाणें । पचविण्यासाठी चूर्ण घेणें । अन्नरसाची नासाडी करणें । कशासाठी ? ॥१२३॥ आंत वाढत जातां विकृति । धन्वंतरीहि काय करिती ? नष्ट करोनि औषधें, संपत्ति । मुखी माती पडतसे ॥१२४॥ परंतु लोक आग्रहीं पडती । हितचिंतक म्हणवोनि खाया देती । ते समजावे घातक श्रोतीं । ठेवावी निश्चिती आहाराची ॥१२५॥नियमित सात्विक अन्नचि खावें । साधें ताजें, भाजीपाले बरवे । दूधदही आपुल्यापरी सेवावें । भोजना करावें औषधचि ॥१२६॥ सर्व भोजनीं उत्तम भोजन । ज्यांत गोघृतदुग्धतक्रपान । समजावें अमृताचें सेवन । शरीरासाठी ॥१२७॥ गोदूध नित्य सेवन करितां । कायाकल्पदि होय तत्त्वता । शक्ति चपलता बुध्दिमत्ता । आरोग्य हातां नित्य राही ॥१२८॥ निरोगी आयुष्य लाभेल बहुत । अल्पमृत्यु अथवा रोगांची सांथ । हे पाऊल न ठेवितील गांवात । तुकडया म्हणे ॥१२९॥ इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । व्यक्ति-आचारें ग्रामारोग्य वर्णित । चौदावा अध्याय संपूर्ण ॥१३०॥ ॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥*" उदयाचा पूजावसर जालेयानंतरे गोसावी विहरणासि बीजे करिती : निरूपण करिती : । " ( गद्यपूजा. ) जूझवीति घाववीति पोहवीति : दरे दरकुटे बुजवीति : पाखाण फोडवीति : आनंदवीति : श्री चक्रधरू ॥ ( पद्यपूजा. ) N/A References : N/A Last Updated : September 20, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP