विवेकसार - एकादश वर्णकम्

श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .


॥ श्रीवरदमूर्तिर्जयति ॥

सच्चिदानंदलक्षणं ॥ किमस्य सत्स्वरूपत्वं चिद्पत्वं किमात्मनः ॥ किंवानंदस्वरूपत्वमित्येतच्चिंत्यते स्फुटं ॥१॥

आत्म्याचे सद्रूपत्व जे त्याते चिद्रूपत्व जे त्याते आनंदरूपत्व जे त्याते विचारितो ॥ सद्रूप म्हणिजे कोणते म्हणाल तरि येकाकरून बाधेते न पाउन ॥ काळत्रयाचे ठाइही येकरूप होत्साते जे आहे ते सद्रूप ॥ हे सद्रूपत्व आत्म्याचेठाइं आहे काय म्हणाल तरि ॥ आत्मा कालत्रयाचेठाइंही आहे म्हणून आत्म्याचेठाइही आहे ॥ आत्मा कालत्रयाचेठाइही आहे म्हणावयाविषयीं प्रमाण कोणते म्हणाल ॥ सर्वजनाचा अनुभव जो तोच प्रमाण ॥ सर्वजन म्हणता कोणते म्हणाल तरी ॥ दरिद्री आढ्य कर्मी भक्त मुमुक्षु हे सर्व जन याचा अनुभव ॥ तो कैसा म्हणाल

तरि बोलतो ॥ दरिद्रि जो तो म्या जन्मांतरी कोणासही कांही दिधले नाही म्हणून या जन्माचेठाइंही मी दरिद्र अनुभवितो याजन्मी तऱ्ही द्याव्याकारणे येक कपर्दिकाही नाही यास्तव येणार जन्माचेठाइही मी दरिद्री होऊन उत्पन्न होईन ॥ याप्रकारे दरिद्र्य़ाचे बोलणे यावरूनही ॥ तैसेच आद्यही म्या जन्मांतरी भल्यास काहीतरी दिधले म्हणुन या जन्मी एश्वर्यातेच अनुभवितो ॥ या जन्मीही यथाशक्ति काही भल्यास समर्पितो म्हणून आपणास येणार जन्माचेठाइंही ऐश्वर्यच प्राप्त होईल याप्रकारे आढ्याच्या बोलण्यावरूनही ॥ ऐसेच कर्मठ जो तोही आपण अनेक जन्माचेठाई सत्कर्मच करिता आलो म्हणून त्या सद्वासनेकरून आपणास परलोक जो तो प्राप्त आहे ॥ ऐसे कर्मठाचे बोलण्यावरूनही ॥ याचप्रकारे भक्त जो तो तोही ॥ आपण अनेक जन्मापासून भगवान् जो त्याते उपासिले म्हणून त्या उपासनेकरून या जन्माचेठाइंही आपणास निरतिशयभक्ति प्राप्त आहे ॥ या भक्तिकरून आपणास भगवल्लोकप्राप्त होतील ऐसे भक्त जो त्याच्या बोलण्यावरूनही ॥ तैसेच मुमुक्षु जो तोही आपण अनेक जन्मास सिद्ध होत्साता ईश्वरार्पणबुद्धि करून अनेक सत्कर्मे जे ते केली म्हणून आपणास या जन्माचेठाई चित्तशुद्धि जे तेही सद्गुरुलाभ जो तोही श्रवणादिक जे तेही प्राप्त झाले आपण कृतार्थ आपणास या उपरि जन्म नाही ॥ काळत्रयाचेठाइही आपण आहोच ऐसे च मुमुक्षुच्या बोलण्यावरूनही आत्म्यास सद्रूपत्व सिद्ध जाले ॥ आम्ही आदिकरून समस्तजनही या पाचामध्ये अंतर्भूत म्हणुन या पांचाच्या अनुभवेकरून आह्मासही सद्रूपत्व सिद्ध आहे ऐसे तरि अनुभवेकरून आम्हासही सद्रूपत्व सिद्ध जाहले इतुकेच परंतु युक्तिकरून सद्रूपत्व सिद्ध जाहले नाही की ऐसे म्हणाल तरि बोलतो ॥ आम्हीही काळत्रयाचेठाइंही आहो म्हणून युक्ति करूनही सद्रूपत्व सिद्ध आहे ते कैसे म्हणाल तरि ॥ आम्ही आता आहो किंवा नाही म्हटिले तरि आहोच शरीरी होत्साते आहो ॥ किंवा अशरीरी होत्साते आहो म्हणाल तरि अशरीरी होऊन असणार जो त्यास व्यवहार घडेना म्हणूनही आणि आम्ही आता व्यवहार करीत होत्साते आहो म्हणूनही शरीरी होत्साते आहो ऐसे जरि जाले हे शरीर जे ते काशावरून आले म्हणाल तरी कर्म जे तेणेकरून आले ॥ कोणे केल्या कर्मेकरून आले म्हणाल तरी दुसऱ्याने केल्या कर्मेकरून आले म्हणाल तरी अन्याने केले जे ज्योतिष्टोमादिकाचे फलही आम्हास आले पाहिजे ॥ येऊ सकेना म्हणुन अन्याने केल्याकर्मेकरून आम्हास शरीर जे ते आले म्हणता नये ॥ ऐसे म्हणुन आम्हीच केले जे कर्म तेणेकरून आम्हास शरीर जे ते आले म्हणून बोलावे ॥ ऐसे जरी जाले या जन्मी केल्याकर्मेकरून शरीर आले किंवा जन्मांतराच्याठाई केले जे कर्म तेणेकरून शरीर जे ते आले म्हणाल तरी या जन्माचे ठाईं केले जे कर्म तेणे करून आले ॥ म्हणुन तरी शरीर जे ते पूर्वभावी होत्साते जे शरीर त्यास कारण होऊ न शके म्हणुन या जन्मीचेठाई केले जे कर्म तेणेकरून शरीर जे ते आले म्हणुन बोलता नये ॥ ऐसे आहे म्हणुन जन्मांतराचेठाई केले जे कर्म तेणेकरून हे शरीर आले म्हणून बोलावे ॥ ऐसे जरि जाले तरि जनमांतराचेठाई शरीरी होत्साते असून कर्म केले किंवा अशरीरी होत्साते असून कर्म केले म्हणाल तरि ॥ अशरीरी होत्साते असून कर्म करणे घडेना ॥ म्हणुन शरीरी होत्साते तरि ॥ त्याहुन पूर्वजन्माचेठाइं केले जे कर्म तेणेकरून आले याप्रकारेकरून आम्ही अनेक कोटिकल्पापासुनही शरीरी होत्साते असून अनेक कर्म जे त्याते करित होत्साते त्या त्या कर्मेकरून आलीं जे अनेक शरीरे जे त्यात ग्रहण करून त्या त्या शरीरनिष्ट सुखदुःखे जे त्याते अनुभवित होत्साते अनेक कल्पादिकाचेठाइ आहो म्हणून तर्क करिजेतो ऐसे आहे म्हणून आत्म्यास युक्ति करूनही ॥ भूतकाळाचेठाइंही वर्तमानकाळाचेठाइंही आहो म्हणून सिद्ध जाले ॥ ऐसें जाले जरि ॥ आत्म्यासि युक्तीकरून भविष्यकाळाचेठाइं विद्यमानत्व कैसे म्हणाल तरि आता आम्ही श्रवणमनननिदध्यासन जे त्याते करून ज्ञान जे ते संपादिले नाही जरी पूर्वजन्माचेठाइ केले जे कर्म त्यास फळभूत होत्साते हे जे शरीर जे ते आम्हास जैसे आले तैसेच या शरीरेकरून केली जे कर्मे त्यास फळभूत होत्साती अनेक शरीरे जे ते याउपरी येतीलच हें जें शरीरे जे याते परिग्रह करून अनेकविध जे कर्मे जे याते जैसे करिती तैसेच ते जे शरीरे जे त्याते ही परिग्रहकरून अनेकविध कर्मे करून ते जे कर्म जे त्यास फलभूत अनेकशरीरे जे ते आम्हास येतीलच ते जे शरीरे जे त्याते परिग्रहकरून ही अनेकविध जे कर्म त्याते करीत होत्साते या कर्मास फळरूप जे सुखदुःख जे त्याते अनुभवित होत्साते अनेक कोटिकल्पेही आहों म्हणून युक्तीकरूनही आठवण करिजेते ॥ म्हणौन काळत्रयाचेठाई आम्ही आहो म्हणायाचा युक्तिकरूनही सिद्ध जाले आणखीही प्रलयाचेठाइ जग जे ते बाधेते पावले जरी आम्ही बाधेते पावत नाही म्हणुन एकाककरूनही बाधेते न पाउन असणे आम्हास सिद्ध जाले ॥ आम्हास उत्पत्यादिविकार जे ते नाहीत म्हणुन येकरूपता जे तेही सिद्ध जाली ॥ हे सांगितले जे सल्लक्षण जे ते आमचेठाइ आहे म्हणून आम्हास सद्रूपत्व सिद्ध जाले हे सिद्धच ॥ आत्म्यास चिद्रूपत्व जे ते कैसे म्हणाल तरी ॥ साधनांतर निरपेक्षेण स्वयंप्रकाशमानेनस्वस्मिन्नारोपितसर्वपदार्थावभासकत्वं चित्वं ॥ याचा अर्थ ॥ साधनांतराते नापेक्षुन व आपणही भासुन आपलेठाइं आरोपिले जे सर्वपदार्थ त्यास भासवणे जे ते चिद्रूपत्व ॥ हे चिदूपत्व जे ते आत्म्याचेठाइं आहे काय म्हणाल तरि आहे ॥ ते कैसे म्हणाल तरि ॥ आम्हाकरून बाल्यादिकरून एतावत्पर्यतही जे जे व्यापार घडुन आले त्या त्या व्यापारामध्ये कित्तेक न भासले जरी उरले व्यापार अवघेही प्रकाशसाधन ऐसे जे आदित्यचंद्र नक्षत्रअग्नीविद्युच्चक्षु यामध्ये येका साधनातेही नापेक्षुनच गाढांधकाराचेठाइं असूनही आम्हास अवघीयासही भासते म्हणुन आत्मस्वरूप आम्ही जे आमुचेठाइं चिद्रूपत्व जे ते आहेच ऐसे जरी जाले बाल्यादिकरून येतावत्पर्यंतही आमचेठाइं आरोपिले जे पदार्थ भासताहेत की आमचेठाइं आरोपिला जो समस्तप्रपंच जो तो भासत नाही म्हणुन सर्वपदार्थावभासक ऐसे जे चिद्रूपत्व जे ते आम्हास कैसे घडेलच ॥ आंतर प्रपंच जो तो बाह्यप्रपंच जो तो सर्व पदार्थ म्हणून बोलिजेतो या प्रपंचद्वयातेही आम्हीच प्रकाशवितो या दोहीमध्येही बाह्यप्रपंच जो तो कैसा भासवितो म्हणाल तरि बोलूं ॥ पृथ्वीआपतेजवायूआकाश म्हणुन ॥ शब्दस्पर्श रूपरसगंध म्हणुन पंचीकृत पंचमहाभूते ब्रह्मांडचतुर्दशभुवने चतुर्विधभूतग्रामें म्हणुन विविधनामरूपगुणधर्मविकार शक्त्याश्रय होत्साता संपूर्ण जाणिजेतो किंवा बाह्यप्रपंच जो तेणेकरून आम्ही जाणिजेतो म्हटिलें तरि बाह्यप्रपंच जो तेणेकरून आम्हीं जाणिजेत नाही म्हणून आम्हांचकरून बाह्यप्रपंच जो त्यातें जाणिजेतें ॥ बाह्यप्रपंच जो त्याते जाणत होत्साते आहो ॥ त्या आम्हास बाह्या होत्साता सर्व पदार्थ जो त्याचे अवभासकत्व सिद्धच आहे ॥ आंतरपदार्थवभासकत्व जे ते कैसे म्हणाल तरि अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय हे कोश जे ते स्थूलसूक्ष्मकारणशरीरे जे ते अस्ति जायते वर्ध्दते विपरिणमते अपक्षीयते विनश्यपति हे षड्भावविकार जे ते ॥ त्वड्यांस शोणितअस्थिस्नायुमज्जा ऐश्या षट्धातु ज्या त्या ॥ अशना पिपासाशोकमोहजरामरण म्हणाव्याच्या षडूर्मी ज्या त्या ॥ श्रोत्र त्वक् चक्षु जिव्हा घ्राण म्हणाव्याचे ज्ञानेंद्रिय पंचक जे ते वाक्पाणिपादपायूउपस्थकर्मोंद्रिय जे ते प्राणपानव्यानोदानसमान म्हणाव्याचे प्राणपचक जे तें मनुबुद्धिचित्त अहंकार म्हणाव्याचे अंतःकरणचतुष्ट्य जे ते ॥ संकल्पाध्यवसायभिमानावधारण म्हणाव्याच्या अंतःकरणवृत्ति ज्या त्या ॥ जागृत्स्वप्नसुषुप्ति म्हणाव्याच्या अवस्थात्रय जे ते ॥ विश्व तैजस प्राज्ञ म्हणाव्याचे अवस्थावान् जे ते ॥ समाधि मूर्च्छा जे ते ॥ मनोचाक्काय म्हणाव्याचे त्रिविधकारण जे ते ॥ कामक्रोध लोभ मोह मद मात्सर्य म्हणावयाचे अरिषड्वर्ग जे ते ॥ नित्यानित्य वस्तुविवेक इहामुत्रार्थफलभोगविराग शमादिषड्संपत्ति मुमुक्षता म्हणायाचे साधनचतुष्टय जे ते ॥ सात्विक राजस तामस गुण जे ते ॥ सुखदुःख जे ते ॥ ज्ञानाज्ञान जे ते ॥ पंचक्लेश अविद्यासामान्य अहंकार राग द्वेष ॥ पुत्रादिकाचेठाइ माझे ऐसी बुद्धी अभिनिवेश ॥ मैत्री करुणा मुदिता उपेक्षा जे ते ॥ यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी अष्टांगयोग जे ते ॥ प्रत्यक्ष अनुमान उपमान शब्द अर्थपत्ति अनुपलब्धी ऐसी षट्प्रमाणे जे ते ॥ रोगारोग जे ते ॥ इत्यादिक करून विविध नामरूप गुणधर्मविकार शक्त्याश्रय होत्साता अंतरप्रपंच संपूर्णही आह्माकरून जाणिजे तो ॥ किंवा अंतरप्रपंच जो तेणेकरून आम्ही जाणिजेतो म्हणाल तरि अंतरप्रपंचेकरून आम्ही जाणिजेत नाही ॥ म्हणून आम्हाचकरून अंतरप्रपंच जो त्याते जाणत होत्साते आम्ही जे त्या आम्हास तर सर्वपदार्थावभासकत्व जे ते सिद्धच आहे ॥ म्हणुन आमचेठाइ आरोपित जे सर्वपदार्थावभासकत्व जे ते सिद्धच आहे ॥ म्हणुन आमचेठाइ आरोपित जे सर्वपदार्थावभासकत्व जे ते साधनांतराते नापेक्षुनच आम्हास सिद्ध होउन आहे ॥ नव्हेहो मनेकरून सर्वातेही जाणिजे ते की या कारणास्तव साधनांतराच्या निरपेक्षेकरून स्वप्रकाशत्व जे ते ॥ सर्वपदार्थावभासकत्व जे ते आम्हास कैसे घडेल म्हणाल तरी घडेलच ॥ मन जे ते उत्पत्तिनाशिवंत होत्साते सावएव होत्साते परिच्छित्र होत्साते दृश्य होत्साते घटाचे परि भूतकार्य होत्सातें आहे म्हणून मनास जडत्वच परंतु चेतनत्व घडेना म्हणून जडरूप जे मन जे ते येका पदार्थातेही भासउ शकेना आत्मा जो तेणेकरून भास्य ऐसे जे मन ते आत्मा जो त्याते भासउ सकेना म्हणुन बोलावे लागते काय ॥ तरि कैसे म्हणाल तरी ॥ आत्मा जो तोच मन जें त्यातेंही सर्वपदार्थ जे त्यातेही भासवितो ॥ याप्रकारे भासाव्याचेठाइ मन जे ते उपाधिमात्र ॥ ते कैसे म्हणाल तरी दृष्टांतपूर्वक निरोपितो ॥ तो दृष्टांत कोणता म्हणाल तरी बोलतो ॥ दिवे लावणीचेठाई तेलेकरून भिजविले जे वातीते आपणही न भासत होत्साती असुन त्या तैलादिकाते जैसे भासउ सकेना ॥ अग्नीतरि वाती म्हणायाच्या उपाधीस मिळुन साधनांतराते नापेक्षुन विशेषेकरून आपणही भासत होत्साते ते वाति ते तैल जे त्याते दिवेलावणी जे तिते आणि सर्व पदार्थ जे त्याते जैसा भासवितो ॥ तैसेच दिवेलावणीस्थान जे स्थूळशरीर जे त्याचेठाइं तैलस्थानि जे कर्म तेणेकरून उत्पथाति जे वातिस्थान जे मन जे ते आपणही न भासुन अन्यपदार्थ जे त्याते भासउ शकेना आत्मा तरी त्या मनासी मिळुन साधनांतराते नापेक्षुनच विशेषकरून भासुन त्या मनाते त्या देहेंद्रियादिकाते अंतरबाह्यप्रपंच जो त्याते भासवीत होत्साता आहे ॥ अंतःकरण जे त्याते ॥ अंतःकरणवृत्ती ज्या त्याते जाणावयाचेठाई आत्मा निरोपाधिक होत्साता जाणतो ॥ तें जें जाणनेरूप आत्मस्वरूप जे तेच आम्ही म्हणून साधनांतर निरपेक्ष होउन स्वयंप्रकाशमान होउन सर्वपदार्थावभासकत्व जे ते आम्हास सिद्ध जाले ॥ आत्मा जो त्यास आनंदस्वरूप कैसे म्हणाल तरी नित्यनिरुपाधिक निरतिशयसुखरूपत्व आनंदत्व याचा अर्थ स्रकूचंदनादिक जे येहीकरून उत्पन्न न होउन सर्वोत्कृष्ट होत्साते सर्वदुःखनिवर्तक होत्साते ॥ सुख जे ते आनंदत्व ॥ ते आनंदत्व जे ते समस्त जे तेहीकरून सुषुप्तिकाळाचेठाइं अनुभविजेते ॥ त्या आनंदाचेठाइ हे बोलिले लक्षण आहे ॥ नव्हेहो सुषुप्तिकाळाचेठाइं आनंदत्व जे ते प्राप्त असले तरी त्या आनंदाचेठाई हे लक्षण जे ते आहे म्हणुन बोलूये ॥ दुःखाभाव मात्र वेगळेकरून आनंद जो तो हि नाही नाहीं त्या आनंदास नित्यनिरूपाधिकत्व जें तें निरतीशय सुखरूपत्व जे तें कोठुन आलें ॥ ऐसे म्हणुन सुषुप्तपुरुष जो तो त्या ससुषुप्तिअवस्थेचेठाई सुख जे त्याते अनुभविले नाही जरी ॥ त्या अवस्थेपासुन उठल्यानंतर मी सुखरूप निजलो होतो म्हणुन बोलिले न पाहिजे ॥ दुःखसहित होत्साता होतो म्हणुन बोलिले पाहिजे ॥ ऐसे तरी बोलत नाही म्हणुन सुषुप्तिअवस्थेचेठाइं समस्त जे प्राणि जे तेहीकरून येक आनंद अनुभविजेतो ॥ त्या आनंदाचेठाइ नित्यनिरूपाधिक निरतिशय ऐसे जे सुखरूपत्व लक्षण आहे ॥ त्या सुखास निरुपाधिकत्व कैसे म्हणाल तरी सुखजनक स्रक्चंदनादिक विषय जे ते त्या सुषुप्तिअवस्थेचे ठाईं नसताही अवघ्याकरूनही सुखही अनुभविजेत आहे म्हणुन त्या सुखास निरुपाधिकत्व आहे निरतिशयत्व कैसे म्हणाल तरी समस्तविषयजन्यसुखामध्ये उत्कृष्ट जे स्त्रीसंभोग ठाइ विरस होउन समस्त प्राणि जे त्या सुखाते ठाकुन प्रतिदिवसीही सुषुप्तीसुखासच अपेक्षित आहेत म्हणुनही आणि त्या सुखास विघ्न करणार जे त्यास सिक्षा करिताहेत म्हणुनही त्या सुषुप्तिसुखास निरतिशयत्व आहे ॥ इतुकेच नव्हे जागृतीस्वप्नाचेठाइं दिसताहेत जे अध्यात्मीक आधीभौतिक आधिदैवीक ऐसी समस्त दुःखे जे त्याते दवडिताहे म्हणुन त्या सुषुप्तिसुखास निरतिशयत्व आहे ॥ त्या सुखास नित्यत्व कैसे म्हणाल तरी जाग्रत्स्वप्नाचे ठाइं अनुभविजेताहेत समस्त विषयसुख जे त्याते अनेकरूप होउन जैसी अनुभविजेत आहेत ॥ तैसे हे सुषुप्तिसुख जे ते अनेकरूप होउन अनुभवित नसता प्रतिसुषुप्तिचेठाई हां येकरूप अनुभविजेत आहेत म्हणून त्या सुषुप्तिसुखास नित्यत्व ॥ नित्य असता सर्वदा कां दिसत नाही म्हणाल तरी ते सुषुप्तिसुख नित्य असता अनित्यस्वरूप देहेंद्रियादिके करून कारणभूत जे आत्मसुख जे ते तिरोधान पावते यास तिरोधानत्व कैसे घडेल म्हणाल तरि घडेल ॥ यास दृष्टांत ॥अग्नि जो तो प्रकाशरूप स्वतःसिद्ध असताही स्वकार्य जो धूम्र त्याच्या संपर्केकरून त्या प्रकाशाचे तिरोधान जैसे होत आहे ॥ तैसे आत्मकार्य देहेंद्रियादिसंपर्के करून जाग्रत्स्वप्नाचेठाइं त्या सुखास निरोधन घडताहे ॥ बहिमुर्ख जो त्यास जे सुख आत्मसुख म्हणुन जाग्रत्स्वप्नाचेठाई दिसेना जरी अंतमुर्ख जो त्यास सर्वथा दिसतच आहे ॥ म्हणुन हे सुषुप्तिसुख जे ते काळत्रयाचे ठाइही आहे म्हणुन त्या सुखास नित्यनिरूपाधिकनिरतिशयत्वही सर्वदा सिद्ध आहे ॥ या विचारास फळ काय म्हणाल तरी हे सांगितले जे सदपचिद्रूप आनंदरूप आत्मा जो तो आम्हीं ॥ आमच्याठाइ सिद्ध होउन आहे म्हणुन तो सच्चिदानंदस्वरूप आत्मा जो तो आम्ही च ऐसे दृढनिश्र्चय याव्याचे या विचारास फळ ॥ या अर्थाचेठाइं संशय नाही सिद्ध ॥

केनाप्यबाधितत्वेन त्रिकालेप्यकरूपतः ।

विद्यमानत्वमस्त्यैत्सद्रूपत्वं सदात्मनः ॥१॥

स्वप्नार्पिताशेष पदार्थ भासकत्वमात्मनः ।

साधनमन्तरेणयत् वदन्ति वेदान्तविदोहितत् ॥

स्वयं प्रकाश मानस्यतु चित्स्वरूपम् ॥२॥

निरूपाधिक नित्यंयत्सुप्तौ सर्व सुखात्परम् ।

सुखरूपत्वमस्येत तदानंदत्व सदात्मनः ॥३॥

एवं विविच्य यो विद्यात्सच्चिदानंदरूपताम् ।

स्वस्यैव वेत्ति सो विद्वान् स मुक्तः सच पण्डितः ॥४॥

इति श्रीमननग्रंथे वेदांतसारे सच्चिदानंदस्वरूपनिरूपणम् नाम एकादश वर्णकं समाप्तम् ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP