१ अनंतर्यव्रत :
एक स्त्रीव्रत. व्रतारंभ मार्ग. शु. तृतीयेपासून करतात. प्रत्येक पंधरवड्यातल्या तृतीयेस उपवासपूर्वक उमेची पूजा करणे, हा या व्रताचा विधी आहे. व्रतावधी एक वर्ष. फल- पतिपुत्रांचा अवियोग.
२ आनंद तृतीया व्रत :
वैशाख, भाद्रपद व मार्गशीर्ष या मासातल्या तृतीयेस ललितादेवीची पूजा करून त्याचबरोबर सुवासिनींचीही पूजा करणे, हा या व्रताचा विधी आहे.
३ अभीष्ट तृतीया :
मार्गशीर्ष शु. तृतीयेस हे व्रत करतात. एक तिथिव्रत. या दिवशी गौरीची पूजा करून अभीष्ट सिद्धीसाठी तिची प्रार्थना करतात.
४ गिरीतनयाव्रत :
मार्ग. शु. तृतीयेस या व्रताचा आरंभ करतात. प्रत्येक महिन्यात निरनिराळ्या नावांनी व फुलांनी गौरीची पूजा करावयाची असते, असा या व्रताचा विधी आहे.व्रतावधी -एक वर्ष.
५ नामतृतीया :
हे तिथिव्रत आहे. मार्ग. शु. तृतीयेस या व्रताचा आरंभ करतात. व्रतावधी एक वर्ष. गौरी, काली, उमा, भद्रा, दुर्गा, कांती, सरस्वती, मंगला, वैष्णवी, लक्ष्मी, शिवा, नारायणी या गौरीच्या बारा नावांपैकी एकेका नावाने प्रत्येक महिन्याला तिची पूजा करतात. या व्रताचे आणखी दोन पर्याय आहेत ते असे-
(१) अर्धनारीनटेश्वर हे महेश्वराचे रूप समजून त्याची पूजा करणे.
(२) केशवापासून दामोदरापर्यंतच्या बारा नावांपैकी एकेका नावाने हरिहराच्या मूर्तीची एकेक महिना पूजा करणे
फल- स्वर्गप्राप्ती.