१ उभयैकादशी :
एक तिथीव्रत. मार्ग. शु. एकादशीला आरंभ. व्रतावधी एक वर्ष. वद्य पक्षातील एकादशीला विष्णूची केशव, नारायणादी नावांनी पूजा करतात. गुर्जर लोकांत फक्त 'उभया' असे म्हणतात.
२ दीपव्रत :
मार्ग. शु. एकादशीला या व्रताचा आरंभ करतात. हे व्रत एक वर्षभर करावयाचे असते. याचा विधी - पहाटे नदीवर स्नान करतात. नंतर वैदिक मंत्र म्हणून लक्ष्मीनारायणाला पंचामृताने स्नान घालतात. तांब्याच्या अथवा मातीच्या दिव्यात नऊ धाग्यांची वात घालून तो दिवा देवापुढे ठेवतात. उद्यापनाच्या वेळी सोन्याचा दिवा करून दान देतात.
फल-विष्णुलोकप्राप्ती.
३ शुक्लैकादशी :- मोक्षदा एकादशी व गीता जयंति :
शुद्धा एकादशी, तसेच नियमादिविषयक निर्णय पूर्वीप्रमाणे घेऊन मार्ग. शु. दशमीच्या दिवशी मध्यान्ही जवाची भाकरी व मुगाची डाळ याचे एकच वेळ भोजन करावे आणि एकादशीच्या दिवशी प्रातःस्नानादी नित्य कर्मे उरकून उपोषण करावे. श्रीविष्णूची पूजा करावी. रात्री जागर करून द्वादशीला एकभुक्त राहून पारणे करावे. ही एकादशी मोहाचा नाश करणारी आहे. म्हणून हिला 'मोक्षदा' एकादशी म्हणतात. त्याच दिवशी गीता, श्रीकृष्ण, व्यास आदींच्या पूजा करून गीताजयंतीचा उत्सव साजरा करावा. गीतापाठ, गीतेवर व्याख्यान, प्रवचन इ. कार्यक्रम करावे. शक्य असेल तर गीतेची मिरवणूक काढावी.