१ अखंड द्वादशी :
मार्ग. शु. द्वादशीस उपवास व पूजा. फल-यज्ञातील वैकल्य दूर होते. हेमाद्रींच्या मते आश्विन शु. द्वादशी, एकादशीस उपवास व विष्णुपूजा. व्रतावधी एक वर्ष. फल- धर्मकृत्यातील न्यून कमी होते.
२ अरण्य द्वादशी किंवा मल्लद्वादशी :
तिथिव्रत. मार्ग. शु. एकादशी किंवा कृत्यमयूखाच्या मते चैत्र किंवा श्रावण शु. एकादशी. व्रतावधी एक वर्ष. यात गोविंदपूजा द्वादशीस अरण्यात जाऊन पारणे करावयाचे असते. पारण्यास बारा ब्राह्मण, यती किंवा दंपती यांस भोजन घालातात.
३ कामद्वादशी :
मार्गशीर्ष शु. द्वादशीस व्रतारंभ करतात. व्रतावधी एक वर्ष प्रत्येक द्वादशीस कामदेवाची पूजा करणे, असा या व्रताचा विधी आहे.
४ जनार्दनपूजा :
मार्ग. शु. द्वादशीला प्रातःस्नान करुन शुचिर्भूत व्हावे. भगवान विष्णूची पूजा करुन उपवास करावा. पंचगव्याने स्नान करावे. ते स्वतः प्राशन करावे. जव व तांदूळ भरलेले पात्र ब्राह्मणाला द्यावे. तसेच
'सप्तजन्मसु यत्किंचिन्मया खंण्डव्रतं कृतम् ।
भगवंस्त्वत्प्रसादेन तदखण्डमिहास्तु मे ॥'
यथाखिलं जगत्सर्वं त्वमेव पुरुषोत्तम ।
तथाखिलान्यखण्डानि व्रतानि मम सन्तु वै ॥'
अशी प्रार्थना करावी.
५ तारक द्वादशी किंवा व्यंजन द्वादशी :
मार्ग. शु. द्वादशीला तारकद्वादशी म्हणतात. हे व्रत या दिवशी सुरू होऊन वर्षभर चालते. हे व्रत सूर्य आणि ग्रह यांच्या प्रीत्यर्थ असते. व्रत सुरू झाल्यानंतर प्रत्येक महिन्यात विविध प्रकारच्या अन्नभोगांनी ब्राह्मणाला संतुष्ट करतात आणि ग्रहांना अर्घ्य देतात.
फल- पापनाश.
६ द्वादशादित्य व्रत :
मार्ग. शु. द्वादशीपासून एक वर्षपर्यंत प्रत्येक शु. द्वादशीला पुढील नाममंत्रोच्चारपूर्वक भगवान सूर्यनारायणाची यथाविधी पूजा करावी आणि जितेंद्रिय स्थितीत राहून व्रताचरण करावे, म्हणजे सर्व प्रकारच्य़ा आपत्ती दूर होतात आणि सर्व सुखांची अभिवृद्धी होते. दर महिन्याचा नाममंत्र असा-
(१) मार्गशीर्षात - धात्रे नमः ।
(२) पौषात - मित्राय नमः ।
(३) माघात - अर्यम्णे नमः।
(४) फाल्गुनात - पूष्णे नमः ।
(५) चैत्रात - शक्राय नमः ।
(६) वैशाखात - अंशुमते नमः ।
(७) ज्येष्ठात - वरुणाय नमः ।
(८) आषाढात - भगाय नमः ।
(९) श्रावणात - त्वष्ट्रे नमः ।
(१०) भाद्रपदात - विवस्वते नमः ।
(११) अश्विनात - सवित्रे नमः ।
(१२) कार्तिकात - विष्णवे नमः ।
७ द्वादशी व्रत :
मार्ग. शु. द्वादशी. या व्रताचे दोन पर्याय आहेत.
(१) व्रतावधी एक वर्ष किंवा आयुष्यभर. एकादशीला उपवास. द्वादशीला वासुदेवाची पूजा असा त्याचा विधी आहे. हे व्रत अंबरीष राजाने वर्षभर केल्याची भागवतात कथा आहे.
(२) द्वादशी दिवशी
'नमो नारायणाय ।'
या मंत्राने तीर्थाचे अभिमंत्रण व तीर्थोदकाची स्तुती करावी. नंतर स्नान करुन सुर्याला अर्घ्य द्यावेत, आणि ब्राह्मण, गाय, सुवर्ण यांना स्पर्श करून सूर्यप्रतिमेची पूजा करावी. ब्राह्मण-भोजन घालून मग पारणे करावे. अशा प्रकारे बारा द्वादशींना व्रत करावे, असे पद्म पुराणात सांगितले आहे.
८ मत्स्यद्वादशी :
मार्ग. शु द्वादशीला हे व्रत करतात. या व्रातात नारायणाची पूजा करतात. पाण्याने भरलेली चार पात्रे घेऊन त्यावर फुले वाहतात. त्यावर तिळाने भरलेले ताट ठेवतात. चार पात्रे म्हणजे चार सागर आहेत, असे मानतात. मग मत्स्यावतारी विष्णूची मूर्ती करून तिची पूजा करतात. रात्री जागर करतात. नंतर चार पात्रांसहित सर्व वस्तू दान देतात.
फल- पापनाशन.
या व्रताचा पर्याय आणखी एक आहे. असा - मार्गशीर्ष शु. दशमीला सुरुवात करून एकद्शीला उपवास, द्वादशीला थोडी चिकण माती आणून आदित्याला अर्पण करतात. नंतर माती अंगाला लावून स्नान करतात.