१ दशादित्यव्रत :
ज्या शु. दशमीला रविवार असेल अशा कोणत्याही महिन्यातील दशमीला हे व्रत करतात. असे असले तरी मार्गशीर्ष, माघ आणि वैशाख महिन्यात प्रारंभ केला असता अधिक फल मिळते. मार्ग. शु. दशमीस रविवार असेल तर नदी, तलाव, अगर ओढ्याकाठी जाऊन प्रातःस्नानादी नित्यकर्मे करावी. पुन्हा मध्यान्हस्नान करुन घरी यावे आणि देवता-पितृगण तृप्त करुन एक वेदी बनवावी.
(१) त्या वेदीवर १२ पाकळ्य़ांचे कमळ काढावे व त्यावर सुवर्णाची सूर्यमूर्ती स्थापावी. तिचे सूर्यमंत्रोच्चारपूर्वक आवाहन, आसन, पाद्य अर्घ्य आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, अक्षत, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, आचमन फळ, तांबूल, दक्षिणा आणि विसर्जन अशा उपचारांनी पूजन करावे.
(२) गाईच्या शेणाने सारवलेल्या वेदीवर काळ्या रंगाने १ दुर्मुखी, २ दीनवदना, ३ मलिना, ४ सत्यनाशिनी, ५ बुद्धिनाशिनी, ६ हिंस्त्रा, ७ दुष्टा, ८ मित्रविरोधिनी, ९ उच्चाटनकारिणी, १० दुश्चिंतप्रदा या पुतळ्या लिहून त्यांच्या नाममंत्रोच्चारपूर्वक त्यांची पूजा-प्रतिष्ठा करावी आणि
नित्यं पापकरे पापे देवद्विजविरोधिनी ।
गच्छ त्वं दुर्दशे देवि नित्यं शास्त्रविरोधिनि ॥'
अशी प्रार्थना करुन विसर्जन करावे.
(३) सूत किंवा रेशमाच्या १० धाग्यांचा बनविलेला दोरा घेऊन त्याला दहा गाठी माराव्या. आवाहनादी षोडशोपचारे त्याची पूजा करावी. नंतर
'ततः समापयेद् देवं भास्करं च दशाकरम् ।
दुर्दशानाशनं देवं चिंतयेद् विश्वरूपिणम् ॥
अशी सूर्याची प्रार्थना करावी. दक्षिणेसहित १० फळे घेऊन
'भास्करो बुद्धिदाता च द्रव्यस्थो भास्करः स्वयम् ।
भास्करस्तारकोमाभ्यां भास्कराय नमो ऽ स्तु ते. ॥
म्हणून वायनप्रदान करून भोजन करावे. आणि
(४) वेदीवर चंदनाच्या गंधाने १ सुबुद्धिदा, २ सुखकारिणी, ३ सर्वसंपत्तिदा, ४ इष्टभोगदा, ५ लक्ष्मी, ६ कांतिदा, ७ दुःखनाशिनी, ८ पुत्रप्रदा, ९ विजया आणि धर्मदायिनी अशा १० पुतळ्या लिहून त्यांचे नाममंत्रोच्चारपूर्वक षोडशोपचारे पूजन करावे आणि
' विश्वद्धवसनां देवीं सर्वाभरणभूषिताम् ।
ध्यायेद्दशदशां देवीं वरदाभयदायिनीम् ॥'
अशी प्रार्थना करुन भोजन करावे. दुर्दशा नाहीशी होते 'दुर्दशा का प्राप्त होते ?' असा प्रश्न नारदमुनींनी विचारला असता कश्यपमुनी म्हणाले, 'धान्याचा कोंडा, भस्म, आणि मुसळ यांना ओलांडले असता; कुमारी, धोबीण, व वृद्ध स्त्री यांच्याशी संग केला असता; अयोनी (मुख, हस्त, गुद) किंवा ब्राह्मणी आदिकांपाशी ब्रह्मचर्याचा भंग केला असता; सायंकाळी, प्रभातकाळी, अगर पर्वकाळी रजस्वला स्त्रीच्या जवळ गेले असता; संकटकाळी माता, पिता किंवा धनी यांचा त्याग केला असता आणि आपले परंपरागत धर्म, कर्म व सदाचार यांचा त्याग केला असता दुर्दशा प्राप्त होते. तेव्हा न्यायमार्ग, आणि सत्कर्म यातच रत असावे. संकटकाळी दशादित्यव्रत करावे. नलराजा आणि पांडव यांनी संकटकाळी हेच व्रत केले होते.
२ धर्मत्रयव्रत :
(१) मार्ग. शु. दशमीला उपवास करुन धर्माची पूजा करावी. तुपाची आहुती द्यावी आणि ब्राह्मणभोजन घालावे.
(२) वद्य पक्षातील दशमीला धर्माची पूजा करुन व्रत करावे.
(३) दोन्ही दशमींना धर्माची यथाविधी पूजा करुन व्रत केले असता या व्रतयात्रेने पापांचा नाश होऊन आयुरारोग्य, आणि ऐश्वर्य यांची अभिवृद्धी होते.
३ पदार्थदशमी :
मार्ग. शु दशमीपासून एक वर्षपर्यंत दर शु. दशमीला इंद्र, अग्नी, यम, निऋती, वरूण, वाय़ू, कुबेर, ईशान, ब्रह्मा, आणि अनंत अशा दहा दिशापतींची गंधपुष्पादिकांनी पूजा करावी. वर्ष पूर्ण झाल्यावर ब्राह्मणभोजन घालावे, म्हणजे व्यापार, व्यवासाय, व्यवहार यामध्ये सफलता प्राप्त होते. शिवाय विद्याधनादीची वृद्धी होते आणि शत्रूंचा नाश होतो