विवेकसार - पञ्चम वर्णकम्

श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .


कर्मनिर्णय प्रकरण

आत्मा अकर्ता

॥ श्री गुरु सदाशिवाय नमः ॥

हें कर्म कित्या प्रकारिचे म्हणून विचारतो । ते कैसे म्हणाल तरि पुण्यपापमिश्र म्हणून तीप्रकारिची कर्मे आहेत या पुण्यपापमिश्र कर्माची फळे कोणती म्हणाल तरी पुण्यकर्माचे फळ देवादिशरीरप्राप्ति पापकर्मास तीर्यक्शरीराची प्राप्ति मिश्रकर्मास मनुष्यशरीरप्राप्ति याप्रकारे याचे फळ हे जे त्रिविधकर्मे जे त्यास उत्कर्ष मध्यम सामान्य फळही बोलतो पुण्योत्कर्षास हिरण्यगर्भशरीरप्राप्ति पुण्यमध्यमास इंद्रादिकाचे शरीरप्राप्ति पुण्यसामान्यास यक्षराक्षसादिशरीरप्राप्ति ॥ हे पुण्यफळे ॥ पापोत्कर्षाचे दुसरियास संताप करणार ऐसे जे गुछगुल्मवृश्र्चिक युकामक्षिकादिशरीरप्राप्ति ॥ पापमध्यमास अंबेफणसनारीकेळमहिषीअश्र्वगर्धभादिशरीरप्राप्ति पापसामान्यास गोगजअश्र्वत्थतुलस्यादिशरीरप्राप्ति हे पापकर्माचि फळे ॥ मिश्रोत्कर्षास निष्काम कर्मानुष्ठानास योग्य शरीरप्राप्ति मिश्रममध्यमास स्वाश्रमास उचित काम्यकर्मास योग्य शरीरप्राप्ति मिश्रसामान्यास चांडालपुल्कसव्याधादिशरीप्राप्ति हे मिश्रकर्माची फळे ॥ यामध्ये मिश्रोत्कर्षे निष्कामकर्मानुष्ठानेकरून चित्तशुद्धि चित्तशुद्धिद्वारा साधनचतुष्ट्यसंपत्ति साधनचतुष्ट्यद्वारा सद्गुरुलाभपूर्वक केली जे श्रवणमननदिध्यासन जे तेहीकरून ज्ञान उत्पन्न होऊन ज्ञानद्वारा जीवनमुक्तिसुखप्राप्ति होते ॥ याकरिता विवेकी जो तेणे कर्मातार्त्तम्यफळ विचारुन मिश्रोत्कर्षेकरून जैसे जीवन्मुक्तिसुखप्राप्तिहोय ऐसे यत्न करावे ॥ हे पुण्यपापमिश्रकर्मे जे ते काशावरून करिजेत आहेत म्हणाल तरि त्रिविधकरणेकरून करिजेत आहेत वित्रिध करणे करून केली जे त्रिविधकर्मे ते कोणती म्हणाल तर बोलूं ॥ सविशेषध्यान निर्विशेषध्यान ॥ परलोकचिंता परासहितप्राप्तीची चिंता भक्तिज्ञानवैराग्याची चिंता हे आदिकरून मनेकरून केली पुण्यकर्मे ॥ सर्वदा विषयचिंतापरास अहितचिंता वेदशास्त्रअप्रमाण्यचिंताधर्माधर्मादिकाची अभावचिंता हे आदिकरून मनाचिं पापकर्मे ॥ सविशेषनिर्विशेषध्यानकाळाचेठाई विषयाचि चिंता हे मनाचे मिश्रकर्म ॥ हें पुण्यपापमिश्रकर्म मनेकरून होताहेत ॥ वेदपठण शास्त्रपठण गीतासहस्रनामपठण गायत्रीपंचाक्षरादिजप भगवन्नामसंकिर्तन परोपकारवार्ता हे अदिकरून वाचेचे पुण्यकर्म ॥ सर्वदा थोराचि निंदा बोलुनये ते बोलणे असत्य बोलणे जे ते चाहाडी सांगणे जे ते हे अदिकरून वाचेचे पापकर्म ॥ वेदशास्त्रपठणादिकाचेठाई लोकिकवार्ता असत्यादिक बोलणे जे ते मिश्रकर्म वाचेचे हे पुण्यपापमिश्र कर्मे वाचेकरून होताहेत ॥ पुण्यतीर्थाचेठाई स्नान करणे गुरुदेवास नमस्कार करणे अंगप्रदक्षणा करणे परास पीडा न करणे हे आदिकरून काईक पुण्यकर्म ॥ सर्वदा पराचि हिंसा करणे परस्त्रीसंग करणे बलात्कारेकरून परधन अपहार करणे जारासि समागम करणे जारत्व करणे हे आदिकरून काईक पाप कर्म ब्राह्मणभोजननिमित्य परास पीडा करणे बिगारी धरून तळि खांदणे इत्यादिक काईकमिश्रकर्म हे आदिकरून काईक पुण्यपापमिश्रकर्म ॥ याप्रकारे त्रिविधकरणेकरून त्रिविधकर्म होते ॥ या विचारास फळ काय म्हणाल तरी त्रिविधकर्म जे ते त्रिविधकरणेच करिताहेत आत्मा येकही कर्म नाही अकर्तृत्वस्वरूप आत्मा मी ऐसा जो दृढनिश्र्चय होणे हे मुख्यफळ ॥ अवांतरफळ म्हणिजे पूर्वोक्त प्रकारे अकर्तुत्वस्वरूप आत्मा मीं म्हणून ऐसा जो दृढनिश्र्चय नाही जऱ्ही हे त्रिविधकरणे जे याते पुण्यकर्मांचेठाई न प्रवर्त्ततिल तऱ्ही न प्रवर्त्तोत मिश्रकर्माचेठाई तऱ्ही प्रवर्तवणे ॥ सर्वथा पाप कर्मांचेठाई प्रवर्त्तउ न देणे हे अवांतरफळ ॥ येकास दोनि फळे आहेत काय म्हणाल तरि आहेत ते कैसे म्हणाल तरि ॥ केळी पेरणार जे यास मनास तृप्प्त होय तंववरि केळे भक्षणे हे मुख्यफळ पानेफुलें आदिकरून याचा विनियोग करणे हे अवांतरफळ दोनिप्रकार आहेत ॥ नव्हे हो समस्त प्राणीही आम्ही कर्म केली ऐसे म्हणताहेत त्यांच्या अनुभवेकरून कर्त्तुत्व आत्मनिष्ठ दिसताहेत म्हणून कर्त्तुत्व आत्मनिष्ठच बोलु ॥ ऐसे म्हणाल तरी आत्मा निर्विकार म्हणून निर्विकार जो आत्मा त्यास कर्त्तृत्व बोलता कामा नये ऐसे जरि जाहाले कर्त्तुत्व आत्म्याचे ठाइ दिसते की यास गति काय म्हणाल तरी अन्यनिष्ठकर्त्तुत्व आत्म्याचेठाई दिसते म्हणुन बोलावे ॥ ऐसे का बोलावे आत्म्यायास कर्त्तुत्व स्वाभाविकच बोलु म्हणाल तरि स्वाभाविकर्तुत्व जाव्याकारणे कोणी यत्न न करावा मुमुक्षु पुरुष जे ते कर्तुत्व जाव्याकारणे यत्न करिताहेत याकरिता आत्म्यास कर्तृत्व स्वाभाविक म्हणून बोलता नये ॥ आत्म्यास कर्तृत्व स्वाभाविकही होत कर्तृत्व जाव्याकारणे यत्नही करोत म्हणाल तरि स्वाभाविक म्हणिजे स्वरूप जाहाले स्वरूपनाशार्थ यत्न करिताहेत ऐस प्रसंग प्राप्त होइल स्वनाशार्थ कोणी यत्न करित नाहीत याकरिता स्वभाविकर्तृत्वनिवृत्तिकारणे यत्न करिताहेत म्हणून बोलता नये ॥ इतुकेच नव्हे स्वाभाविक कर्तृत्वाची निवृत्ति बोलता स्वरूपनाश होत आहे ॥ कर्तृत्वनिवृत्ति करू नये कि आत्मा उरला पाहिजे तोच नाहीसारिखा होतो म्हणून कर्तृत्व स्वाभाविक बोलु नये ॥ अहो आत्म्यास कर्तृत्व स्वाभाविक हो त्याची निवृत्ति ही होते कैसे म्हणाल तरि अग्निस उष्णत्व स्वाभाविक का त्या उष्णत्वाची मणिमंत्रऔषधेकरून जैसी निवृत्तिहि होत आहे तैसेच आत्म्यास स्वाभाविक कर्तृत्व जे त्याची उत्कृष्टकर्मोपासनेकरून निवृत्ति घडते म्हणून बोलू तरि अग्निचे उष्णत्व कालांतराचेठाई मणिमंत्राचेनियोगे करून जैसे आविर्भावाते पावते तैसेच उत्कृष्ट कर्मोपासनेचे फळाचा नाश जाला असता आत्म्याचे स्वाभाविक जे कर्तृत्व ते अविर्भावाते पावते ॥ इतकेच नव्हे ॥ आणखी दुषणांतर आहे ॥ ते कोणते म्हणाल तरि कर्तृत्वनिवृत्तिरूपमुक्ति जे तीस जन्यत्व ही अनित्यत्व येत आहे आणिखी आत्मा अकर्ता म्हणून बोलताहेत ज्या श्रुत्यादिक त्यास व्यर्थताही येत आहे ॥ हें न होतां सुषुप्तिचेठाई आत्मा आहे की तेथेही कर्तृत्व दिसले पाहिजे ॥ दिसत तर नाही म्हणून आत्म्यास कर्तृत्व स्वाभाविक म्हणून बोलु नये ॥ आहो सुषुप्तीचे ठाई आत्मा आसतां कर्तृत्व कां न दिसावे दिसायाचे प्रयोजन नाही ॥ तें कैसे म्हणाल तरि सुतार आदि करून स्वकार्यप्रतिकर्तृत्व असताही स्नानभोजनशयनविहारकाळाचेठाईही वासला कींकरी याचा संयोग नाहि म्हणून कर्तृत्व दिसत नाही आणि वासला किंकरि याच्या संयोगेकरून जैसे कर्तृत्व दिसते तैसे आत्म्यासही सुषुप्तीचे ठाई कर्तुत्व आहे ॥ असतांही त्रिविधकरणसंयोग नाही म्हणून कर्तुत्व दिसत नाही जागृत्स्वप्नाचेठाई करणसंयोग आहे म्हणुन कर्तृत्वादि दिसते ॥ म्हणून बोलावें तरी तूष्णींभूतावस्थेचे ठाई ही करणसंयोग आहे म्हणून तेथे तऱ्ही कर्तृत्व दिसावे दिसत नाही की ॥ म्हणुन आत्म्यास कर्तृत्व स्वाभाविक नव्हे अगांतुकच सिद्ध ॥ अगांतुक म्हणिजे काय म्हणाल तरि अन्यनिष्ठधर्म अन्याचे ठाईं दिसणे अगांतुकच असे दिसते काय म्हणाल तरि दिसते ते कैसे म्हणाल तरि नावेवरि बसूनि जाणार जो पुरुष त्यास अज्ञानेकरून नावेचे ठाई चांचल्यता तीरस्थवृक्षादिकाचे ठाई तीरस्थ वृक्षाची अचांचल्यता ते नावेचे ठाई दिसते ॥ तैसे त्रिविधकरणानिष्ठ जे कर्तृत्व जे ते अज्ञानेंकरून आत्मनिष्ठ ऐसे दिसते ॥ आत्मनिष्ठ जे अकर्तृत्व ते त्रिविध करणानिष्ठ ऐसे दिसते म्हणून आत्म्यास कर्तृत्व अगांतुकच ॥ बरेहो या त्रिविधकरणास कर्तृत्व जरी घडे ते आत्मनिष्ठ दिसते म्हणूयें त्रिविधकरणे अचेतन की त्यास कर्तृत्व बोलता नये ते कैसे म्हणाल तरी लोकामध्ये चेतनपुरुष जे त्यास करणें साक्षेचे करून कर्तृत्व दिसतें ॥ नाहींतरी अचेतने जे त्रिविध करणे यांसच कर्तृत्व बोलता चेतनत्व आणि करणांतरेंही कल्पावी तैसी कल्पिता नये की ॥ याकरितां त्रिविध करणासच कर्तृत्व कैसे बोलावे म्हणाल तरी बोलूये ॥ ते कैसे म्हणाल तरि लोकामध्ये अचेतनास कर्तृत्व देखिले आहे याकरिता त्रिविधकरणास कर्तृत्व बोलूये ॥ लोकांमध्ये कोठे देखिले म्हणाल तरि वायव्यादिकाचेठाइं देखिले ॥ ते कैसे म्हणाल तरि अचेतन वायु जो यास करणे आणि चेतनत्व या दोहीची अपेक्षा न करिता वृक्षाची उन्मूळन रूप क्रिया जे इप्रति कर्तृत्व दिसते की । आणि प्रवासासही करण आणि चेतनत्व या दोहींची अपेक्षा न करितां वृक्षादिकाची उन्मळनरूप क्रिया जे तिप्रति कर्तृत्व दिसते याकरितां अचेतनें जे तिन्ही करणें यास करणाची आणि चेतनत्वाची अपेक्षा नसून त्रिविधकर्माप्रति कर्तृत्व घडते ॥ ऐसे जरी जाले हे त्रिविधकरणेही येकाकरून प्रेरणेते पाउन त्रिविध कर्म करिताहेत किंवा आपणच करिताहेत ॥ म्हणाल तरि आपणच करिताहेत ऐसे म्हणून बोलावे ॥ ऐसे बोलिल्याने कुऱ्हाडी आदिकरून करणे म्हणुन यासही प्रेरकाची अपेक्षा नसुन कर्तृत्व घडावे ऐसे दिसत नाही म्हणून आणिखी येका करून प्रेरणेते पाउन कर्म करिताहेत ऐसे बोलावे ॥ ऐसे जरि जाले चेतनेकरून प्रेरणेते पावत होत्साति करिताहेत किंवा अचेतनेकरून प्रेरणेते पावत होत्साति कर्म करिताहेत विचारु ॥ चेतनेकरून प्रेरणेते पावत होत्साति करिताहेत म्हणुन बोलु तरि चेतन ऐसा जो आत्मा तो निर्विकार म्हणुन चेतनेकरून प्रेरणेते पाउन करिताहेत ऐसे बोलतां नये ॥ अचेतनेकरून प्रेरणेते पाउन करिताहेत म्हणुन बोलावे तरि घटघटांतरेकरून प्रेरणेते पाउन जळाहरणादिक क्रिया केल्या पाहिजे ॥ तैसे होत नाही म्हणून आणि म्या देवालय बांधले म्या सहस्राभोजने करविली ऐसे आत्म्यनिष्ठ कारयितृत्व दिसतें याकरितां आत्म्यासच कारयितृत्व बोलूं म्हणाल तरि आत्मा निर्विकार म्हणून काययितृत्व बोलतां नये ॥ ऐसे जरि जाले या कारइतृत्वाअनुभवास गति काय म्हणाल तरि अन्यनिष्ठ जे कराइतृत्व ते आत्म्याचे ठाई दिसते म्हणुन आत्म्यास कारइतृत्व अगांतुक बोलावे ॥ अन्यनिष्ठ कारइतृत्व ते आत्म्याचें ठांइं दिसते म्हणुन कां बोलावें ॥ आत्म्यास कारइतृत्व स्वभाविकच म्हणुन बोलु तरि पूर्वी कर्तृत्वाचे ठाई जितके दोष प्राप्त होते तितकेही दोष येथे प्राप्त होताहेत ॥ श्रुति युक्ति अनुभवेंकरून ॥ अतएव आत्म्यास कारइतृत्व स्वाभाविक म्हणून बोलतां नये अगांतुक ऐसे बोलावें ॥ अगांतुक म्हणिजे काय म्हणाल तरि अन्यनिष्ठधर्म अन्याचे ठाइ दिसणें ऐसे पूर्वी बोलिलो ॥ अन्य निष्ठधर्म अन्याचेठाई दिसतात काय म्हणाल तरि अग्निनिष्ठधर्म उष्णत्व प्रकाशत्व जे जे अयः पिंडाचे ठाइं अयःपिंडनिष्ठवर्तुळत्वादिक अग्निचे ठाई जैसे दिसते तैसे रागद्वेषादिनिष्ठ कारइतृत्व अज्ञानेंकरून आत्मनिष्ठ दिसतें ॥ आत्मनिष्ठ जें अकारइतृत्व ते रागद्वेषनिष्ठ दिसतें ॥ ऐसे जरि जाले अचेतनास कारइतृत्व बोलतां घटें घटांतराप्रति प्रेरणा केली पाहिजे म्हणुन बोलिलो होतो त्या उत्तर काय म्हणाल तरि तेथे योग्यता नाही याकरिता प्रेरकत्व घडेना ॥ जेथे योग्यता आहे तेथे प्रेरकत्व घडते ऐसे दिसते तरि योग्यता कोठे आहे तेथे तर प्रेरकत्व कैसे दिसते म्हणाल तरी भांड्यामध्ये दारुगोळि अग्निच्यायोगें करून चातुरंगदळाचा संहार करते याकरिता अचेतन जे पाषाणादिकाप्रति प्रेरकत्व दिसते इतकेच नव्हे प्रेतशरीरास आपली ज्ञाति जे तेहीकरून करिजेत अरहे जे क्रिया त्या क्रियेप्रति कारइतृत्व जैसे दिसते तैसे च अचेतन जे रागद्वेषादिक यास त्रिविधकरणेकरुन करिजेत आहेत जे त्रिविधकर्मे त्या प्रति कारइतृत्व बोलूं ये ॥ आहो ऐसे बोलिल्यानें आत्म्यास सर्वांतरयामी बोलणार जे श्रुतिस्मृति यास तात्पर्य काय म्हणाल तरि आत्मा निर्विकार म्हणुन अस्मादिकांच्या वाणीं कारइतृत्व बोलता नये ॥ तरि कैसे बोलावे म्हणाल तरि सूर्याच्या संनिधानेंकरून समस्त प्राणिही स्वकार्याचे ठाईं जैसे प्रवर्त्तत आहेत अयस्कांत सान्निध्येकरून लोखंड चळताहेत तैसे आत्मसान्निध्येकरून सकळही जगही चळनाते पावते ऐसे त्या श्रुतीस्मृतीचे तात्पर्य म्हणुन बोलावे ॥ ऐसे बोलिल्याने आत्म्यास निर्विकारित्व सिद्ध जाहाले काय म्हणाल तरि सिद्ध जाहाले ते कैसे म्हणाल तरि आदित्यप्रकाशसन्निधानेकरून सकळ प्राणीही व्यापार करित असताही प्राणिनिष्ठ विकारादिक आदित्यास जैसे स्पर्श करीत नाही अयस्कांत सान्निध्येकरून लोखंड चळत असतांही त्या लोखंडनिष्ठविकारादिक आयस्कांतास स्पर्श करु न शकेत तैसे आत्मा सान्निध्येंकरून चेष्टणार जे जगत तन्निष्ठ जे विकारादिक ते आत्म्यास स्पर्शु शकत नाहीत म्हणून आत्म्यास निर्विकारत्व सिद्धच आहे ॥ ऐसे जरि जाहाले तरि या विचारास फळ काय म्हणाल तरि देवाचे रथोत्छावी रथ चालावयाचे ठाई अधिकारी जे त्याकरून रथ चालावयाचा व्यापार जो होतो तो अभिमानेकरून त्यास नियंता स्वस्थ प्रभु जो त्याचे ठाई म्या दो घटिका मध्यें रथ चालविला म्हणुन जैसे दिसते तैसे रागद्वेषानिष्ठ जे कराइतृत्व ते अध्यासेकरून आत्मनिष्ठ दिसते ॥ विचारून पाहता आत्म्यास सर्वात्मना कारइतृत्व असत नाही या करिता अकारइता निर्विकार आत्मा मी ऐसा दृढनिश्र्चय याव्याचे या विचारास फळ या अर्थी संशय नाही ॥ सिद्धच आहे

॥ श्र्लोक ॥

त्रिविधैरेव करणैः पुण्यं पापं च मिश्रकम् ।

क्रियते न मया कर्मेत्येवं बुद्धिर्विमुच्यते ॥१॥

रागाद्यैरेव निर्वर्त्यं प्रेरकत्वं न मे क्वचित् ।

इतियस्य दृढाबुद्धिः समुक्तः सच पण्डितः ॥२॥

इति श्रीमननग्रंथे कर्मव्यतिरिक्तात्मना अकर्तृत्वबोध ज्ञानप्रकरणं पंचमवर्णकं समाप्तं ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP