१ नागपंचमी :
हे व्रत श्रावण शु. पंचमीचे म्हणून प्रसिद्ध असले तरी स्कंदपुराणात म्हटल्याप्रमाणे
'शुक्ला मार्गशिरे पुण्या श्रावणे या च पंचमी ।
स्नानदानैर्बहुफला नागलोकप्रदायिनी ॥ '
या वचनानुसार मार्ग. शु. पंचमीलाही नागांची पूजा केल्याने व एकभुक्त व्रत केल्याने फलप्राप्ती होते.
२ नागदिवाळी :
मार्ग. शु. पंचमीला हे नाव आहे. या दिवशी नागप्रतिमेची पूजा करण्याची व घरात जेवढे पुरुष असतील त्यांतील प्रत्येकाच्या नावाने एकेकपक्वान्न करून त्यावर दिवा लावण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. दिवा हे दीर्घायुष्याचे प्रतीक, नाग हे कुलाच्या मूळपुरुषाचे प्रतीक मानतात. या मूळपुरुषाच्या कृपेने घरातल्या हयात पुरुषांना दीर्घायुष्य लाभावे , असा यात हेतू असतो.
३ श्रीपंचमी :
या व्रतात आरंभ मार्ग. शु. पंचमीला होतो. त्यासाठी हाती कमलपुष्प घेतलेल्या, कमलासनावर बसलेल्या आणि दोन गजेंद्रांनी आपल्या सोंडांमधून सोडलेले दूध अगर जल याने स्नान करणार्या लक्ष्मीचे चित्तामध्ये ध्यान करावे आणि सुवर्णादिनिर्मित्त मूर्तीसमोर व्रतसंकल्प करावा. तीन प्रहर दिवस लोटल्यावर गंगेच्या अगर विहीरीच्या पाण्याने स्नान करावे. नंतर उपर्युक्त मूर्तीची सुवर्णादीच्या कलशावर स्थापना करुन सर्वप्रथम देवगण व पितृगण तृप्त करावे (अर्थात गणपतिपूजन, मातृकापूजन आणि नांदी श्राद्ध करावे). नंतर ऋतुकालोभ्दव फलपुष्पादी घेउन उपलब्ध उपचारद्रव्यांनी लक्ष्मीचे पूजन करावे. गंधविलेपनापूर्वी १ चंचला, २ चपला, ३ ख्याती, ४ मन्मथा, ५ ललिता, ६ उत्कंठिता, ७ माधवीं, ८ श्री अशा अष्टनामोच्चारांनी १ पाद, २ जंघा, ३ नाभी, ४ स्तन, ५ भुजा, ६ कण्ठ, ७ मुख आणि ८ मस्तक अशा अष्टांगांची पूजा करावी, नैवेद्य अर्पण करावा आणि सवाष्ण स्त्रिला कुंकू लावून तिला जेवू घालावे. तिच्या पतीला
'श्रीर्मे प्रीयताम् '
म्हणून एक शेर तांदूळ व तूप देऊन भोजन करावे. अशा तर्हेने १ मार्गशीर्ष - श्री, २ पौष - लक्ष्मी, ३ माघ - कमला, ४ फाल्गुन - सम्पद, ५ चैत्र - पद्मा, ६ वैशाख - नारायणी, ७ ज्येष्ठ - धृती, ८ आषाढ - स्मृती, ९ श्रावण - पुष्टी, १० भाद्रपद - तुष्टी, ११ आश्विन - सिद्धी, १२ कार्तिक - क्षमा याप्रमाणे बारा महिन्यांत बारा देवींची यथासांग व यथाक्रम पूजन करावे, मंडप उभारावा. त्यात वस्त्रे, भूषणे व पात्रे यांनी युक्त शय्येवर लक्ष्मीचे पुन्हा पूजन करून ती सवत्स धेनूसह ब्राह्मणास द्यावी. नंतर भोजन करावे. असे व्रत केले असता पुत्र-सुख, सौभाग्य आणि अचल लक्ष्मी प्राप्त होते.
याच दिवशी कार्तिकेयाचा देवसेनेशी विवाह झाला. याच दिवशी शरीरिणी श्री त्याच्या आश्रयाला आली. ज्या दिवशी हे श्री-कार्तिकेय यांचे मीलन झाले, तो महातिथी लोकांत 'श्री-पंचमी' म्हंणून प्रसिद्ध पावली.