श्रीगणेशायनमः ॥ श्रीसरस्वत्यैनमः ॥ श्रीगुरुभ्योनमः ॥
जाग्रत्स्वप्नसुषुप्त्याख्यास्त्ववस्थाः काः किमात्मनः ॥
साक्षित्वमेषामित्येतत्सदृष्टांतं विचार्यते ॥१॥
आत्म्यास अवस्थात्रयसाक्षित्व जे ते श्रुतीचेठाई बोलिले आहे ॥ ते अवस्थात्रय न कळता अवस्थात्रयसाक्षित्व कळेना ॥ याकरिता आधी अवस्थात्रय निरुपितो ॥ अवस्थात्रय म्हणिजे जागृति स्वप्न सुषुप्ति अवस्था हे तिनि ॥ या तिममध्ये जाग्रदवस्था कोणती म्हणाल तरि सकळेंद्रियेकरून बाह्यार्थज्ञान जो पर्यंत होते तोपर्यंत जाग्रदवस्था स्वप्नावस्था कोणती म्हणाल तरि इंद्रियद्वारा बाह्यार्थज्ञान न होऊन मनच जाग्रदविषय संस्कारद्वारा विषयाकार आणि कर्त्ताद्याकार जोपर्यंत परिणामाते पावते तोपर्यंत स्वप्नावस्था ॥ सुषुप्त्यवस्था म्हणिजे इंद्रियेकरून बाह्यार्थज्ञान न होऊन आणि मनही कर्त्ताद्याकारे परिणामाते न पाऊन ॥ बुद्धि जे ते कारणात्मरूपे करून जोपर्यंत राहते तोपर्यंत सुषुप्त्यवस्था हे जे अवस्थात्रय त्याचे साक्षित्व आत्म्यास कैसे म्हणाल तरि अवस्थात्रयास मिळुन न मिळुन असुन अवस्थात्रय आणि अवस्थात्रयव्यापार ॥ अवस्थात्रय वान् यातें जाणने जे ते साक्षित्व ॥ या साक्षित्वास इतकी विशेषणे पाहिजेत काय म्हणाल तरि पाहिजेत ऐसे कोठे देखिले म्हणाल तरि दृष्टांति देखिले आहे ॥ तो दृष्टांत कोणता म्हणाल तरि ऋण जेणे दिधले त्याने ऋण घेतलियास माझे ऋण दे म्हणुन मागता तो काळांतरी देइन म्हणत असता याप्रकारे अन्योन्यमुहुर्त मात्र संवाद जाला त्यानंतरे ज्याणे ऋण दिधले त्याणे ऋण घेतलियास कठिणेकरून मागतो तो नाही म्हणत याप्रकारे मुहुर्तमात्र अन्योन्यकलह जाला ॥ त्या उपरि ते दोघेही राजगृहास जाऊन ज्याणे ऋण दिधले आणि आपलि गोष्टि सांगीतली ॥ म्या यास ऋण मागितले याने मज मारिले ॥ याउपरि दुसरियाने ही तैसेच सांगितले ॥ ऐसे अन्योन्यविरुद्ध उत्तर ऐकु न राजगृहीच्याने पुसि केली यास कोणी साक्षी आहे काय तव ते म्हणु लागले की साक्षी आहे ॥ त्याउपर साक्षी करून त्या दोघाच्या वृत्तांतही स्पष्ट जाला ॥ म्हणून त्या साक्षीचेठाई पूर्वोक्त साक्षिलक्षण आहे ॥ तरि त्या संवादियाचेठाई अवस्थात्रयव्यापार अवस्थात्रयअभिमानिपण आहे ॥ काय म्हणाल तरि आहे ॥ ते संवादी जवपर्यंत मौनेकरून होते तवपर्यंत सुषुप्ति अवस्थेस दृष्टांत ॥ त्या अवस्थेचेठाई ॥ व्यापारत्रय नाही ॥ मौनेकरून आहेत जे दोघे अवस्थावान् ॥ त्यानंतर सौजन्येंकरून जवपर्यंत बोलत होते तंवपर्यंत स्वप्नावस्थेस दृष्टांतया स्वप्नावस्थेचाठाईं व्यापारत्रय आहेत कोणते म्हणाल तरि हस्तचलनादिक का इकच्या पार अन्योन्यसंभाषणे वाचीकव्यापार ॥ उत्तरासप्रत्योत्तर ॥ चिंतन मानसीकव्यापार ॥ मृदु बोलणार दोघेजण जे अवस्थावान ॥ त्यानंतर जोपर्यंत कलह करित होते तोपर्यंत जाग्रदअवस्थेस दृष्टांत ॥ त्या अवस्थेचाठाईं व्यापारत्रय आहेत ॥ ते कोणते म्हणाल तरि अन्योन्यताडनादिक काइक व्यापार ॥ अन्योन्य पराक्रम बोलणे वाचिक व्यापार ॥ अन्योन्यवर्मचिंतन मानसीक व्यापार ॥ हे व्यापारत्रय कलह करणार दोघेही अवस्थावान् ॥ आता मध्यस्थ देवदत्त त्याचेठाई आत्मलक्षणे कैसी आहेत म्हणाल तरि देवदत्त त्याचे कलह पाहत होता म्हणून अवस्थात्रयास मिळुन असायाविषईं दृष्टांत ॥ त्यास साह्य होऊन एकही गोष्टि बोलिला नाही ॥ म्हणुन अवस्था त्रयासनामिळुन राहणेविषयी दृष्टांत ॥ ते अवस्थात्रय त्याचे व्यापार अवस्थाभिमानी जे यास जाणत आहे म्हणुन साक्षित्वविषइदृष्टांत याप्रकारें तो जो मध्यस्थ जो पुरुष त्याचेठाईं साक्षिरूप आत्मा त्याचे लक्षण आहे ॥ तरि दार्ष्टांतिकाचेठाईं साक्षी जो आत्मा त्यास इतकी विशेषणें आहेत काय म्हणाल तरि अवस्थात्रयासिमिळुन न मिळुन असून अवस्थात्रयाते याचे व्यापाराते अवस्थाभिमानी जे त्याते जाणताहे म्हणून तीनि विशेषणं आहेत ॥ आतां दार्ष्टांतिकाचे ठाईं अवस्थात्रय कोणते म्हणाल तरि जाग्रत्स्वप्नसुषुप्ति जे ते जाग्रत म्हणिजे निद्रेपासुन उठुन पुनः निद्रा ये जोपर्यंत जागृत ॥ यास दृष्टांत विशालनगरासारिखे ॥ जाग्रत् त्या नगरामध्ये ब्राह्मण क्षत्रीय याचे आळीसारिखे जाग्रदअवस्थेचेठाई काइक वाचिक मानसीक व्यापार ॥ त्या नगराच्या हाणिवृद्धीचा अभिमानी प्रभुसारिखे त्या जाग्रदव्थेचाठाई यावयाचे जे सुखःदुख तेणेरकरून तापाते पावणार विश्र्व जो तो अवस्थावान् ॥ स्वप्नावस्था म्हणिजे निद्राकाळाचेठाई जाग्रद्वासनामय मन जे तेणे करून कल्पिला जो प्रपंच त्याचेठाईं जोपर्यंत व्यवहार करितो तोपर्यंत स्वप्नावस्था यास दृष्टांत त्यानगरामध्ये आहे जो कोट त्याचेपरि स्वप्नावस्था त्या कोटामध्ये ब्राह्मणक्षेत्रीयवैश्य याचे आळीचेपरी स्वप्नावस्थेचेठाई काइक वाचिक मानसीक व्यापार ॥ त्या
कोटामधील म्हणि वृद्धीचा अभिमानी प्रभुसारिखे स्वप्नावस्थेचेठाई याव्याचे जे सुखःदुःख तेणेकरून तापाते पावणार तैजस जो तो स्वप्नावस्थावान् ॥ सुषुप्तिअवस्था म्हणिजे बाह्यव्यापार नसून अंतरव्यापार नसून शरीराचे स्मरणही नसुन जीव जोपर्यंत सुषुप्तावस्था ॥ यास दृष्टांत त्या कोटामधिल राजगृहासारिखे सुषुप्तिअवस्था राजगृहामध्ये ब्राह्मणक्षत्रियवैश्य याचे विथी जैसी नाहीत तैसे सुषुप्त्यावस्थेचे ठाईं काईक वाचीक मानसीक व्यापारही नाही ॥ त्या राजगृहाचे हाणिवृद्धीचा अभिमानी राजा जैसा तैसे सुषुप्तिअवस्थेचेठाई ही निजानंदाते अनुभवणार प्राज्ञ अभिमानी सुषुप्त्यावस्थावान् ॥ या अवस्थात्रयाचे साक्षीत्व आत्म्यास कैसे म्हणाल तरि कालिची जाग्रदवस्था त्या अवस्थेचाठाई काइक वाचिक मानसीक व्यापार तो अवस्थावान् ॥ कालिची स्वप्नावस्था त्या अवस्थेचेठाईं काइक वाचीक मानसीक व्यापार तो अवस्थावान कालिची सुषुप्तिअवस्था अवस्थेचेठाइंचे त्रिविधव्यापाराचे नाहीपण जे ते जो अवस्थाअभिमानी ॥ हे इतकेही आजि आह्मास दिसतेत की हे स्मरण बोलावे की अनुभव म्हणुन बोलावे ॥ म्हणाल तरी अनुभव म्हणावे जरि ते विषयसंनिकर्ष आता नाहीत याकरिता ते अनुभव म्हणता नये ॥ स्मरणच म्हणून बोलावे तरी स्मरण अनुभूत वस्तुविषयइक किंवा अननुभूतवस्तुविषइक म्हटिले तरि अननुभूतवस्तुविषइक स्मरण होते म्हटिले तरि प्रपंच व्यापार मात्राचे स्मरण जाले पाहिजे स्मरण होत नाहिकी याकरिता स्मरण अनुभूत वस्तुविषइक बोलावे ॥ तरि कोणाकरून अनुभविजेते म्हणाल तरि आम्हाकरून अनुभविजेत आहे तरि आम्ही त्यासि मिळुन अनुभविले किंवा न मिळुन अनुभविले ॥ न मिळुन अनुभविले तरि स्वर्गादिकाचेठाई विषय आता अनुभवीले पाहिजेत ॥ अनुभविजेत नाहीकी याकरिता मिळुनच अवस्था ॥ अवस्थाव्यापार अवस्थावान् याते अनुभविले म्हणुन बोलावे ॥ तरि या अवस्थादिकासि न मिळुन राहणे कैसे म्हणाल तरी ॥ कालिची जाग्रत्स्वप्नसुषुप्तिअवस्था अवस्थाव्यापार अवस्थावान् हे अवघे नाशाते पावले असता आम्ही नाशाते पावलो नाही ॥ याकरिता या अवस्थात्रयास मीळालो नाही ॥ या अवस्थादिकासि मिळालो असतो तरि अवस्थादिकाबरोबरि आम्हीही नाशाते पावतो ॥ त्यासी मिळालिया त्याबरोबरि नाशाते पावावे ऐसा नियम आहे काय म्हणाल तरि ॥ वस्त्रादिकास मीळाले जे चित्रादिक ते वस्त्रादि नाशाते पावले असता त्याबरोबर जैसे नाशाते पावताहेत ॥ तैसे आम्हीही त्या अवस्थादिकास मिळालो असतो तरी नाशाते पावतो ॥ म्हणून त्या अवस्थादिकास आम्ही न मिळुनच आवस्थादिकास जाणतो ॥ याकरिता साक्षीलक्षण आमचेठाईं सिद्ध आहे ॥ पूर्वोक्त प्रकारे आम्हीच अवस्थात्रयसाक्षी ॥ आता तुझी बोलिला प्रकार अवस्थादिजाणतो म्हणुन अवस्थावानासच साक्षित्व सिद्ध असता अवस्थावानास साक्षीत्व न बोलुन त्याहून व्यतिरिक्त जो त्यास साक्षित्व बोलिलेत ॥ एैसे कां म्हणाल तरि अवस्थावानास साक्षित्व घडेना म्हणून त्याहून व्यतिरिक्त जो त्यास साक्षित्व बोलिले ॥ ते कैसे म्हणाल तरि अवस्थावान् जो तो बाह्य वृक्षादिक अंतर देहादिकाचेवाणी विकारी म्हणुन त्या वृक्ष आणि देहादिकास अन्यपदार्थावभासकरूप साक्षीत्व नाही ॥ हा विकारी आहे याकरिता यास साक्षित्व घडेना यावेगळा साक्षी येक दिसेना की आहे म्हणून कैसे जाणावे म्हणाल तरि हा अवस्थावान् कालि ज्या सुखदुःखास मिळुन होता त्या सुखदुःखासी न्यून अथवा अधिक सुखःदुखासी मिळुन आहे म्हणून याअवस्थावानाचे विकार जो जाणतो तो या अवस्थावानाहुन व्यतिरिक्त साक्षी म्हणुन जाणूये ॥ निर्विकार जो आत्मा तो मी साक्षी म्हणून जाणत नाही कीं ॥ विकारी अवस्थावान् तो मी साक्षी म्हणुन जाणतो ॥ म्हणुन निर्विकारी आत्मा मी साक्षी ऐसे जाणतो म्हणुन कैसे म्हणाल तरि दृष्टांतपूर्वक निरूपितो ॥ तो दृष्टांत कोणता म्हणाल तरि दर्पणाचेठाई ग्रीवास्थमुख प्रतिबिंबुन त्या प्रतिबिंबद्वारा आपुले सौंदर्यत्व सुरूपत्वादिक जैसे जाणतो तैसे निर्विकार आत्मा अंतःकरणामध्ये प्रतिबिंबद्वारा मी निर्विकार साक्षी म्हणुन जाणतो त्या दृष्टांताचाठाइं दृश्य दर्पण त्यामध्ये प्रतिबिंबले जे हे दोन्ही ग्रिवास्थमुखाचेठाई आहेत जे सौंदर्यकुरूपत्वादिक जैसे जाणु सकत नाहीत ॥ तैसे दृश्य अंतःकरण त्याचेठाईं प्रतिबिंबला जो दृश्य विकारी चिदाभासही आपणास आधिष्ठान आत्मनिष्ठसाक्षित्व जाणू सकेना म्हणून निर्विकारी आत्मा स्वतः मी साक्षी ऐसे नेणे जरिही विकारी जो अवस्थावान् तो मी साक्षी म्हणुन जाणनारियाचे ॥ वाणी दिसले जरिही विकारी जो त्यास साक्षीत्व घडेना ॥ तो जो निर्विकारी आत्मा त्यासच साक्षित्व घडते ॥ ते जे साक्षलक्षण आमच्याठाईं आहे म्हणून आम्हीच साक्षी आमचेठाई साक्षित्व पूर्वि सिद्ध आहे किंवा आता साधनेंकरून सिद्ध आहे म्हणाल तरि विवादकरणारीयाचा जो साक्षी त्याचेठाईं साक्षित्व जे आहे ते साधनेकरून सिद्ध न होऊन पूर्वीच जैसे सिद्ध आहे ॥ तैसे आमचेठाईं आहे जे साक्षित्व साधनेकरून सिद्ध न होऊन पूर्विच सिद्ध आहे ॥ तरि पूर्वि हे काही दिसले नाही का म्हणाल तरी विचार नाही म्हणुन दिसले नाही ॥ विचारून पाहाता आत्म्यासच साक्षित्व नित्यसिद्ध आहे ॥ या विचाराचे फळ काय म्हणाल तरि विवाद करणारियाचा साक्षी जो देवदत्त त्याहुनि अन्य जे संवादी त्याच्या अवस्था अवस्थाव्यापार अवस्थावत्व देवदत्तास नाही ॥ याकरिता हे अवस्थाविकार त्यास जैसे स्पर्श करू सकत नाहीत ॥ हे अवस्थादिक अवघियातेही तो उदासीन होऊन पाहात होता म्हणुन या अवस्थादिकाचा साक्षी होऊन जैसा तो आहे तैसे आम्हाहुन अन्य जो साभासाहंकार त्याचे अवस्थात्रय अवस्थाव्यापार अवस्थावत्व आम्हास नाही म्हणून हे अवस्था विकार अवस्थावत्व आम्हास स्पर्श करू सकत नाहीत हे अवस्थादिक अवघे आम्ही उदासिन होऊन पाहात आहो म्हणून हे अवस्थादिक जे याचे काळत्रयाचेठाईही साक्षी होऊन आहे म्हणून निश्र्चय होणे ॥ याविचाराचे फळ पूर्वोक्तप्रकारे बरवे विचारून आपण साक्षी म्हणुन जो जाणतो तो कृतार्थ तोच जीवन्मुक्त म्हणु न वेदांतसिद्धांत अवघे बोलताहेत ॥ याअर्थी संशय नाही सिद्ध ॥
इन्द्रियैरूपलिब्धिः स्यादर्थांना जाग्रदात्मनः ।
निद्रायां मनसैवार्थोपलब्धि स्वप्न उच्यते ॥१॥
सर्वविज्ञानरहिता सुषुप्तिः स्यात्सुखात्मिका ।
तद्व्यापाराः कायिकाद्यास्तद्वन्विश्र्वादिनामकः ॥२॥
अवस्थाद्यैस्तु संयुक्तस्तत् ज्ञातृत्वादयं भवेत् ।
अवस्थाद्यैरसंयुक्तस्तन्नाशेऽप्यस्य संस्थितेः ॥३॥
यथा विवादकर्तृणां साक्षीचैत्ररथः सदा । अवस्थादि विकाराणां साभियुक्तः स्वयं तथा ॥४॥
अहं साक्षीति यो विद्याद्विविच्यैवं पुनःपुनः ।
स एव मुक्तः सो विद्वान्निति वेदान्तडिण्डिमः ॥५॥
॥ इति श्री वेदान्तसारे मननग्रन्थे अवस्थात्रयसाक्षित्व निरूपणं नाम नवम वर्णकं संपूर्णमस्तु ॥